हिंसक माणिक 'सरकार'

 विवेक मराठी  16-Jun-2017


***पार्थ कपोले****

पुस्तकाचे नाव    :    त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा

                      माणिक सरकार

लेखक    : दिनेश कानजी

प्रकाशन  : चंद्रकला प्रकाशन

मूल्य : 160 रुपये  l पृष्ठसंख्या : 144

ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात पुष्पा कपाली या महिलेची कहाणी अंगावर काटा आणणारी आहे. ही महिला सात महिन्यांची गरोदर होती. माकपचे कार्यकर्ते तिच्या घरात शिरले. तिला मारहाण केली. मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाला. पोटातील अर्भकाचा बळी गेला. पुष्पा कपालीचा गुन्हा एवढाच होता की ती भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होती. एका गर्भवती महिलेला लाथाबुक्क्यांनी मारण्यासाठी किती क्रौर्य लागत असेल? माकप कार्यकर्त्यांच्या क्रौर्याचं हे अपवादात्मक उदाहरण नाही. क्रौर्य आणि आणि दहशत यावरच माकपचा डोलारा उभा आहे! अडीच दशकांच्या काळात त्रिपुरामध्ये काडीचाही विकास न करता याच क्रौर्यावर माकपने आपल्या सत्तेचा गड शाबूत राखला.

माणिक सरकार. त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री आणि माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते. देशातील सामान्य जनतेला या माणिक सरकारांचं कोण कौतुक...

'माणिक सरकार कसे साधेपणाने राहतात, माणिक सरकार कसे कमी पैशात जगतात, माणिक सरकार कसे फक्त एक रुपया पगार घेतात, माणिक सरकार कसे लोकाभिमुख कारभार करतात, माणिक सरकार कसे त्रिपुराचा चौफेर विकास करत आहेत...'

माक्र्सवाद्यांचे 'ब्लू आइड बॉय' असणाऱ्या कॉम्रेड माणिक सरकारांना तर देशातील समस्त कॉम्रेडनी जणू 'देवदूत' वगैरेच बनवून टाकलंय (साम्यवादी देव वगैरे संकल्पना मानत नसले तरी!)'

अशी कोणी साधेपणाने राहणारी व्यक्ती दिसली की आपल्या देशातील जनतेला अगदी भरून येतं. त्याच्याबद्दल उगाचच सहानुभूती वगैरे दाटून येते. त्यात तो राजकारणी असेल तर मग विचारायलाच नको. एरवी राजकारण्यांच्या नावे खडे फोडणारे लोक अशी कोणी व्यक्ती दिसली की तिच्या अगदी प्रेमातच पडतात आणि प्रेम आंधळं असल्याने तिच्यावर अगदी आंधळा विश्वास ठेवतात. (त्यातूनच मग केजरीवाल यांच्यासारखे गणंग तयार होतात.) त्याच्या खोलात शिरून सत्य नेमकं काय, हे जाणून घेण्याची तसदी कोणीही घेत नाही.

डाव्यांनी आणि त्यांच्या कलाने वागणाऱ्या माध्यमांनी सामान्यांच्या याच अज्ञानाचा फायदा घेतला आणि माणिक सरकार यांची 'लार्जर दॅन लाइफ' अशी एक प्रतिमा तयार केली. डाव्यांच्या प्रपोगंडास मिळालेलं मोठं यश म्हणून माणिक सरकार आणि 'कथित विकासाचं त्रिपुरा मॉडेल' याकडे पाहता येईल.

माणिक सरकारचं आणि हिंसाचार, गुंडगिरी आणि भ्रष्टाचार यांनी बरबटलेल्या त्यांच्या राजवटीचं खरं स्वरूप पत्रकार दिनेश कानजी यांनी आपल्या 'त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा - माणिक सरकार' या पुस्तकात रेखाटलं आहे. कानजी यांनी महिनाभर त्रिपुराचा दौरा केला, परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली, त्रिपुरातील अन्य पक्षाच्या - भाजपा, काँग़्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी आणि सामान्य जनतेशी संवाद साधत माणिक सरकारचा आणि डाव्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर मांडला आहे. 'त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा - माणिक सरकार' या नावातच माणिक सरकार यांच्या कथित लोकाभिमुख राजवटीची कल्पना येते. विकासाच्या नावाखाली डाव्या पक्षाने राज्यात फक्त अराजक पसरवलंय आणि माणिक सरकार त्यात सक्रिय आहेत - साधेपणाचा बुरखा घालून! मात्र राष्ट्रीय माध्यमांचे लाडके असणाऱ्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यांच्या नावाने गावगन्ना हिंडणाऱ्या एकाही माध्यममुखंडांला माणिक सरकारांचा हा चेहरा जनतेसमोर आणायची तसदी वाटली नाही. सदर पुस्तकात माणिक सरकार यांच्या राजवटीतील अराजक आणि भ्रष्टाचार पाहून माणिक सरकार हे लेनिन, स्टालिन आणि माओ यांच्या हिंसक राजवटीचे खरे उत्तराधिकारी शोभतात.

