एक आवेग... ध्यासाने पछाडलेला

 विवेक मराठी  06-Dec-2017

*** अरुण करमरकर****

या वर्षी होणाऱ्या 18व्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गिरीश प्रभुणे यांची निवड झाली आहे. समरसतेची भावात्मक संकल्पना साहित्यातून प्रकट होणारी आणि जोपासली जाणारी समरसता प्रकट होणाऱ्या संवेदनेला अक्षरबध्द करणारे साहित्य इ.चा उत्सव म्हणून समरसता साहित्य संमेलनाकडे पाहायचे झाले, तर गिरीश प्रभुणे यांची ही निवड सर्वथा उचित म्हणावी लागेलच.

गिरीश यशवंत प्रभुणे... मला वाटते हा एक साडेनऊ अक्षरी समाजमंत्र आहे. मंत्रामध्ये एक गूढता असते, खोलवर दडलेले एक मर्म असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंत्रामध्ये एक सामर्थ्यही असते. गिरीश प्रभुणे यांच्या व्यक्तिमत्त्वात हे सगळे काही आहे. मर्म आहे समाजभक्तीचे, सामर्थ्य आहे एका अत्यंत उदात्त चळवळीचे... अन् तरीही त्यांचे व्यक्तित्व काहीसे गूढ आहेच. लौकिक जीवन अत्यंत संपन्न, मानसन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे होण्यासाठी आवश्यक असलेली गुणसंपदा त्यांच्यापाशी जरूर आहे अन् तरीही त्यांना ओढ आहे ती भौतिक श्रीमंतीकडे, समृध्दीकडे उदासवृत्तीने पाहत समर्पित जीवन जगण्याची. कुटुंबजीवनाकडे त्यांनी पाठ फिरवलेली नाही, पण त्यात पूर्णपणे रममाण होण्याचा रूढमार्गही त्यांनी पत्करलेला दिसत नाही. कलंदरपणा जणू जन्मजात त्यांना लाभला आहे. त्यामुळे सामान्यत: नकळत्या समजल्या जाणाऱ्या शालेय वयातच घरातून निघून जाऊन भटकेपणाने समाजदर्शन घेण्याकडेही ते धावले होते. तिथून परतले, शालेय महाविद्यालयीन शिक्षणाच्या आणि विवाह करून घर-संसार साकारण्याच्या 'सामान्य' मार्गावर चालतही राहिले. पण तसे चालतानाही त्यांची दृष्टी लौकिकापार जाणाऱ्या दिशांचाच वेध घेत राहिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांचे बाळकडू त्यांच्या वृत्तींमध्ये भिनले आहे, पण स्वतंत्र विचाराची कवाडे त्यांनी बंद केली नाहीत.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करीत असतानाच या 'समाजमंत्रा'ची अक्षरे ठळक होऊ लागली. गावातल्या (चिंचवड) अनिष्ट, अनैतिक आणि अवैध कारवायांच्या विळख्यात सापडलेला क्रांतिवीर चापेकरांचा वाडा मुक्त करण्याच्या कामी प्रभुणे सरसावले. जोखीम तर या कामात होतीच. प्रत्यक्ष संघर्षाला, मारामारीलाही तोंड द्यावे लागले. पण गिरीशजी आणि त्यांचे मोजकेच तरुण सहकारी हटले नाहीत. तो भग्न होऊ पाहणारा वाडा त्यांनी मुक्त केलाच, शिवाय क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती स्थापन करून एका तेजस्वी प्रेरणेच्या स्मृती दीर्घकाळपर्यंत जोपासण्याची व्यवस्थाही निर्माण केली. चिंचवडच्या हमरस्त्यावर क्रांतिवीर चापेकरांची प्रतिमा आज दिमाखाने उभी आहे, तर चापेकर वाडा आता 'क्रांतितीर्थ' बनला आहे. एवढेच नव्हे, तर तेथे एका भव्य आणि दूरदर्शी प्रकल्पाचे रूप घेण्याच्या दिशेने पावले पडू लागली आहेत. पदवी शिक्षण घेत असतानाच गिरीश प्रभुणे याचे समाजनिरीक्षणही साक्षीभावाने सुरू होते. पुढे जे काही करायचे ते समाजाभिमुख आणि समाजोन्नतीसाठीच, हा निश्चयही हळूहळू पण ठामपणाने मनात साकार होत होता. त्या निश्चयाला व्यवहार देण्याच्या मार्गाचा शोध त्याचे मन घेऊ लागले होते. त्याच शोधातून 'असिधारा' नावाचे साप्ताहिक चालवणे, संघाचा प्रचारक या नात्याने काम करणे, 'माणूस'कार श्री.ग. माजगावकरांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या 'ग्रामायन' चळवळीचा पूर्णवेळ कार्यकर्ता बनून निमगाव म्हाळुंगी या गावात जाऊन राहणे... यासारखे अर्थपूर्ण टप्पे ओलांडले. व्यक्तित्त्वाचे गूढ पैलू अधिक गहिरे होत गेले. वैचारिक निष्ठा आणि व्यक्तिजीवनाचा व्यवहार या दोन्ही पातळयांवर गिरीश प्रभुणे यांचा हा मंत्र नांदत होता. रा.स्व. संघाच्या संस्कारवास्तूत पण गवाक्षातून त्यांची दृष्टी मात्र वेध घेत होती समाजाच्या सांदीकोपऱ्यांची. सामाजिक समरसता मंचाच्या कामातील त्यांचा सहभाग या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला, असे म्हणायला हवे. सलग दहा वर्षे सामाजिक समरसता मंचाचे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री या नात्याने गिरीशजी महाराष्ट्रात फिरत होते. भटकंतीचे चक्र तर त्यांच्या पायाला जन्मापासूनच बांधले गेले होते. त्याच भटकंतीने त्यांना आणून सोडले त्या सांदीकोपऱ्यात तगमगलेल्या भटक्या बांधवांपाशी. ब्रिटिशांनी गुन्हेगारी जमातीचा शिक्का मारून उघडया कारागृहात बंदिस्त केलेले हे बांधव. स्वातंत्र्यानंतर त्यांच्या सेटलमेंटभोवतीच्या कुंपणाच्या तारा कापल्या गेल्या. भटके बांधव विमुक्त झाले खरे, परंतु त्यांच्याभोवती वेढलेली गुन्हेगारीच्या तप्तमुद्रेची रंगीत पारदर्शिका मात्र दूर झाली नाही. लोक आणि पोलीस प्रशासनही त्याच रंगातून त्यांच्याकडे पाहत राहिले. तर दुसरीकडे (तथाकथित) आधुनिक जीवनशैलीने त्यांच्या कौशल्यांना आणि पर्यायाने सन्मानजनक चरितार्थाला झाकोळून टाकले. भीक मागणे किंवा चोऱ्या करून पोट भरणे याशिवाय अन्य पर्याय शिल्लकच राहिला नाही. सामान्य सन्मान तर दूर, साधी नागरिकत्वाची खूणही त्यांना उपलब्ध राहिली नाही. गरिबी, बेकारी, अपमान, अत्याचार, अवहेलना, निरक्षरता, दुष्ट रूढी अशा मागासलेपणाच्या समस्त बेडयांनी घट्ट जखडलेला हा समूह - गिरीशजी या समूहात ती पूर्वग्रहित पारदर्शिका निकराने भेदून घुसले. साऱ्या अस्मानी, सुलतानी अतिक्रमणाच्या विरोधात आपल्या छातीचा कोट करून त्यांच्यासोबत उभे राहिले. अगदी आप्तस्वकीयांसह साऱ्या प्रस्थापित, पांढरपेशा व्यवस्थांशी झुंज देऊ लागले. पोलिसी दंडेलीसमोर ठामपणे उभे राहण्यापासून केविलवाण्या लहानग्यांना पोटाशी घेण्यापर्यंत सर्व स्तरात त्यांनी चिवट लढा उभारला.

