त्वचाविकारासाठी युनानी उपचार पध्दती

 विवेक मराठी  14-Feb-2017

***डॉ. राशिद काझी****

साप्ताहिक विवेकच्या आरोग्य विशेषांकांच्या माध्यमातून आजवर आयुर्वेद, ऍलोपथी आणि होमिओपॅथी या तीन चिकित्सा पध्दतींमध्ये निरनिराळया आजारांची नोंदवलेली लक्षणे, त्या आजारांचे परिणाम, उपचार आणि उपचारपश्चात घ्यायची काळजी याविषयीचा आढावा घेणारे लेख नेहमीच प्रकाशित होत असतात. त्वचा व त्वचाविकार आरोग्य विशेषांकाच्या निमित्ताने युनानी चिकित्सा पध्दतीवर आधारित लेख प्रकाशित करत आहोत. त्वचाविकारांची कारणे, निकष, उपचारपध्दती या सगळया मुद्दयांच्या आधारे डॉ. एम.आय.जे. तिब्बिया युनानी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य व एच.ए.आर. कालसेकर हॉस्पिटलमधील ज्येष्ठ युनानी चिकित्सक डॉ. राशिद काझी यांच्याशी झालेला हा संवाद.

''आजार बरा करणारी आणि आरोग्याची काळजी घेणारी नैसर्गिक, सुरक्षित आणि दुष्परिणामरहित चिकित्सा पध्दती असं युनानी चिकित्सा पध्दतीचं वर्णन केलं जातं. आयुर्वेद या भारतीय चिकित्सेइतकाच दीर्घ इतिहास युनानी चिकित्सेलाही आहे. युनानी चिकित्सा पध्दती पाच हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे, असं इतिहास सांगतो. ग्रीक तत्त्वज्ञ इस्कलाबूस या चिकित्सेचा शोधकर्ता मानला जातो, तर हिप्पोक्रॅटसने (अरेबिक भाषेत बुकरातने) या चिकित्सा पध्दतीची शास्त्रशुध्द पध्दतीने मांडणी केली, त्यामुळे त्याला युनानीचा पिता असं मानलं जातं. जगाच्या इतिहासात अतिशय प्रगतिशील अरब कालखंडात युनानीवर अनेक प्रकारची अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली गेली. अन्य चिकित्सा पध्दतींप्रमाणेच युनानीमध्येही त्वचाचिकित्सा आणि त्वचाविकारांवरील उपचार यावर विशेष संशोधन करण्यात आलं आहे.'' डॉ. राशिद काझी सांगत होते.

युनानी उपचारांमागीत मूलतत्त्वे त्यांनी आम्हाला सांगितली. ते म्हणाले, ''आयुर्वेदात कफ-वात-पित्त या तीन प्रकृती महत्त्वाच्या मानल्या जातात. या तीन प्रकृतींमधील असमतोल म्हणजेच कोणताही आजार वा विकार, असं आयुर्वेद मानतं. सौदा (वात), सफरा (पित्त), बलगम (कफ), दम (रक्त) या चार द्रवघटकांपासून आपलं शरीर बनलेलं असून यांतील दर्जा आणि प्रमाणाचा समतोल हा मानवी प्रकृतीच्या आणि कोणत्याही आजाराच्या मुळाशी असतो, असं बुकरात म्हणतो. या चार घटकांना नजरिये इखलात म्हटलं जातं.  नजरिये इखलातमधील योग्य समतोलाने आजार बरे होतात असं युनानी मानतं. काही वर्षांनी जेव्हा यावर अधिक संशोधन झालं, त्यानंतर हे चार वेगवेगळे घटक नसून ते रक्तातच असतात असं मानलं जाऊ लागलं. रक्तातील घटकांत होणारा बदल म्हणजे आजार ही संकल्पना बुकरातच्या काळापासून आहे असं युनानी मानते.''

