गोष्ट वाळीत पडलेल्या कतारची आणि चोरांच्या उलटया बोंबांची

 विवेक मराठी  17-Jun-2017


सोमवार 5 जूनचा दिवस उजाडला तोच मुळी अरब देशांमधील भाऊबंदकीच्या फर्मानांनी. इराणच्या आखातात बरोबर मध्यात असलेल्या, मध्येच उगवलेल्या अंगठयाच्या आकाराच्या कतारवर प्रमुख बडया अरब देशांनी एकाएकी बहिष्कार टाकला. कतारपुढे खरोखरीच मोठे संकट उभे आहे. त्यांचा जमीन व हवाई संपर्क संपुष्टात आल्याने दैनंदिन वस्तूंचा पुरवठा आता रोखला गेला आहे. इराण व कुवेत हे दोन्ही आखाती देश त्याच्या मदतीस आले आहेत. तरी कतारपुढील प्रश्न बिकट आहेत. आता एकच आठवडा गेला आहे. पुढे काय घडते, त्यावर लक्ष ठेवायला पाहिजे.

सोमवार दि. 5 जूनचा दिवस उजाडला तोच मुळी अरब देशांमधील भाऊबंदकीच्या फर्मानांनी. इराणच्या आखातात बरोबर मध्यात असलेल्या, मध्येच उगवलेल्या अंगठयाच्या आकाराच्या कतारवर प्रमुख बडया अरब देशांनी एकाएकी बहिष्कार टाकला. अरब देशांमधील बिग ब्रदर सौदी अरेबियाने कतार हा अतिरेक्यांना साहाय्य करतो, इस्लामिक स्टेट विरोधातील लढाईत मोठा अडसर ठरतो, तो इराणचा पित्त्या आहे असे आरोप करत कतारशी सर्व प्रकारचे आर्थिक, राजनैतिक आणि दळणवळण इ.चे संबंध तडकाफडकी संपुष्टात आणले. त्याच्या पाठोपाठ संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, बहारीन, येमेन आणि लिबियातील पूर्वेकडचे प्रतिसरकार इ.नीही कतारला जणू वाळीत टाकले. कतारसकट हे सर्व देश अरब आहेत. या घटनेमुळे इस्लामी अरब देशांमधील भाऊबंदकी जगासमोर उघडी झाली.

दोनच आठवडयांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अतिरेक्यांविरोधात काय करायचे याचा उपदेश एकत्र जमलेल्या मुस्लीम देशाच्या राजांना आणि हुकूमशहांना केला होता. जाता जाता त्यांनी मोठे घबाड, सुमारे 10,000 कोटी डॉलर्सचा शस्त्रे पुरविण्याचा करार एकटया सौदी अरेबियाशी केला होता. बाकी मुस्लीम देशांशी इतर छोटे-मोठे करार करून आपला खिसा चांगलाच गरम करून ट्रंप महाशय पहिलाच परदेश दौरा अमेरिकन नागरिकांसाठी यशस्वी करून परतले. त्या वेळी त्यांच्या डोळयात, कोणालाही न जुमानणारा इराण खुपत होता. पण पाकिस्तानचे वर्षानुवर्षे रुतलेले आणि जखम करणारे मुसळ मात्र दिसत नव्हते. जणू लोकलाजेस्तव नवाज शरीफ यांना बाजूला सारल्याचे दर्शनी वाटत असले, तरी ट्रंप आणि अरब देशांच्या संतापाचा रोख पाकिस्तानच्या दिशेने न वळता एक प्रकारे नगण्य असलेल्या कतारकडे वळला. म्हणतात ना - 'अजापुत्रं बलिं दध्यात् , देवो दुर्बल घातक:' -  देवाचा आणि मनुष्याचा कोप दुर्बलांवरच होतो. सौदी अरेबिया, इजिप्त, लिबिया इ.  मोठया अरब देशांच्या तुलनेत एक टक्काही आकारमान  अथवा मूळची अरब जनसंख्या नसलेल्या या छोटया देशावर अरब धेंडांची गाज पडली.

