मधुमेहाचे उपचार 2

 विवेक मराठी  25-Apr-2017

कित्येक वर्षं मेटफॉर्मिन आणि सल्फोनिल युरिया या दोनच तोंडी घ्यायच्या आणि इन्श्युलीन या इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या औषधांवर मधुमेहाचे उपचार चालायचे. मात्र गेल्या दोन-अडीच दशकांमध्ये यात आमूलाग्र क्रांती झालेली आहे. आता डॉक्टरांच्या हातात अनेक नवी आयुधं आलेली आहेत. पण ही औषधरूपी आयुधं वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला बंधनकारक आहे, याची काळजी मात्र मधुमेही रुग्णांनी घ्यावी.


कित्येक वर्षं मेटफॉर्मिन आणि सल्फोनिल युरिया या दोनच तोंडी घ्यायच्या आणि इन्श्युलीन या इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या औषधांवर मधुमेहाचे उपचार चालायचे. मात्र गेल्या दोन-अडीच दशकांमध्ये यात आमूलाग्र क्रांती झालेली आहे. आता डॉक्टरांच्या हातात अनेक नवी आयुधं आलेली आहेत. त्यातलं खूप महत्त्वाचं औषध म्हणजे पायोग्लिटाझोन. अगदी काल-परवापर्यंत याच गटाचं आणखी एक औषध - रोझिग्लिटाझोनदेखील उपलब्ध होतं. परंतु त्याने होणाऱ्या साइड इफेक्टचं वादळ उठलं आणि त्या वादळात रोझिग्लिटाझोन वाहून गेलं. सुदैवाने ही भीती अनाठायी असल्याचं आता लक्षात येतंय व हे औषध पुन्हा बाजारात उतरवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

प्रथम हे पाहायला हवं की हे औषध आधीच बाजारात असलेल्या पूर्वीच्या औषधांपेक्षा वेगळं कसं. शिवाय याचे असे कोणते दुष्परिणाम दिसले म्हणून त्या गटातलं एक औषध बाजारातून हद्दपार करण्यात आलं.

 मुळात हे औषध मेटफॉर्मिनप्रमाणे इन्श्युलीन रेझिस्टन्स कमी करण्याचं काम करतं. टाईप टू मधुमेहींना याचा फारच फायदा होतो. कारण या प्रकारच्या मधुमेहामध्ये मुळातच बीटा पेशी प्रमाणाबाहेर इन्श्युलीन बनवत असतात. शरीराच्या पेशींमध्ये इन्श्युलीन रेझिस्टन्स असल्याने त्यावर मात करण्याइतपत इन्श्युलीन बनवत असताना बीटा पेशींची दमछाक होत असते. इन्श्युलीन रेझिस्टन्स कमी करणारी औषधं बीटा पेशींवर पडणारा हा ताण विलक्षण कमी करतात. म्हणून पायोग्लिटाझोनसारखी औषधं मधुमेहाच्या उपचारांमध्ये अत्यंत मोलाची कामगिरी बजावत असतात. भारतासारख्या देशांमध्ये अगदी कृश दिसणाऱ्या माणसांमध्येसुध्दा बऱ्याच मोठया प्रमाणात इन्श्युलीन रेझिस्टन्स दिसतो. म्हणून केवळ आपल्या देशाचा विचार केला, तरी या गटाच्या औषधांनी तुम्हा-आम्हा भारतीयांना खूप मोठा दिलासा दिला आहे. इवलासा डोससुध्दा फरक करत असल्याने  या औषधाने तुमच्या-आमच्या आयुष्यात मोलाची जागा पटकावून ठेवली आहे आणि तशी ही औषधं बरीच स्वस्त असल्याने खिशाला चाट बसत नाही.

ही झाली जमेची बाजू. पण या औषधांचे दुष्परिणामसुध्दा काही कमी नाहीत. या औषधांनी वजन वाढतं. वाढणारं वजन दोन कारणांनी असतं. एक म्हणजे शरीरात पाणी साचून राहत असल्याने असं होतं. असं पाणी भरणं काही वेळा घातक ठरतं. विशेषत: जेव्हा हृदय नीट काम करत नसेल तेव्हा हे अधिकच जाणवतं. शरीरात भरलेल्या अनावश्यक पाण्याचा निचरा करताना हृदय थकून जातं, हार्ट फेल्युअरमध्ये जातं. यासाठी ज्या वेळी हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता पन्नास टक्क्याहून कमी झालेली असेल, हृदयाचा 'इजेक्शन फ्रॅक्शन' 50 टक्क्याहून कमी झाला असेल, तेव्हा या गटाची औषधं वापरली जात नाहीत.

