गांधीहत्या, कपूर आयोग व सावरकर (भाग 2)

 विवेक मराठी  12-Jun-2017


 ***अक्षय जोग***

सावरकरांनी स्वातंत्र्याआधी व नंतरही स्वकीयांच्या हत्येला कधीच समर्थन दिले नव्हते. इंग्लंडमध्ये ना. गोखलेंच्या एक-दोन भाषणांनी प्रक्षुब्ध होऊन जेव्हा 'अभिनव भारता'तील काही पुढारी त्यांच्यावर (ना. गोखलेंवर) आक्रमण करण्याच्या गोष्टी बोलले, तेव्हा त्या अमंगल विचारांचा तीव्र निषेध करून, प्रामाणिक मतभिन्नतेच्या कोणावरही आक्रमण करणे आणि तेही स्वजनांवर करणे हे घोर पातक आहे, हा खराखरा अत्याचार होईल हे सावरकरांनी त्यांस समजावून दिले आणि तो ठराव संमत होऊ  दिला नाही.

ब्रिटिशांनी जेव्हा जेव्हा दुसऱ्या महायुध्दाच्या काळात विशेष न्यायालये स्थापन केली, तेव्हा तेव्हा काँग्रेस पुढाऱ्यांनी त्याविरुध्द आरडाओरडा केला होता. परंतु गांधीहत्या खटल्यासाठी मात्र नेहरू सरकारने बिनदिक्कतपणे विशेष न्यायालयाची स्थापना केली. 'मुंबई सार्वजनिक सुरक्षा कायदा' हा अत्यंत जुलमी स्वरूपाचा होता. त्यात ज्यूरीची व्यवस्था नव्हती. अपिलासाठीची मुदतही केवळ 15 दिवस होती. (अन्यथा ती 60 दिवस असते.) या कायद्यानुसार हत्येचा केवळ प्रयत्न करणे या गुन्ह्यालाही फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद आहे. हत्येच्या प्रयत्नाला मदत करणे - साथ देणे आणि हत्येचा कट रचणे यामध्ये कायदेशीर भाषेत मोठा भेद आहे. हत्येचा कट रचणे हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जातो आणि त्यासाठी कडक शिक्षा होऊ शकते. शिवाय हत्येचा कट रचणे हा आरोप सिध्द करणेही तुलनेने सोपे असते. वॉरंट काढून सावरकरांवर आरोपपत्र ठेवण्यासाठी प्रथमदर्शनी पुरावाच उपलब्ध नव्हता, म्हणून 'Bombay Public Security Measures Act, 1947' पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून सावरकरांना अटक करण्यात आली.19 (कोणत्याही कायद्याला पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे हे अनैतिक समजले जाते.) नंतर बडगेवर पोलिसी छळाचा उपयोग करून बडगेला माफीचा साक्षीदार बनवून सावरकरांवर त्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले. बडगेच्या साक्षीव्यतिरिक्त कोणताही खरा वा खोटा पुरावा उपलब्ध नव्हता. तसेच वादासाठी कासार, दामले, बडगे, पाहवा ह्यांच्या साक्षी सत्य मानल्या, तरी त्यातून केवळ नथुराम-आपटे यांनी सावरकरांची भेट घेतली इतकेच सिध्द होते, त्यांच्या भेटीत काय चर्चा झाली व त्यांनी भेटीत गांधीहत्येचा कट रचला ह्यासंबंधी एकही साक्षी-पुरावा उपलब्ध नव्हता. न्यायमूर्तींच्या निकालपत्रावरूनही ह्याची कल्पना येते. न्यायमूर्ती निकालपत्रात म्हणतात, 'सरकार पक्षाचा सावरकरांवरील खटला फक्त माफीच्या साक्षीदारावर व केवळ त्यांच्या एकटयाच्या साक्षीवरच आधारलेला आहे... (केवळ) माफीच्या साक्षीदाराने सावरकरांविरुध्द सांगितलेल्या कथनावर विश्वास ठेवून निष्कर्ष काढणे धोकादायक आहे...पहिल्या मजल्यावर आधी नथुराम गोडसे-नारायण आपटे व विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या दरम्यान काय संभाषण झाले हे दाखवण्यासारखा खटल्यातील कागदपत्रात कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे माफीच्या साक्षीदाराच्या उपस्थितीत विनायक दामोदर सावरकरांनी नथुराम गोडसे व नारायण आपटे ह्यांना उद्देशून केलेली टिपण्णी ही महात्मा गांधीहत्येच्या कटासंदर्भातच होती हे मानण्यास कुठलाही पुरावा नाही. तेव्हा दिल्लीला 20.1.1948 व 30.1.1948ला जी घटना घडली, त्यात सावरकरांचा कोणत्याही रितीने संबंध होता असे मानण्यास कोणतेही सयुक्तिक कारण नाही.'

