महानंदा ग्राहककेंद्री दुग्धप्रकल्प

 विवेक मराठी  29-Apr-2017

 महाराष्ट्रातील मुख्य व्यवसायांपैकी एक म्हणजे दुग्धव्यवसाय. घरगुती स्तरावर दूधविक्री करण्यापासून ते राज्यभर दूधपुरवठा करणाऱ्या मोठमोठया डेअरीजपर्यंत या व्यवसायाचा विस्तार झाला आहे. केवळ पाश्चराइज्ड दूधविक्री नाही, तर त्याचबरोबर तूप, दही, पनीर असे दुग्धजन्य पदार्थ बनवण्याच्या कल्पनांचाही या व्यवसायात सुरुवातीच्या काळातच शिरकाव झाला आणि ग्राहकांच्या मागणीमुळे त्या यशस्वीही झाल्या.

साप्ताहिक विवेकचा या वर्षीचा महाराष्ट्र दिन विशेषांक हा अन्नप्रक्रिया उद्योग, दुग्ध व दुग्धप्रक्रिया उद्योग या विषयावर आधारित आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सहकारी दूध महासंघाच्या 'महानंदा' या दुग्धप्रकल्पाचा घेतलेला हा सविस्तर आढावा.

दूध.. बहुतेकांच्या दैनंदिन आहारातील अनन्यसाधारण घटक. परिपूर्ण आहार असं ज्याचं वर्णन केलं जातं, त्या दुधाला आयुर्वेदातही पूर्णान्न म्हणून गौरवलं गेलं आहे. परिपूर्ण आहार म्हणून आपल्या आहारात या दुधाचा समावेश करताना, त्याच्या शुध्दतेबद्दल जागरूक असणं गरजेचं आहे. त्यावर पर्याय म्हणजे दुधाचं पाश्चरायझेशन अर्थात् निर्जंतुकीकरण करणं. आज राज्यातल्या अनेक मोठमोठया डेअऱ्या दुधाचे निर्जंतुकीकरण केलेलं दूध आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचवण्याची काळजी घेत आहेत. 'महानंदा' हा महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाचा प्रकल्पही असाच. महाराष्ट्रभर खप असलेल्या या प्रकल्पात पाश्चराइज्ड दूधाबरोबरच दही, ताक, मठ्ठा, लस्सी, पनीर, तूप, सुगंधी दूध अशी उत्पादनंही घेतली जातात.

महासंघाचा विस्तार

दूध संकलनासाठी महासंघाची त्रिस्तरीय रचना आहे. गावपातळीवर दूध उत्पादकांची, म्हणजे दुधाचा जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांची सोसायटी असते. हे शेतकरी आपल्याकडील अतिरिक्त दूध जिल्हा पातळीवरच्या जिल्हा उत्पादक महासंघाकडे सुपुर्द करतात. या जिल्हा दूध उत्पादक संघांकडून राज्याच्या महासंघाकडे दूध येतं. संस्थेचं मुख्य केंद्र मुंबईमध्ये गोरेगाव इथे असून सध्या वेगवेगळया ठिकाणच्या 6 शाखांमधून महानंदचं काम चालतं. यात नागपूर, तसेच लातूर एम.आय.डी.सी.मध्ये संघाचे स्वत:च्या मालकीचे प्लांट आहेत, तर कणकवली, पुण्यात कात्रजमध्ये, नवी मुंबईतील वाशीमध्ये भाडेतत्त्वावर प्लँट सुरू आहेत. पुण्यात दौंड तालुक्यात दूध पावडर बनवण्याचा स्वत:च्या मालकीचा प्लँट आहे. आज साधारणपणे 85 जिल्हा दूध उत्पादक संघ महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे सभासद आहेत.

 आजच्या घडीला रोज तीन ते साडेतीन लाख लीटर दूध पिशवीतून ग्राहकांना वितरित केलं जातं. त्याचबरोबर महासंघाद्वारे दुधाचं टेट्रा पॅकिंग करून ते भारतीय लष्कराला पुरवलं जातं. दुधाची रोजची विक्री जरी तीन/साडेतीन लाख लीटर होत असली, तरी त्याच्या सह-उत्पादनांची निर्मिती गृहीत धरून रोज साडेचार ते पाच लीटर दुधाची आवक प्रकल्पात होत असते. त्याशिवाय सणवार, सार्वजनिक कार्यक्रमांच्या खास दिवशी अनेकदा हा आकडा साडेपाच लाखापर्यंतही जातो.

