'गृहस्थाश्रमाचे फळ' लाभलेले दादा कचरे

 विवेक मराठी  16-Jun-2017


दादांचे जीवन न्याहाळले तर असे वाटते की, संत तुकाराम महाराजांनी 'जोडोनिया धन' हा अभंग जणू त्यांनाच उद्देशून लिहिला आहे. बहुतेक लोक गृहस्थाश्रमातच रमणारे असतात, पण गृहस्थाश्रम सुफळ करणारे लोक अभावानेच दिसतात. परोपकारी स्वभाव, परनिंदेचा तिटकारा, मातृवत परदारेषु हा भाव, भूतदया आणि शेतकरी असल्यामुळे गाई-पशूंचे पालन, शांतिरूप, कोणाचेही वाईट न चिंतणारा आणि पूर्वजांचे महत्त्व वाढविणारा असे सर्व गुण आपल्याला दादांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतात. त्यामुळे गृहस्थाश्रमाचे खरे फळ त्यांना लाभलेले आहे असेच वाटते.

'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी॥' हा जगद्गुरू संत तुकोबारायांचा अभंग चरितार्थ केलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणजे दादा उपाख्य नारायणराव म्हस्कूजी कचरे. तसे पाहता तुकाराम महाराजांनी दुकानदारी व सावकारी आयुष्यभर केली नाही; पण संत ज्ञानेश्वर माउलींच्या आशीर्वादाने जन्मलेल्या दादांनी आयुष्यभर शेती आणि दुकानदारीचा व्यवसाय उत्तम प्रकारे सांभाळला आणि प्रपंचातून परमार्थही साधला. दादा हे वारकरी. आयुष्यभर वारीत सहभागी होणारे. गळयात तुळशीची माळ धारण करणारे माळकरी. ते सहा महिन्यांचे असतानाच त्यांच्या आईने त्यांच्या गळयात तुळशीची माळ घातली होती. पण त्यांचा हा परमार्थ सामाजिक अंगानेच बहरला.

महाराष्ट्राला भाऊबंदकीचा अभिशापच आहे. दादांचे वडील म्हस्कूजी हे स्वभावाने अगदीच साधेभोळे होते. ते मूळचे पुण्यातील एरंडवणा-कोथरूडचे. येथील पाटीलकी त्यांच्याकडे होती आणि वृत्तीने ते शेतकरी होते. मोठा जमीनजुमला होता, पण त्यांच्या भोळेपणामुळे भाऊबंदांनीच त्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या आणि म्हस्कूजी भूमिहीन शेतकरी झाले. पुण्यातील कोथरूड भाग सोडून ते मग आपल्या सासुरवाडीला, म्हणजे पुण्यातीलच पूर्वेकडील भाग म्हणजे वानवडी गाव येथे आले.

दादांना त्यांची जन्मतारीख नीट आठवत नसली, तरी त्यांना आपले जन्मसाल 1927 आहे हे बऱ्यापैकी लक्षात आहे. काही कालांतराने दादांचे पितृछत्र हरपले. मग त्या मायमाउलीलाच कंबर कसून संसाराचा गाडा ओढावा लागला. भाजीपाला विकणे, दुसऱ्यांच्या शेतांवर मजुरीने जाणे अशी कामे करून दादांच्या आईने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. दादांच्या पाठचा भाऊ म्हणजे नाना यांच्यात दहा वर्षांचे अंतर होते. त्यामुळे जाणत्या वयात दादांवरच कुटुंबाचा भार पडला.

वानवडीला 1936 साली संघाची शाखा सुरू झाली आणि वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षीच दादा संघाच्या संपर्कात आले. ते नियमित संघाच्या शाखेवर जाऊ लागले. वयाच्या चौदाव्या वर्षी दादा संघदृष्टया प्रथम वर्ष शिक्षित झाले. पू. डॉक्टरांचा शेवटचा बौध्दिक वर्ग ऐकण्याचे भाग्य त्यांना लाभले. आद्य सरसंघचालकांपासून विद्यमान सरसंघचालकांपर्यंत सर्वच सरसंघचालकांचे दर्शन ज्यांना झाले आहे, अशा काही भाग्यवान स्वयंसेवकांपैकी दादा एक आहेत.

