पुस्तकांची शेती करणारे गाव - भिलार

 विवेक मराठी  08-May-2017

***मधुबाला आडनाईक***

'हे ऑन वे' या गावातील पुस्तकांचे ढीग पाहिले आणि साहित्याला वाहिलेल्या या गावासारखेच गाव महाराष्ट्रात असावे, असे तावडे यांना वाटले आणि तेव्हापासून त्यांनी याचा पाठपुरावा करायला सुरुवात केली. अखेर त्यांच्याच मंत्रिपदाच्या काळात या संकल्पनेला मूर्त स्वरूप आले आणि या पुस्तकांच्या गावासाठी भिलार गावची निवड करण्यात आली. हे 'पुस्तकांचं गाव' आता कायमस्वरूपी या गावात असणार आहे. साधारण तीन हजार वस्तीचे हे गाव आता देशभर 'पुस्तकांचं गाव' म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे भिलारमध्ये यापुढे लोकांनी यावे, पुस्तके वाचावीत, मुक्काम करावा, पर्यटन वाढवावे; इतकेच नव्हे, तर प्रकाशकांनीही आपली पुस्तके इथे प्रकाशित करावीत.''

भिलार... महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन गिरिस्थानांच्या मधले गाव. भोसे खिंडीतून हे गाव सुरू होते, ते तीन किलोमीटर परिसरात या गावचे शेवटचे टोक. सधन गावातील प्रत्येकाची स्ट्रॉबेरीची शेती. स्ट्रॉबेरी महोत्सव भरवणाऱ्या या गावाचे वैशिष्टय म्हणजे स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजींचे हे गाव. ब्रिटिशकाळापासून लिचीची लागवड करणाऱ्या या गावाने कधी स्ट्रॉबेरीची शेती सुरू केली आणि कधी ते छोटेखानी हिलस्टेशन झाले, ते कोणालाच समजले नाही. साधारण तीन हजार वस्तीचे हे गाव आता देशभर 'पुस्तकांचं गाव' म्हणून ओळखले जात आहे.

गुरुवार, दि. 4 मे 2017. राज्य शासनाने 'पुस्तकांचं गाव' म्हणून अधिकृतपणे या गावाचे लोकार्पण केले आणि या गावाचा इतिहास बदलला.

संपूर्ण राज्यातील साहित्यिक या गावात आले, राजकीय आणि साहित्यिक मान्यवर हातात हात घालून स्ट्रॉबेरी खात खात पुस्तकांचा आस्वाद घेऊ लागले. हा आगळावेगळा सोहळा घडवून आणला तो शिक्षणमंत्री, भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्यामुळे. आमदार झाल्यानंतर कधीतरी परदेश दौऱ्यात असेच लंडनमधील 'हे ऑन वे' या गावातील पुस्तकांचे ढीग पाहिले आणि साहित्याला वाहिलेल्या या गावासारखेच गाव महाराष्ट्रात असावे, असे तावडे यांना वाटले आणि तेव्हापासून त्यांनी याचा पाठपुरावा करायला सुरुवात केली. अखेर त्यांच्याच मंत्रिपदाच्या काळात या संकल्पनेला मूर्त स्वरूप आले आणि या पुस्तकांच्या गावासाठी भिलार गावची निवड करण्यात आली.

सह्याद्रीच्या डोंगरकुशीत स्ट्रॉबेरी पिकवणाऱ्या या गावात तब्बल पंधरा हजार पुस्तके वाचायला मिळतील. त्याची स्वतंत्र वर्गवारी करण्यात आली आहे. 'स्वत्व' नावाच्या ठाण्याच्या स्वयंसेवी संस्थेने गावातील भिंती बोलक्या केल्या. श्रीपाद भालेराव आणि सहकाऱ्यांनी अवघ्या तीन दिवसांत वाचनसंस्कृतीशी जवळीक साधणाऱ्या चित्रांनी या भिंती सजवल्या. भिलारकरांचा उत्साह इतका दांडगा, की आपल्या घरीच कोणी पाहुणे येणार आहेत, अशा लगबगीने सर्वत्र सडा-रांगोळी घालून येणाऱ्यांचे स्वागत केले जात होते. गावात बहुतेक भिलारे आडनावाची सारी माणसे. पुस्तके कशी हाताळायची ते यातील एकालाही माहीत नाही. पण शासनाने पुस्तकांसाठी हे गाव निवडले आहे आणि जगभरातील पर्यटक आता येथे येणार, हे समजताच घरातील प्रत्येक जण ग्रंथपालाच्या भूमिकेत होता. ज्यांचा कधी आयुष्यात साहित्याशी दूरान्वयानेही संबंध आला नाही, असा स्थानिक शेतकरीही साहित्यिकांचे स्वागत करायला पुढे होता. अनिल भिलारे, राहुल भिलारे, शशिकांत भिलारे असे अनेक जण मूळ शेतकरी, पण घरात पर्यटकांसाठी वाचनालय होणार म्हटल्यावर त्यांनी कौतुकाने जुन्या घराचे नूतनीकरण केले.