दिनेश कानजी यांनी पुस्तकात त्रिपुराचा कथित विकास, सरकारी यंत्रणेवर असलेली डाव्यांची मजबूत पकड, सरकारी यंत्रणांचा डाव्यांकडून होणारा यथेच्छ गैरवापर, विरोधी पक्षांची गळचेपी, विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या सरकारी आशीर्वादाने होणाऱ्या हत्या, दहशतवादास प्रोत्साहन, अंमली पदार्थांचा विळखा, शिक्षणाचा उडालेला बोजवारा, समृध्द निसर्ग लाभूनही पर्यटनाची दुरवस्था आणि आर्थिक बाजूची लागलेली वाट या सर्व गोष्टी सविस्तरपणे मांडल्या आहेत. ते वाचून विचारी जनांच्या मनात निश्चितच काळजी वाटेल.

माणिक सरकार यांच्या कथित साध्या प्रतिमेच्या प्रेमात अनेक जण आहेत, मात्र खरी परिस्थिती अगदी त्याच्या उलट आहे. माणिकबाबूंकडे स्वत:चे घर नाही, मात्र अत्यंत आलिशान अशा सरकारी निवासस्थानी ते विलासी ऐशआरामात राहतात. अगदी चाळीस कि.मी.चा प्रवासही माणिकबाबूंसारखा 'साधा' मुख्यमंत्री हेलिकॉप्टरशिवाय करत नाही. आपलं वेतन ते पक्षास देऊन टाकतात, मात्र आपल्या राहणीमानावर दरमहा लाखो रुपये ते अगदी सहज खर्च करतात. एकीकडे शोषितांसाठी लढायच्या गोष्टी माकप करतं आणि दुसरीकडे माणिकबाबू मात्र आलिशान आयुष्य जगतात. त्यांचे जोडे खास दिल्लीवरून मागवण्यात येतात, आपल्या चश्म्याच्या महागडया फ्रेम्स ते दर महिन्याला बदलतात, अत्यंत उंची कपडे अशी त्यांची 'साधी' राहणी आहे. अर्थात डाव्यांच्या दांभिकपणास शोभेसं असंच माणिक सरकारांचं वर्तन आहे.

लोकाभिमुख माणिक सरकारांच्या राजवटीत तब्बल 10 हजार 281 कोटींचा 'रोझव्हॅली चीटफंड घोटाळा' झाला असून त्यात थेट माकप नेत्यांचे लागेबांधे आहेत. विशेष म्हणजे 'रोझव्हॅली' आणि प. बंगालातील 'सारदा चीटफंड घोटाळा' या दोहोंची एकत्रित रक्कम 12 हजार 740 कोटी रुपये एवढी आहे, म्हणजे सारदापेक्षा कित्येक पटींनी जास्त घोटाळा माणिक सरकार यांच्या डाव्या राजवटीने केला आहे. कानजी यांनी त्याचा मांडलेला तपशील धक्कादायक आहे. माणिक सरकार यांचा या घोटाळयाशी थेट संबंध. त्यांनीच 'रोझव्हॅली'चं त्रिपुरामध्ये लाँचिंग केलं आणि झोकात भाषणही ठोकलं. सोबतच 'रोझव्हॅली'ला मोक्याचे भूखंडही वाटण्यात आले. संतापजनक बाब म्हणजे कंपनीविरुध्द 2012मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही कंपनीस सरकारी अनुदान सुरू होतं. माणिक सरकार यांचा हा चेहरा निश्चितच 'साधा' नाही.

त्रिपुराच्या सीमा बांगला देशास भिडलेल्या आहेत. दहशतवाद्यांचं नंदनवन म्हणून आता हे राज्य आता पुढे येतंय. अर्थात त्यालाही माणिकबाबूंचा वरदहस्त आहेच. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी हबीबी मियाँ हा राज्याच्या मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर दीर्घकाळ वास्तव्यास होता. हरकत उल जिहादी या संघटनाचा अतिरेकी मामून मियाँ हा सुमन उर्फ प्रवीण मुजुमदार या हिंदू नावाने वास्तव्यास होता. माकप सरकारचे मंत्री शाहीद चौधरी यांचे त्याच्याशी एवढे घरोब्याचे संबंध होते की यंत्रणा त्याच्या शोधात असल्याची कुणकुण लागल्यावर मंत्रीमहोदयांच्या पत्नीने सरकारी वाहनातून या दहशतवाद्यास बांगला देशात नेऊन सोडलं. माणिक सरकारांच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या राजवटीचं हे सत्य कानजी यांनी साद्यंत मांडलंय.

