युध्द आकाशातील लहरींसाठी..!

 विवेक मराठी  31-Mar-2017

 गेल्या पंधरवडयात दूरसंचारच्या क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्या व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर यांनी हात मिळवला अन देशाच्या व्यावसायिक वर्तुळात अक्षरश: खळबळ उडाली. याला कारण आहे ते जगातील सर्वात मोठया मोबाइल टेलिफोनीच्या बाजारात मुसंडी मारत असलेलं 'रिलायन्स जिओ'..! फक्त सहा महिन्यांत रिलायन्स जिओने बाजाराची सर्व समीकरणे बदलली. डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत आयडियाचे उत्पन्न 3.8 टक्क्यांनी घसरले, तर व्होडाफोनचे 1.9 टक्क्यांनी. आता ही टक्केवारी फारशी जास्त दिसत नसली, तरी जिथे मोबाइलचे मार्केट अत्यंत वेगाने वाढते आहे, तिथे वाढीमध्ये फरक न होता जर ग्राहकांची संख्या खाली जात असेल, तर ती निश्चितच चिंतेची बाब आहे. आणि म्हणूनच रिलायन्स जिओविरुध्द टक्कर देण्यासाठी ह्या कंपन्या एकवटलेल्या आहेत.

गेल्या पंधरवडयात दूरसंचारच्या क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्या व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर यांनी हात मिळवला अन देशाच्या व्यावसायिक वर्तुळात अक्षरश: खळबळ उडाली. कारण हे फक्त एकत्र येणे नव्हते, तर विलिनीकरण होते. 'मर्जर' होते. आणि असे भलेमोठे मर्जर आपल्या देशानेच काय, इतरही देशांनी फारसे बघितलेले नव्हते. या विलीनीकरणामुळे ही 'जोड कंपनी' देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी झालेली आहे. देशातील एकूण मोबाइल ग्राहकांच्या 34.5% ग्राहक या एका कंपनीजवळ असणार आहेत. आणि म्हणूनच सध्यातरी ही 'जोडकंपनी' देशातील बलाढय दूरसंचार कंपनी झालेली आहे.

गंमत म्हणजे हे विलीनीकरण तसे असमान आहे. व्होडाफोनसारख्या ताकदवान ब्रिटिश दूरसंचार कंपनीने तुलनेने लहान अशा, भारतीय असलेल्या आयडियाबरोबर भागीदारी करावी, हेच मुळात अप्रूप आहे. कारण व्होडाफोन नेहमी दुसऱ्या कंपनीला 'ऍक्वायर' करते, विकत घेते किंवा स्पष्ट शब्दात सांगायचे तर 'गिळंकृत' करते. पण तसे काही इथे झालेले नाही. याचा अर्थ, 'भारतातले मार्केट डायनामिक्स इतर देशांपेक्षा वेगळे आहेत' हे व्होडाफोनला पटलेय असे दिसतेय.

व्होडाफोनचे वार्षिक उत्पन्न 41 बिलियन स्टर्लिंग पाउंड आहे. (माहितीसाठी - मायक्रोसॉफ्टचे वार्षिक उत्पन्न 60 बिलियन स्टर्लिंग पाउंड आहे. यावरून अंदाज यावा.) एक लाख आठ हजार कर्मचारी त्यांच्या जगभरातल्या वेगवेगळया कार्यालयांमध्ये काम करतात. त्या मानाने आयडिया ही लहान कंपनी आहे. या कंपनीचे वार्षिक उत्पन्न फक्त 4 बिलियन स्टर्लिंग पाउंड आहे. म्हणजे व्होडाफोनच्या एक दशांश..!

मात्र आयडियाची मुळे भारतातल्या निमशहरी आणि ग्रामीण क्षेत्रात घट्ट रुजली आहेत. म्हणून शहरी क्षेत्रात वरचश्मा असणाऱ्या व्होडाफोनने आयडियाला आपला पार्टनर निवडले. ग्राहकांच्या बाबतीत एक प्रकारे या दोन्ही कंपन्या एक-दुसऱ्याला पूरक आहेत.

