चार साम्राज्यवादी आक्रमणांचा मुकाबला

 विवेक मराठी  30-May-2017

हिंदूंच्या इतिहासात पूर्वीही ग्रीक, शक, कुशाण, हूण यांची आक्रमणे झाली होती. पण ही आक्रमणे व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेतून झालेली होती. त्यामुळे एकदा त्या आक्रमकांचा आपल्या मूळ देशाशी संबंध तुटल्यानंतर ते सर्व आक्रमक इथल्या संस्कृतीशी मिसळून गेले. व्यवहारात प्रत्येकाचे वेगळेपण कायम  ठेऊन मानसिक पातळीवर एकात्मता निर्माण करण्याच्या विशेष सांस्कृतिक परंपरेमुळे अनेक विविध प्रकारचे गट हिंदूंच्या सांस्कृतिक प्रवाहात सामील झाले. देव, धर्म, ग्रंथ, पूजापाठ, रूढी, राजवट, तत्त्वज्ञान अशापैकी कोणत्याही एका बाबतीत व्यवहारात सांगता येण्यासारखा सारखेपणा नसूनही मानसिक पातळीवर एक समान, शब्दातीत मूल्यभावना निर्माण झाली होती.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हिंदू समाजाची स्थिती कशी होती व त्याच्यासमोर कोणकोणते प्रश्न होते याचे वर्णन 1920 साली 'ज्ञानकोश'कार केतकर यांनी केले आहे.

' भारतीय संस्कृतीची अंगे चोहोकडे पसरली, तिने अनेक लोकांवर छाप टाकली आणि बऱ्याच लोकसमुदायात स्थूल एकरूपता आणली. पण 900 वर्षांचा इतिहास पाहता विद्येविषयी असलेल्या दुर्लक्षामुळे, स्पर्धा करणाऱ्या व भारतीय संस्कृतीचा नाश करू पहाणाऱ्या इतर संस्कृतीशी विद्वानवर्ग अपरिचित असल्यामुळे, वाढत चाललेल्या ज्ञानक्षेत्राशी असंबध्द राहिल्याने, जगाशी स्पर्धा करण्यास योग्य असे समाजयंत्र बनविण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे व इतर काही कारणांनी या संस्कृतीचा दिवसेंदिवस नाश होत आहे. एकेकाळी या संस्कृतीचा पगडा बॅक्ट्रियापासून कंबोडियापर्यंत आणि खरोष्ट्रापासून फिलिपाईन्सपर्यंत एवढा दृढ झाला होता की, हा सर्व प्रदेश म्हणजे भारतवर्षच होऊ पहात होता... तीच संस्कृती आज नामशेष होऊ  पहात आहे आणि आपण जागरूक झाल्यास तिचे भवितव्य काय आहे या सर्व गोष्टी आपणास विचारार्ह आहेत.'(ज्ञानकोश प्रस्तावना खंड)

एकेकाळी इराण - अफगाणिस्तानापासून कंबोडियापर्यंत पसरलेल्या भारतीय किंवा हिंदू संस्कृतीचा भौगोलिक संकोच तर झाला होताच, पण सुशिक्षितांमध्ये आपण हिंदू आहोत असे सांगणे न्यूनगंडाचे वाटावे, असा बौध्दिक संकोचही झाला होता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रचलित जगाशी स्पर्धा करू शकेल असे जे समाजयंत्र बनवावे लागते, ते बनविण्याची हिंदू समाजातील प्रक्रियाच नष्ट होऊन गेली होती. केवळ आंधळेपणाने परंपरेचे पालन करणे म्हणजेच धार्मिकता असे मानले जात होते.