अरबांमधील वाह्यात काटर्े

अंगठयाच्या आकाराचा, जेमतेम दहा लाख अरब लोकसंख्येचा, अत्यंत मोक्याच्या जागी, इराण-पर्शियाच्या आखातात असलेला हा चिमुकला देश सामरिकदृष्टया तर  महत्त्वाचा आहेच, त्याचप्रमाणे त्याच्या भूप्रदेशात खनिज तेलाचा व वायूचा वारेमाप साठा असल्याने त्याची श्रीमंती ओसंडून वाहते आहे. इतर अरब देशांप्रमाणे तेथे मनुष्यबळाची कमतरता आहे. बाहेरून नोकरीसाठी आलेल्या लोकांची संख्या जवळपास तेवढीच आहे. अलीकडेच प्रसिध्द झालेल्या आकडेवारीनुसार कतारमध्ये नोकरीसाठी असलेल्या भारतीयांची संख्या जवळपास सहा लाख आहे. यावरून त्यांच्या श्रीमंतीची कल्पना येईल.

सर्व बाजूंनी आखाती समुद्राने वेढला गेलेला कतार दक्षिणेला फक्त सौदी अरेबियाच्या मार्गाने अगदी चिंचोळया पट्टीने भूभागाशी जोडला गेला आहे. या देशाच्या दोन महत्त्वाच्या गोष्टींमुळे तो जगात प्रसिध्द आहे. कतारमध्ये मोठया प्रमाणावर उद्योगधंद्यांना चालना मिळाली आहे. त्याची राजधानी दोहा ही तर जागतिक व्यापाराचे आणि राजकीय घडामोडींचे केंद्र आहे. त्याचप्रमाणे पाश्चिमात्य दूरदर्शन वाहिन्यांच्या बरोबरीने सक्षम आणि प्रामुख्याने इस्लामी जगताशी संबंधित बातम्या, चर्चासत्रे आणि प्रभावी प्रचार यंत्रणा म्हणून गणली जाणारी दूरदर्शन वाहिनी अल-जझीरा राजधानी दोहा इथून कार्यान्वित होते. माझी व्यक्तिगत आवड नमूद करायची, तर मुस्लीम जगतावर लक्ष असावे यासाठी दररोज सायंकाळी 7.30 ते 8.00दरम्यानच्या बातम्या मी कटाक्षाने, जवळपास न चुकता त्यावर पाहतो. इतर बरेच अरब देश असले, तरी अल-जझीरा या वाहिनीने जे स्थान जागतिक स्तरावर निर्माण केले आहे, त्याचा इतर मोठया अरब राष्ट्रांना हेवा वाटतो. त्यामुळेच अनेकदा अल-जझीरावर काम करणाऱ्या वार्ताहरांना अरब देशांनी तुरुंगात टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. अल-जझीरा ही वाहिनी इस्लामी देशांसाठी जणू डोकेदुखी बनली आहे.

हा देश सौदी अरेबियाप्रमाणे सुन्नी असला, तरी त्याची धार्मिकता पातळ आहे. तिथे विशेष धार्मिक बंधने नाहीत. त्याच वेळी सुन्नी अरबांना खुपणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कतारचे समोरच्या इराणशी चांगले मैत्रीचे संबंध आहेत. इराण हा सौदी अरेबियाचा शत्रू आहे. त्याच्याशी साटेलोटे असलेल्या कतारचा सौदी अरेबियाला अर्थातच विरोध आहे. सौदी अरेबियाला काही करता येत नव्हते, कारण अमेरिकेचा मोठा सैनिकी तळ, ज्यात सुमारे 10000 अमेरिकी तळ ठोकून असतात, तो कतारमध्ये आहे. तेथे अमेरिकेच्या जहाजांची, सैन्याची आणि रसद पुरविण्याची वाहतूक सतत सुरू असते. काही वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेचे इराणशी बिनसले होते, तेव्हा हा तळ अमेरिकेला सामरिकदृष्टया फार कामी आला होता. इराणवर थेट लक्ष ठेवण्यासाठी हा तळ फार महत्त्वाचा आहे. या तळामुळे 'आपलेच दात आपलेच ओठ' अशी सौदी अरेबियाची स्थिती होती. कतार करत असलेल्या व्रात्यपणावर वेसण घालता येत नव्हती.