लेखकाने माणिक सरकाराची आर्थिक बाजूही नेमकेपणाने मांडली आहे. त्रिपुराचं अर्थकारण हे विकासाचं नसून बुडीतलं आहे. महसूल नसल्यामुळे निधीसाठी सतत केंद्राच्या तोंडाकडे पाहायचं, केंद्राकडून मिळालेल्या पैशांचा मनमानी पध्दतीने वापर करायचा आणि या पैशाने पक्ष आणि कार्यकर्ते पोसायचे, एखाद्या कामासाठी घेतलेला पैसा भलत्याच कामांसाठी वापरायचा, असे सर्व प्रकार राज्यात अनेक वर्षांपासून सुरू आहेत. देशात 38 टक्के लोक दारिद्रयरेषेखाली असले, तरी त्रिपुरात मात्र हा टक्का तब्बल 67.78 एवढा आहे. राज्यात सरकारी कर्मचारी आणि मध्यमवर्गाचा टक्का साधारणपणे 31.50 एवढा आहे. दारिद्रयरेषेखालील जनता आणि मध्यमवर्ग यांची एकूण टक्केवारी 99.28 आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर अर्थकारणाची सारी सूत्रं 0.72 टक्के लोकांच्या हाती आहेत आणि त्यात समावेश होतो तो डाव्या पक्षांचे नेते, राज्यातील मंत्री, आमदार आणि ड्रग्ज माफिया यांचा. डाव्यांच्या शोषितांविरुध्दच्या कथित लढयाचं हे वास्तव स्वरूप!

सर्वत्र अशी अराजकसदृश परिस्थिती असताना त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाकडे जनता अत्यंत सकारात्मक दृष्टीने पाहते आहे. सुनील देवधर हे भाजपा नेते कार्यकर्त्यांसमवेत कष्ट घेत असून भाजपा आता राज्यात रुजायला लागला आहे. त्रिपुरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा स्पष्टपणे जाणवतोय. आणि नेमकं हेच माणिकबाबूंना पाहावत नाहीये. त्यामुळे माणिकबाबू राज्यात विरोधी पक्षाच्या - विशेषत: भाजपाच्या विरोधात रक्तरंजित राजकारण खेळत आहेत. लेखकाने विरोधकांवर होणाऱ्या जीवघेण्यात हल्ल्यांची वस्तुस्थिती मांडली आहे, जी राष्ट्रीय म्हणवणाऱ्या एकाही माध्यमाने फारशी मांडलेली नाही.

चांदमोहन हा दलपती या गावातील भाजपाचा साधा कार्यकर्ता. 26 डिसेंबरच्या पहाटे सहाच्या सुमारास डाव्या पक्षांचे गुंड त्याच्या घरी आले. स्थानिक आमदार ललितमोहन त्रिपुरा यांनी त्याला बोलावल्याचं त्यांनी सागितलं. मात्र त्यानंतर चांदमोहनचा थेट मृतदेहच घरी आला, ज्यावर बेदम मारहाणीच्या खुणा होत्या. चांदमोहनची हत्या करण्यामागचं कारण म्हणजे त्याचा उत्तम जनसंपर्क आणि सामाजिक कार्य. मात्र ललितमोहन यांना 2018मध्ये होणाऱ्या निवडणुकीत चांदमोहन हा प्रतिस्पर्धी वाटत होता आणि त्यांनी त्याची मग थेट हत्याच केली. असे अनेक चांदमोहन माणिक सरकारांच्या राजवटीत संपवले गेले आहेत. आणि त्याचं काही वावगंही त्यांना वाटत नाही. अर्थात हिंसा हेच तत्त्वज्ञान असणाऱ्या डाव्यांकडून अन्य काही अपेक्षा करणंच चूक आहे.

एकूणच या पुस्तकात लेखकाने डाव्यांच्या भंपकपणाची मुद्देसूद चिरफाड केली आहे. प्रत्यक्ष जाऊन परिस्थिती पाहिली असल्याने घटनांची दाहकता लिखाणात नेमकेपणाने उतरली आहे. डाव्यांच्या राजवटीबद्दल भाबडा आशावाद आणि विश्वास बाळगणाऱ्या प्रत्येकाचे डोळे या पुस्तकामुळे खाडकन उघडतील, हे नक्की.

9405192998

[email protected]