हिंदूंच्या इतिहासात पूर्वीही ग्रीक, शक, कुशाण, हूण यांची आक्रमणे झाली होती. पण ही आक्रमणे व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेतून झालेली होती. त्यामुळे एकदा त्या आक्रमकांचा आपल्या मूळ देशाशी संबंध तुटल्यानंतर ते सर्व आक्रमक इथल्या संस्कृतीशी मिसळून गेले. व्यवहारात प्रत्येकाचे वेगळेपण कायम  ठेऊन मानसिक पातळीवर एकात्मता निर्माण करण्याच्या विशेष सांस्कृतिक परंपरेमुळे अनेक विविध प्रकारचे गट हिंदूंच्या सांस्कृतिक प्रवाहात सामील झाले. देव, धर्म, ग्रंथ, पूजापाठ, रूढी, राजवट, तत्त्वज्ञान अशापैकी कोणत्याही एका बाबतीत व्यवहारात सांगता येण्यासारखा सारखेपणा नसूनही मानसिक पातळीवर एक समान, शब्दातीत मूल्यभावना निर्माण झाली होती. जोवर कोणत्याही सुसंघटित संस्कृतीशी हिंदू समाजाचा संपर्क आला नव्हता, तोवर ही समाजयंत्रणा ठीक चालली होती. ग्रीकांचे आक्रमण राजकीय होते, त्याला चाणक्य व चंद्रगुप्त यांनी मध्यवर्ती प्रबळ सत्ताकेंद्र स्थापून उत्तर दिले. तसेच शक, कुशाण व हूणांच्या बाबत झाले. एकतर त्यांचा लष्करी पराभव झाला किंवा ते हळूहळू ज्याप्रमाणे कनिष्क हा कुशाण राजा बौध्द बनला, त्याप्रमाणे इथल्या कोणत्या ना कोणत्या सांस्कृतिक धारेचा भाग बनले. पण ही परिस्थिती मुस्लीम व बिटीश आक्रमणाने पालटली.