स्ट्रॉबेरीची शेती विसरून हे ग्रामस्थ आता पुस्तकांची शेती करू लागले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याला प्रोत्साहन दिले ते राज्य शासनाच्या मराठी विषयाशी संबंधित तीन-चार संस्थांनी. मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेबरोबरच वाईचे विश्वकोश संस्कृती मंडळाने खूपच मेहनत घेऊन हे 'पुस्तकांचं गाव' उभारले. सध्या तरी पंचवीस ठिकाणी वेगवेगळया ग्रंथ-पुस्तकांनी हे वाचनालय तयार आहे. सात घरे, सहा रेस्टॉरंट्स, तीन मंदिरे, दोन शाळा यांमध्ये ही पुस्तके ठेवली आहेत.

मराठी भाषा विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी विनय माळवणकर हे या अनोख्या प्रकल्पासाठी समन्वयाची भूमिका पार पाडत आहेत. ग्रामस्थांबरोबरच शासकीय अधिकाऱ्यांनीही हे आपल्या घरचेच कार्य आहे, अशा भूमिकेतून भिलारमध्ये मुक्काम ठोकला होता. ग्रामस्थांनी या पुस्तकांच्या गावासाठी साडेतीन एकर जागा दिली आहे. घर तिथे वाचनालय, प्रत्येक ठिकाणी किमान पाचशे-सहाशे पुस्तकांची सोय तेथे केली गेली आहे. लोकार्पण सोहळयाच्या दिवशी अनेक घरात पुस्तकांसोबत साहित्यिकांनीही हजेरी लावली होती. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, गिरीश प्रभुणे, डॉ. अरुणा ढेरे, दिलीप करंबेळकर, कवी रामदास फुटाणे, अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर, रवींद्र गोळे, मनस्विनी प्रभुणे, श्याम जोशी यांनी वाचकांशी आवर्जून गप्पा मारल्या, कविकट्टयावर कवितांची मैफल जमवली. एकूण वातावरण जणू दुसरे साहित्य संमेलनच होते. इथे केवळ साहित्य रसिक नव्हते, तर पर्यटकही होते. ते बहुतेक ठिकाणचे फलक वाचत होते आणि त्यांच्या आवडीच्या घरात शिरून वेगवेगळया प्रकारची पुस्तके वाचत होते. हा आनंदसोहळा दिवसभर सुरू होता. सरकारनेही आवर्जून लोकार्पण सोहळयाचा कार्यक्रम नेमका आणि भाषणबाजीला फाटा देऊन उरकल्यामुळे अनेकांनी सायंकाळनंतर या गावात मुक्काम करून पुस्तकवाचनाचा आनंद घेतला. हिल रेंज शाळेत बालसाहित्य, तर हनुमान मंदिरात नियतकालिके होती, एका खासगी कार्यालयात वर्तमानपत्रे अन साप्ताहिके, तर एका रिसॉर्टमध्ये निसर्ग, पर्यटन अन पर्यावरण साहित्य उपलब्ध होते. पेन ड्राइव्हमध्येही पन्नास ते शंभर बोलकी पुस्तके उपलब्ध होती.

हे 'पुस्तकांचं गाव' आता कायमस्वरूपी या गावात असणार आहे. ही सुरुवात आहे, असे मंत्र्यांनी सांगितले, आणि तसे कार्यक्रमही राबवले जाणार आहेत.