दर्जाशी तडजोड नाही

हल्ली प्रत्येक वस्तूचे, पदार्थाचे रोज नवनवे ब्रँड आपल्या पाहण्यात येतात. मग त्याला दूध तरी कसं अपवाद असेल? आज सरकारी, सहकारी, खासगी उत्पादकांकडून येणारे दुधाचे बरेच ब्रँड आपल्याला माहीत आहेत. अन्य उत्पादनांच्या ब्रँडमध्ये असते, तशी स्पर्धा दूध व्यवसायातही आहेच. अशा या स्पर्धेत सहकारी महासंघाचा महानंद मात्र आपला चाहता ग्राहकवर्ग टिकवून आहे. दुधाइतकीच महानंद ब्रँडची लस्सी, तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर या  उत्पादनांनाही बाजारात चांगलीच मागणी आहे. राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने दुधाच्या गुणवत्तेचे काही मापदंड निश्चित केले आहेत. या सगळया मापदंडांचं काटेकोर पालन महानंदमध्ये केलं जातं. त्याचबरोबर टोण्ड दुधाचं, स्किम्ड मिल्कचंही संघाद्वारे वितरण केलं जातं. 

वरती म्हटल्याप्रमाणे महानंदमध्ये रोज जवळपास पाच लाख लीटर दुधाची आवक होते. या दुधावर कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी त्याच्या सुमारे 22 प्रकारच्या जीवशास्त्रीय चाचण्या केल्या जातात. त्याच्याही आधी दुधाचं स्कॅनिंग केलं जातं. डेन्सिटी मीटर (घनता मापक), लॅक्टोमीटर या यंत्रांच्या साहायाने हे स्कॅनिंग केलं जातं. त्याला आवश्यक अशी अद्ययावत, परिपूर्ण प्रयोगशाळा हे या प्रकल्पाचं वैशिष्टय आहे. दुधातील घटक, त्याची घनता/घट्टपणा, त्यातील युरिया, अल्कोहोल यांचं प्रमाण, तसंच अन्य काही घटकांचं प्रमाण तपासून घेतलं जातं. दुधाची घनता जास्त दाखवण्यासाठी त्यात वेगवेगळया स्वरूपाची भेसळ केलेली असते. काही वेळा वनस्पती तेलाची अगर तुपाची, काही वेळा ज्वारी-गव्हाच्या पिठाची भेसळ केल्याचं आढळून आलं आहे. अशा गोष्टींमुळे लोकांच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. म्हणूनच 22पैकी कोणत्याही चाचणीत दुधात काही दोष आढळले, तर ते बाद केलं जातं. अशा वेळी असं भेसळयुक्त दूध घेऊन आलेला पूर्ण टँकरच परत पाठवला जातो.

प्रयोगशाळेतल्या चाचण्या यशस्वीपणे पार करणाऱ्या दुधाचं निर्जंतुकीकरण केलं जातं. यासाठी गरम पाण्याच्या साहाय्याने अतिशय कमी वेळात दूध 84 अंश सेल्सियसपर्यंत तापवलं जातं आणि थंड पाण्याच्या दाबाने ते गारही केलं जातं. त्यानंतर त्यातील मळ, कचरा बाजूला काढला जातो. मग होमोजिनायझरच्या मदतीने त्यातील साय पूर्णपणे मोडून त्यात मिसळली जाते. या प्रक्रियेनंतर दूध पॅकिंगसाठी योग्य बनतं. विशेष म्हणजे निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्णपणे यंत्रांच्या साहाय्याने पार पडते. तिथे माणसाचा स्पर्श पूर्णपणे टाळला जातो. या प्रक्रियेतील सगळया सूचना संगणकांच्या माध्यमातून दिल्या जातात आणि त्याच्यावर नियंत्रणही संगणकाचं असतं. ग्राहकांना देण्यासाठी ज्या पिशव्यांमध्ये दूध भरलं जातं, त्या प्लास्टिक पिशव्यांच्या शुध्दतेचीदेखील तपासणी केली जाते.

