गुप्तवार्ता विभाग आणि निमलष्करी दले

 विवेक मराठी  07-Dec-2017

 

 

***विवेक गणपुले***

शत्रूच्या मनसुब्यांची आणि तयारीची खरी माहिती विविध मार्गांनी मिळवणे, त्यावरून उचित निष्कर्ष काढणे आणि ह्या दोन्ही गोष्टी वेळेवर योग्य ठिकाणी पोहोचवणे असे गुप्तवार्ता (Intelligence) विभागाच्या कामाचे वर्णन थोडक्यात करता येईल. त्याचबरोबर अर्ध सैनिक दल किंवा निमलष्करी दल यांची माहितीही या लेखात आपण घेणार आहोत.

गेल्या तीन भागांत भौगोलिक सुरक्षेच्या तीन मुख्य आधारस्तंभांची अगदी प्राथमिक माहिती घेतली. यापुढे सैन्याच्या मदतीला असणाऱ्या अन्य काही यंत्रणांची माहिती घेऊ.

यातला पहिला भाग म्हणजे गुप्तवार्ता (Intelligence) विभाग. हा खरा तर सैन्याच्या प्रत्येक दलात त्यांचा स्वत:चा स्वतंत्र असा एक विभाग असतोच. ह्या विभागाच्या कार्यक्षमतेवर युध्दकाळातील सैन्याच्या मोहिमांची परिणामकारकता अवलंबून असते. शत्रूच्या मनसुब्यांची आणि तयारीची खरी माहिती विविध मार्गांनी मिळवणे, त्यावरून उचित निष्कर्ष काढणे आणि ह्या दोन्ही गोष्टी वेळेवर योग्य ठिकाणी पोहोचवणे असे ह्या विभागाच्या कामाचे वर्णन थोडक्यात करता येईल.

उपग्रह किंवा अन्य माध्यमातून मिळणारे फोटो, सर्व प्रकारच्या बिनतारी संदेशांची (मोबाइल फोनसुध्दा) देवाणघेवाण, प्रत्यक्ष निरीक्षणे, शत्रुप्रदेशातील माध्यमे, विविध व्यक्तींची चौकशी (Interrogation) असे विविध मार्ग ही माहिती मिळवण्यासाठी वापरले जातात. मात्र हेच सर्व मार्ग शत्रूला चुकीच्या निष्कर्षावर पोहोचवण्यासाठीही वापरता येतात.

वरील माहितीच्या आधारे एक स्पष्ट चित्र तयार करणे आणि त्याचे निष्कर्ष जिथून प्रत्यक्ष कार्यवाही होणार आहे त्या त्या जागी योग्य स्तरावर पोहोचणे यावरच ह्या सर्व रचनेची उपयुक्तता अवलंबून असते.

ह्याबद्दल आपली स्थिती काय आहे, हे पुढील परिच्छेदावरून लक्षात येईल -

Such lapses, committed at one time or the other by all agencies, came to the notice of the Committee. These illustrate a number of deficiencies in the system. There is need for greater appreciation of the role of intelligence and who needs it most and also more understanding with regard to who must pursue any given lead. It further highlights the need for closer coordination among the intelligence agencies. (http://nuclearweaponarchive.org/India/KargilRCA.html)

जिज्ञासूंनी हा अहवाल मुळातूनच जरूर वाचावा.

वरील चौकशी समितीच्या अहवालावर काय कार्यवाही झाली, ह्यावरूनही आपली सैन्याबाबतची उदासीनता समजून येते.

ह्याची दुसरी बाजूही लक्षात घेण्यासारखी आहे. 1962च्या युध्दाआधी चीन कधीही हल्ला करू शकतो याची जाणीव राजकीय नेतृत्वाला करून दिली असूनही त्याकडे कानाडोळा करून पराभव ओढवून घेतल्याचे उदाहरणही आपल्या नजीकच्या भूतकाळात आहेच. असो. ह्या विषयात सुधारणांना भरपूर वाव असून त्या वेळ न घालवता त्वरित करायला हव्या आहेत, इतकीच टिप्पणी सध्या पुरेशी आहे. अर्थात दुसऱ्या दोन महत्त्वाच्या नागरी गुप्तवार्ता संघटनांबाबत - RAW आणि  IB  ह्याबाबत - काही फारशी वेगळी स्थिती नाही. अंतर्गत सुरक्षेचा विचार करत असताना पुढे याबाबत अधिक माहिती घेऊ या.

