आव्हानांवर मात करणारे नेतृत्व

 विवेक मराठी  27-May-2017


केंद्रिय मंत्री मा. नितीनजी गडकरी हे भारतीय राजकारणातील मुरब्बी, कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक... भाजपातील धडाडीचे नेते... राज्यातील तडफदार, कार्यक्षम मंत्री... राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने पक्षाचे नेतृत्व करणारे महाराष्ट्रातील धुरंधर.... आणि सध्या केंद्रिय मंत्री या नात्याने विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारे... ही सगळी नितीन गडकरी या एकाच कर्तबगार व्यक्तीची थक्क करणारी रूपे. त्याचबरोबर ते प्रसिध्द उद्योजक आणि शेतकरीही आहेत. मा. नितीन गडकरी हे विवेक समूहाच्या इथवरच्या प्रवासाचे साक्षी आहेत, हितचिंतक आहेत आणि सन्मित्रही! नुकतीच या सन्मित्राने वयाची साठी पूर्ण केली. या षष्टयब्दीपूर्तीचे औचित्य साधून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ दर्शन घडवणारे लेख देत आहोत.

व्यवसाय प्रबंधन क्षेत्रातील एक नामवंत तज्ज्ञ शिव खेरा यांनी नेतृत्वाची व्याख्या करताना असे सांगितले आहे की, सामान्यपणे जी माणसे ज्या शैलीत काम करतात त्यापेक्षा भिन्न शैलीत कार्य करणारी व्यक्ती त्या समूहाचे नेतृत्व करणारी असते. हे सूत्र मांडताना एका छायाचित्राचा वापर ते करतात. त्या छायाचित्रात खूप सारे मासे प्रवाहाच्या दिशेने पोहताना दाखविले आहेत. त्याच छायाचित्रात एक मासा असाही दाखविला आहे, जो प्रवाहाच्या विरुध्द पोहत असतो. प्रवाहाविरुध्द पोहणाऱ्या त्या माशाला शिव खेराने नेता असे घोषित केले आहे. असाच एक जन्मजात नेता म्हणजे नितीनजी आहेत.

नितीनजींनी आपले राजकारणातील वेगळेपण अगदी आताच सिध्द केले आहे. नुकत्याच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा व मणिपूर राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यात पंजाब वगळता सर्वत्र भाजपाची सत्ता स्थापित झाली आहे. त्यातील गोव्यात भाजपा सरकार सत्तेत यायला फक्त अन् फक्त गडकरी कारणीभूत ठरले आहेत. दि. 11 मार्च 2017 या दिवशी मतमोजणी सुरू होती. गोव्यात भाजपाच्या तत्कालीन नेतृत्वाला ती निवडणूक खूप कठीण गेली होती. 40 सदस्यांच्या या विधानसभेत अंतिम निकाल घोषित झाले, तेव्हा निकाल असे होते - काँग्रेस 17, भाजपा 13, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, विजय सरदेसाई यांचा पक्ष व अन्य 10. सर्वात अधिक जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या होत्या अन् त्यापेक्षा चार जागा भाजपाला कमी मिळाल्या होत्या अन् 21 या जादुई आकडयापर्यंत कुणीच पोहोचलेले नव्हते. भाजपाचे गोव्यातील मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर पराभूत झाले होते. निकाल घोषित झाल्यावर रातोरात नितीन गडकरींना सांगावा गेला. खास विमानाने ते रातोरात गोव्यात पोहोचले. त्या वेळी रात्रीचा 1 वाजला होता. मतमोजणीत सर्वात जास्त जागा मिळविलेला काँग्रेस पक्ष सुस्तावला होता. त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या पक्षाची बैठक बोलाविली होती. काँग्रेसचे प्रभारी म्हणून दिग्वीजय सिंग यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. ते गोव्यातील एका बडया हॉटेलात शांत व गाढ झोपले होते. गडकरींनी 1 वाजता गोव्यात पोहोचताच आपल्या बैठका, भेटी यांचा सपाटा सुरू केला. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाशी चर्चा सुरू केली. या चर्चेतून हळूहळू पीळ सैलावत गेला. पहाटे पहाटे त्या पक्षाने भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विजय सरदेसाई यांच्याशी चर्चा सुरू झाली. त्यांनी अट टाकली होती - जर मनोहर पर्रिकर गोव्यात मुख्यमंत्री म्हणून परतणार असतील, तर अन् तरच भाजपाला आमचा पाठिंबा राहील. याबाबत स्पष्टता द्यायला दिवस उजाडला होता. नितीनजींनी गोव्यातून या घडामोडी दिल्लीला कानावर घातल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी बोलणे सुरू झाले. केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून पर्रिकरांवर मोठी जबाबदारी होती. त्यांना गोव्यात धाडायचे की, गोवा गमवायचा हा कळीचा मुद्दा होता. 11 वाजताच्या सुमारास केंद्राने निर्णय घेतला की, पर्रिकर गोव्यात जातील आणि दोन्ही मित्रपक्षांची व काही अपक्षांची पाठिंबा पत्रे घेऊन भाजपा नेत्यांनी गोव्यातील राजभवन गाठले. श्रीमती मृदुला सिन्हा यांना 22 जणांची (आमदारांची) यादी देण्यात आली. राज्यपालांनी पत्र ठेवून घेतले. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी पर्रिकरांची निवड झाली. राज्यपालांनी त्यांना सरकार तयार करायला सांगितले. तोपर्यंत दिग्गीराजा राणे की दिगंबर कामत की आणखी कुणी याबाबत आमदारांची मते आजमावीत होते.

