उमलत्या वयातील भरकटलेली वाट

 विवेक मराठी  15-May-2017

***डॉ. यश वेलणकर***

बालवयात जग तुलनेने लहान असते. तारुण्यात ते विस्तारते. त्यामुळे विचारांचे प्रमाणही वाढते. या विचारांचे काय करायचे, त्यांना कसे हाताळायचे, अधूनमधून त्यांच्यापासून कशी शांतता मिळवायची, एकाग्रता आणि समग्रता कशी वाढवायची याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण त्यांना याच वयात मिळायला हवे. तेच खरे आवश्यक शिक्षण आहे. अन्यथा आज कुलकर्णीला अटक करून सिफू संकृती नष्ट करता येईल, पण वेगळया नावाने वेगळी माणसे असे उद्योग सुरू करीत राहतील आणि बंडखोर तरुण पिढी त्यांच्या कच्छपी लागत राहील, रेव्ह पाटर्या होत राहतील आणि मादक द्रव्यांचा व्यापार होतच राहील.

मुंबईत सिफू संकृतीच्या नादाला लागलेल्या दोन तरुणींनी त्यांच्या पालकांवर आरोप करीत न्यायाची मागणी केली आहे. सुनील कुलकर्णी नामक तथाकथित डॉक्टरच्या प्रभावाखाली येऊन घरातून त्या निघून गेल्या या बातमीमुळे माध्यमात हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला आहे. असे का होऊ  लागले आहे, यावर अनेक विचारवंत त्यांची मते मांडत आहेत.    

या सिफू संकृतीमध्ये अनेक तरुण-तरुणी सहभागी असावेत असे काही जणांना वाटत आहे. काही काळापूर्वी पुण्यात रेव्ह पार्टीच्या निमित्ताने अशीच चर्चा होत होती. अशा काही घटना घडल्या की आपण त्यावर काही काळ चर्चा करीत राहतो आणि नवीन विषय आले की हा विषय विसरून जातो. तसे न घडता सध्याच्या चर्चेतून काही उपाय शोधायचे असतील, तर असे का घडते हे प्रथम समजून घ्यायला हवे.

पौगंडावस्थेत शरीरात अनेक बदल होत असतात, त्याचप्रमाणे मेंदूतही बदल होत असतात. या वेळी मेंदूतील पेशींचे प्रूनिंग होत असते. ज्यांना कनेक्शन मिळाले नाही, त्या पेशी नष्ट होत असतात. शरीरात लैंगिक हॉर्मोन्स तयार होऊ  लागतात, त्याने शरीर वेगाने बदलते. शारीरिक बदल नवीन भावनांना जन्म देतात. त्याच वेळी जगाची नवीन माहिती कळत असते. वेगळे अनुभव घ्यावे, बंडखोरी करावी असे या वयातच वाटते. या सर्व गोष्टींचा एकत्र परिणाम म्हणजे या वयात मनात असंख्य विचार येत असतात. त्या विचारात गुंतल्याने या वयातील मुले-मुली बऱ्याचदा त्यांच्याच तंद्रीत असतात. आजूबाजूला काय चालले आहे याचे भान त्यांना राहत नाही. या विचारांच्या कल्लोळाचा परिणाम अभ्यासावरदेखील होतो. समोर शिकवले जात असते, पण मन विचारात भरकटते. अभ्यास वाचत असताना डोळे अक्षरांवर फिरत राहतात, पण त्याचे आकलन होत नाही. मनात सतत येणाऱ्या विचारांमुळे मन चलबिचल असते. भविष्याची स्वप्ने रंगवताना वर्तमानाशी असलेला सांधा तुटतो.

या वयात शिक्षक, पालक ओरडत असतात, लक्ष द्या असा उपदेश करीत असतात; पण लक्ष द्यायचे म्हणजे नक्की काय करायचे, हे कोणीच सांगत नाही.

बालवयात जग तुलनेने लहान असते. तारुण्यात ते विस्तारते. त्यामुळे विचारांचे प्रमाणही वाढते. या विचारांचे काय करायचे, त्यांना कसे हाताळायचे, अधूनमधून त्यांच्यापासून कशी शांतता मिळवायची, एकाग्रता आणि समग्रता कशी वाढवायची याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण त्यांना याच वयात मिळायला हवे. तेच खरे आवश्यक शिक्षण आहे.

मेंदूतील एक्झिक्युटिव्ह फंक्शन करणारा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स या वयात विकसित होत असतो. मेंदूतील हाच भाग भावनांना तीव्र होऊ देत नाही. कोणत्याही गोष्टीला अंध प्रतिक्रिया न देता योग्य प्रतिसाद निवडण्याची क्षमता ह्या प्रीफ्रंटल ब्रेनमुळेच माणसाला प्राप्त होत असते. एखाद्या निर्णयाचा काय परिणाम होऊ  शकतो याचा विचार करणे, मनात येणाऱ्या भावनांनुसार इम्पल्सिव्हली न वागणे ही सर्व या प्रीफ्रंटल ब्रेनची कामे आहेत. तो योग्य प्रकारे विकसित होण्यासाठी पूरक वातावरण या वयात मिळणे अपेक्षित आहे. पण ते सध्याच्या कोणत्याच व्यवस्थेत मिळत नाही आहे.