दादांचे लौकिक शिक्षण चौथीपर्यंतच झाले होते. उपजीविकेचा कोणताच अन्य मार्ग उपलब्ध नसल्यामुळे ते कधी गवंडयाच्या, तर कधी सुताराच्या हाताखाली काम करून चार पैसे कमवू लागले. दादांच्या डोक्यावर नेहमीच पांढरी गांधी टोपी असे. त्या काळात ब्रिटिशांचे राज्य असल्यामुळे सैनिकी छावणीच्या भागातून टोपी परिधान करून जाणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावर चहा ओतून सैनिक त्यांची टवाळी करत असत, पण दादांनी आपली राहणी कधीच बदलली नाही.

विनायकराव जोगळेकर नावाच्या त्याच भागातील एका संघकार्यकर्त्याने दादांना असे सुचविले की, ''तुम्ही प्रामाणिक आहात आणि कष्ट उपसण्याची तुमची तयारी आहे. मग दुसऱ्याच्या हाताखाली राबण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा व्यवसाय का करीत नाही? तुम्हाला एखादे छोटेमोठे दुकान या भागात टाकता येईल की!''

मग भुजबळ आणि कचरे असे भागीदारीत छोटे दुकान शिंदे छत्री या भागात दादांनी सुरू केले. भुजबळ हे दादांचे मामेसासरेच होते. 1950 साली त्यांचे स्वतंत्र दुकान सुरू झाले. आपल्या लहान भावाने शिक्षण घ्यावे अशी दादांची भूमिका होती. नानांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले, तेव्हा दुकानाचा व्यवसाय वाढला होता आणि तेथे मदतीची गरज होती. मग नानांनीही दुकानावर येण्यास सुरुवात केली. चोख व्यवहार आणि ग्राहकांशी चांगली वागणूक याच्या बळावर दादांनी थोडे पैसे गाठीशी जमवून आपला शेतकरी बाणा जपण्यासाठी थोडीफार जमीन खरेदी केली. वानवडीत तेव्हा बागायती शेती केली जात असे. विहिरीच्या पाण्यावर ती शेती होत असे. दादांचे कुटुंब शेतीवर राबू लागले. दादांच्या सौभाग्यवती इंदुमती यांनीही दादांना उत्तम साथ दिली. सर्वच प्रकारे संसाराचा गाडा ओढण्यासाठी त्यांचा सहभाग अर्धांगी या नात्याने त्यांनी उचलला. दादांचा संसार यशस्वी केला.

दादांचा स्वभाव आधीपासून सात्त्विच होता. कोणतेही व्यसन नव्हते आणि त्यात संघाचे संस्कार. दादांनी सरळमार्ग कधीच सोडला नाही. त्या वेळी वानवडी गावात मोठया प्रमाणात व्यसनाधीनता होती आणि हातभट्टयाही सररास चालत असत. अशा वातावरणात या सर्व गोष्टीपासून चार हात लांब राहणे म्हणजे एक प्रकारे साधनाच होती. घरात संघकार्यकर्त्यांची ऊठबस असल्यामुळे हे त्यांना साधता आले. 

पुढे आपले लहान बंधू नानांची समाजकार्याची आवड लक्षात घेऊन त्यांना दादा संघकार्यासाठी जास्त मोकळीक देऊ लागले आणि स्वतः दुकानदारीकडे लक्ष देऊ लागले. पुण्यातील नामांकित जनसेवा सहकारी बँकेच्या स्थापनेसाठी आणि ती पुढे नावारूपाला आणण्यासाठीही नाना कचरे यांनी अपरिमित कष्ट उपसले आहेत. त्यांनी या बँकेच्या संचालक मंडळातही अनेक वर्षे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अर्थात यासाठी दादांचे पाठबळ त्यांना अतिशय उत्तमपणे लाभले आहे.