पंचवीस वर्षे होऊन गेली. प्रभुणेंचा हा लढा उत्तरोत्तर अधिकाधिक रोमहर्षक बनत आला आहे. सारा समाज 'आपला' म्हणायचा आणि ते आपलेपण पावलोपावली निभवायचे, हा अर्थ त्यांनी समरसतेच्या संकल्पनेला प्राप्त करून दिला. सहसंवेदनेची कणव केवळ भावनिकतेच्या आणि करुणेच्या पुरतीच बंदिस्त न ठेवता वैज्ञानिक डोळसपणाचे कोंदण तिला देऊन या 'आपल्या' बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीची वाट प्रशस्त करण्याचा आटापिटा त्यांनी सुरू केला. तुळजापूरजवळच्या यमगरवाडीच्या माळावर पारधी आणि अन्य भटक्या जमातींची बालके शिक्षणाची आराधना करू लागली. पाठोपाठ कोल्हाटी, मसणजोगी, नंदीबैलवाले अशा अन्य जमातींचे तरुणही एकवटू लागले. या बांधवांच्या भोवती आवळला गेलेला दुष्ट रूढींचा अन् अंधश्रध्दांचा विळखाही हळुवारपणे सैल करण्याच्या कामी प्रभुणेंनी पुढाकार घेतला. वेळ आली, तेव्हा उकळत्या तेलाने भरलेल्या भांडयात हात घालण्याची अमानुष शिक्षा एखाद्या भगिनीच्या वतीने स्वत: झेलण्यासाठीही पुढे सरसावले. पोलिसी अतिरेकासमोर हिमतीने उभेही राहिले आणि गुन्हे हातून घडलेल्या तरुणांना त्याची यथायोग्य शिक्षा भोगण्यासाठी सादर होण्याचे यशस्वी आवाहनही करीत राहिले. या सगळया प्रक्रियेत प्रसंगी उग्रता, कठोरपणा आणि हट्टाग्रह यांचा अंगीकार करावा लागला, तेव्हा अप्रियता स्वीकारून तोही केला. या त्यांच्या उलट खटाटोपाचा आवेग आणि धग तथाकथित संघटनात्मक चौकटीला मानवणे शक्य नव्हते. पण तशीच वेळ आली, तेव्हा ती चौकटही झुगारून द्यायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.