मुख्यमंत्री म्हणून पर्रिकरांचा शपथविधी होणार या बातमीचा फॅक्स येताच काँग्रेसवर तडिताघात झाला. नितीनजींनी हरलेली बाजू विजयात पलटविली होती. अपयशाचे रूपांतर विजयात झाले होते. नितीनजींनी हे पहिल्यांदाच केले होते काय? त्यांना जवळून जाणणारे लोक-मित्र याचे उत्तर 'नाही' असेच देतील. 1995-1996मध्ये महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार निवडणुकीत माघारले आहे, हे पाहिल्यावर गडकरींनी असेच रातोरात विदर्भातील अपक्ष आमदार गोळा केले होते. पूर्ण निकाल लागण्यापूर्वीच आमदार सुनील केदार यांची रवानगी गडकरींनी मुंबईत केली होती व त्यांच्या या धावपळीमुळेच त्या वेळी मनोहर जोशी व गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असे सेना-भाजपा-अपक्ष युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले होते. विदर्भातील अपक्षांची फौज युतीला मिळाली नसती, तर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले असते काय? या प्रश्नाचे उत्तर मला तरी आजही नकारार्थी मिळते.


नितीनजींच्या राजकारणाचा बाजच जरा वेगळा आहे. अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांचे नेतृत्व फुलले. विद्यार्थी परिषदेत असतानाही अभ्यासवर्ग घेणे, एखाद्या महाविद्यालयात संघटना बांधणे, भाषणे देत विद्यार्थ्यांना जमा करणे यापेक्षा निवडणुकीचे व संघर्षाचे राजकारण त्यांना मनापासून आवडत असे. त्यांनी अभ्यासवर्ग वगैरे घेतले नसतील असे नाही, पण त्यात त्यांची खरी रुची नव्हती व त्या वेळी खरे नितीनजी दिसतही नसत; पण विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुका आल्या की त्यांच्यातील नेतृत्व उफाळून येत असे. त्या निवडणुका लढविण्यात व गाजविण्यात आगळात आनंद मिळत असे. त्या वेळी विद्यापीठ राजकारणात एन.एस.यू.आय., युवक काँग्रेस, काँग्रेसमधील तिरपुडे गट यांचा दबदबा राहत असे. त्यात विद्यार्थी परिषद खाली कुठेतरी राहत असे. पण नितीनजींच्या आधी बापू भागवतकडे नेतृत्व आले आणि निवडणुकांत विद्यार्थी परिषदेची दखल घेतली जाऊ लागली. मॉरिस कॉलेजमधून यू.आर. झालेला मोहन गिरी एकमताने पडला आणि राष्ट्रवादी संघटनेला विरोध करणारे हादरले. तोच वसा नितीनजींनी पुढे चालविला. कधी तिरपुडे गटाला जवळ कर, तर कधी श्रीकांत जिचकारांना मित्रत्वाची स्नेह गळाभेट दे, तर कधी बर्डी पॅनलला एखादे पद देत अ.भा. विद्यार्थी परिषदेकडे नितीन गडकरी अध्यक्षपद व सचिवपद आणू लागले. त्यातूनच रवींद्र कासखेडीकर, विजय प्रकाशे आदी विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होऊ लागले. निवडणुका लढविताना पैसा महत्त्वाचा असतो, हे त्यांना जेव्हापासून जाणवू लागले. त्यापूर्वी विद्यार्थी परिषद म्हणजे चार-चार आणे गोळा करून कार्यक्रम घेत होती. तो काळ नितीनजींनी अनुभवला आहे.