मुंबईचे DCP नगरवाला गांधीहत्या तपासाचे काम पाहत होते व त्यांनीच मुंबईचे गृहमंत्री मोरारजी देसाईंच्या सूचनेनुसार सावरकर सदनावर 20 जानेवारीनंतर पाळत ठेवली होती. स्वत: नगरवाला म्हणाले की, ''त्यानंतर गांधीहत्याकटाचा खटला दाखल झालेल्यापैकी कोणाही व्यक्तीने 20 ते 30 जानेवारी 1948 दरम्यान सावरकरांची भेट घेतल्याचा पुरावा त्यांच्यासमोर उपलब्ध नव्हता. असा कोणताही पुरावा न्यायालयासमोर नव्हता.20

सावरकरांनी स्वातंत्र्याआधी व नंतरही स्वकीयांच्या हत्येला कधीच समर्थन दिले नव्हते. इंग्लंडमध्ये ना. गोखलेंच्या एक-दोन भाषणांनी प्रक्षुब्ध होऊन जेव्हा 'अभिनव भारता'तील काही पुढारी त्यांच्यावर (ना. गोखलेंवर) आक्रमण करण्याच्या गोष्टी बोलले, तेव्हा त्या अमंगल विचारांचा तीव्र निषेध करून, प्रामाणिक मतभिन्नतेच्या कोणावरही आक्रमण करणे आणि तेही स्वजनांवर करणे हे घोर पातक आहे, हा खराखरा अत्याचार होईल हे सावरकरांनी त्यांस समजावून दिले आणि तो ठराव संमत होऊ दिला नाही.21

गांधीहत्या खटल्यातील निवेदनातही त्यांनी घटनात्मक मार्गाचे व बळकट केंद्र शासनाचे महत्त्व विशद करून प्रसंगी काँग्रेस शासनाशीही साध्यानुकूल सहकार्य तत्त्वानुसार समान आघाडीची तयारी दर्शविली होती. 'कोणताही पक्ष सत्ताधीश असला तरी आपण केंद्र शासन समर्थ केले पाहिजे. त्यात कोणताही पालट आवश्यक असला तरी तो घटनात्मक मार्गांनीच घडवून आणला पाहिजे; कारण आपला देशातील कोणताही अत्याचार किंवा आपल्यातील नागरी फूट ह्या राज्यालाच धोकादायक ठरेल. परकीय शत्रूच्या सशस्त्र अत्याचाराविरुध्द लढताना आवश्यक नि न्याय्य असलेली क्रांतिकारक प्रवृत्ती आता घटनात्मक मार्गात रूपांतरित केली पाहिजे; तरच पक्षांतर्गत मतभेद व गृहयुध्द या धोक्यांपासून आपण हे राज्य सुरक्षित ठेवू शकू. ह्याच उद्देशाने माझी अशी इच्छा होती की, या देशातील काँग्रेस नि हिंदू महासभा या दोन महान संघटनांनी, ज्या खरोखर अधिक जवळ येत होत्या त्यांनी अधिक जवळ यावे, समान आघाडी करावी व आपल्या राज्याच्या केंद्र शासनाचे हात बळकट करावेत.22

निर्दोष मुक्तता की पुराव्याअभावी मुक्तता?

प्रकाश बाळ ह्यांच्या म्हणण्यानुसार सावरकरांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. केवळ नि:संदिग्ध व पुरेसा पुरावा नसल्याने त्यांची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली आहे.23 बाळ यांनी न्यायालयाने दिलेला अंतिम निकाल वाचलेला नसावा, तो निकाल मूळ इंग्लिशमध्ये असा आहे - 'He is found 'not guilty' of the offences as specified in the charge, and is acquitted thereunder: he is in custody, and be released forthwith unless required otherwise.'24

न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे की ते दोषी नाहीत (not guilty) व त्यांना निर्दोष (Acquitted) ठरविण्यात येत आहे. 'नि:संदिग्ध व पुरेसा पुरावा नसल्याने पुराव्याअभावी त्यांची मुक्तता' असे येथे म्हटलेले नाही.