पुढच्या काळात दादांना संघकार्य अधिक प्रमाणात करता आले नसले, तरी कचरे कुटुंब हे संघाचे कुटुंब असल्याची बाब अधोरेखित झाली होतीच आणि दादांची तिन्ही मुले अगदी लहानपणापासून संघात जाऊ लागली व संघविचारांचे बाळकडू त्यांनाही चांगल्या प्रकारे मिळू लागले.

'शुध्द बीजापोटी, फळे रसाळ गोमटी' असे म्हणतात. या संतवाणीचे प्रत्यंतर आपल्याला दादांच्या संसाराकडे पाहून येते. दादांना एकूण तीन मुले व दोन मुली. गणेश, मुरलीधर, गिरीश आणि सुमन व वत्सला. अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष ऍड. मुरलीधर कचरे हे दादांचे दुसऱ्या क्रमांकाचे चिरंजीव. आपल्या मुलांना संघात जाण्यासाठी दादांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. मुरलीधर कचरे यांनी दोन वर्षे कोल्हापूर येथे प्रचारक म्हणून कार्य केले आहे. ''दादांच्या प्रेरणेमुळेच आणि सततच्या पाठिंब्यामुळेच आपण मनापासून संघकार्य करू शकलो'' असे ऍड. कचरे सांगतात. अणीबाणीच्या काळातही सत्याग्रह करण्यासाठी दादांनी ऍड. कचरे यांना मनोबळ दिले. ऍड. कचरे सक्रिय कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या घरावर पोलिसांची सतत नजर असे. पोलीस वेळी-अवेळी येऊन दादांवर प्रश्नांची सरबत्ती करीत व ऍड. कचरेंचा ठावठिकाणा विचारीत. या सर्व प्रसंगाला दादांनी खंबीरपणे तोंड दिले. अणीबाणीत आपल्या घरातील एका सदस्याने सत्याग्रह करावा, असे दादांचे मत होते. त्यानुसार ऍड. कचरेंनी सत्याग्रह केला. त्यांना येरवडा कारागृहात एक महिन्याचा कारावास भोगावा लागला.

संघाच्या स्वयंसेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी भूमिगत राहून अणीबाणीच्या विरोधात लढा सुरू ठेवला होता. त्यांपैकी अनेक जण - उदा. गिरीश कुबेर, गोविंद लेले, आनंद चंद्रचूड, दामुअण्णा दाते, तात्या बापट इत्यादी, रात्री-अपरात्री दादांच्या घरी येत. मग त्यांची भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था दादा व त्यांची धर्मपत्नी आनंदाने करीत असे. दादांच्या आईला राजकारणाची फारशी कल्पना नव्हती, पण संघाच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबल्याबद्दल त्या पदोपदी इंदिरा गांधीच्या नावाने उध्दार करीत असत. खरे तर अशाच साध्याभोळया माणसांचे शिव्याशाप गांधी घराण्याला बाधले असावेत! संघाच्या लोकांना आपण घरात आसरा दिला तर आपल्यावर संकट कोसळेल याची भीती या कचरे कुटुंबाला कधीच वाटली नव्हती. मिसाखाली अनेक कार्यकर्ते तुरुंगात डांबले गेले होते. घरातील कर्ता पुरुष तुरुंगात असल्यामुळे कुटुंबाची दैना झाल्याचेही दिसत होते. या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी अन्य कार्यकर्ते आर्थिक जुळवाजुळव करीत असत. तात्या बापटांनी एकदा सहज विचारले होते, ''आई, जर अगदीच आर्थिक अडचण उभी राहिली तर तुमची शेतजमीन विकून ती नड भागवाल का?'' तेव्हा दादांच्या आईने लगेच होकार दिला होता. पण तशी पाळी ओढविली नाही.

