भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग - इतिहासाचा रखवालदार

 विवेक मराठी  26-Apr-2017

 

*** गुरुनाथ राणे***

भारताचा पुरातत्त्वीय अनमोल सांस्कृतिक ठेवा पुढील पिढयांसाठी सुरक्षित राहावा, या उदात्त हेतूने अलेक्झांडर कनिंगहॅम या ब्रिटिश अधिकाऱ्याने 1861 साली भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, ASI) या विभागाची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत हा विभाग भारताचा प्राचीन ऐतिहासिक ठेवा शोधण्याचे आणि त्याचे जतन-संवर्धन करण्याचे काम इमानेइतबारे करीत आहे.

ASI म्हटले की बरेच दुर्गप्रेमी त्यांच्या नावाने बोटे मोडायला सुरुवात करतात. सर्व दुर्गांची दुरवस्था ASIमुळेच झाली आहे, असा त्यांचा ठाम समज असतो. ASI स्वतः काही करीत नाही आणि दुसऱ्यालाही काही करू देत नाही, हा आणखी एक गैरसमज. याकरिता यामागची सत्य परिस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. प्राचीन साहित्य, हस्तलिखिते, मंदिरे, दुर्ग यांचे, तसेच तत्सम बाबींचे जतन-संवर्धनाचे काम अत्यंत कौशल्याचे आणि खर्चीक असते. यासाठी प्रचंड पैशाची आणि कुशल कारागिरांची, तसेच तंत्रज्ञांची गरज भासते आणि इतर खात्यांप्रमाणेच या दोन्ही गोष्टींची ASIकडे सध्या वानवा आहे. याही परिस्थितीत ASI आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असते. ASIचे प्रथम कर्तव्य म्हणजे ताब्यातील स्मारकांचे (MonumentsM{) वारसा मूल्य जपणे आणि ते अबाधित राखणे. त्यांच्या प्राचीन रचनेत कोणताही बदल होणार नाही याची काळजी हा विभाग घेतो. अशा स्मारकांच्या आजूबाजूस अनेक प्राचीन अवशेष असण्याची शक्यता असते. म्हणून आजूबाजूच्या 500 मीटरचा परिसरसुध्दा आपल्या ताब्यात ठेवतो आणि तेथे कोणतेही अतिक्रमण होऊ देत नाही, जेणेकरून भारताचा हा अनमोल ठेवा सुरक्षित राहावा.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे दोन किल्ले ASIच्या अखत्यारीत आहेत आणि विजयदुर्ग सबसर्कलचे संवर्धक (Conservator) राजेश दिवेकर यांच्या कुशल देखरेखीखाली या दोन्ही किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर 30 ते 35 कामगारांची टीम या कामात व्यग्र आहे. रस्त्यांच्या दुतर्फा असलेली झाडी, तलाव आणि तटांवरील वाढलेली झुडपे यांच्या साफसफाईचे काम पूर्ण होत आले आहे. अर्थात हा दर वर्षीचा नित्याचा भाग आहे. परंतु पश्चिमेकडील ढासळलेल्या एका तटाचे आणि बुरुजाचे बांधकाम अप्रतिम झाले आहे. हे अतिशय अवघड आणि आव्हानात्मक काम होते. यासाठी योग्य दगड हवा होता. सिंधुदुर्ग इको-सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे कुठेही उत्खनन करणे शक्य नाही. सिंधुदुर्गातील आणि कर्नाटकातील किनारपट्टीवरील दगडांची पाहणी करून दगडांची चाचणी घेण्यात आली. सध्या कर्नाटक, झाराप आणि विजयदुर्ग येथून दगड गोळा करण्यात येत आहे. कारण बुरुजांच्या पायामधील दगड दोन टनांहून जास्त वजनांचे होते. 365 दिवस अहोरात्र समुद्रांच्या अजस्र लाटांचा मारा झेलण्याची ताकद त्यात होती. म्हणून समुद्रात ढासळलेल्या दगड क्रेनच्या साहाय्याने पुन्हा वर काढून तेच दगड पायात बसविण्यात आले. यासाठी कर्नाटकातून खास कारागीर मागविण्यात आले. हे काम चालू असताना तटावरून समुद्रात पडून एका कामगाराचा दुर्दैवी अंत झाला. आलेली टीम परत गेली आणि काम ठप्प झाले. दुसरी टीम मिळेपर्यंत एप्रिल-मे महिना उजाडला. या महिन्यात किल्ल्यावर पाण्याचे दुर्भिक्ष असते. कामाला मर्यादा येतात. नंतर पावसाळयात काम करणे केवळ अशक्य. कारण तीन महिने बोटसेवा पूर्ण बंद असते. कामगार, दगड, क्रेन आणि बांधकाम साहित्य किल्ल्यात घेऊन जाणे हे बोटसेवेवर अवलंबून असते आणि यामुळेच किल्ल्याच्या संवर्धनास विलंब होत आहे.

इतक्या सर्व दिव्यातून जाऊन ASIने अप्रतिम काम केले आहे. विजयदुर्गाच्या आणि सिंधुदुर्गाच्या समुद्रात ढासळलेल्या तटबंदी ओळखता येणार नाहीत इतक्या बेमालूम आणि उत्कृष्ट उभारल्या गेल्या आहेत. बांधकामासाठी जुन्या पध्दतीचाच रोमन मॉर्टर फर्ॉम्युला वापरण्यात आला आहे. त्यात चुनखडी, मंगलोरी कौलांचे तुकडे, विटांचा भुगा, बारीक खडी आणि वाळू वापरण्यात आली आहे. यात वाळूचा वापर फक्त 15 टक्के आहे. अजूनही खूप काम बाकी आहे. आपण ASIला वेळ द्यावयास हवा. कर्नाटकातून आणलेले हे कुशल कामगार सिंधुदुर्गावरील बुरुज-संवर्धनानंतर अनेक दिव्य पार करत महाराजांच्या किल्ल्यांचे संवर्धन करीत आहेत.

& 9403938318

[email protected]