आयुर्वेदात जसे श्लोक असतात, तसे युनानीत अरबी कौल असतात. आरोग्य जर चांगलं असेल तर ते टिकवलं पाहिजे आणि बिघडल असेल तर ते पूर्ववत केलं पाहिजे, असं बुकरातने एका कौलमध्ये सांगितलं आहे.

आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी युनानीमध्ये 'असबाबे सित्ता जरुरिया' हे समीकरण सांगितलं आहे. 'आयुरारोग्यासाठी अनिवार्य सहा घटक' असं याला मराठीत म्हणता येईल.

  1. हवा (प्राणवायू), 2. खाणेपिणे,
    3. वेळेवर झोपणे-वेळेवर उठणे,
    4. शरीरासाठी उपयुक्त घटक. उदा., - रक्त, 5. आरोग्यासाठी हानिकारक घटकाचं उत्सर्जन. उदा.- मल-मूत्र, रजस्राव व
    6. शरीराचा व मेंदूचा गरजेपुरता व्यायाम आणि त्यांना मिळणारा आराम.

त्वचाविकारांवरील युनानीमधील उपचारांविषयी डॉ. काझी यांनी सांगितलं, ''युनानी संकल्पनांनुसार नजरिये इखलात आणि असबाबे सित्ता जरुरिया यांवरच आपलं आरोग्य आणि अनारोग्य अवलंबून असतं. त्वचाविकारांबाबत बोलायचं झालं, तर युनानीच्या मते सफरा (पित्त) आणि दम (रक्त) यामुळे हे त्वचाविकार होतात. त्यातही सफराच्या अर्थात शरीरातील पित्ताच्या बिघडलेल्या स्तरामुळे मुख्यत्वे त्वचाविकार होतात. यातले काही त्वचाविकार हे उष्ण प्रकारचे असतात, तर काही शीत प्रकारचे असतात. यातले खाज येणे, त्वचा चिडचिडी होणे, लाल होणे, पुरळ येणे हे प्रकार पित्तामुळे होतात. त्वचेवरील फोड, तारुण्यपिटिका या रक्तातील दोषांमुळे तसेच कफामुळे होतात.''

अन्यही काही त्वचाविकारांविषयी त्यांनी माहिती दिली. दाऊस सदफ/चुंबल (psoriasis) हे सगळे विकार सौदा अर्थात वातामुळे होतात, असे ते म्हणाले. अनेक त्वचाविकार आनुवंशिक असतात. त्यातला सोरायसिस माता-पित्यांकडून बऱ्याचदा मुलांकडे येतो. या त्वचाविकारांसह बर्स (leucoderma), बेहक (vitiligo), शुररा - बनातुल्लेल (urticaria), जेब - हुक्का (scabies) हेदेखील मुख्य त्वचाविकार असल्याचे त्यांनी सांगितले.

मानवी सवयी आणि स्वभाव ही त्वचाविकार होण्यामागील कारणे असल्याचेही डॉ. काझी यांनी सांगितले. ते म्हणाले, ''इथपर्यंत आपण अंतर्गत बदलांचा त्वचाविकारांशी असलेला संबंध समजून घेतला. पण माणसाच्या काही सवयीदेखील त्वचाविकारांना कारणीभूत ठरतात. आहार आणि स्वच्छता यांचं त्वचाविकारांशी जवळचं नातं आहे. जे लोक शारीरिक स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतात, त्यांना त्वचेच्या तक्रारी तुलनेने कमी भेडसावतात. जे अस्वच्छ असतात त्यांना त्वचाविकारांची लागण लवकर होते. त्याचप्रमाणे खाण्यापिण्याशीही त्वचाविकारांचं जवळचं नातं आहे. फास्ट फूड, तेलकट अन्न, क्षारयुक्त अन्न सेवन करणाऱ्यांना त्वचाविकार लवकर होतात.