या औषधाने पोटातली चरबी त्वचेखाली सरकते. पोटात दडलेली चरबी दृश्य नसते, पोटाच्या पोकळीत लपलेली असते. पण त्वचेखाली चढलेली पुटं स्पष्ट नजरेला पडतात. त्यामुळे बरेच जण नाराज होतात. आपल्या शरीराच्या आकारमानाबद्दल जागरूक असणाऱ्यांना याची जास्त काळजी वाटते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सगळयाच लोकांमध्ये हे वजन वाढण्याचे परिणाम दिसतातच असं नाही. काही लोकांमध्ये वजन इतकं कमी वाढतं की ते कोणाच्या नजरेतही येत नाही. काही जणांमध्ये मात्र ते बरंच वाढलेलं दिसतं. जी मंडळी या औषधांसोबत ऍमलोडेपिन नावाचं रक्तदाबाचं औषध किंवा इन्श्युलीन घेताहेत, त्यांचं वजन जरा अधिकच वाढलेलं दिसतं हे खरं. वजन खूपच वाढणं मधुमेहींना योग्य नव्हेच. म्हणून फार जास्त वजन वाढू लागलं की हे औषध बंद करण्यावाचून प्रत्यवाय उरत नाही. या औषधाचा अत्यंत कमी डोस वापरून वजन फारसं वाढत नाही आणि अशा अल्प प्रमाणात घेतलेल्या डोसमुळेदेखील लहान चणीच्या भारतीय व्यक्तींना तितकाच फायदा होतो, हे डॉ. विजय पणीकरसारख्या प्रतिथयश डॉक्टर मंडळींनी सिध्द करून दाखवलं आहे.

अर्थात केवळ या कारणासाठी ही औषधं बदनाम झालेली नाहीत. रोझिग्लिटाझोन बंद करण्याचं इंगित वेगळं आहे. या औषधांमुळे मूत्राशयाचा कर्करोग होण्याचं प्रमाण वाढतं असा शोधनिष्कर्ष कुणीतरी काढला आणि कोण धावपळ झाली. मधुमेहावर उपचार करताना कर्करोग हा प्रचंड गंभीर आजार ओढवून घ्यायला, मधुमेहाने उद्या येणारं मरण कर्करोगाने आज ओढून आणायला कोण तयार होणार म्हणा!

भारतातही काही काळासाठी या गटाच्या औषधांवर कर्करोगाच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली होती. पुढच्या काळात अनेक शोध प्रकल्प हाती घेण्यात आले. त्यात ही गोष्ट स्पष्ट झाली की या औषधाचं कर्करोगाशी जोडलेलं नातं तितकंसं खरं नाही. त्यामुळं अशा अत्यंत गुणकारी आणि स्वस्त औषधांपासून पेशंटना वंचित ठेवण्याचं काहीच कारण नाही. म्हणून पुन्हा ते बाजारात उतरवण्यात आलं. अर्थात औषधाच्या प्रत्येक स्ट्रिपबरोबर वजन वाढण्याची, हार्ट फेल्युअरची आणि मूत्राशयाच्या कर्करोगाची चेतावणी देणारी ब्लॅक बॉक्स वॉर्निंग असलेली चिठ्ठी असणं बंधनकारक करण्यात आलं. ही औषधं कुणाला द्यायची आणि कुणाला देणं टाळायचं, याचे पक्के संकेत आता बनलेले आहेत. औषध ज्यांना द्यायचं अशा पेशंटची निवड योग्य पध्दतीत झाली, तर बरीच वर्षे पेशंटला कुठलाच धोका नसतो, यावर शिक्कामोर्तब झाल्याने या गटातलं जगभर बंदी आलेलं रोझिग्लिटाझोन हे औषधदेखील पुन्हा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.

दुसऱ्या एका गटाची तीन औषधंदेखील काही दशकांपासून वापरली जाताहेत. अल्फा ग्लुकोसायडेझ इन्हिबिटर हा तो गट. आपण अल्फा ग्लुकोसायडेझ हे प्रकरण आधी नीट समजून घेतलं पाहिजे.