कुठे निदर्शने करायची आहेत, माईक पाहिजे म्हटले की, रेशीमबागमधील माईक नितीनजी मिळवीत. निदर्शने जंगी होत. बातम्या छापून येत, पण नंतर मात्र माईकची व्यवस्था करणारे नितीनजी व माईकवाले कुलकर्णी यांचा शिवाशिवीचा खेळ सुरू होत असे. समोरून कुलकर्णीची सायकल दिसली की नितीनजी अलगद बाजूच्या गल्लीत जात. माईकचे त्या वेळी काय जे 15-16 रुपये होत ते मिळत नाहीत, म्हणून कुलकर्णी हात चोळत असत आणि पुढील कार्यक्रमाआधी नितीनजी त्याची व्यवस्था जरूर करत असत.

त्या काळात विद्यार्थी परिषदनंतर नितीनजी भाजपाचे काम करू लागले. रंग उडालेली त्यांची ती पांढुरकी गुलाबी रंगाची व्हेस्पा संपूर्ण विदर्भात फिरत असे. रस्त्याला बंद पडली की तिला धक्का मारीत घरी आणणे हे नितीनजींसाठी नवीन नव्हते. आज ती स्कूटर गेली. कार आली. त्यानंतर अनेक गाडया आल्या. गडकरी आता तर विजय मिळविण्यासाठी खास विमानातून जातात. पण ते जुने दिवस अजूनही त्यांच्या स्मरणात आहेत. हेच त्यांच्या राजकारणाचे व नेतृत्वाचे वेगळेपण आहे.

नागपूरची एम्प्रेस मिल बंद पडली. हजारो कामगार बेकार झाले. कामगार कायद्यामुळे इंटकच्या हातातच सर्व सूत्रे होती, पण त्या विपरीत वातावरणातही नितीनजी कामगारांच्या हितासाठी झगडत होते. झटत होते. इंटकमधील हरिभाऊ नाईक यांच्या विरोधात त्यांनी सतीश चतुर्वेदीचा गट उभा केला आहे. भाजपा व सतीश चतुर्वेदी गट मिळून कामगारांना मदत करू लागले. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे राजकारणातील सूत्र त्यांनी अगदी सहजपणे अंगीकारले. कामगार क्षेत्रात सतीश चतुर्वेदी सोबत असतानाच महापालिकेत मात्र ते सतीशच्या विरोधात होते. झुंजी देणे, धडका देणे, समोरच्याला जायबंदी करणे वा प्रसंगविशेषी स्वत:ही जायबंदी होणे याचे आगळे आकर्षण नितीनजींना होते, म्हणूनच त्यांनी राजकारणाचा बाजच बदलून टाकला.

महापालिकेच्या वा नागपूर विद्यापीठाच्या राजकारणात नितीनजी व अटल बहादूर सिंह नेहमी परस्पर विरोधात उभे ठाकले. रामजन्मभूमीचे आंदोलन सुरू असताना नितीनजींनीच अटल विरोधात जोरदार निदर्शने घडवून आणली होती, पण त्याच अटलला त्यांनी भाजपाच्या तिकिटावर नागपूर लोकसभा मतदारसंघातून उभे केले. त्या वेळी विदर्भात लोकसभेच्या 11 जागा होत्या. त्यापैकी फक्त नागपूरची जागा भाजपाने गमाविली होती, पण उर्वरित दहाही जागांवर भाजपा विजयी झाला होता. भाजपाची पायाभरणी शतप्रतिशत नितीनजींमुळे झाली. पक्षापल्याड जाऊन मैत्री करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे झाली.