आज विभक्त कुटुंबपध्दतीत मुलांना वेळ देणे म्हणजे त्यांना फिरायला घेऊन जाणे यासाठीच पालक वेळ काढू शकतात, आणि शाळा, कॉलेजेस, टयूशन क्लास हे सिलॅबस पूर्ण करून अधिकाधिक मार्क मिळवण्याच्या शर्यतीत असतात. त्यामुळे मुलांना सॉफ्ट स्किल्स शिकवण्याचा विचारच आज होत नाही.


याच वयात मुलांना स्वत:ची आयडेंटिटी निर्माण करायची असते. त्यांना पालकांपेक्षा मित्रमैत्रिणी अधिक जवळचे वाटू लागतात. त्यांच्यावर 'इम्प' मारण्यासाठी रिस्क घेतली जाते. जुन्या परंपरा, बंधने झुगारून देऊन मुक्त जगावे, स्वच्छंदी वागावे असे वाटत असते. कुलकर्णीसारख्या व्यक्ती याच भावनेला प्रोत्साहन देतात, मुक्तता अनुभवण्याची संधी देतात. त्यामुळे त्याला अनुयायी मिळतात. आईवडील आमच्यावर अन्याय करीत आहेत असे तरुण मुली खुलेआम सांगतात किंवा रेव्ह पार्टीत सहभागी होतात, व्यसनांना बळी पडतात.

सध्या तरुण-तरुणींमध्ये आत्महत्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. विशेष म्हणजे या तरुण-तरुणींत नैराश्याची लक्षणे त्यांच्या मित्रमैत्रिणींना समजलेली नसतात. अशा घटना आपल्या आवतीभोवती घडत आहेत. बऱ्याचदा एखादा तरुण आत्महत्या करतो, त्या वेळी त्याच्या दोस्तमंडळींना दु:ख होतेच, पण आश्चर्यही वाटते. तो असे काही करेल अशी शंकाच कधी आमच्या मनात आली नव्हती असे ही दोस्तमंडळी बोलून दाखवतात.


असे का होत असावे?

याच्या दोन-तीन शक्यता आहेत.

1) नैराश्याचे विचार सर्वच माणसांच्या मनात येत असतात. पण हे विचार सुप्त मनात साठत राहिले, तर कोणत्यातरी छोटयाशा कारणानेदेखील नैराश्याची किंवा रागाची तीव्रता अचानक वाढते. कोणतीही भावना तीव्र असते, त्या वेळी आपल्या मेंदूतील वैचारिक मेंदूला ती कामच करू देत नाही. अन्य सर्व गोष्टी विसरल्या जातात आणि नैराश्याच्या भरात किंवा क्रोधाच्या भरात आत्मघातकी कृती घडून जाते. भावनेची तीव्रता अचानक वाढणे हे अशा वर्तनाचे एक कारण असू शकते. पौंगडावस्थेत मूड स्विंग खूप मोठे असतात, त्यामुळे या वयात अशा आत्महत्या किंवा सिफू, हिप्पी होण्याची प्रवृत्ती वाढते.

2) दुसरी शक्यता अशी आहे की ही भावनांची तीव्रता अचानक वाढत नाही. एखादे अपयश, प्रेमभंग यामुळे नैराश्य आलेले असते, पण ते व्यक्त करता येईल अशी खास जवळीक कुणाशीच नसते. आपल्या भावना व्यक्त केल्या तर चेष्टा होईल, आपले हसे होईल अशी भीती वाटत असते. त्यामुळे दोस्तांना याची कल्पना येत नाही. मग खोटी आपुलकी आणि स्वातंत्र्याचे आमिष दाखवणारा कुलकर्णी पालकांपेक्षा जवळचा वाटू लागतो.

3) कॉलेज युवक-युवती यांच्यातील आत्महत्यांचे आणि भ्रामक स्वातंत्र्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा सध्या वाढले आहे, याचे एक कारण समाजाची बदलती मानसिकता हेही असू शकते. आज व्यक्तीची समाजमानसातील प्रतिमा तिला अधिक महत्त्वाची वाटते. या प्रतिमेला धक्का बसण्यापेक्षा आयुष्य संपविणे किंवा घरातून पळून जाणे ती व्यक्ती अधिक पसंत करते.

सध्याच्या गतिमान आयुष्यातील वाढते ताणतणाव लक्षात घेतले, तर आपण सर्वांनीच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे. विशेषत: मुलांच्या वयाच्या बारा-तेरा वर्षांपासून आईवडिलांनी मुलांशी गप्पा मारणे, त्यांना विचार करायला प्रोत्साहन देणे या गोष्टी आवर्जून करायला हव्यात. त्याचप्रमाणे प्रीफ्रंटल ब्रेनला सजगतेच्या - म्हणजेच माइंडफुलनेसच्या सरावाने प्रशिक्षण मिळत असते. अमेरिकेत आणि युरोपमध्ये त्यासाठी आज अनेक माइंडफुल स्कूल्स सुरू झाली आहेत. आपल्या येथे असाच विचार करून पौगंडावस्थेतील मुलांसाठी सजगता वर्ग सुरू करायला हवेत. शाळा, कॉलेज, टयूशन क्लास यांनी त्यासाठी वेळ काढायला हवा.

असे केले, तर या घटनेच्या चर्चेतून काहीतरी साध्य होईल. अन्यथा आज कुलकर्णीला अटक करून सिफू संकृती नष्ट करता येईल; पण वेगळया नावाने वेगळी माणसे असे उद्योग सुरू करीत राहतील आणि बंडखोर तरुण पिढी त्यांच्या कच्छपी लागत राहील, रेव्ह पाटर्या होत राहतील आणि मादक द्रव्यांचा व्यापार होतच राहील.

9146364940

[email protected]