एक प्रश्न, दोन उत्तरं

 विवेक मराठी  17-Jun-2017


"वनवासींना अधिकाराबाबत जागृत केलं ते कम्युनिस्टांनी, मात्र त्यांचा विकास घडवला तो वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी' हे उद्गार आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कै. गोदावरी परुळेकरांचे. डाव्या विचारसरणीच्या एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तीने वनवासी कल्याण केंद्राच्या कामाला अशी पोचपावती द्यावी, ही काही साधी घटना नाही. त्यांचे हे उद्गार वनवासी कल्याण केंद्राच्या कामाची दिशा, त्याच्या विचारांचा गाभा यावर प्रकाश टाकणारे आहेत. गोदाताईंच्या उद्गगारांचं आज स्मरण होण्याचं कारण म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या तलासरी येथील वनवासी कल्याण केंद्राने यंदाच्या वर्षी पन्नाशीत केलेलं पदार्पण. एखाद्या सामाजिक कामासाठी 50 वर्षं ही काही फार नाहीत. मात्र बिकट आव्हानांचा मुकाबला करत आणि वनवासी बांधवांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं उद्दिष्ट डोळयांसमोर ठेवत त्यानुसार कामाची आखणी करत, तलासरी केंद्राने इथवरची वाटचाल केली आहे. म्हणूनच या कार्याच्या पन्नाशीची आवर्जून नोंद घेणं क्रमप्राप्त आहे.

वनवासी क्षेत्रातलं काम म्हणजे सतीचं वाण. कडव्या कम्युनिस्टांचं प्रभावक्षेत्र असलेल्या प्रदेशात शिरकाव करून निधडेपणाने आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवणं, आपल्या ध्येयावर - हिंदुत्ववादी विचारसरणीवर अविचल निष्ठा ठेवून येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरं जाणं, हे करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली. यामुळेच आज या कामाचा सुवर्णमहोत्सव साजरा होण्याचं भाग्य लाभलं आहे.

वनवासी बांधवांसाठी लढण्याचा, त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार प्राप्त करून देण्याचा बहाणा करणारे कम्युनिस्ट असोत वा नक्षलवादी, त्यांचा या कामामागचा छुपा अजेंडा वेगळाच असतो, हे आता उघड गुपित आहे. देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतरही, येथील जनसंख्येचाच एक भाग असलेल्या जंगलात राहणाऱ्या बांधवांच्या पिढयान्पिढया, कोणत्याही प्रकारच्या विकासाचं वारंही न पोहोचल्याने अज्ञान, दारिद्रय, अंधश्रध्दा यांच्या विळख्यात अडकलेल्या होत्या. या देशाचे हे नागरिक मूलभूत हक्कांपासून वंचित होते. त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली ती, सर्वात आधी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या कम्युनिस्टांनी. मात्र हे अधिकार समर्थपणे वापरण्यायोग्य त्यांना बनवायचं तर त्यांच्याभोवतीचा अज्ञान, अंधश्रध्देचा विळखा दूर करणं गरजेचं होतं. त्यासाठी या वनबांधवांच्या जीवनात पुस्तकी तसंच व्यवहारोपयोगी शिक्षणाचा, सुसंस्कारांचा दिवा लावण्याची गरज होती. त्यांच्यापर्यंत पायाभूत सुविधा पोहोचवण्यासाठी आग्रही राहण्याची गरज होती. ही गोष्ट मात्र कम्युनिस्टांनी केली नाही. कारण वनवासींची वंचितता हा त्यांच्या चळवळीचा प्राणवायू होता आणि आजही आहे. तोच काढून घेणं म्हणजे चळवळीलाच मूठमाती देणं. म्हणूनच वनवासींच्या विकासासाठी आवश्यक अशा मूलभूत प्रबोधनात्मक, विकासात्मक कामांपासून ते दूर राहिले. व्यवस्थेशी कधीही संवाद-समन्वय करायला न शिकवता, व्यवस्थेशी संघर्ष करण्याकरिता वनवासींना सतत पेटवत राहिले. इतकंच नव्हे तर, अशा विचारांनी काम करणाऱ्यांच्या कामात विघ्नं आणू लागले. जे वनवासी कम्युनिस्टांच्या वा नक्षलवाद्यांच्या मगरमिठीतून स्वत:ची सुटका करून घेऊ शकले नाहीत, त्यांच्या आयुष्यात प्रबोधनाची पहाट आजही झालेली नाही. तर जिथे जिथे वनवासी कल्याण केंद्राचं काम उभं राहिलं, त्या परिसरातील वनवासी समाज शिकून शहाणा झाला, त्याला व्यवहारज्ञान आलं, विकासाची आस त्यांच्या मनात जागी झाली. एक एक करत हळूहळू कुटुंबच्या कुटुंब शहाणं होत गेलं. शालेय/महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्यांच्यापैकी अनेकांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवला. ऍड. चिंतामण वनगा, विष्णू सवरा यांच्यासारख्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. आमदार, खासदार, मंत्रिपद या दिशेने प्रगती केली. हे आशादायी चित्र निर्माण होण्यात वनवासी कल्याण केंद्राचे अध्वर्यू स्व. माधवराव काणे यांच्यासह सेवाभावी, निरपेक्ष भावाने काम करणाऱ्या अनेकांनी भरीव योगदान दिलं. आप्पा जोशींसारख्या समर्पित भावाने काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर तर जिवावरचा हल्ला झाला, पण तो हल्लाही त्यांना या कामापासून दूर करू शकला नाही.