कतारचा वाह्यातपणा असा की अरब देशांमधील राजघराणी आणि ठाण मांडून बसलेल्या मुबारक, गड्डाफी इ. हुकूमशाहांच्या विरोधात कारवाया करणाऱ्या इस्लामी भ्रातृभाव (Muslim Brotherhood) या संघटनेच्या नेत्यांना, तसेच पॅलेस्टाइनमधील अतिरेकी संघटना हामासच्या नेत्यांना कतारने उजळ माथ्याने आश्रय दिला. एवढेच काय, अल कायदाचे कार्यालय कतारमध्ये होते.

दोन दशकांपूर्वी कतारमध्ये राज्यक्रांती झाली. बाप शेख खलिफाला त्याचा मुलगा शेख हमदने गचांडी दिली आणि सत्ता बळकावली. हा बदल विशेष नव्हता. अरब देशांमध्ये अशा बापलेकांच्या, भावाभावांच्या मारामाऱ्या, सत्तापालट इ. नवे नाहीत. पण एकाधिकारशाहीची परंपरा असलेल्या अरब देशांमध्ये कतारने लोकशाही रुजविण्याचा प्रयत्न केला. 1999मध्ये कतारमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात महिलांनीसुध्दा निवडणूक लढविण्याची व सरसकट मतदान करण्याची घटना घडली. हे अरबांसाठी अघटित होते. त्याच दरम्यान शेजारच्या इराणची पत्रास न बाळगता आयातोल्लांच्या नाकावर टिच्चून कतारने  इस्रायलला नैसर्गिक वायू पुरविण्याचा करार केला. ज्या वेळी अमेरिकेने इराकवर चढाई केली, तेव्हा कतारच्या अमिराने अमेरिकेच्या धोरणांवर जोरदार टीका केली. युध्दाचा परिणाम म्हणून जेव्हा तेलाच्या किमती भडकू लागल्या, तेव्हा त्या नियंत्रणात ठेवण्याच्या बाजूने कतारने कल दर्शविला. एकंदरीत काय, तर अनेक प्रकारे प्रस्थापित अरब आणि अमेरिकाच नव्हे, तर इराणलाही बाजूला ठेवून स्वत:ला पटेल ते धडाडीने अवलंबिणे हे कतारचे महत्त्वाचे धोरण आहे. त्यामुळे इतर सर्व अरब आणि मुस्लीम देशांसाठी हे श्रीमंत पण वाह्यात कार्टे ठरले. त्याच्या विरोधात आग धुमसत होतीच. त्यातच कतारचा राजा तमीन बीन अल थानीने परिषद संपताच सौदी अरेबियावर अमेरिकेचा पिट्टू होण्याची टीका केली आणि हामास व हिजबुल्ला या पॅलेस्टाइनमधील शिया अतिरेकी संघटनांना पाठिंबा दर्शविला. इराणची कड घेतली. हा प्रकार उंटावरची शेवटची काडी (last straw on camel's back) ठरला.