तुम्ही-आम्ही जेवतो. ते अन्न पोटात गेल्यावर पचतं. पचण्याच्या क्रियेत अन्नातल्या तीन मुख्य घटकांचं - कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन्स यांचं - त्यांच्या त्यांच्या एकल घटकात रूपांतर होतं. या पचण्याच्या प्रक्रियेत पाचक रसांचा मोठा वाटा असतो. पैकी रक्तातलं ग्लुकोज वाढण्यात कार्बोहायड्रेटसचा सगळयात मोठा सहभाग असतो. यातून शास्त्रज्ञांच्या मनात एक उत्तम कल्पना आली. कार्बोहायड्रेट पचवणाऱ्या पाचक रसांपैकी ग्लुकोज वेगळं काढणाऱ्या अल्फा ग्लुकोसायडेझ या रसालाच का लक्ष्य करू नये? जर मुळात मधून ग्लुकोज वेगळी झालीच नाही, तर ती आतडयांच्या अन्नपदार्थ शोषणाऱ्या भागाला उपलब्धच होणार नाही. साहजिकच रक्तातलं ग्लुकोज वाढणार नाही.

अशी झकास कल्पना सुचल्यावर मग शास्त्रज्ञ कशाला मागे राहतील? त्यांनी अथक प्रयत्नांनी असे अल्फा ग्लुकोसायडेझ ब्लॉक करणारे तीन रासायनिक पदार्थ शोधून काढले. जेवणानंतर अचानक वाढणारं ग्लुकोज नियंत्रणात आणणं या तीन औषधांमुळे शक्य झालं. अकारबोझ, व्होगलीबोझ आणि मिग्लीटोल ही तीन औषधं या घडीला बाजारात सहज उपलब्ध आहेत. भारतासारख्या प्रामुख्याने कार्बोहायड्रेट जेवणात असणाऱ्या देशाला यांचा खूपच फायदा होताना दिसतो आहे. रक्तात अगदीच अल्प प्रमाणात येत असल्याने या औषधांचे फारसे दुष्परिणामदेखील होताना दिसत नाहीत.

तशी ही औषधं फार महागसुध्दा नाहीत. फक्त ही औषधं प्रत्येक जेवणासोबत घ्यावी लागतात. आपण साधारणत: दिवसातून तीन मोठी जेवणं घेतो. नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण. कधीकधी संध्याकाळी चहाबरोबर थोडंसं खाणं तोंडात टाकतो. म्हणून दिवसातून किमान तीन ते चार वेळेला आणि तेही जेवणाच्या पहिल्या घासासोबत ही औषधं घेणं अपरिहार्य ठरतं. जेवणाआधी किंवा नंतर घेऊन फारसा फायदा होणार नाही. कारण जेवणातली कार्बोहायड्रेट अजून पोटात यायची बाकी असली तर औषध पुढे आणि कार्बोहायड्रेट पचून गेली की औषध मागे असा कारभार होईल. वरातीआधी अथवा वरातीनंतर घोडं नाचवून काहीही उपयोग होणार नाही.

अगदीच काहीच दुष्परिणाम होत नाहीत असं म्हणणं थोडं आततायीपणाचं होईल. कारण या औषधांचा गुणधर्मच त्यांचे दुष्परिणाम निश्चित करतो. साहजिकच आहे, कार्बोहायड्रेट पचली नाहीत तर आतडयातून सरकत सरकत ती पुढे जाणार. तुम्हा-आम्हा सर्वांच्याच आतडयात काही उपकारक बॅक्टेरिया असतात. न पचल्याने आतडयांच्या त्या भागात पोहोचलेलं कार्बोहायड्रेट त्यांना आयतं अन्न म्हणून मिळतं. त्यावर ते ताव मारतात. बॅक्टेरिया आपलं अन्न खातात खरे, परंतु त्यातून निर्माण होणारा वायू, गॅस ते आतडयातच सोडतात. गॅस फारच झाला तर आपल्याला पोटफुगी होते. हाच या गटातल्या औषधांचा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे. मधुमेहावर औषधं घेत असताना जर तुम्हाला पोटफुगीने अस्वस्थ वाटत असेल, तर तुमच्या औषधात या गटातली औषधं नाहीत याची खातरजमा करणं आवश्यक ठरतं. 

9892245272