यामध्ये गावाच्या पारावर कथाकथन आणि कवितावाचन, लेखक-प्रकाशक पर्यटकांच्या भेटीला, वाचन-संपादन-मुद्रितशोधन कार्यशाळा, नव्या पुस्तकांचे प्रकाशन सोहळे, अंधांसाठी बोलक्या पुस्तकांची उपलब्धता अशा अनेक संकल्पना येथे राबवण्यात येणार आहेत. वाईच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे साहाय्यक सचिव डॉ. जगतानंद भटकर आणि विद्याव्यासंगी साहाय्यक संपादक सरोजकुमार मिठारी त्यांच्या मदतनिसांसह सहा महिन्यांहून अधिक काळ भिलारमध्ये ग्रामस्थ आणि शासकीय अधिकारी यांच्यातील दुवा बनून आहेत.

बाळासाहेब भिलारे, सरपंच वंदनाताई प्रवीण भिलारे यांनी ग्रामस्थांना या अनोख्या प्रकल्पाचे महत्त्व सांगून पुस्तकांच्या गावात येणारे साहित्यिकांचे स्वागत करण्याच्या अनेक योजना आखल्या आहेत.

या पुस्तकांच्या गावासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 101 पुस्तके दिली आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून द.मा. मिरासदार यांच्या कन्या सुनेत्रा आणि जावई रवींद्र मंकणी यांनी काही पुस्तके या गावासाठी दिली. गावाची भावनिक गुंतवणूक इतक्या टोकाची आहे, की गावातील काही धार्मिक कार्यक्रम या कार्यक्रमासाठी रद्द केले गेले. अगदी अंत्यसंस्काराचा एक कार्यक्रमही रद्द केला गेला. एक लग्नसोहळाही पुढे ढकलला... इतका त्याग ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी केला. लोकार्पण सोहळयात विनोद तावडे यांनी सांगितले की ''राजकारणी लोक साहित्याशी फटकून वागतात, मौजमजेसाठी परदेश दौरा करतात असे म्हटले जाते. परंतु हे असत्य आहे. आता तो काळ उरला नाही. परदेशातील काही चांगल्या संकल्पना आपल्या इथे राबविण्यासाठी आम्ही धडपडत आहोत. आमच्या कारकिर्दीत एक तरी काम चांगले करावे, या हेतूने सारे जण राबत आहेत. त्यामुळेच भिलारसारखे गाव 'पुस्तकांचं गाव' ठरू शकले. आता युनेस्कोचा 'कॅपिटल बुक' हा सन्मान मिळविण्यासाठी आम्ही धडपडणार आहोत.'' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर ''डॉक्युमेंटेशन करण्यात भारतीय कमी पडतात, त्यामुळे आपल्या जुन्या परंपरा जतन करू शकलो नाही. वैद्यकशास्त्र, इतिहास यामध्ये आपली भारतीय परंपरा जगाच्या कितीतरी पुढे आहे. पण आपण त्यांचे लिखित जतन करू शकलो नाही. यापुढे डिजिटल युगात आपण आपले संशोधन निश्चितपुणे पुस्तकरूपात, लिखित रूपात पुढे आणू. भिलार या गावाचा विशेष कौतुकसोहळा केला पाहिजे, कारण या गावाने ही संकल्पना प्रत्यक्षात राबवली. राजकर्ते केवळ योजना सुचवू शकतात, पण राबवण्याची अंतिम जबाबदारी त्या त्या घटकाची असते. त्यामुळे भिलारमध्ये यापुढे लोकांनी यावे, पुस्तके वाचावीत, मुक्काम करावा, पर्यटन वाढवावे; इतकेच नव्हे, तर प्रकाशकांनीही आपली पुस्तके इथे प्रकाशित करावीत.''

या कार्यक्रमाला स्थानिक राजकारणीही गटतट विसरून उपस्थित होते. महादेव जानकर, विजय शिवतारे, एकनाथ शिंदे मकरंद पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर असे नेते आणि हजारो साहित्यप्रेमी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ या इतिहास घडवणाऱ्या घटनेचे साक्षी होते.

9922438365