पाण्यासाठी 'पुढच्या हाका, सावध ऐकण्याची तयारी'

 विवेक मराठी  29-May-2017


पाणीटंचाईच्या धगीतून जलयुक्त शिवार ही शासनाची मोहीम ग्रामीण जनतेची सुटका करू शकते, असा विश्वास जनतेला वाटू लागला आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईचा वणवा पेटला असला, तरी शहरातील जनता त्यामानाने सुखी म्हणावी लागेल. कारण महानगरपालिका अजूनही पुरेसा पाणीपुरवठा करीत आहे. परंतु येणाऱ्या काळात पाण्यासाठी शहरांनाही योगदान द्यावे लागेल, हे धुळयातील काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने आपल्या उपक्रमातून दाखवून दिले आहे.

जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळूनी किंवा पुरुनी टाका

सडत न एका ठायी ठाका

सावध ऐका, पुढल्या हाका...!

या केशवसुतांच्या कवितेतील उक्तीप्रमाणे पाण्याबाबत तरी वर्तन करण्याची गरज लोकांना वाटू लागली आहे. त्यामुळे आपल्या दारी असलेला नळच पाण्याला जन्म घालतो, या भ्रमातून लोक जागे होऊन पाण्याचे मूल्य समजून घेऊ लागले आहेत. तसे नसते, तर राज्यभर लोकसहभागातून मोठया प्रमाणावर जलसंधारणाची कामे यशस्वी ठरली नसती. पाणी फक्त शेत-शिवारात, डोंगरपायथ्याशीच अडविले जाऊ शकते असे नाही तर ते शहरातून वाहणाऱ्या छोटया-छोटया नाल्यांना बांध घालूनही अडविता येते, हे धुळेकरांनी सिध्द करून दाखविले आहे.

महानगरांना पाण्याची वारेमाप उधळण करता यावी म्हणून धरणांसाठी खेडी पुनर्वसित झाली. शेतातली उभी पिके जळून गेली तरी चालतील, पण शहरे तहानलेली राहू नयेत म्हणून अनेक मैल अजस्र पाईपलाइन टाकून शहरांना पाणी पुरविले जाते. शहराला पाणी मिळावे म्हणून ग्रामीण जनता शेती-बाडीचे बलिदान करते. आता ह्या बलिदानाच्या बदल्यातलं पाणीदेखील शहरांची तहान भागवू शकत नाही, म्हणून की काय धुळयातील काही सावध झालेल्यांना 'पुढच्या हाका' ऐकू आल्या असाव्यात. त्यामुळे विस्तारत चाललेल्या महानगर क्षेत्रांतर्गत 'पाणी अडवा, पाणी जिरवा' उपक्रम राबवायला सुरुवात झाली असावी.

धुळे जिल्हा मागच्या काही वर्षांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. पाण्याच्या एकेका थेंबासाठी शहरी व ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईने कळस गाठला असून मागच्या महिन्यात पाणी भरण्याच्या वादातून शिंदखेडे तालुक्यातील 'दत्ताने' गावातील एका महिलेने स्वत:ला पेटवून घेतले होते. पाण्याचा टँकर येताच पाणी भरण्यासाठी गावात एकच झुंबड उडते. त्यातून होणारे वाद एखाद्या महिलेने पेटवून घ्यावे इथपर्यंत विकोपाला पोहोचू लागले आहेत. शिंदखेडे तालुक्यातील ह्या भागात लागोपाठ 4 वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. पाणीटंचाईच्या धगीतून जलयुक्त शिवार ही शासनाची मोहीम ग्रामीण जनतेची सुटका करू शकते, असा विश्वास जनतेला वाटू लागला आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईचा वणवा पेटला असला, तरी शहरातील जनता त्यामानाने सुखी म्हणावी लागेल. कारण महानगरपालिका अजूनही पुरेसा पाणीपुरवठा करीत आहे. परंतु येणाऱ्या काळात पाण्यासाठी शहरांनाही योगदान द्यावे लागेल, हे धुळयातील काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने आपल्या उपक्रमातून दाखवून दिले आहे.

धुळयात काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मुकुंद कोळवले यांनी महापालिका हद्दीत कोळवले नगराजवळील सिंधी नाल्यावर लोकसहभागातून व स्वत:च्या आर्थिक सहकार्यातून दगडी बांध बांधण्याचा प्रस्ताव सादर केला. शहरात होणाऱ्या अशा जलसंधारणाच्या कामाबाबत जिल्हाधिकारी
डॉ. पांढरीपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाली. जलयुक्त शिवार समितीचे धुळे तालुक्याचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी मंजुरी दिली. मिसाळ यांनी कोळवले यांना या नाल्यावर लोकसहभागातून व स्वखर्चातून काम करण्याबाबत पत्र दिले. 22 लाख रुपये खर्चाच्या या कामास पाटबंधारे विभागाने मंजुरी दिल्यानंतर हे काम होण्याबाबतचा आदेश पारित झाला. महानगरांतर्गत जलयुक्त शिवाराच्या कामास आता प्रारंभ झाला आहे.

धुळे शहराची सध्याची लोकसंख्या 6 लाख 24 हजार इतकी असून या लोकसंख्येला दररोज सुमारे 6 कोटी लिटर इतक्या पाण्याची गरज आहे. सध्या धुळयाला 60 किमी अंतरावरील तापी नदीवरून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. 1994 साली ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून तापी नदीत उन्हाळयात पाण्याचा स्रोत आटतो. त्यामुळे ऐन उन्हाळयात ह्या योजनेद्वारे पाणी मिळू शकत नाही. शहरापासून जवळ असलेल्या नकाणे व डेडरगाव तलावांमध्ये अलीकडे काही वर्षापासून दुष्काळी परिस्थितीमुळे फारसा पाणीसाठा होत नाही. शिवाय अक्कलपाडा धरणातूनही हरणमाळ बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. तेही उन्हाळयात धुळयाची पाण्याची तहान भागवू शकत नाही.

पाण्याची वाढती गरज पाहता शहरांनाही आता पाणी अडविण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे लागेल, हे जाणून धुळयातील मुकुंद कोळवले यांनी याची सुरुवात केली आहे. भविष्यातील पाण्याची वाढती गरज पाहून शहरातील जनतेने पाणी अडविण्याच्या कामात सहभागाची तयारी केली असल्याचे यातून दिसून येते.

शहरातून जाणारे किंवा शहराला लागून असलेल्या नाल्यांचे खोलीकरण केल्यास पुराच्या पाण्याचा धोका कमी होईल, तसेच नाल्याच्या काठावर होणारे अतिक्रमण थांबू शकेल. हा फायदा सर्वच शहरांना होणार असल्याने धुळयातील या प्रयोगाची दखल शासकीय पातळीवर घेतली गेली आहे.

8805221372