त्याचबरोबर युनानी मानतं की त्वचाविकारांचं मानसिक आरोग्याशीही नातं आहे. जे लोक तणावयुक्त मानसिकतेत असतात, अशा लोकांना त्वचाविकारांचा त्रास होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोरायसिस हा आजार. सोरायसिसच्या एखाद्या रुग्णाला विचारलं तर हा आजार मानसिक ताणाच्या काळात बळावल्याचं ते सांगतात. त्वचेच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांना आम्ही औषधांसह आहाराच्या सवयींबाबत आवर्जून मार्गदर्शन करतो. त्यामुळे आजार लवकर बरा होतो.''

ज्या शरीरांतर्गत कारणामुळे त्वचाविकार झाला आहे त्या मूळ कारणासाठी उपचार केले, तर तो त्वचाविकार आपसूकच बरा होतो असं डॉ. काझी सांगतात. ते म्हणतात, ''सौदा सफरा बलगम दम यांपैकी ज्या कारणामुळे त्वचेची प्रकृती बिघडली असेल ते ओळखून त्याप्रमाणे उपचार सुरू केले जातात. त्यांपैकी सौदा (वात), सफरा (पित्त), बलगम (कफ) हे तिन्ही घटक औषधे देऊन शरीरातून उत्सर्जित करता येणं शक्य असतं. परंतु, दम अर्थात रक्तदोषातून झालेला त्वचाविकार असेल, तर मात्र तो रक्तदोष दूर करावा लागतो. त्यासाठी आम्ही मोहद्दिलाद हे औषध देतो, जे रक्तशुध्दी करतं आणि त्यानंतर मुसफ्फियाद देतो, जे रक्ताला नॉर्मल करतं. युनानीमध्ये एकेक औषधंही असतात किंवा दोन औषधं एकत्रपणे घेऊनही त्याचा परिणाम साधला जातो.''

समाजात आवर्जून आढळणारा त्वचाविकार म्हणजे कोड अर्थात बर्स म्हणजेच leucoderma आणि बेहक म्हणजेच vitiligo. आज अनेक ठिकाणी आपल्याला कोड झालेली माणसे दिसतात. खरे सांगायचे तर ल्युकोडर्मा अर्थात कोड हा आजार केवळ शारीरिक नसून ती एक सामाजिक समस्या आहे, हे अधिक सांगायला नको. शरीरातील मेलॅनिनचा स्तर कमी झाला की त्वचा पांढरी होऊ लागते आणि त्वचेवर चट्टे उठतात. कोड झालेले अनेक जण वेगवेगळया उपचार पध्दतीद्वारे उपचार करून थकतात, पण यश येत नाही. काही दिवस परिणाम दिसतो, पण काही काळाने औषधे बंद किंवा कमी झाली की पुन्हा हे कोड पसरू लागते.

कोडासाठी 100 टक्के फळ देणारे उपचार युनानीमध्ये असल्याचे डॉ. राशिद काझी सांगतात. ''कोड किंवा बर्स हे शरीरातील कफाच्या (बलगमच्या) बदललेल्या प्रमाणामुळे येते. दोन-तीन प्रकारची औषधे आहेत, ज्यामुळे कोड पूर्णपणे बरे होऊ शकते. अक्रिलाल आणि सुफुफे बाबची ही त्यातली मुख्य औषधं. अर्थात हे उपचार आजाराच्या स्वरूपानुसार कमीअधिक वेळखाऊ असू शकतात. अशा काळात काही वेळा रुग्ण मानसिकदृष्टया खचू शकतो. यावर युनानीच्या जुन्या ग्रंथांमध्ये काही तोडगे दिले आहेत. उपचार पूर्ण होईपर्यंत रुग्णाला काही विशिष्ट प्रकारचे लेप लावायला दिले जातात, ज्यात बऱ्याचदा गेरू किंवा मेंदी यांचा समावेश असतो. या लेपांमुळे त्वचेवरील चट्टयांचा रंग बदलून ते बाकीच्या त्वचेशी मिळताजुळता रंग धारण करतात. यामुळे रुग्णाला आपण बरे होत असल्याची खात्री पटत जाते व ते सकारात्मकपणे उपचार पूर्ण करतात. एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे सुफुफे बाबची पावडर मिसळून ते रुग्णाला प्यायला दिले जाते आणि खाली उरलेला साका लेप म्हणून लावून कोवळया उन्हात बसायला सांगितले जाते. आमच्या रुग्णालयात अनेक रुग्णांना या पध्दतीच्या उपचारांनी पूर्ण बरे वाटले आहे. अर्थात आनुवंशिकतेने आलेले कोड जायला वेळ लागतो.''