संघर्ष, कायम लढा यात गुंतलेला, रमलेला हा नेता सत्तेत कधी जाईल व तिथेही आपली नाममुद्रा उमटवील असे वाटले नव्हते. कारण सत्तेचा त्यांना मोह नव्हता. महाराष्ट्रात युती शासन आल्यावर सुरुवातीला ते मंत्री झाले नव्हते. मंत्रीमंडळात जाण्याचा त्यांचा मनोदयही नव्हता. पण युतीच्या मंत्रीमंडळ विस्तारात राजकारणाची अपरिहार्यता म्हणून ते मंत्री झाले. सार्वजनिक बांधकाम यासारखे त्या वेळी कुणीही फारसे मागत नसलेले खाते त्यांनी स्वीकारले आणि त्यातून महाराष्ट्राचा कायापालट घडवून आणला.

नितीनजींच्या कामाचे वैशिष्टय आहे की, ते चांगल्या गोष्टी कुठूनही शिकत असतात. केंद्रात काँग्रेसचे सरकार होते व जगदीश टायटलर वा कमलनाथ हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते, तेव्हा पहिल्यांदा 'पब्लिक-गर्व्हमेंट पार्टिसिपेशन' ही योजना सुरू झाली होती. ती नितीनजींनी जाणून घेतली आणि अतिशय प्रभावीपणे ती योजना महाराष्ट्रात राबविली. बी.ओ.टी. - म्हणजेच 'बिल्ड, ऑपरेटर ऍंड ट्रान्स्फर' तत्त्वावर त्यांनी महाराष्ट्रात काम करणे सुरू केले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारला व विक्रमी वेळात व कमी खर्चात पूर्णत्वाला नेला. आपल्याला हे कंत्राट कसे मिळाले नाही याचा विचार धीरूभाई अंबानी करू लागले. त्यांनी स्वत: नितीनजींजवळ ही खंत व्यक्त केली होती, तर या महामार्गावरून जाताना झालेला आनंद व्यक्त केला. शिवाय अमिताभ बच्चन या नटालाही चैन पडली नाही. अभिनंदन करणारा स्वत: अमिताभ बच्चनचा फोन आला, हे समजल्यावर नितीनजी आनंदाने उडायचेच तेवढे बाकी राहिले होते, कारण त्यांच्या पिढीचा सुपरस्टार होता अमिताभ बच्चन व त्याने फोन करावा आणि अभिनंदन करावे म्हणजे खूपच झाले. यातून एक नवीन जादूचा दिवाच नितीनजींना गवसला व त्यांनी इतक्या धाडसाने काम सुरू केली की महाराष्ट्र त्यांना 'पूलकरी, रोडकरी' म्हणून ओळखू लागला.

त्यांचा होणारा विकास, त्यांच्या यशाची चढती कमान सहन न होऊन भाजपामधीलच काही सहकारी मंत्र्यांनी अण्णा हजारे यांच्याकडे नितीनजींबाबतची कागाळी केली. सामान्यत: राजकारणी मंडळी अशा आरोपांकडे कानाडोळाच करतात, पण नितीनजींनी ते आरोप अतिशय गंभीरपणे घेतले. कुणीतरी त्यांना म्हणालेही, ''इतके पॅनिक का होता? राजकारणात तर असे आरोप होतच राहतात.'' नितीनजी त्या वेळी लागलीच म्हणाले होते, ''स्वच्छ चारित्र्याविना मजजवळ पूंजी ती कोणती आहे? तिच्यावरच जर कुणी घाला घालू बघत असेल, तर संतापून उठायचे नाही, तर काय करायचे?'' त्यांच्या या आक्रमक पावित्र्यानेच आरोप करणारे गारद झाले होते.