तसेच कोणत्याही न्यायालयाचा एखाद्या आरोपीला दोषमुक्त करणारा कोणताही निकाल पुराव्याअभावी निर्दोष ठरविणाराच असतो. आपल्या न्यायपध्दतीत acquittalची - सुटकेची वर्गवारी केलेली नाही. निर्दोष सुटका म्हणजे निर्दोष सुटकाच!

सरदार पटेलांनी नेहरूंना व मुखर्जींना पाठविलेल्या पत्रांचा जो उल्लेख केला जातो, तोही निरर्थक आहे. गृहमंत्र्यांची माहिती ही पोलिसांनी दिलेल्या माहितीवरच आधारलेली असणार ना? पोलीस छळ, मारहाण करून दबावाखाली जबान्या लिहून घेत असतील, तर तीच माहिती गृहमंत्र्यांसमोर येणार ना? कपूर आयोग अहवालातही सावरकरांना आरोपी करणाऱ्या अशा कुठल्याही कागदपत्रांचा उल्लेख नाही. पोलिसांकडे किंवा पटेलांकडे सावरकरांविरुध्द पुरावे होते, तर ते न्यायालयात सादर का केले नाहीत? सावरकरांना आरोपी करण्यास पटेलांची संमती होती असे मानले, तरी संमती हा पुरावा ठरत नाही. पोलिसांच्या कार्यवाहीला गृहमंत्र्यांचा पाठिंबा होता, इतकाच त्याचा अर्थ होतो.

डॉ. कुमार सप्तर्षी एका लेखात म्हणतात - 'ते हुशार होते. ते कधीही पुरावा मागे ठेवत नसत. सरदार पटेलांनी पं. नेहरूंना पत्र लिहून त्यांचे नाव खटल्यातून वगळले. त्यापूर्वी त्यांनी सौदा केला. सावरकरांना सोडण्याच्या मोबदल्यात त्यांनी राजकारण सोडून द्यायचे, असा सौदा झाला. गांधीहत्येच्या आरोपातून वगळल्यानंतर शेवटपर्यंत सावरकर राजकारणाबद्दल एक शब्दही बोलले नाहीत. उलट हिंदू महासभेचे अध्यक्ष असलेल्या भोपटकर वकिलांना त्यांनी तंबी दिली की, गांधीहत्या या विषयात माझ्याबद्दल एक शब्दही बोलू नका, मी निर्दोष आहे वगैरे गोष्टी बोलू नका.'25

सावरकरांना इंग्रजांनी 50 वर्षांच्या जन्मठेपेची - काळया पाण्याची शिक्षा दिली ती सावरकरांविरुध्द कुठलाही पुरावा नसताना असे म्हणायचे आहे का? त्यांनी कुठलाही पुरावा मागे ठेवला नाही ह्याचा पुरावा काय? असा कुठला पुरावा होता की जो सावरकरांनी मागे ठेवला नाही, पण सप्तर्षींना तो माहीत आहे?

'सरदार पटेलांनी पं. नेहरूंना पत्र लिहून त्यांचे नाव खटल्यातून वगळले' हे पत्र कुठे आहे? दिनांक काय? संदर्भ काय? पटेल-नेहरू-सावरकर हा सौदा कोणामार्फत केला? ह्या सौद्याचा पुरावा काय? म्हणजे गांधीहत्येतील संशयिताला नेहरू-पटेलांनी पाठीशी घातले असे म्हणायचे आहे का? हा सौदा करून नेहरू-पटेलांना कुठला लाभ होणार होता? नथुरामने गांधीजींना गोळी मारलीच नाही ह्या नथुरामवाद्यांच्या पोकळ विधानासारखेच हे वरील विधान पोकळ आहे. पोकळ विधान हा पुरावा ठरत नाही, आरोपाच्या पुष्टीकरणासाठी पुरावा आवश्यक असतो.

