अंतराळातील बाहुबली

 विवेक मराठी  14-Jun-2017


*** डॉ. बाळ फोंडके****

आज आपले जे एकूण 41 उपग्रह अंतराळात आपल्यावर सोपवलेली कामगिरी इमानेइतबारे पार पाडत आहेत, त्यापैकी तब्बल 13 दळणवळणासाठीच उपयोगी पडत आहेत. पण हा नवीन भिडू त्यापैकी सात-आठ उपग्रहांचं कामकाज एकटाच पार पाडू शकणार आहे. अंतराळातला बाहुबलीच म्हणायला हवं त्याला. ज्या 'डिजिटल इंडिया'चं स्वप्न आपण पाहत आहोत, ते साकार करण्याच्या प्रयत्नांमध्ये तो कळीची भूमिका बजावणार आहे.  देशाच्या ज्या कानाकोपऱ्यात, जिथे फायबर ऑॅप्टिकचं जाळं विणलं न गेल्यामुळे इंटरनेट सेवा कमकुवत राहिली आहे तिथे, ती बळकट करण्याचं काम या उपग्रहाकडून बजावलं जाणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISROने) सातत्याने एकापाठोपाठ एक उच्चांक प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे गेल्या आठवडयात तिने यशाचं आणखी एक शिखर गाठलं, याचं फारसं कौतुक होण्याचं कारण नव्हतं. तरीही ते तसं होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. विचारांची प्रस्थापित बैठक मोडून नव्या दिशेने जेव्हा वाटचाल केली जाते, एक प्रकारचा पॅरॅडाइम शिफ्ट घडवून आणला जातो, तेव्हा जगाने त्याकडे डोळे विस्फारून आदराने पाहावं यात नवल नसतं. जीएसएलव्ही मार्क 3 या उपग्रह प्रक्षेपक यानाच्या मदतीने इस्रोने ज्या जीसॅट-19 या नव्या उपग्रहाची प्रतिष्ठापना अंतराळात केली आहे, तो आपण अंतराळयुगाच्या एका नव्या पर्वात पदार्पण केल्याची ग्वाही देत आहे.

काय आहे या नव्या प्रक्षेपक यानाची आणि त्यातून प्रवास करत अंतराळातलं आपलं गंतव्य स्थान गाठणाऱ्या या उपग्रहाची खासियत? तसं पाहिलं तर हाही एक दळणवळणासाठी वापरला जाणारा उपग्रहच आहे. आज आपले जे एकूण 41 उपग्रह अंतराळात आपल्यावर सोपवलेली कामगिरी इमानेइतबारे पार पाडत आहेत, त्यापैकी तब्बल 13 दळणवळणासाठीच उपयोगी पडत आहेत. पण हा नवीन भिडू त्यापैकी सात-आठ उपग्रहांचं कामकाज एकटाच पार पाडू शकणार आहे. अंतराळातला बाहुबलीच म्हणायला हवं त्याला. ज्या 'डिजिटल इंडिया'चं स्वप्न आपण पाहत आहोत, ते साकार करण्याच्या प्रयत्नांमध्ये तो कळीची भूमिका बजावणार आहे. यच्चयावत व्यवहार संगणकाधिष्ठित डिजिटल प्रणालीद्वारे पारदर्शकरित्या पार पाडण्याची जी महत्त्वाकांक्षी योजना आपण आखलेली आहे, ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अशा महाकाय उपग्रहाची आवश्यकता होतीच. खासकरून देशाच्या ज्या कानाकोपऱ्यात, जिथे फायबर ऑॅप्टिकचं जाळं विणलं न गेल्यामुळे इंटरनेट सेवा कमकुवत राहिली आहे तिथे, ती बळकट करण्याचं काम या उपग्रहाकडून बजावलं जाणार आहे. किंबहुना जमिनीखालून तारा किंवा तंतुप्रकाशयंत्रणा टाकून इंटरनेटचं जाळं विणणं भूतकाळात जमा करण्याची मोहीमच हा उपग्रह हाती घेऊ शकतो. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे नुकत्याच वॉनाक्राय रॅन्समवेअर या संगणक विषाणूने जगभर माजवलेल्या हाहाकारानंतर संगणकाधिष्ठित प्रणालीच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. सायबर सिक्युरिटीला प्राधान्य देण्याची गरज प्रकर्षाने जाणवते आहे. त्यावरही या बिनतारी इंटरनेटचा तोडगा उपकारक ठरणारा आहे.