महाराष्ट्रात युतीचे शासन आले आणि पाच वर्षांनी पुन्हा परिवर्तन झाले. आघाडी शासन सत्तेवर आले. नितीनजी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते झाले. तो सगळा कालखंड खूप परीक्षा घेणारा ठरला होता. रामटेकवरून नागपूरला परत येताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. फक्त नशीब म्हणून सर्व वाचले. पण त्या क्षणीही आपल्यातील नेता त्यांनी हरपू दिला नव्हता. सोबतच्या सर्वांना, म्हणजे जखमी झालेल्या कांचनवहिनी, नितीनजींचा स्वीय साहाय्यक चारुहास बोकारे व ड्रायव्हर या सर्वांना उपचारासाठी रवाना करूनच मगच जखमी नितीनजी ऑरेंज सिटी हॉस्पिटलला रवाना झाले होते. त्या अपघातामुळे त्यांची लोकप्रियता पुन्हा एकदा सिध्द झाली होती. लोकांचे अन् नेत्यांचे थवेच्या थवे त्यांना बघायला इस्पितळात लोटत होते. गर्दी आवरता आवरत नव्हती. देशभरातील बडे नेते त्यांना भेटायला रुग्णालयात आले होते. पण त्या अपघातात त्यांचे सहा-आठ महिने गेले होते. राजकारणाच्या ऐन उमेदीत त्या अपघाताने एक नवीन आव्हान समोर उभे केले होते.

याच काळात नागपूर महापालिकेत झालेल्या अफरातफरी प्रकरणी राज्यातील सत्ताधाऱ्यांना भाजपातील अनेक नगरसेवकांना अटक केली होती. सर्व पक्ष जनमानसाच्या मनातून उतरतो का? अशी स्थिती होती. त्या अवस्थेततही नितीनजी गरजले होते, ''सूडाचे खोटे राजकारण करणाऱ्या एकेकाला मी धडा शिकविल्याविना राहणार नाही'' व त्याने सर्व राजकारण बदलून गेले. सूडाचे राजकारण करणारे आज गजाआड गेले आहेत. विरोधी पक्ष नेते असताना त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. त्यांनी आपल्या नेतृत्वात पक्षाला आक्रमक रूप दिले, चेहरा दिला. या काळात ते फक्त विधानपरिषद सदस्य होते. पण अशा झुंजार लढवय्या नेत्याला नियती फार काळ स्वस्थ राहू देत नाही. भाजपात परिवर्तन करण्याचा निर्णय घेण्यात आला. राजकारणातील पहिली पिढी निवृत्ती मार्गाकडे वाटचाल करीत होती. दुसऱ्या पिढीला वगळून तिसऱ्या पिढीवर पक्षाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय झाला. दिल्लीच्या वातावरणाला सरावलेली, दिल्लीतील वावरामुळे संपूर्ण भारताला आणि जगाला माहीत असलेली नावे मागे पडली व नितीनजी भाजपाचे अध्यक्ष झाले. भाजपाच्या स्थापनेनंतर प्रथमच नागपूरला अखिल भारतीय भाजपाचे अध्यक्षपद मिळाले.