 शांतता काळात सैन्य प्रत्यक्ष सीमेवर अडकून न पडता विविध अभ्यास, नवीन शस्त्रास्त्रे वापरण्याची सवय, डावपेचांची रचना आणि अभ्यास, साधनसामग्रीची देखभाल आणि नूतनीकरण इत्यादीसाठी मोकळे असावे, म्हणून काही साहाय्यक दले निर्माण केली आहेत. अर्ध सैनिक दल किंवा निमलष्करी दल असा शब्दप्रयोग अधिकृतपणे होत नाही. पुढील सात दलांबाबत 'सशस्त्र पोलीस दल' असा उल्लेख केला जातो.

Assam Rifles (AR)

Border Security Force (BSF)

Central Industrial Security Force (CISF)

Central Reserve Police Force (CRPF)

Indo Tibetan Border Police (ITBP)

National Security Guard (NSG)

आसाम रायफल्स हे भारताचे सर्वात जुने निमलष्करी दल आहे. 1835मध्ये Cachar Levy ह्या नावाने स्थापन झाल्यापासून अनेक नावे बदलत 1917पासून 'आसाम रायफल्स' ह्या नावाने ओळखले जाते. ह्या दलाकडे विविध कामे सोपवली जातात.

The Border Security Force 1965 साली स्थापन झालेले दल आहे. ह्या दलाकडे अधिकृतपणे शांतता काळात जमिनीवरील सीमांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

Central Industrial Security Force (CISF) ह्या नावावरूनच, 1969मध्ये स्थापन झालेल्या आणि 1983मध्ये सशस्त्र दलाचा दर्जा मिळालेल्या ह्या दलाची जबाबदारी ही फक्त केंद्र सरकारच्या औद्योगिक आस्थापनांच्या सुरक्षेची किंवा तत्सम कामांची आहे, हे लक्षात येते.

Central Reserve Police Force (CRPF) - 1949 साली स्थापन झालेल्या दलाची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सशस्त्र बंडाळी रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना साहाय्य करणे अशी आहे.

Indo Tibetan Border Police (ITBP)  ह्या दलाची स्थापना 1962च्या युध्दानंतर झाली आणि मुख्यत्वे तिबेटबरोबरची सीमा सुरक्षा ही जबाबदारी ह्या दलाकडे दिली गेली.

National Security Guard (NSG) - सामान्यत: ब्लॅक कॅट कमांडो ह्या नावाने प्रसिध्द असणाऱ्या ह्या दलाकडे अतिरेकीविरोधी कारवाया आणि विशिष्ट व्यक्तींची सुरक्षा अशी जबाबदारी आहे.

Sashastra Seema Bal - 1962च्या युध्दानंतर स्थापन झालेले हे दल RAWचे साहाय्यक दल आणि विशेषत: ईशान्य सीमा प्रदेशात नागरिकांमध्ये प्रशिक्षण, सुधारणा इत्यादींची कामे करणारे दल म्हणून ओळखले जाते.

वरील माहिती अत्यंत प्राथमिक असून ह्या प्रत्येक दलाची आणि त्यांच्या कामगिरीची माहिती हीच एक वेगळी लेखमाला होऊ  शकेल.

वरील प्राथमिक माहितीवर नजर टाकताना एक गोष्ट लक्षात येते की BSF आणि ITBP (जरी या दलाच्या नावात पोलीस हा शब्द असला, तरी) ही दोन दले शांतता काळात सीमा सुरक्षेसाठी जबाबदार आहेत आणि अन्य सर्व दले मुख्यत: शांतता, सुव्यवस्था आणि सशस्त्र बंडाळीचा बिमोड अशा कारवायांसाठी जबाबदार आहेत.

ह्या दोन कामांसाठी पूर्णत: वेगळी कौशल्ये लागतात, तसेच सैन्य आणि पोलीस दल अशा वेगवेगळया संघटनांबरोबर त्यांचे संबंधही असावे लागतात. या बाबी लक्षात घेऊन सीमा सुरक्षेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यवस्था यांमध्ये योग्य तो फरक (रचना, प्रशिक्षण, शस्त्रास्त्रे समन्वय इत्यादी सर्वच बाबतीत) केला जावा, असे सुचवावे असे वाटते.

यापुढील भागात सुरक्षा दलांच्या प्रमुख साहाय्यकारी संस्था - DRDO आणि ऑॅर्डनन्स फॅक्टरी यांची माहिती घेऊ.

& 9158874654