धार्मिक व आर्थिक साम्राज्यवाद

मुस्लीम आक्रमक भारतात आले. त्यांच्यामध्ये केवळ साम्राज्यविस्ताराची प्रेरणा नव्हती, तर धर्मप्रसाराचीही प्रेरणा होती. त्यापैकी कोणती प्रेरणा अधिक महत्त्वाची होती यावर चर्चा करणे निरर्थक ठरेल. मुस्लीम धर्माची स्थापना झाल्यानंतर ज्या झपाटयाने त्या धर्माचा विस्तार झाला, त्यामुळे आपल्या धर्मावरचा मुस्लिमांचा विश्वास वाढला होता. 'युध्दात जिंकशील, तर पृथ्वीचे राज्य करशील व युध्दात मृत्यू झाला, तर स्वर्गात प्रवेश मिळेल' या कृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाचे तंतोतंत पालन मुस्लीम योध्दे करत होते. त्यामुळे आजवर हिंदू संस्कृतीने कधीही न अनुभवलेल्या संघटित धर्मप्रसाराच्या अनुभवाला हिंदू समाजाला तोंड द्यावे लागले. हिंदूंच्या दृष्टीने धर्म ही व्यक्तिगत आचरणाची बाब होती, धर्मांतराची सक्ती करून त्याचा प्रसाराची नव्हती. त्यामुळे मुस्लीम आक्रमण हे केवळ राजकीय आक्रमण राहिले नाही, तर ते जीवनपध्दतीवरचे आक्रमण बनले. मुस्लीम धर्माचे एक वैशिष्टय म्हणजे एकदा मुस्लीम धर्माचा प्रभाव निर्माण झाला की इस्लामपूर्व संस्कृतीशी त्या समाजाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. एकेकाळी इराणमध्ये असलेली पर्शियन संस्कृती असो की अफगाणिस्तानमध्ये असलेली बौध्द संस्कृती असो, त्यांचे स्मरण, अभिमान त्या देशातील लोकांना राहिलेला नाही. भारतात इस्लामी सत्ता दृढमूल झाल्यानंतर इथला समाज आत्मरक्षणासाठी लढत राहिल्याने इंडोनेशिया, कंबोडिया आदी प्रदेशातील संस्कृतीची आज आठवणही हिंदू समाजाला राहिलेली नाही. आपले राज्य टिकविण्यासाठी काही राजांनी समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण तो टिकला नाही. अकबराने निर्माण केलेला दिने ईलाही पंथही अशाच पध्दतीचा होता. त्याचा पणतू दारा शुकोव यानेही असा प्रयत्न केला, पण त्याला औरंगजेबापुढे आपले राज्य टिकविता आले नाही. मुस्लीम आक्रमणामुळे हिंदू संस्कृतीचा भौगोलिक संकोच झाला. हळूहळू हे भाग कधी हिंदू संस्कृतीचे भाग होत, याचाही हिंदू समाजाला विसर पडत गेला. आज त्याचे नुसते स्मरण केले तरी हिंदू साम्राज्यावादाचा प्रचार केला, अशी डाव्या व सेक्युलर लोकांकडून टीका केली जाते.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुस्लीम आक्रमकांना उतरती कळा लागली असली, तरी हिंदूनी नि:संदिग्धपणे आपले राज्य स्थापित करण्याआधीच इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाले. हे राज्य आर्थिक साम्राज्यवादाच्या लालसेतून निर्माण झाले होते. त्यामुळे लो. टिळकांच्या प्रतिपादनाप्रमाणे इथे हिंदू, मुस्लीम व ब्रिटीश असे तीन पक्ष तयार झाले. हिंदू व मुस्लीम यांनी एकत्र येऊन ब्रिटिशांच्याविरुध्द लढा दिला पाहिजे, असे प्रतिपादन करणारा 'हिंदी राष्ट्रवाद ' काँग्रेसने मांडला. त्यासाठी कॉंग्रेसने अनेक तडजोडीही केल्या. पण त्यातून हिंदू - मुस्लीम ऐक्य निर्माण झाले नाही. या तडजोडीतून काय निष्पन्न होणार हे आधीच लक्षात घेऊन डॉ. हेडगेवारांनी हिंदू समाजाला समर्थ करून त्याच्याच आधारावर भारत स्वातंत्र्य मिळवू शकतो, असा विश्वास निर्माण करणारा ' हिंदू राष्ट्रा'चा सिध्दांत मांडला. पण केवळ सिध्दांत मांडण्यावरच न थांबता विसाव्या शतकातील जीवनस्पर्धेत टिकेल असे परिवर्तन हिंदू समाजात घडविण्याची आवश्यकता होती. त्यासाठी मुस्लीम समाजातील सामूहिक धर्माचे मानस आणि आपल्या धर्माकरिता कोणतेही समर्पण  करण्याची तयारी हे गुण स्वीकारण्याची आवश्यकता होती, तर इंग्रजांकडून सार्वजनिक जीवनातील शिस्त व सामूहिक निर्णयप्रक्रियेची पध्दत याचा अंगिकार करण्याची गरज होती. या दोन्ही गोष्टी केवळ भाषणे देऊन अंगी रुजवता येण्यासारख्या नव्हत्या, तर सर्वसामान्य लोकांनाही सहभागी होता येईल अशी संघटना प्रक्रिया त्यासाठी निर्माण करणे आवश्यक होते. स्वामी विवेकानंदांनी 'वेदांती मेंदू आणि मुस्लीम शरीर ' तसेच ' गीतापठण करण्यापेक्षा हिंदू समाजाला फुटबॉल खेळण्याची गरज आहे,' अशा शब्दात त्यांनी हिंदू समाजातील परिवर्तनाची गरज सांगितली होती. अशी वाक्ये शब्दश: घ्यायची नसतात, त्यांचा मतितार्थ समजून घ्यायचा असतो. समाज केवळ अध्यात्मिकदृष्टया श्रेष्ठ असून चालत नाही तर ऐहिकदृष्टया एकसंध, सामर्थ्यवान व शिस्तप्रिय असला पाहिजे, असे त्यांचे सांगणे होते.