या प्रकल्पाच्या आवारातच दुधाच्या टेट्रा पॅकिंग प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रणा कार्यान्वित आहे. या ठिकाणी दूध जमा होण्यापासून ते टेट्रा पॅकचे बॉक्सेस पुठ्ठयाच्या मोठया बॉक्समध्ये ठेवेपर्यंतच्या सर्व प्रक्रिया यंत्रांच्या साहाय्याने पार पडतात. संगणकावर 'कमांड' देण्यापलीकडे माणसाचा हस्तक्षेप या कामात होत नाही. या प्रक्रियेला 'अल्ट्रा हाय टेंपरेचर मिल्क प्रोसेसिंग' असं म्हटलं जातं. टेट्रा पॅकमधील दुधाचं आयुष्य 6 महिन्यांचं असतं. मात्र एकदा पॅक उघडला की तो पॅक फ्रीजमध्ये ठेवावा लागतो आणि आठ दिवसात त्यातील दूध संपवावं लागतं. टेट्रा पॅकिंगची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहणं हादेखील आनंददायी अनुभव आहे. भारताच्या सीमेवर लष्करासाठी महानंदचं साडेबारा लाख लीटर दूध दर वर्षी पुरवलं जातं.


लस्सी, दही आणि बरंच काही...

महानंद लस्सी, दही, ताक, साजूक तूप, सुगंधी दूध, श्रीखंड, आम्रखंड, पनीर अशा सह-उत्पादनांच्या निर्मितीसाठी अद्ययावत स्वरूपाची यंत्रणा आज महासंघात उपलब्ध आहे. त्या त्या उत्पादनासाठी आवश्यक अशी संपूर्ण अत्याधुनिक आणि संगणकाधारित यंत्रणा इथे वापरली जाते. त्यासाठी वेगवेगळया तज्ज्ञांची नियुक्तीही केलेली आहे. आतापर्यंत अनेक सह-उत्पादनांसाठी मानवी श्रमांचा उपयोग केला जात असे. मात्र अद्ययावत यंत्रणा उभारणीचं काम पूर्ण होत आलं असून येत्या काही काळात तेथून उत्पादनाला सुरुवात होईल. प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेपासून बाटलीबंद उत्पादनांवर लेबल चिकटवण्यापर्यंत सर्व कामं या यंत्रणेद्वारे केली जातील. यामुळे वेळेची बचत तर होईलच, त्याचबरोबर संघाने अचूकतेचं जे मूल्य आजवर जपलं आहे, त्यात अधिकच भर पडेल असं म्हणणं योग्य ठरेल.

खासगी व्यावसायिकांचा त्रास

अनेक खासगी दूध वितरकांनी या क्षेत्रात स्वत:चे पाय रोवले आहेत. याचा फटका बसतो आहे तो सहकारी दूध महासंघाला. सरकारने दुधाच्या खरेदीचं मूल्य प्रतिलीटर 24 रुपये इतकं ठेवलेलं असताना आज महासंघाला मात्र उत्पादकांकडून 28 रुपये प्रतिलीटरने दूध विकत घ्यावं लागतं. याला कारणीभूत आहेत खासगी दूध वितरक. कारण हे वितरक वाट्टेल ती किंमत देऊन दूध विकत घेतात. (खासगी वितरकांकडे दूध गेलं की त्याच्या शुध्दतेची कोणतीही खात्री देता येत नाही, हे आणखी एक.) त्याचबरोबर बटरचं आणि दूध पावडरचं बाजारातील मूल्य वाढल्यामुळे उत्पादकांकडच्या दुधाचा ओघ तिकडे वळू लागला आणि त्यामुळे सहकारी वितरकांसाठी बाजारात दुधाची तूट निर्माण झाली आहे. आज अनेक ठिकाणी दूध पावडरींचे प्लँट सुरू झाले आहेत आणि त्याचा फटका महासंघसह अन्य वितरकांना बसतो आहे. अशा वेळी दूध उत्पादकांना अधिक भाव द्यावा, तर आर्थिक तूट वाढते. अशा कोंडीच्या परिस्थितीत दुधाच्या किमतीत फार फरक पडू न देता, ग्राहकावरही त्याचा बोजा पडू न देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. स्पर्धा वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे ब्रँडचं वैविध्य. 

आज महाराष्ट्रात दूधाचे जवळपास 155 ब्रँड आहेत. त्यातले जेमतेम 8-10 ब्रँडच सरकारने, अन्न व औषध प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचा आणि मापदंडाच्या चौकटीत, त्यातील नियमांना  अनुसरत आपली उत्पादनं तयार करतात. त्यामुळेच ते आज लोकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. महानंद हा अशांपैकीच एक ब्रँड, जो वेगवेगळया उत्पादनांच्या माध्यमातून आणि त्यांच्या राखलेल्या दर्जामुळे स्वत:चा लौकिक या क्षेत्रात टिकवून आहे.

[email protected]