राठोड

 विवेक मराठी  07-Mar-2017

त्या दिवशी संध्याकाळी हजरत निजामुद्दीनला जनरलचं तिकीट काढून आरक्षित डब्यात चढलो, तेव्हाच लक्षात आलेलं की खांडव्यापर्यंतचा किमान सोळा तासांचा प्रवास आरक्षित डब्यातल्या सर्वात दुर्लक्षित जागेत बसून करावा लागणार आहे. कपाळाला गंध, हातात चार वेगवेगळया खडयांच्या अंगठया, अंगात काळा कोट आणि तोंडात खास बनारसी पानाचा तोबरा भरलेला टीसी दिसला. त्याला अत्यंत प्रेमाने, ''देखो सरजी, कहां जुगाड हो रहा है तो'' वगैरे विनवण्या करून पाहिल्या, पण काही उपयोग नाही. शौचालयाच्या बाजूच्या जागेत सोळा तास काढता येतील इतका निर्ढावलेपणा शरीराच्या प्रत्येक अवयवात आणला. तोवर गाडीने आग्रा सोडलं होतं. फारसा त्रास होत नव्हता. अगदी टिपिकल मध्यमवर्गीय असल्याने 'परिस्थितीशी जुळवून घेणं' तसं माझ्या रक्तातच. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आख्ख्या डब्यात जेवढे प्रवासी नसतील, तेवढे प्रवासी 'दरवाजा ते शौचालय' या भागात सहज सामावून घेतले जाऊ  शकतात, हेसुध्दा लक्षात आलं. एकेक स्टेशन घेत गाडी राजस्थानातल्या कुठल्याशा स्टेशनात शिरली, तेव्हा रात्रीचा 1 वाजला होता. अंगाचा पंचकोन किंवा षटकोन करून मी एका कोपऱ्यात बसलेलो. टक्क जागा होतो. तेवढयात ते दोघे डब्यात चढले.

ते दोघे. आधी तो आत शिरला. डार्क रंगाचा शर्ट, बाह्या कोपरापर्यंत खेचलेल्या, नजरेत एकाच वेळेला आत्मविश्वास, माज आणि तरीही अस्वस्थ भिरभिरणारे भाव. त्याच्या मागोमाग दुसरा. वयाने त्याच्यापेक्षा बराचसा मोठा. कदाचित फक्त वयानेच. दोघांच्या चेहऱ्यात बऱ्यापैकी साम्य. पण ते फक्त दिसण्यात. दुसऱ्याचा चेहरा तसा निर्विकार, डोळयांत फारशी चमक नाहीच... असलंच तर कारुण्य. तेसुध्दा भरभरून नाही.  त्याला आयुष्यात मिळालेल्या सुखाइतकंच. अगदी कणभर.

माझ्याच पुढयात ते दोघे बसले. बाप-लेक. अगदी स्वाभाविकपणे मी त्या मुलाच्या बाजूला सरकलो आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या.

 ''राठोड हैं हम.'' वाक्यावाक्यात एक प्रकारचा अभिमान आणि 'राठोड'पणाची झलक. बोलता बोलता त्याने पाकीट काढलं. पाकिटात दहा-दहाच्या दोन जुनाट नोटा. आतमध्ये जपून ठेवलेला महाराणा प्रतापचा फोटो. ''ये हैं हमारे पूर्वज और हमारे आदर्श. जिस दिन खुद का पैसा कामायेंगे उस दिन टेटू निकलवाएंगे 'जय राजपुताना' नाम से. खून से रजपूत हैं हम।'' ऐकता ऐकता मी मधूनच त्याच्या बापाकडे पाहायचो. त्याच्या चेहऱ्यावरची निष्क्रिय असाहायता आणि डोळयांतली केविलवाणी चमक 'राठोड'पणाशी कुठेच जुळायची नाही. बोलता बोलता त्याला तहान लागली. बापाकडे त्याने पाणी मागितलं. एक घोट प्यायला आणि म्हणाला, ''ये तो गरम हैं. पानी ठंडा चाहिये.'' बाप काहीच बोलला नाही... कदाचित सवयीनुसार....

थोडयाच वेळात कुठल्याशा छोटया स्टेशनात गाडी थांबली. सिग्नल लागला असावा म्हणून. त्याने पाण्याची बाटली घेतली आणि तो खाली उतरला. रात्री अडीच-तीनची वेळ असावी. त्या टोकाला सार्वजनिक नळ होता. त्याने पाणी भरायला सुरुवात केली आणि गाडीने भोंगा दिला. निघण्याचा. इतका वेळ बसलेला त्याचा बाप उठला आणि दरवाजात आला. बापाच्या डोळयात काळजी होती. ''किसने कहा था पानी लेनेको??? आजा जल्दी।'' शक्य तितक्या जोरात आणि अधिकाराने काही बोलेपर्यंत गाडीने वेग पकडला आणि नळासमोरून तोसुध्दा दिसेनासा झाला. पुढच्या दोन मिनिटांत बापाच्या डोळयांत मी राग, असाहायता आणि हताशपणा सारं काही पाहिलं. ''बिलकुल भी हमारी नहीं सुनता. हम जो कहे उसके ठीक उलटा करना हैं इसको।'' वाक्य पूर्ण होतंय न होतंय इतक्यात मागच्या डब्यातून तो आला. बापाने त्याला चार शब्द सुनावले. त्याने पाण्याची बाटली बापाला दिली आणि म्हणाला, ''ये लीजिये. पीजीये.... ठंडे हो जाइये. हम गये वहां इसलिये ठंडा पानी मिला. बैठे रहके जिंदगीभर गरम पानी नहीं पीना हैं हमें।'' तो माझ्या बाजूला येऊन बसला. माझ्या नजरेला नजर मिळविली आणि म्हणाला, ''कभी कभी हमें लगता हैं घरमें सिर्फ हम ही राठोड हैं।'' या वाक्यावर त्याच्या बापाकडे पाहायची माझी हिम्मत झाली नाही.

कुठल्याशा स्टेशनात ते दोघे उतरले. जाताना म्हणालेला, ''फेसबुक पे हँ मैं।'' मी काही त्याला पुन्हा शोधलं नाही. नावापुढे राजे आणि आडनावापुढे पाटील लावणारी पुष्कळ पोरं मी पाहतो. कधीकधी मला त्यांच्यात तोच दिसतो. कधीकधी वाटतं, आपला अंदाज चुकीचा असेल. फक्त एक प्रश्न मला राहून राहून सतावतो की ऐन तारुण्यात असलेलं हे 'राठोड'पण कायम राहील की आयुष्यातले उन्हाळे-पावसाळे बघून त्याचाही 'बाप' होईल?

& 9773249697