आव्हाने समोर खूपच होती. दिल्लीत कुठे राहायचे यापासून हिंदी भाषेतील तज्ज्ञता इथपर्यंत सर्व प्रश्न होते. पण त्या सर्वावर त्यांनी सहजतेने मात केली. तोवर अ.भा. अध्यक्ष म्हणजे धोतर वा पैजामा-कुडता हा पोषाख रूढ झाला होता. त्यालाच नितीनजींनी पहिला धक्का दिला. बुशशर्ट व पँट हा आपला नेहमीचा पोषाख कायम ठेवला. त्यामुळे तरुणाईशी त्यांचा संपर्क कायम राहिला. खासदार व नंतर केंद्रीय मंत्री झाल्यावरही त्यांच्या पोषाखात त्यांनी बदल केला नाही. फक्त आता जाकीट तेवढे नव्याने समाविष्ट झाले. त्यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करणारे अ.भा. अधिवेशन इंदोरला झाले. परंपरागत पध्दतीने तारांकित हॉटेलात उतरण्याची पध्दत त्यांनी बदलली. संघपध्दतीने सर्व प्रतिनिधींची व्यवस्था तंबूत करण्यात आली. त्या परिसरात पर्यावरणस्नेही वातावरण निर्माण करण्यात आले होते. पेट्रोल वा डिझेलवर चालणारी वाहने त्या ठिकाणी नव्हती, तर सायकल अन् बॅटरीवर चालणारे दिवे होते. त्या अधिवेशनात देशाच्या प्रगतीची माहिती होईल असे पर्यावरणस्नेही प्रदर्शन लावण्यात आले होते. त्या वेळच्या भाषणातून त्यांनी नवीन संघर्षाचा, आंदोलनाचा मार्ग सांगितला आणि ऐन उन्हाळयात भाजपाने दिल्लीत निदर्शने आयोजित केलीत. संघर्ष, निदर्शने, मोर्चा यांचा विसर पडलेल्या पक्षाला त्यांनी एक पूर्वपरंपरेचा पण आक्रमक मार्ग दाखविला. आक्रमकतेने स्वत: नितीनजी पुढे जात होते आणि पक्षाला पुढे घेऊन जात होते. अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून खरे त्याच वेळी संसदेच्या एखाद सभागृहाचे त्यांनी सदस्य व्हायला हवे होते. तसे ते झाले असते, तर दिल्लीतील सत्तेच्या राजकारणात त्यांचा वावर राहिला असता. खासदार म्हणून ज्या सहजतेने सत्तेच्या दालनात वावर राहिला असता, त्यापासून वंचित राहिले. खासदार नसल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वे भारतात येत, त्यांच्यावर प्रभाव टाकण्यापासून वंचित राहावे लागते. पक्ष संघटन आणि लोकप्रतिनिधित्व यात संघटन मोठे आहे, असा सल्ला त्यांना देण्यात आला व मी राज्यसभेत वगैरे जाणार नाही अशी घोषणा करून ते मोकळे झाले. तत्त्व आणि व्यवहार यात सांगड घालण्याऐवजी त्यांनी तत्त्वाला अग्रक्रम दिला, अशी ही पहिली वेळ होती. आज मागे वळून पाहताना जाणवते की, तो सल्ला ऐकून नितीनजींनी एका संसदपटूपासून देशाला त्या वेळी वंचित केले. त्याचा परिणाम नाही म्हटले तरी पराभव झालाच.