माहितीच्या दळणवळणाच्या वेगात आणि व्याप्तीतही या उपग्रहातील यंत्रणेमुळे क्रांती होणार आहे. आजवर या कामावर योजलेल्या उपग्रहांमध्ये ही माहिती वाहून नेण्यासाठी एकाच झोताची सोय केलेली होती. निरनिराळया कंपनसंख्यांच्या लहरींवर आरूढ होत माहिती वाहून नेणाऱ्या यंत्रणा या एकमेव झोतावरच अवलंबून असत. त्यामुळे मग त्या वहनाचा वेग तर मर्यादित राहतच असे, तसंच दाटीवाटी झाल्यामुळे काही वेळा गल्लत होण्याची किंवा काही माहिती वाहूनच न नेण्याचीही शक्यता बळावत असे. या नव्या कोऱ्या उपग्रहात असे आठ झोत वापरले जात आहेत. त्यामुळे माहितीचं वहन करणाऱ्या यंत्रणा एकमेकींच्या तंगडीत तंगडी अडकून धडपडण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी होणार आहे.

या महाकाय उपग्रहाला आपल्या कुशीत घेऊन अंतराळात नेण्याची कामगिरी करणारं भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक यान, जीएसएलव्ही - मार्क थ्री, हेही अगडबंबच आहे. तुम्हा-आम्हाला समजेल अशा भाषेत सांगायचं, तर भारवाहनाची आपली कमाल क्षमता गाठणाऱ्या पाच बोईंग जंबो जेट विमानांएवढं त्याचं वजन आहे. आणि जंबोच्या भाषेत बोलायचं, तर तब्बल 200 हत्तींच्या एकत्रित वजनाएवढं आहे. म्हणूनच तर तो जवळजवळ साडेतीन हजार किलो वजनाचा उपग्रह लीलया वाहून नेऊ शकला आहे. तरीही तो एक पांढरा हत्ती नाही, याचा प्रत्यय लवकरच मिळेल आणि 'आपल्यासारख्या गरीब देशाला ही चैन परवडणारी आहे का?' असे नाठाळ प्रश्न विचारणाऱ्यांची पंचाईत करून टाकेल. एवढंच काय, आज-उद्या भारतीय अंतराळवीरांनाही - आपण त्यांना 'गगनॉट्स' म्हणू या - तो आपल्या पोटातून अंतराळातल्या इच्छित स्थळी पोहोचवू शकतो. सदैव भूतकाळाचे गोडवे गाण्यातच धन्यता मानणाऱ्या आपल्याला 'आता जरा भविष्याकडे नजर लावा' असा संदेशच या अंतराळस्वारीने देऊन ठेवला आहे.

हे यश एका रात्रीत मिळालेलं नाही. त्यापाठी तीस-चाळीस वर्षांची अथक तपश्चर्या आहे. स्वावलंबनाचे अनेक धडे गिरवलेले आहेत. ही संपूर्ण यंत्रणा स्वबळावर विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. सुरुवातीच्या काळात काही विदेशी घटकांचा वा तंत्रज्ञानाचा वापर जरूर केला होता. निश्चित कालमर्यादा पाळण्यासाठी ते अनिवार्य होतं. परंतु हळूहळू यापैकी प्रत्येक तंत्रज्ञानाची जागा स्वदेशी तंत्रज्ञानाने घेतलेली आहे. विशेषत: 1974च्या पोखरण येथील अणुचाचण्यांनंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या किंवा घटकांच्या बाबतीत जगाने आपल्याला वाळीतच टाकलं होतं. त्याचं एक ठळक उदाहरण म्हणजे आपल्याला नाकारण्यात आलेली क्रायोजेनिक इंजिनं. वजनदार प्रक्षेपकांच्या सुरळीत कामगिरीसाठी ती अत्यावश्यक असतात. अतिशीत तापमानावर ठेवलेल्या हायड्रोजनसारख्या इंधनावर चालणारी ही इंजिनं आपण रशियाकडून विकत घेणार होतो. अशी तीन इंजिनं आणि त्याच्या उत्पादनाचं तंत्रज्ञान आपल्याला देण्याचा करारही झाला होता. एवढंच काय, त्या करारान्वये आपण बांधिल असलेली पूर्ण किंमतही अदा केली गेली होती. पण ऐन वेळी अमेरिकेच्या दडपणाखाली येऊन रशियाने माघार घेतली. करारभंग केला. आपल्याला तंत्रज्ञान देण्याचं सपशेल नाकारलं. आपण हे प्रकरण आंतरराष्ट्रीय लवादाकडे नेऊ शकलो असतो. पण आपण डोक्यात राख घालून न घेता तारतम्याने विचार केला. तंत्रज्ञान नाही, तर त्या बदल्यात आणखी तीन इंजिनं देण्याची विनंती आपण केली. ती मान्य झाली आणि सहा इंजिनं आपल्या पदरात पडली. त्यांचा सखोल अभ्यास करत आपणच ते तंत्रज्ञान विकसित करण्याचा मार्ग अनुसरला. त्यात यशस्वीही झालो. आज या नवीन प्रक्षेपकाला चालना देण्याची कामगिरी आपण स्वत:च विकसित केलेल्या क्रायोजेनिक इंजिनांकडून पार पाडली जात आहे.