आता - म्हणजे गेल्या बारा वर्षांपासून त्यांनी चिंचवड येथेच 'समरसता गुरुकुलम' चालवले आहे. उघडया मैदानावर झाडांच्या सावलीत, पारावर... निसर्गाच्या सान्निध्यात छोटया छोटया बालकांचे समूह अनौपचारिकपणे शिक्षणाचे, कलाकौशल्याचे आणि समृध्द जीवन जगण्याचे औपचारिक धडे गिरवतात. आपापल्या पिढीजात कौशल्यांचा शास्त्रशुध्द मागोवा घेत असतानाच इथले विद्यार्थी अन्यही अनेक कुशलता शिकतात. त्यामुळे इथून बाहेर पडणारा विद्यार्थी केवळ पढिक साक्षर बनून नव्हे, तर स्वयंपूर्ण आणि निरामय जीवन जगण्यासाठी सुसज्ज होऊन बाहेर पडेल अशी शिक्षणाची रचना प्रभुणे यांनी या गुरुकुलात आकाराला आणली आहे.

या वर्षी होणाऱ्या 18व्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गिरीश प्रभुणे यांची निवड झाली आहे. समरसतेची भावात्मक संकल्पना साहित्यातून प्रकट होणारी आणि जोपासली जाणारी समरसता प्रकट होणाऱ्या संवेदनेला अक्षरबध्द करणारे साहित्य इ.चा उत्सव म्हणून समरसता साहित्य संमेलनाकडे पाहायचे झाले, तर गिरीश प्रभुणे यांची ही निवड सर्वथा उचित तर म्हणावी लागेलच. खरे तर त्यासाठी 'अठरावे' समरसता साहित्य संमेलन होईपर्यंत का आणि कसे थांबले गेले, असाच प्रश्न अधिक सयुक्तिक ठरेल. (जाता जाता हे नमूद करायलाच हवे की प्रत्यक्ष पुस्तकरूपाने प्रभुणे यांचे लिखाण मोजकेच प्रसिध्द झाले असले, तरी त्यांच्या लेखणीचा दर्जा त्यांच्या व्यक्तित्वाइतका आणि कर्तृत्वाइतकाच अस्सल, अभिजात आणि निखळ, निरामय मानवयतेला समृध्द करणारा आहे.) अध्यक्षपदी गिरीश प्रभुणे असावेत हा स्वत: प्रभुणे यांचा नव्हे, तर त्या संमेलन प्रक्रियेचा आणि समरसता संकल्पनेचा गौरव आहे, असे म्हणणे अधिक उचित ठरेल.

या निमित्ताने गिरीश यशवंत प्रभुणे या समाजमंत्र-सामर्थ्यवंत सन्मित्राला हृदयपूर्वक अभिवादन आणि लक्ष लक्ष शुभेच्छा!

[email protected]