ट्रंपची मुक्ताफळे

ट्रंप सौदी अरेबियातील मुस्लीम देशांच्या परिषदेत मुस्लीम देशांना इस्लामी अतिरेकाला पाठबळ देण्याच्या त्यांच्या धोरणांबाबत काही खडे बोल सुनावेल, अशी अटकळ होती. झाले उलटेच. ट्रंप यांनी इराणवरच रोख धरला. अतिरेक्यांविरोधात उधळलेली मुक्ताफळे ही पाकिस्तानला अथवा इसिसला पाठबळ देणाऱ्या अरब देशांच्या विरोधात नसून ती सौदी अरेबियाने पडद्याआडून दिलेल्या सल्ल्यानुसार कतारविरोधात होती. सौदी अरेबियाने दहा हजार कोटी डॉलर्सचा करार केल्यानंतर वारेमाप पैसा मिळालेले ट्रंप हे घबाड मिळाल्याने बावचळले. त्यांनी कतारविरोधात कारवाई करण्यास सौदी अरेबियाला होकार दिला. सौदी अरेबियाने इतर देशांना बरोबर घेऊन कतारला वाळीत टाकताच ट्रंपनी त्याचे समर्थन केले. हे करताना आपला मोक्याच्या ठिकाणी असलेला सैनिकी तळ उद्या कतारने उठवायला सांगितला, तर ते अमेरिकेला बरेच महागात पडणार आहे. ते सामरिकदृष्टया पाऊल मागे घेणारे ठरणार, याचे भान 'आधीच मर्कट तशातच मद्य प्याला' या म्हणीप्रमाणे ट्रंप महाशयांना नव्हते. ट्रंपला नाटो (NATO) संघटनेच्या धर्तीवर अरब देशांची इराणविरोधात एकी करायची होती. ती आता मागे पडली. एकीकडे अमेरिकेचा राज्य सचिव (Secretary of State) रेक्स टिल्लरसन हा सौदी अरेबिया व कतार यांच्यामधील दरी कमी करण्याचा प्रयत्न करत होता, तर टिल्लरसनने केलेल्या विधानाच्या अगदी विरोधी भूमिका केवळ दोन तासांनंतर ट्रंपनी घेतली. कतार अतिरेक्यांना आर्थिक मदत देत असून त्याच्या विरोधात पावले उचलण्यासाठी सौदी राजा सलमान याचे ट्रंपनी आभार मानले. साहाजिकच त्यानंतरचे टिल्लरसनचे विधान जरा वेगळे होते. ट्रंपची बाजू सांभाळून घेणारे होते. (द हिंदू, दि. 12 जून 2017.)

चोरांच्या उलटया बोंबा

अतिरेकी संघटनांना मदत करणारा, त्यांना आश्रय देणारा म्हणून अनेक अरब देशांनी कतारवर आरोप केले, तरी त्यांनी तसेच खुद्द अमेरिकेने गेली काही दशके काय केले आहे? त्यांनी अफगाणिस्तानात रशियाविरोधात चळवळ उभी करण्यासाठी स्थानिक राष्ट्रवादाला बळ न देता कडवा इस्लाम कसा वाढेल याची व्यवस्था केली. सौदी अरेबियाला वहाबी-सलाफी विचासरणीचा प्रसार करायचा होताच. सौदी अरेबियाने मशिदी आणि मदरसे यांच्या माध्यमातून अफगाणी निर्वासितांमधून हजारो अतिरेकी निर्माण करण्याचे कारखाने उघडले. त्यासाठी गेली तीस वर्षे पेट्रोडॉलरचा ओघ वाहतो आहे. पाकिस्तान व 9-11च्या हल्ल्यापासून अमेरिका त्याचे दुष्परिणाम भोगत आहेत. पाकिस्तानला अणुबाँब बनविण्यास तयार करण्यासाठी सौदी पेट्रोडॉलर आणि अमेरिकेचा कानाडोळा या गोष्टी प्रामुख्याने जबाबदार आहेत. त्याच पाकिस्तानने तंत्रज्ञान पुरविल्यामुळे इराण आणि उत्तर कोरिया या दोन देशांनी अणुबाँब बनविण्याचे तंत्र विकसित केले. उत्तर कोरिया आता अमेरिकेची डोकेदुखी ठरला आहे.