गांधीहत्येनंतर सावरकर राजकारणावर बोलले नाहीत हे अज्ञान आहे. 'चीनपासून सावध राहा' हे काय साहित्यिक संकट सांगितले होते का? 1949ला केलेली 'एक धक्का और दो, पाकिस्तान तोड दो' ही गर्जना, 1952ला अभिनव भारत सांगत समारंभ भाषण व 'युध्दसज्ज व्हा' हे भाषण, 1961चे मृत्युंजय दिनाचे भाषण ही सर्व भाषणे राजकीय नाहीतर काय आर्थिक, ललित किंवा साहित्यिक भाषणे होती का?

सावरकरांनी भोपटकरांना कधी, केव्हा, कुठे तंबी दिली? तंबी दिली म्हणजे ते कटात सहभागी होते, हे कसे सिध्द होईल?

हिंदू संस्थानिक व सावरकर ह्यांचा कट?

तुषार गांधी आरोप करतात की, 'आयोगाच्या निदर्शनास असे आले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारकडे माहिती आली की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेचे नेते अल्वार संस्थानच्या राजाला भेटले आणि हिंदू राष्ट्र स्थापनेची योजना आखण्यात आली. याच योजनेत महात्मा गांधी अडसर ठरणार असल्याने त्यांच्या हत्येचा निर्णय लगेच पक्का करण्यात आला'... 'अल्वार आणि ग्वाल्हेर या संस्थानांमधील कॉमन लिंक वि.दा. सावरकर हेच होते.'26 ज्या कपूर आयोगाचा आधार घेत आहेत, त्यात काय आहे ते पाहू या. Mr. Jetley, D.I.G., witness 55, had investigated into the Gwalior matters. He said, "I went to Gwalior just to find out how things stood & all that I saw was that these princes had no hand in the assassination & no connection with the clique"..... Mr.Rana the D.I.G. (C.I.D.), Poona, witness No. 3, who was sent to inquire into the part of the princes in the tragedy, also has stated that the Princes of Gwalior, Alwar & Bharatpur had no hand in the conspiracy to murder Mahatma Gandhi.27

Mr. M.K. Sinha, Deputy Director of Intelligence Bureau in 1947-48 stated that there was a strong Mahasabha movement & R.S.S. movement in Marathi-speaking parts of Bombay & in C.P. & in parts of Bihar. He could not say whether there was any anti-Gandhi movement there but there was a great deal of anti-Gandhi talk especially because of Gandhi's attitude towards Pakistan but he had received no reports about this anti-Gandhi movement likely to burst into violence....' शेवटी कपूर आयोग म्हणतो, 'In view of all this, the Commission thinks the evidence to be insufficient to prove anything relevant to the inquiry.'28 म्हणजे हिंदू संस्थानिक, सावरकर व संघ ह्यांचे काहीही कटकारस्थान नव्हते असे DIG d CID अधिकारीच सांगत व ते कपूर आयोगानेही ग्राह्य धरले आहे. म्हणजे ज्या आधारावर आरोप केले जात आहेत, तो आधारच आरोपांना फोल ठरवतोय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सावरकरांचे वकील ल.ब. भोपटकर यांना खटला चालू असतानाच्या काळातच बाहेर भेटायला बोलावून म्हणाले होते की, ''तुमच्या अशिलावर (स्वा. सावरकरांवर) कोणताही आरोप नाही. थातूरमातूर पुरावा रचण्यात आला आहे. कॅबिनेटमधील सदस्यांचे म्हणणे होते की, सावरकरांना एवढयातेवढया संशयावरून आरोपी करू नये. पण अखेर एका ज्येष्ठ नेत्याच्या आग्रहामुळे त्यांना या खटल्यात गोवण्यात आले आहे. सरदार पटेलांचेही त्यांच्यापुढे काही चालले नाही. तुम्ही खटला निर्भयपणे लढवा. जय तुमचा आहे.''29