राष्ट्रनिर्माणाची प्रक्रिया

'ज्ञानकोश'कार केतकर यांनी म्हटल्याप्रमाणे हिंदू समाजाचे, विसाव्या शतकातील स्पर्धेस योग्य असे समाजयंत्र बनविण्याची आवश्यकता होती. असे समाजयंत्र बनण्याची प्रक्रियाही त्यांनी ज्ञानकोशातील 'हिंदुस्थान व जग' या पहिल्या खंडातील 'सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचे जगद्विकासांत स्थान' या चौदाव्या प्रकरणात स्पष्ट केले आहे. त्यात ते म्हणतात,

'समाजाच्या निरनिराळया स्थितीत समाजदृढीकरणाचे कार्य अव्याहत सुरू असते. प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र यांचा विषय जे जीव त्यांच्या सादृश्याच्या दृष्टीने आणि आणि सादृश्यांत महत्त्व आणि सावययत्व यांच्या दृष्टीने बनविलेल्या परंपरा तपासल्या असता आणि सामाजिक घटना अवलोकल्या असता ही दृढीकरणाची क्रिया त्या ठिकाणी चालू दिसते. सामाजिक घटनेबद्दल कित्येक गोष्टी हर्बर्ट स्पेन्सर यांनी लोकांच्या नजरेस आणल्या आहेत. तो म्हणतो, वैयक्तिक घटना आणि सामाजिक घटना यामधे सामान्य असे चार धर्म आहेत.

1) घटनेचा आरंभ भ्रूणत्वापासून किंवा अतिशय लहान पुंजक्यापासून होऊन त्याची वाढ नकळत होत जाते. काहींचा आकार वाढून मूळच्या आकाराच्या दहा हजारपट होतो.

2) या पुंजक्यांची रचना आरंभी एवढी साधी असते की त्यात काही अवयवयुक्तता असेल असे वाटत नाही. परंतु ते जसजसे वाढत जातात, तसतसे त्यांची रचना अधिक गुंतागुंतीची होत जाते.

3) आरंभी जेंव्हा त्यांची वाढ अर्धवट झालेली असते, तेव्हा त्यांच्या घटकांमधे परस्परावलंबित्व फारच थोडे असते. ते हळूहळू वाढत जाऊन पुढे इतके पुर्णत्वास येते की, प्रत्येक घटकाचे जीवीत अथवा चलनवलन हे सर्वस्वी दुसऱ्या घटकाच्या जीवितावर व चलनवलनावर अवलंबून असते.

4) समाजाचे आयुष्य त्यातील घटकांवर अवलंबून नसून बरेच दीर्घकालीन असते. प्रत्येक घटक हा स्वतंत्रपणे जन्मतो, वाढतो, कार्य करतो, उत्पादन करतो आणि मरून जातो. परंतु या घटकांचा झालेला समूह पिढयानपिढया जगतो. त्याच्या आकारामध्ये, रचनेच्या पूर्णतेमध्ये आणि क्रियाकरणाच्या शक्तीमध्ये सारखी वाढ होत रहाते.

जेव्हा अनेक लहान लहान सामाजिक घटक एक मोठा एकरूपी समाज बनण्याकरिता एकत्र येतात, तेव्हा या निरनिराळया घटकामध्ये एक नवीन रचना करण्याच्या दृष्टीने जी अंत:क्रिया होते तिला दृढीकरण असे म्हणतात. जे निरनिराळे समाज अशा दृष्टीने एक होतात, त्यांना नेहमीच दृढीकरणाच्या बाबतीत यश येते असे नाही. व्यक्तीवरील जातीचे बंधन तोडून टाकून तिला राष्ट्राच्या समूहामध्ये प्रत्यक्ष सामील करण्यासाठी बरेच श्रम करावे लागतात. अनेक जाती एका ठिकाणी मिळून त्यांची एक मोठी एकस्वरूपी जात किंवा एक राष्ट्र होण्यापूर्वी त्या जातींना अनेक स्थितीतून जावे लागते. या स्थित्यंतरातील पायऱ्या जगातील, देशातील लोकांचे निरीक्षण केले असता सहज नजरेस येतील. या पायऱ्यांची  जातीभेद, साम्राज्ये, आणि वंशपरंपरागत वर्गभेद ही उदाहरणे होत. आधुनिक जगात या पायऱ्यांचे अस्तित्व समाजाच्या दृढीकरणाची प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे अशी साक्ष देते.'

'जेव्हा अशा निरनिराळया जातींना सांस्कृतिक व सामाजिकदृष्टया एका दर्जावर आणले जाते, तेव्हा त्यांची एक जात बनणे शक्य होऊ  लागते. अशावेळी त्यांचे दृढीकरण होण्यास सुरुवात झाली असे म्हणता येईल.'