हे विलीनीकरण सुखासुखी किंवा उगीचच झालेले नाही. याला कारण आहे ते जगातील सर्वात मोठया मोबाइल टेलिफोनीच्या बाजारात मुसंडी मारत असलेले 'रिलायन्स जिओ'..! फक्त सहा महिन्यांत रिलायन्स जिओने बाजाराची सर्व समीकरणे बदलली. डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत आयडियाचे उत्पन्न 3.8 टक्क्यांनी घसरले, तर व्होडाफोनचे 1.9 टक्क्यांनी. आता ही टक्केवारी फारशी जास्त दिसत नसली, तरी जिथे मोबाइलचे मार्केट अत्यंत वेगाने वाढते आहे, तिथे वाढीमध्ये फरक न होता जर ग्राहकांची संख्या खाली जात असेल, तर ती निश्चितच चिंतेची बाब आहे. आणि म्हणूनच, बिहारच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे एकमेकांचे हाडवैरी असलेले पक्ष भाजपाविरुध्द एकत्र आले, तसाच काहीसा हा प्रकार आहे. रिलायन्स जिओविरुध्द टक्कर देण्यासाठी ह्या कंपन्या एकवटलेल्या आहेत.

आणि याला कारणही तसेच आहे. रिलायन्स समूहाचे जेव्हा वाटे-हिस्से झाले, तेव्हा रिलायन्स कम्युनिकेशन्स अनिल अंबानींकडे आले. मुळात रिलायन्स समूहाने दूरसंचार व्यवसायात यावे, ही मुकेश अंबानींची कल्पना होती. त्यामुळे त्यांचे 'ब्रेनचाइल्ड' असलेले रिलायन्स कम्युनिकेशन जेव्हा अनिल अंबानींकडे गेले, तेव्हाच केव्हातरी मुकेशने भविष्यात या क्षेत्रात परत येण्यासंबंधी विचार करून ठेवला असेल.

आणि म्हणूनच, सुमारे वीस वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे रिलायन्सने मागील दाराहून का होईना, मोबाइलच्या क्षेत्रात प्रवेश केला, तो असाच धडाकेबाज होता. त्यामागे कल्पना होती धीरूभाईंची, की गरिबालासुध्दा परवडेल अशा दरात मोबाइल सेवा पुरवता आली पाहिजे. त्यांनी लक्ष्य ठेवले होते पोस्टकार्डाचे. तेव्हा 15 पैशांना मिळणारे पोस्टकार्ड हे गरिबांसाठी सर्वात स्वस्त असणारे संवाद साधण्याचे साधन होते. तितक्या पैशात मोबाइलवरून बोलता आले पाहिजे, अशा आग्रहाने त्यांनी सेवा सुरू केली. अत्यंत स्वस्तात, इतरांकडे नसणारे, किंवा इतर देशात फारसे लोकप्रिय नसलेले 'सी.डी.एम.ए.' हे तंत्रज्ञान त्यांनी वापरले. मोठया प्रमाणावर ग्राहक तयार केले. मात्र पुढे जाऊन 'मुख्य धारेतले' तंत्रज्ञान नसल्याने रिलायन्सच्या मोबाइल व्यवसायाला मर्यादा पडल्या.

नेमके हेच हेरून मुकेश अंबानींनी नवीन, बदललेल्या मोबाइलच्या बाजारात अत्यंत विचारपूर्वक पाऊल टाकले. पूर्वी झालेल्या काही चुकांची त्यांना जाणीव होती, म्हणून त्यांनी त्या चुका टाळल्या. या वेळी त्यांनी मुख्य धारेतील तंत्रज्ञान वापरले. जगभरात 4जी  सेवेसाठी LTE (Long Term Evolution) हे तंत्रज्ञान वापरले जाते. यातील अत्याधुनिक व्हर्जन रिलायन्स जिओने वापरले.