दादा आणि दादांची आई हे दोन्ही पक्के वारकरी. पंढरीची वारी नियमाने करणारे. तोच त्यांचा जीवनातील खरा आनंद.  विठ्ठलमंदिरातील काकडयाला दादांची नियमित उपस्थिती असायची. वारकऱ्याचा नेमधर्म, संघाचे संस्कार आणि गरिबीची जाण, व्यवहारातील सचोटी यामुळे दादांचे पूर्ण जीवन घडलेले आहे. वानवडी येथील विठ्ठलमंदिरात गोकुळाष्टमीला अखंड हरिनाम सप्ताह असतो. दादा त्याच्या महाप्रसादाचा सर्व खर्च आनंदाने उचलत असत आणि अजूनही या कचरे कुटुंबाने ही परंपरा सांभाळली आहे.

आता दादांनी नव्वदी पार केलेली असल्यामुळे त्यांना पूर्वीप्रमाणे तडफेने सर्व कामे करता येत नाहीत. पण अगदी काही महिन्यापर्यंत, म्हणजे एकंदर 1950 ते 2017 या सदुसष्ट वर्षांच्या काळात त्यांनी दिवसाला सोळा-सोळा तास काम केलेले आहे. या काळात आपले काम हाच देव मानून त्यांनी कधीही सुटी घेतली नाही अथवा मौजमजेखातर कधी कुठे प्रवास केला नाही. आपल्या कुटुंबातील सर्वांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांची जीवनात प्रगती व्हावी यासाठी दादा सदैव राबत राहिले.

दादांच्या अशा निरलस स्वभावामुळे दादा समाजात लोकप्रिय तर होतेच, तसेच त्यांना कधी काही अडचण आली तर संघाचे कार्यकर्तेही दादांना मनापासून मदत करीत असत. दादा तसे दुकानदार होते आणि दुकानदार फारसा लोकप्रिय नसतो; पण त्यांच्यासारख्या देवमाणूस आम्ही कधी पाहिलेला नाही, असे वानवडीतील गावकरी बोलून दाखवितात. दादांनी बरेच कार्य पडद्याआड राहून कर्तव्यभावनेने केले. त्यांना प्रसिध्दीची काही हौस नव्हती. गाजावाजा करायला आवडत नसे. फोटोसाठी आणि कौतुकासाठी त्यांनी कधीच धडपड केली नाही. दादांनी पैसा बराच कमविला, पण साधी राहणी आणि सायकलवरून प्रवास त्यांनी कधीच सोडला नाही.

दादांचे जीवन न्याहाळले तर असे वाटते की, संत तुकाराम महाराजांनी 'जोडोनिया धन' हा अभंग जणू त्यांनाच उद्देशून लिहिला आहे. बहुतेक लोक गृहस्थाश्रमातच रमणारे असतात, पण गृहस्थाश्रम सुफळ करणारे लोक अभावानेच दिसतात. परोपकारी स्वभाव, परनिंदेचा तिटकारा, मातृवत परदारेषु हा भाव, भूतदया आणि शेतकरी असल्यामुळे गाई-पशूंचे पालन, शांतिरूप, कोणाचेही वाईट न चिंतणारा आणि पूर्वजांचे महत्त्व वाढविणारा असे सर्व गुण आपल्याला दादांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतात. त्यामुळे गृहस्थाश्रमाचे खरे फळ त्यांना लाभलेले आहे असेच वाटते. कुटुंबसंस्था संपत चालल्याच्या या काळात दादांना नातवंडांचे आणि पणतवंडांचे मुख पाहण्याचे भाग्य लाभले आहे. अशा दादांना 'जीवेत् शरदः शतम्, पश्येत् शरदः शतम्' अशाच शुभेच्छा!!

9594961864