हायपोग्लायसेमिया

 विवेक मराठी  19-Jun-2017


हायपोग्लायसेमिया म्हणजे रक्तातलं ग्लुकोज नॉर्मलपेक्षाही कमी होणं. मुळात याच्या व्याख्येतच पहिली गोम आहे, ती म्हणजे 'नॉर्मल'ची पातळी ठरवण्याची. असं कुणीही उठलं आणि एखादा आकडा सांगितला, तोच नॉर्मल म्हटलं तर चालणार नाही. हा आकडा कसा आला ते शास्त्रीयदृष्टया सिध्द करावं लागेल. त्यासाठी प्रथम ही गोष्ट लक्षात घेतली गेली की मेंदू आपल्या ऊर्जेच्या गरजेसाठी फक्त आणि फक्त ग्लुकोजवर अवलंबून असतो. त्यामुळे मेंदूला ज्या पातळीवर ग्लुकोजची कमतरता जाणवू लागेल, ती पातळी हायपोग्लायसेमियाची.

सा मधुमेह हा 'लंबी रेस का घोडा' आहे. त्यामुळे मधुमेहात निर्माण होणाऱ्या समस्या बहुधा अनेक वर्षांनी होतात. एखाद-दुसरं वर्षं तुमचं ग्लुकोज थोडं वाढलेलं राहिलं, तर शरीराला मोठा अपाय होण्याची शक्यता कमी. पण त्यातही अचानक उद्भवणारे काही प्रश्न तयार होऊ  शकतात. दत्त म्हणून अचानक उभ्या राहणाऱ्या अशा प्रश्नांचा मागोवा घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. कारण याच प्रश्नांमध्ये व्यक्तीच्या जिवाला धोका होण्याचं प्रमाण बरंच जास्त आहे.

यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे हायपोग्लायसेमिया किंवा रक्तातलं ग्लुकोज नॉर्मलपेक्षाही कमी होणं. मुळात याच्या व्याख्येतच पहिली गोम आहे, ती म्हणजे 'नॉर्मल'ची पातळी ठरवण्याची. असं कुणीही उठलं आणि एखादा आकडा सांगितला, तोच नॉर्मल म्हटलं तर चालणार नाही. हा आकडा कसा आला ते शास्त्रीयदृष्टया सिध्द करावं लागेल. त्यासाठी प्रथम ही गोष्ट लक्षात घेतली गेली की मेंदू आपल्या ऊर्जेच्या गरजेसाठी फक्त आणि फक्त ग्लुकोजवर अवलंबून असतो. त्यामुळे मेंदूला ज्या पातळीवर ग्लुकोजची कमतरता जाणवू लागेल, ती पातळी हायपोग्लायसेमियाची. आता मेंदूला ग्लुकोज पुरेसं मिळत नाहीये हे कसं ओळखायचं? हा पुढचा प्रश्न होता. त्याचंही उत्तर फार अवघड नव्हतं. मेंदूला ऊर्जेची कमतरता जाणवू लागली की तो कुरकुर करणार. त्याची लक्षणं दिसणार. ही लक्षणं दिसणं हा पहिला मुद्दा. अचानक जोरात भूक लागणं, थरथरायला होणं, थोडासा घाम फुटणं अशी लक्षणं इतर अनेक आजारांमध्ये दिसतात. त्यामुळे पेच पूर्ण सुटणं शक्य नव्हतं.

मग पुढचा विचार आला. नुसती लक्षणं दिसली की हायपोग्लायसेमिया सिध्द होत नाही. प्रत्यक्ष रक्त तपासल्यावर ग्लुकोज खाली गेलेलं दिसलं पाहिजे. निदानाची अगदी खात्रीच पटवायला हवी, तर ग्लुकोज घेतल्यावर किंवा काहीतरी खाल्ल्यावर ती लक्षणं नाहीशी झाली पाहिजेत. लक्षणं दिसणं, ती दिसल्यावर रक्त तपासून ग्लुकोज विशिष्ट पातळीच्या खाली गेल्याचं सिध्द करणं आणि त्यानंतर अन्न वा ग्लुकोज घेतल्यावर पुन्हा लक्षणं गायब होणं या तीन गोष्टी एकत्र असल्या, तरच आज हायपोग्लायसेमियाचं निदान केलं जातं. हायपोग्लायसेमियाच्या व्याख्येतच तिन्ही बाबी अंतर्भूत केल्या गेल्या आहेत.

हायपोग्लायसेमियाची व्याख्या तीन पातळयांवर नेण्यामागे काही कारणं आहेत. स्त्री गरोदर असेल, तर ती मधुमेही नसतानादेखील नैसर्गिकरित्या तिच्या ग्लुकोजची पातळी 60च्या दरम्यान असू शकते. कधीकधी ती 50पर्यंतसुध्दा खाली येते. अशा वेळी हायपोग्लायसेमियासाठी ग्राह्य धरलेला 70चा आकडा तितकासा योग्य ठरत नाही. कारण त्या काळात स्त्री नेहमीपेक्षा अधिक किंवा 150% इन्श्युलीन बनवत असते. साहजिकच तिची ग्लुकोजची पातळी कमी होते. तिच्यात हायपोग्लायसेमियाची सगळी लक्षणंही दिसत असतात. परंतु ग्लुकोज देऊन तिला बरं वाटतंच असं नाही. काही वेळेला ज्यांचं ग्लुकोज बऱ्याच काळासाठी खूप जास्त - 400-500 असतं, अशा मंडळींचं ग्लुकोज अचानक 150-200वर आलं, तरी त्यांना हायपोग्लायसेमियाची लक्षणं जाणवतात. प्रत्यक्ष रक्त तपासलं, तर ग्लुकोज 70पेक्षा जास्तच असतं. म्हणजे वैद्यकीय भाषेत ज्याला 'रिलेटिव्ह हायपोग्लायसेमिया' म्हणतात, तो त्यांना झालेला असतो. याचा अर्थ नुसत्या लक्षणांचा विचार करून त्यांना ग्लुकोज दिलं गेलं, तर फसगत होईल. त्यांचं ग्लुकोज पुन्हा पातळी सोडून वर जाईल. तिन्ही गोष्टींचा व्याख्येत अंतर्भाव करण्यामागे या सगळया गोष्टी आहेत. बऱ्याचदा रुग्णांना जरासा जरी संशय आला, तरी हायपोग्लायसेमिया नसतानाही ती मंडळी घाबरून ग्लुकोज घेतात व स्वत:ची शुगर वाढवून बसतात. म्हणूनच इतकं पाल्हाळ लावावं लागलं.