हे तर मुख्य तंत्रज्ञान झालं. ते विकसित करणं तर निकडीचंच होतं. पण या अनुषंगाने अनेक लहानमोठी तंत्रज्ञानं विकसित केली जातात, हेही आपण ध्यानात घ्यायला हवं. या इंजिनांना ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी लिथियम आयन बॅटरीचा वापर केला जातो. यांचं उत्पादनही आपण आता स्वबळावर करू लागलो आहोत. यापुढील प्रक्षेपक यानांसाठी तर त्यांचा उपयोग होईलच, तसाच इतरही अनेक क्षेत्रांना त्यांचा लाभ होणार आहे. आपल्या मोबाइल फोनमधील बॅटरीही याच प्रकारची असते. पण आता ज्या विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित वाहनांची प्रतीक्षा आपण करत आहोत, तीही याच प्रकारच्या बॅटरीवर चालतात. त्यामुळे आपण प्रदूषणविरहित हरितयुगाकडे वेगाने वाटचाल करू शकणार आहोत.

या सर्व तंत्रज्ञान विकासाच्या भाऊगर्दीत इस्रोच्या एका महत्त्वाच्या उपलब्धीकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. आजवर दोन यशस्वी प्रक्षेपणांमध्ये बराच काळ जात असे. कारण एक उड्डाण यशस्वी झाल्यानंतरच पुढच्या उड्डाणाचा श्रीगणेशा केला जाई. त्यामुळे अनेक प्रकल्पांमध्ये दिरंगाई तर होतच होती, त्याशिवाय त्यांचा अनुशेषही उरत असे. गेल्या काही वर्षांमध्ये इस्रोने आपल्या कार्यपध्दतीत बदल केला आहे. एकाच वेळी अनेक गट निरनिराळया उड्डाणांची तयारी समांतररित्या करत आहेत. त्यामुळेच दोन प्रक्षेपणांमधलं अंतर लक्षणीयरित्या घटलं आहे. यंदाचं 2017 हे वर्ष अजून निम्मंही सरलेलं नाही. तरीही आजवर चार प्रक्षेपणं झाली आहेत. त्यातली दोन तर चांगलीच अवघड होती. पहिलं, दोन महिन्यांपूर्वी केलेलं तब्बल 104 उपग्रहांचं एकसाथ अंतराळ प्रतिष्ठापन आणि दुसरं, आताचं बाहुबली प्रक्षेपकाच्या खांद्यावर बसून महाकाय उपग्रहानं अंतराळात घेतलेली झेप.

आपण याचा अभिमान बाळगत जल्लोश केला, तरी इस्रोच्या वैज्ञानिकांनी मात्र परत कामाला जुंपून घेतलेलं आहे. याहूनही अवजड उपग्रह जीसॅट 11ची बांधणी करायची आहे. चांद्रयान 2मधून परत एकदा चंद्रावर स्वारी करायची आहे. तसंच मंगलयान - 2 केवळ भोज्ज्याला शिवून परत येणार नाही, तर मंगळावर उतरून, तिथे फेरफटका मारून, तिथल्या मातीचे नमुने गोळा करून परत येणार आहे. त्याचीही पूर्ण तयारी करायची आहे.

आजवर भारतीय अंतराळवीरांनी अवकाशभ्रमण केलेलं आहे. परंतु राकेश शर्मांसारखं एकतर कोणत्या तरी परदेशी यंत्रणेचं बोट धरून किंवा केवळ भारतीय मातापित्यांच्या पोटी जन्म घेतला म्हणून भारतीय म्हणवणाऱ्या काही जणांनी. आता मात्र सरकारी अनुमती मिळाली, तर येत्या काही वर्षांमध्ये अस्सल भारतीय अंतराळवीर भारतीय अवकाशयानातून प्रवास करत अंतराळाची सफर करेल. त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी वापरायच्या खास यानाची चाचणीही घेतली गेली आहे. तो सुदिन लवकरच उगवो, अशी आशा आपण आता करू शकतो.

 [email protected]