असं म्हणतात की, ध्येय जेवढं उदात्त तेवढी कामावरची निष्ठा अविचल. याची उदाहरणं संघकार्यात तर जागोजागी पाहायला मिळतील. त्यातही वनवासी क्षेत्रातलं आव्हान अधिक नाजूक होतं. मूलनिवासी आणि बाहेरून या देशात आलेले, असं दुहीचं विष वनवासी बांधवांच्या मनात पेरलं गेलं होतं. त्या विषाचं समूळ उच्चाटन करून तिथे, 'हे राष्ट्र एक आहे, आपण सारे बांधव आहोत' ही भावना मनामनामध्ये रुजवायची होती. हा भाव केवळ पुस्तकी शिक्षणातून निर्माण होणार नव्हता, हे लक्षात घेऊन वनवासींची सण-उत्सवाची परंपरा टिकवून ठेवतानाच, संपूर्ण समाजाला एकत्वाच्या धाग्याने बांधून ठेवणारी भारतीय सण परंपरेची त्यांना ओळख करून देण्याचं काम वनवासी कल्याण केंद्राने केलं. जुन्या सण परंपरेत कालसुसंगत बदल करत, वनवासी बांधवांना अन्य समाजाशी जोडण्यासाठी त्यांचा उपयोग केला. महाराष्ट्राच्या ज्या वनवासीबहुल क्षेत्रात वनवासी कल्याण केंद्राचं काम उभं राहिलं, तिथे तिथे विकासाची पदचिन्हं उमटली आहेत. ज्यांच्याजवळ गोदाताई परुळेकरांसारखी दृष्टी आहे, त्या भिन्न विचारसरणीच्या लोकांनाही वनवासी कल्याण केंद्राच्या कामाविषयी कौतुकाद्गार काढावेसे वाटतील. मात्र ज्यांना कावीळ झाली आहे. त्यांना या कामाचं मोल समजणं कठीण आहे.

वनवासी समाजासमोरच्या समस्यांचं निराकरण आजही पूर्णपणे झालेलं नाही. त्यात नव्या समस्यांची भर पडते आहे. त्यामुळे वनवासी कल्याण केंद्राचं काम संपलेलं नाही. वनवासी समाजाच्या जागृत होण्यामुळे ज्यांच्या जीवनाचं ध्येयच हरवलं आहे अशा कम्युनिस्टांशी/नक्षल्यांशी संघर्ष तर आजही चालूच आहे. रक्तात रुजलेला संकोच, न्यूनगंडाची भावना दूर सारत वनवासी समाज आता कुठे मुख्य प्रवाहापर्यंत आला आहे. त्यांच्यातलेच काही जण आता त्या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे आले आहेत. संपूर्ण भारतीय समाजाचे नेतृत्व करू शकतील असे कार्यकर्ते या समाजातून घडवण्याचं काम अद्याप बाकी आहे. त्यासाठी शुभेच्छा!