नितीनजींच्या राजकारणाचे वैशिष्टय आहे की आक्रमक होत विरोधकांना अंगावर ओढावून घेण्यात, त्यांच्याशी वाद घालण्यात त्यांना नेहमीच पराकोटीचा आनंद मिळतो. हा आनंद घेत असतानाच ते त्या व्यक्तीला आपलेसेही करून टाकत असत. याच शैलीमुळे त्यांनी दिल्लीत अन्य पक्षांमधील आपला मित्रपरिवारही वृध्दिंगत केला. वाढता ठेवला. मुलायमसिंह, लालू आणि ममता दीदी यांच्याशी वाद कायम ठेवीतही मैत्री वाढविली. स्नेह वाढविला. एक नवीन राजकारणी, नवीन मुत्सद्दी त्या वेळी आकार घेता झाला. भाजपाची लोकमान्यता वाढत होती. शिवाय राजकारणातील नितीनजींचा दबदबाही वाढत होता. पक्षाने त्याकरिता म्हणून पक्ष संविधानात दुरुस्ती केली. लागोपाठ दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मार्ग त्यांच्यासाठी म्हणून मोकळा करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत असतानाही नागपूरकडे त्यांचे लक्ष होते. भविष्यात आपल्याला नागपूरचे लोकप्रतिनिधी व्हावयाचे आहे, हे त्यांनी मनोमन ठरविले होते. त्यामुळे भाजपाच्या परंपरागत मतदारांऐवजी नवनवीन क्षेत्रात ते आपला दबदबा वाढवीत होते. अगदी मुस्लीम वस्तीतही त्यांची मान्यता वाढत होती. त्यांच्या वाडयावर जो कुणी येत होता त्याची सर्व काळजी घेतली जात होती. त्याच्या समस्या ऐकल्या जात होत्या. त्यांना उत्तरे मिळत होती. रिक्तहस्ते कुणीही वाडयावरून परत जात नव्हता. जणू रोज वाडयावर 'लोक दरबार' लागत होता. पण हा वाढता दबदबा अनेकांसाठी पोटशूळ ठरू लागला. त्यातून दोन प्रकरणे उभी केली गेली. गडकरी कुटुंबाला व स्वत: नितीनजींना त्याचा भरपूर मन:स्ताप सहन करावा लागला. एक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याबद्दल लिहिणे इष्ट होणार नाही. पण पूर्ती प्रकरणात झालेले आरोप फक्त पुन्हा अध्यक्षपद मिळू नये यासाठीच होते. वास्तविक आरोप झाल्यावर नितीनजी लगेच खुलासा करतात; पण या प्रकरणी त्यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही मौन बाळगा, पण या मौनामुळेच आरोप करणाऱ्यांना वाटायला लागले की नक्कीच 'दाल में कुछ काला है'. यातूनच ज्यांनी आक्षेप घेतला, तो बेपत्ता आहे वगैरे माहिती माध्यमे पेरू लागली. पण वस्तुस्थिती अशी होती की, ती व्यक्ती त्याच गावात घरी होती. एका वृत्तवाहिनीने त्याची मुलाखत दाखविल्यावर खुलासा झाला. त्यानंतर नितीनजींनी मनमोकळया, मोकळया-ढाकळया मुलाखती देत आपली बाजू स्पष्ट केली. त्यामुळे आरोपांचे ढग बाजूला सारले गेले. आज ते प्रकरण जणू इतिहासजमा झाले आहे. पण त्याचा एक परिणाम असा झाला की, नितीनजी दुसऱ्यांदा भाजपा अध्यक्ष होऊ शकले नाहीत.

दुसरा कोणी असता, तर या पर्वाने खचून गेला असता. वस्तुस्थिती काही वेगळीच असताना विनाकारण त्यांना माध्यमांचे ताडन सहन करावे लागले. पण तीही बाब नियतीचा खेळ म्हणून त्यांनी सहजतेने स्वीकारली. पुढे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. नितीनजींनी भंडारा वा वर्धा या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा सल्ला त्यांना देण्यात येऊ लागला. त्या वेळी नितीनजींनी स्पष्ट केले की, मी नागपूरमधूनच निवडणूक लढविणार आहे. आणि त्यांनी नागपुरात विजयी होऊन एक नवीन विक्रम रचला. फक्त माजी केंद्रीय राज्यमंत्र्याला पराभूत केले असे नाही, तर अतिशय निर्णायकपणे 3 लाखांवर मतांनी विजय संपादन केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात ते जबाबदारी स्वीकारते झाले. त्यांना भूतल व जल परिवहन खात्याचे मंत्री करण्यात आले. आज नितीनजी त्या मंत्रीमंडळातील मुख्य ट्रबल शूटर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे ज्या मंत्र्यांच्या कामाचे मुक्तपणे कौतुक करतात, त्यात नितीनजींचे नाव अग्रभागी आहे. उत्तराखंडातील चारही धामला जाण्यासाठी बारमाही रस्ता ते तयार करीत आहेत. 'माता-पित्यांना श्रध्दास्थानांची यात्रा घडविणारा श्रावणबाळ' या शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचा उल्लेख केला आहे.

रस्ते बांधण्याचा जो वेग पूर्वी मंदावला होता, तो आता चांगलाच वाढला आहे. जलमार्गाने वाहतूक सुरू करण्याचा त्यांचा प्रयास आहे. आज नितीनजी फक्त नागूपरचे, विदर्भाचे वा महाराष्ट्राचे राहिले नाहीत, तर संपूर्ण देशाचे झाले आहेत. मात्र व्ही.आय.पी. संस्कृती त्यांना अजून स्पर्श करू शकली नाही. अशा या लोकोत्तर नेत्याचा षष्टयब्दीपूर्ती निमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा!

8888397727