गेल्या 2-3 वर्षांत मोबाइल कंपन्यांच्या उत्पन्नाच्या प्रकारामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. पूर्वी 'व्हॉइस कॉल' हे ह्या कंपन्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन होते. इंटरनेट वापरामुळे मिळणारे उत्पन्न कमी असायचे. मात्र हळूहळू हे चित्र बदलत गेले. व्हॉइस कॉलमुळे मिळणाऱ्या उत्पन्नात घट होत गेली आणि इंटरनेटच्या वापरामुळे मिळणारे उत्पन्न वाढत गेले. आज प्रामुख्याने इंटरनेटच्या वापरातून मोबाइल कंपन्यांचा महसूल येतोय. सर्वसामान्य माणसाचे जीवनही इंटरनेटने व्यापून टाकलेय. डेन्मार्क, स्वीडन यासारख्या देशांमध्ये तर इंटरनेटचा वापर हा त्यांच्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांमध्ये सामील केला गेलाय. सोशल मीडियाने इंटरनेटवरील गर्दी वाढवण्यास चांगलाच हातभार लावलाय.

आणि आता तर व्हॉइस कॉलसुध्दा इंटरनेटवरून होताहेत. हा बदल लक्षणीय आहे. म्हणजे आता हळूहळू दूरसंचार कंपन्यांचे महसुलाचे जे मुख्य साधन होते, तेच बंद होणार आहे आणि दूरसंचारच्या सर्व गरजांकरता इंटरनेट हे एकमात्र साधन राहणार, असे चित्र समोर आहे. हे नेमके हेरले मुकेश अंबानींनी आणि म्हणूनच आधीच्या नेटवक्र्सचा (म्हणजे 'लेगसी' नेटवक्र्स - अर्थात 2जी, 3जीचा) विचार न करता त्यांनी सरळ 4जीमध्ये उडी मारली. यात व्हॉइस कॉलसाठी 2जी, 3जीप्रमाणे वेगळे स्विच ठेवण्याची गरज नसते. आणि मुख्यत्वे इंटरनेटच्या वापराला समोर ठेवूनच हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेले आहे.

मुकेश अंबानींनी किमान सात-आठ वर्षे आधीच या सर्व गोष्टींचा विचार केला होता. जून 2010मध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने 4,800 कोटी रुपयांमध्ये 'इन्फोटेल ब्रॉडबँड सव्हिसेस लिमिटेड' ही कंपनी विकत घेतली. या कंपनीचे वैशिष्टय म्हणजे 4जीच्या लिलावाच्या एक वर्ष आधी भारताच्या सर्व 22 सर्कल्समध्ये (दूरसंचारच्या दृष्टीने भारताला 22 सर्कल्समध्ये विभागलेले आहे. साधारणत: प्रत्येक प्रदेश म्हणजे एक सर्कल आहे. पण सर्वच बाबतीत तसे ते नाही. उत्तर प्रदेशात दोन सर्कल्स आहेत, तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ मिळून एक सर्कल आहे. आपल्या महाराष्ट्रात मुंबई वेगळे सर्कल आहे, तर उर्वरित महाराष्ट्र आणि गोवा मिळून एक सर्कल आहे.) ब्रॉडबँड स्पेक्ट्रम जिंकणारी ही एकमेव कंपनी होती. या कंपनीवर स्वामित्व मिळवल्यामुळे रिलायन्सला स्वाभाविकच इंटरनेटच्या क्षेत्रात मोठी झेप घेण्याचा 'प्लॅटफॉर्म' तयार झाला. याला जोड दिली ती 4जीच्या LTE ह्या तंत्रज्ञानाची. त्याचबरोबर मुकेश अंबानींनी मतभेद बाजूला ठेवून भावाच्या दूरसंचार कंपनीबरोबर हातमिळवणी केली आणि मोबाइल नेटवर्कच्या पायाभूत सुविधांसाठी लागणाऱ्या टॉवर्सची व्यवस्था केली.