हर्बर्ट स्पेन्सर याने जैविक विज्ञानातील तत्त्वे सामाजिक शास्त्राला लावली आहेत. एकपेशीय प्राण्यापासून अत्यंत गुंतागुंतीचे अवयव असलेल्या आणि त्याचबरोबर आत्मसुरक्षेपासून अत्यंत प्रगत अशा आत्मजाणीवेपर्यंत जैविक उत्क्रांती झालेली आहे. तसेच केतकरांच्या समाजदृढीकरणाच्या प्रक्रियेत विविध प्रकारच्या भेदांवर मात करून समाजात एकात्मभाव निर्माण करण्याला महत्त्व आहे. या दोन्ही कसोटयांवर संघाचे यश तपासून पाहिले पाहिजे. एका साध्या मैदानावरील शाखेपासून सुरुवात करून एकविसाव्या शतकातील राष्ट्रनिर्माणाला आवश्यक अशा सर्व घटकांची निर्मिती संघ करू शकला आहे व हे सर्व करीत असताना समाजातील सर्व घटकांना राष्ट्रवादाच्या आधारावर सामाजिक व  सांस्कृतिकदृष्टया एका पातळीवर आणण्यासाठी आवश्यक ती संघटनात्मक कार्यपध्दतीही विकसित केली आहे. त्यामुळे अनेक संकटांनी विरोध करूनही संघ वाढला, कारण त्याचा पाया शास्त्रशुध्द आहे. माक्र्सवादाच्या वाढत्या प्रभावामुळे हेगेलप्रमाणेच स्पेन्सरचे समाजशास्त्रही दुर्लक्षित राहिले. समाजात आंतरिक चेतना असते हे आता अनेक समाजशास्त्रज्ञ मान्य करू लागले आहेत. संघाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर त्याचेही पुनर्मूल्यांकन झाले पाहिजे.

संघाची स्थापना करताना डॉक्टरांच्या डोळयापुढे दोनच साम्राज्यवादी आक्रमणे होती. परंतु भविष्यातील आक्रमणांना तोंड देऊ  शकेल असा हिंदू समाज त्यांना निर्माण करायचा होता. कम्युनिस्ट साम्राज्यवाद हे विसाव्या शतकातील तिसरे आक्रमण होते. रशिया व चीन यांनी कम्युनिझमचा त्याग केल्यानंतर जागतिक स्तरावरील कम्युनिझमचा प्रभाव संपला असला, तरी सोनिया गांधींच्या सल्लागारांच्या स्वरूपात भारतावरील त्यांचा प्रभाव कायम होता. भगव्या दहशतवादापासून जातीयताविरोधी विधेयक आणण्यापर्यंत संघाला संपविण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. परंतु ते अयशस्वी झाले. कम्युनिझमच्या पराभवानंतर आलेले जागतिकीकरण हा चौथा बाजारपेठीय साम्राज्यवाद होता. इतर साम्राज्यवादापेक्षा त्याचे स्वरूप वेगळे आहे. प्रारंभीच्या काळात विकसित देश याच्यामागे असले, तरी आता त्याचे स्वरूप बदलले आहे. जागतिकीकरणाबद्दल विकसित देशांमध्येच चिंता निर्माण झाली असून वेगवेगळया प्रकारे आपल्या देशातील उद्योग व रोजगार वाचविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. परंतु, जगातील सर्व देशांत जागतिकीकरणावर अवलंबून असलेला एक वर्ग तयार झाला आहे व त्यामुळे जगाची आडवी विभागणी झाली आहे. या चारही साम्राज्यवादी आक्रमकांनी आपल्या देशाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा गुणात्मक धडाही दिला आहे. जसे कम्युनिझमने आर्थिक आणि सामाजिक शोषणाचे स्वरूप स्पष्ट केले. तसेच जागतिकीकरणामुळे भारतीय तरुणांना जगभरामध्ये आपले कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय जगतात आज भारताची जी विशेषत्वाने दखल घेतली जाते, याचे कारण जागतिकीकरणच आहे.       

 [email protected]