शरबत उन्नाह, अतरिफल शाहवरा, माजून उशबा, हब्बेमुसफी खून अशी अनेक औषधे वेगवेगळया त्वचाविकारांवर पोटातून घेण्यासाठी दिली जातात. तर गजाए हुसन अफजा, मरहमे कूबा, मरहबे हिना अशी मलमेही लावण्यास दिली जातात. मात्र ही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच वापरावीत, असा सल्लाही डॉ. काझी देतात.

सध्याची बदललेली जीवनशैली आणि त्वचेचे बिघडलेले आरोग्य यांत जवळचा संबंध आहे. आज प्रत्येक जण स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी धावतो आहे. त्यामुळे झोप, सकस अन्न यासह दैनंदिन स्वच्छतेकडेही दुर्लक्ष होत आहे. या सगळयाचा त्वचेच्या अनारोग्याशी असणाऱ्या संबंधांविषयी डॉ. काझी म्हणाले, ''त्वचेचे बरेचसे आजार पित्तामुळे होतात, असं मी मघाशीच सांगितलं. पित्त आपल्या यकृतात तयार होतं. अन्न नीट पचत असेल तर आपलं यकृत काम नीट करतं. अन्न तेव्हाच पचेल जेव्हा आपल्या आहाराच्या सवयी आणि दिनचर्या नॉर्मल असेल. शेवटी हे एक चक्र आहे. एक जरी पायरी बिघडली, तरी त्याची परिणती त्वचाविकारात होऊ शकते. आपण सध्या जगत असलेली जीवनशैली आणि आपण वापरत असलेल्या अनेक रासायनिक वस्तू या एकत्रितपणे त्वचाविकाराला कारणीभूत ठरू शकतात. वेगवेगळया प्रकारचे शांपू, साबण, मुरुमांसाठी वापरण्यात येणारी वेगवेगळी क्रीम्स, लोशन्स, गोरेपणा देणारी क्रीम्स यात अनेक तऱ्हेची रासायनिक द्रव्यं वापरली जातात. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आपण वापरत असलेली अशी अनेक उत्पादनं त्वचेच्या अनारोग्यात भर घालतात. आम्ही त्वचा स्वच्छ पाण्याने धुण्याचा सल्ला देतो. त्यासाठी अशा कोणत्याही उत्पादनांची गरज नसते.''

त्वचाविकार दूर करण्यासह युनानी उपचार पध्दती सौंदर्य वाढवण्यासाठीही उपचार करते. आज युनानीच्या जुन्या ग्रंथांमध्ये यासाठी अनेक तोडगे सांगितले आहेत. मुरुम, एग्झीमा अशा अनेक आजारांवर आज युनानीमध्ये उपचार शक्य आहेत. गुलाबाचे पाणी, मेंदी, हळद, संत्र्याची साल अशा अनेक वस्तू सौंदर्यवृध्दीसाठी वापरता येतात, अशी माहिती डॉ. काझी यांनी दिली. ते म्हणाले, ''युनानी उपचार पध्दती त्वचाविकारांपासून जपणूक, त्वचाविकारांवर उपचार आणि सौंदर्यसाठी उपचार या तिन्ही क्षेत्रात काम करते आणि तेही रसायनांचा कमीतकमी वापर करून. त्यामुळे त्यांचा विपरीत परिणाम होत नाही. मला वाटतं कदाचित याचमुळे आज अनेक लोक युनानी उपचार घेण्यास उत्सुक असतात.''

& 9869178149

मुलाखत - मृदुला राजवाडे