डॉ. आंबेडकरांनी भोपटकरांना ही माहिती पुरविली, त्या वेळी डॉ. आंबेडकर केंद्रीय कायदा मंत्री होते व ह्या खटल्यावर त्यांचे बारीक लक्ष होते. गांधीहत्या खटल्याची सुनावणी सुरू झाल्यावर डॉ. आंबेडकर काकासाहेब गाडगीळांना म्हणाले, ''अरे गाडगीळ, चल. या बहादुर माणसाची ट्रायल पाहायला चल, कोर्टात!'' त्यामुळेच नव्हे, पण गाडगीळ त्या सुनावणीला गेले. पण डॉ. आंबेडकर तर दोन-तीनदा गेले. कायदा मंत्री नि कायदेपंडित म्हणूनच नव्हे, तर न्यायाधीशांनाही त्यांच्या खटल्याची कार्यवाहीची न्याय्यता राहावी याकडे बऱ्याच उच्चपदस्थांचे लक्ष आहे, हे दाखविण्यासाठी, न्यायालयात न्या. आत्मचरण यांच्या लक्षात येईल अशा प्रमुख जागी बसून. 22 जूनला सुनावणी सुरू झाली, तेव्हा डॉ. आंबेडकर आपल्या पत्नीसह ती सुनावणी ऐकण्यासाठी तसे प्रथम गेले नि काका गाडगीळही त्यांच्यासवे होते नि त्यांनी ती सुनावणी ऐकली.30 इतकेच नव्हे, तर या खटल्यासंबंधीचे निर्णय बाहेरच्या बाहेर घेतले जात होते. पण शेवटी सावरकरांना खटल्यात टाकायचे की नाही? हा प्रश्न मत्रीमंडळासमोर आला, तेव्हा कायदा विशारद म्हणून डॉ. आंबेडकरांनी 'तशा पुराव्याच्या अभावी हे करू नये' असाच निर्णय दिला होता.31 म्हणजे जी माहिती डॉ. आंबेडकरांनी भोपटकरांना दिली होती, तीच सरकारलाही दिली होती.

वि.श्री. जोशी ह्यांनी सावरकर चरित्रात अशी माहिती दिली होती की, 'माहीतगार माणसांच्या माहितीप्रमाणे पुराव्याची छाननी झाल्यावर अभियोजकांचे मुख्य वकील बॅ. चंद्रकिशन दप्तरी यांनीही सावरकरांना कटात नि अभियोगात गोवण्याइतका प्रथमदर्शनी पुरावा नाही, असेच स्पष्ट मत सरकारला दिले असे समजते.'32 डोनोवन ह्यांचे सापडलेले पत्र आंबेडकर-भोपटकर भेटीला व वि.श्री. जोशींच्या माहितीला पुष्टीच देते. म्हणजे केंद्रीय कायदा मंत्री डॉ. आंबेडकरांनी सरकारला व भोपटकरांना दिलेली माहिती व सरकारचे विशेष वकील सी.के. दफ्तरी ह्यांनी सरकारला वडोनोवनला दिलेली माहिती ह्यात विलक्षण साम्य आहे, त्यामुळे सावरकरांचे निर्दोषत्व निःसंदिग्धपणे सिध्द होते.

समाप्त

संदर्भ

19 Exhibits D/ 102 & D/ 103, ORDER NO. 1202 OF 1948, Page No 46-47, Mahatma Gandhi Murder Case Volume-V

20 Kapur, भाग 2, खंड 4, पृष्ठ 35.

21 करंदीकर, शि.ल. सावरकर चरित्र,  www.savarkar.org online आवृत्ती, पृष्ठ 445

22 सावरकर, बाळाराव, स्वा. सावरकर ः सांगता पर्व, खंड 4, वीर सावरकर प्रकाशन, 1986, पृष्ठ 52

23 बाळ, प्रकाश, 'संशोधक शेषरावांची बौध्दिक बेशिस्त', 10 सप्टेंबर 2015, लोकमत

24 Mahatma Gandhi Murder Case Volume-III, पृष्ठ 109

25 सप्तर्षी, डॉ. कुमार, 'बरे झाले, शेषराव बरळले!', 12 सप्टेंबर 2015, लोकमत

26 गांधी, तुषार, 'महात्मा गांधींच्या हत्येच्या षड्यंत्रातून सावरकरांना वगळणे अशक्य', 9 फेब्रुवारी 2015, मीडिया वॉच पब्लिकेशन

27 Kapur, खंड 2, पृष्ठ 250

28 उपरोक्त, खंड 4, पृष्ठ 62

29 जोशी, वि.श्री. अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ, मनोरमा प्रकाशन, 1992, पृष्ठ 142

30 उपरोक्त, पृष्ठ 149-150

31 उपरोक्त, पृष्ठ 141

32 उपरोक्त, पृष्ठ 140

9960685559