शिया-सुन्नी संघर्षात बशर अल अस्साद हा सीरियाचा हुकूमशाहा आणि शिया असलेले हामास यांना नेस्तनाबूत करण्यासाठी इसिसचा भस्मासूर उभा करण्यात आला. सुन्नी अतिरेक्यांना शस्त्रास्त्रे आणि आर्थिक मदत करण्यात सौदी अरेबियाचा पुढाकार होता व आहे, हे आता लपून राहिलेले नाही. या शिया-सुन्नी लढाईचा परिणाम म्हणून इराक, सीरिया, लिबिया इ. देश भाजून निघत आहेत. तसेच आजवर लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. सीरिया, लिबिया, इराक या देशांवर जणू गाढवाचे नांगर फिरण्याची स्थिती आहे. या सर्व देशांमध्ये अमेरिकेने सैन्य, सैनिकी विशेषज्ञ आणि रसद पुरवून अतिरेक्यांना खतपाणी घातले आहे. आता इस्लामी अतिरेकाचा भस्मासूर थेट फिलिपिन्सच्या मुस्लीमबहुल मरावी बेटांपासून तो लंडनच्या थेम्स नदीपर्यंत पोहोचला आहे. त्यासाठी हे सर्व अतिरेकी-वहाबी अरब देश - त्यात कतारसुध्दा आलाच - अमेरिका आणि त्याच्यासोबत सैनिकी कारवाईत ओढले गेलेले युरोपातील देश तेवढेच अपराधी आहेत. केवळ एकटया कतारला वाळीत टाकणे, अतिरेकी कारवायांसाठी जबाबदार धरणे म्हणजे अरब देशांसकट अमेरिका, इंग्लंड इ. चाळीस चोरांच्या उलटया बोंबा आहेत. त्याची किंमत ते भोगत आहेत आणि भविष्यातसुध्दा भोगत राहतील. त्यापासून त्यांची सुटका नाही.

कतारपुढील समस्या

कतारपुढे खरोखरीच मोठे संकट उभे आहे. त्यांचा जमीन व हवाई संपर्क संपुष्टात आल्याने दैनंदिन वस्तूंचा पुरवठा आता रोखला गेला आहे. इराण व कुवेत हे दोन्ही आखाती देश त्याच्या मदतीस आले आहेत. आठवडाभरानंतर तुर्कस्तान व रशिया हे दोन देश कतारच्या बाजूने उभे राहिले. त्यांनी सौदी अरेबियाबरोबर रदबदली सुरू केली आहे. शेजारीच आमनेसामने असलेल्या इराणने विमाने भरून फळे आणि इतर दैनंदिन पुरवठयाचे साहित्य मोठया प्रमाणावर पुरविण्यास सुरुवात केली आहे. कुवेतने पुढाकार घेऊन ही तेढ मिटविण्याचे राजनैतिक प्रयत्न चालविले आहेत. तरी कतारपुढील प्रश्न बिकट आहेत. इतर अरब देशात राहणाऱ्या कतारींना देश सोडून चालते होण्याचे आदेश दिल्यामुळे कुटुंबे विभक्त होणार आहेत. हे सर्व देश अरब असल्याने देशादेशांमधून बंधने न येता लग्ने होत असत. त्यांना आता विभक्त व्हावे लागणार आहे. इतर देशात कामासाठी गेलेले अथवा स्थायिक झालेले कतारी नागरिक परत आल्याने त्यांचे पुनर्वसन करावे लागेल. पुनर्बांधणीच्या साधनांचा पुरवठा आटल्याने त्या कामांना खीळ बसेल. या घटनेचा खनिज तेलाच्या किमतीवर लगेच परिणाम झाला. तो दूरगामी असेल. काम न राहिल्यामुळे परत येणाऱ्या लोकांची भारतासाठी मोठी समस्या असेल. असेही होऊ  शकते की गैरकतारी कर्मचारी सोडून गेल्यास भारतीयांची गरज वाढेल. आता एकच आठवडा गेला आहे. पुढे काय घडते, त्यावर लक्ष ठेवायला पाहिजे.     9975559155