मुकेश अंबानींनी मागील वेळेचा अनुभव लक्षात घेता या वेळेस मोबाइल संचांच्या उत्पादनावर त्यांचे नियंत्रण असेल अशी व्यवस्था केली. त्यासाठी LYF (लाइफ) ही कंपनी दोन वर्षांपूर्वी उभी केली. ही कंपनी रिलायन्स जिओची साहाय्यक कंपनी आहे. आतापर्यंत या कंपनीने वाटर-1, वाटर-2, अर्थ आणि फ्लेम या ब्रँडचे हँडसेट विक्रीला आणले आहेत.

रिलायन्स जिओचा ग्राहकांना आकर्षित करण्याचा वेग इतका जबरदस्त आहे की पहिल्या 83 दिवसांत त्यांनी 5 कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला आणि या 21 फेब्रुवारीला त्यांच्या नेटवर्कमध्ये 10 कोटी ग्राहक होते. जिओ येण्यापूर्वी ब्रॉडबँड वापरण्याच्या बाबतीत भारताचा जगामध्ये 150वा क्रमांक होता. आता मात्र मोबाइल डेटा वापरण्याच्या बाबतीत भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे..! गेल्या महिन्याची सरासरी काढली, तर जिओच्या ग्राहकांनी रोज 3.3 कोटी गिगाबाइट डेटा वापरला. जिओचे ग्राहक मोबाइलवर सरासरी रोज साडेपाच तास व्हिडिओ बघण्यात घालवतात.

आणि या सर्व आकडेवारीमुळे व्होडाफोन आणि आयडिया यासारख्या कंपन्यांना हादरे बसणे स्वाभाविकच होते. यातूनच मग विलीनीकरणाची कल्पना पुढे आली.

या नवीन कंपनीजवळ सुरुवात करतानाच जवळपास 40 कोटी ग्राहक आहेत. त्यामुळे जगातील सर्वांत मोठया अशा दूरसंचार कंपन्यांपैकी एक असे स्थान निर्माण झाले आहे. भारती एयरटेल ही ह्या कंपनीच्या थोडी मागे असून त्यांची ग्राहकसंख्या आहे 32 कोटी. जास्त स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्याने, सेवेचा दर्जा सुधारण्याच्या रूपाने या विलीनीकरणाचा फायदा होईल. सध्या आयडियाकडे 20 सर्कल्समध्ये 4जी, तर 15 सर्कल्समध्ये 3जीचे लायसन्स आहे; तर व्होडाफोनकडे 16 सर्कल्समध्ये 4जी आणि 17 सर्कल्समध्ये 3जीचे लायसन्स आहे.

आता खेळाला खरी सुरुवात झालेली आहे. ही नवीन कंपनी, एयरटेल आणि रिलायन्स जिओ यांच्यात खरा खेळ रंगणार आहे. दुर्दैवाने, एकेकाळची सर्वात मोठी सरकारी दूरसंचार कंपनी बी.एस.एन.एल. ह्या खेळात कुठेच नाही..! किमतींमध्ये भडकलेले हे युध्द काही काळानंतर थांबेल, कारण कोणालाच ते परवडणारे नाही. 'पेमेंट बँकिंग'सारखे उत्पन्नाचे नवीन एव्हेन्यू समोर येतील. स्पर्धात्मक वातावरणामुळे अनेक नवनवीन सेवा सुरू होतील. रेल्वे गाडयांमध्ये, वोल्वो बसमध्ये लवकरच मोबाइलवर इंटरनेट वापरता येईल, असे बरेच काही होईल..

आणि तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य ग्राहकाला या सर्वांचा फायदा होईल, हे निश्चित..!

9425155551

[email protected]