खऱ्या हायपोग्लायसेमियाची भीती कुणाला असते, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ज्यांना इन्श्युलीन सुरू आहे, त्यांना ती भीती सर्वात जास्त असते. त्यातही मधुमेहाने मूत्रपिंडाचा विकार झालाय, इतर कुठल्या तरी कारणाने लिव्हर बिघडलंय अशांना हायपोग्लायसेमिया जरा अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असते. याचं कारण म्हणजे जेव्हा आपण काहीही खात नसतो, उपाशी पोटी असतो, तेव्हा आपली रक्तातलं ग्लुकोज कमी होऊ न देण्याच्या कामात ही दोन इंद्रियं महत्त्वाची जबाबदारी पेलत असतात. रित्या पोटी ग्लुकोज पुरवण्याचं काम करत असतात. त्यांच्यातच बिघाड झाला की रित्या पोटी हायपोग्लायसेमिया व्हायची भीती वाढणं साहजिकच असतं. बरं, या आजारांमध्ये तोंडी द्यायची मधुमेहाची इतर अनेक औषधं वर्ज्य असतात. त्यामुळे डॉक्टरांचा नाइलाज होतो. रुग्णांना इन्श्युलीन देणं त्यांना भाग पडतं.

इन्श्युलीनखेरीज सल्फोनील युरिया गटाची औषधं, तसंच नॉनसल्फोनील युरिया गटाची औषधं घेणाऱ्यांना हायपोग्लायसेमिया होऊ  शकतो. त्यांनीही थोडं सांभाळून राहायला हवं.

अगदी क्वचित, मधुमेह नसलेल्या काही मंडळींना हायपोग्लायसेमिया होतो. त्यांच्यात बीटा पेशींची संख्या जास्त असते. प्रसंगी इन्श्युलिनोमा नावाचा छोटासा टयूमर असू शकतो. हा टयूमर कधीकधी इतका छोटा असतो की सी.टी. स्कॅनमध्येही तो पकडला जात नाही. त्यासाठी वेगळया, थोडयाशा अधिक महागडया तपासण्या करण्याची गरज भासते. दिसणारी लक्षणं रक्तातलं ग्लुकोज कमी झाल्यावर असावीत तशीच असतात. फक्त यात होणाऱ्या हायपोग्लायसेमियाची लक्षणं रित्या पोटी दिसत नाहीत. जेवल्यानंतर तास दोन तासांनी दिसतात.

इथे आणखी एका, गोंधळात टाकणाऱ्या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे. ज्या मंडळींमध्ये ल्युकेमिया आहे किंवा रक्तातल्या पांढऱ्या पेशींची संख्या इतर कुठल्यातरी कारणाने वाढलेली आहे, अशा लोकांचं घरी ग्लुकोमीटरवर तपासलेलं ग्लुकोज आणि प्रत्यक्ष लॅबोरेटरीमध्ये तपासल्यावर आलेला रिपोर्ट यात खूप तफावत आढळते. लॅबोरेटरीचा रिपोर्ट खूप कमी ग्लुकोज दाखवतो. बऱ्याचदा आपलं ग्लुकोमीटर बिघडलंय की काय अशी शंका येते. तसं काहीही नाही. याला वैद्यकीय भाषेत 'स्युडो हायपोग्लायसेमिया' म्हणतात. शिरेतून रक्त काढल्यावर बराच वेळ बाहेर राहिलं तर त्यातल्या जिवंत पांढऱ्या पेशी ते ग्लुकोज वापरतात. म्हणून त्या सँपलमधलं ग्लुकोज कमी येतं. 

हायपोग्लायसेमिया झाल्यावर काय केलं पाहिजे? प्रथम तो का होतो हे ध्यानात घेऊन आपल्या खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे. शरीर रक्तात ग्लुकोज आल्यावरच नेमकं इन्श्युलीन बनवतं. त्यामुळे ग्लुकोज कमी होण्याचा धोका नसतो. परंतु जेव्हा तुम्ही-आम्ही इन्श्युलीन बाहेरून घेतो, तेव्हा ते आधीच रक्तात पोहोचलेलं असतं. ते आपलं काम करणारच. आपण त्याला खाण्याची जोड दिली नाही, तर ग्लुकोज कमी होणारच. म्हणून प्रथम तुम्हाला कुठली औषधं चालू आहेत, त्या औषधांपासून ग्लुकोज कमी होण्याचा धोका किती आहे हे डॉक्टरांकडून जाणून घ्या. काही कारणाने ती औषधं घेऊन तुमचं ग्लुकोज नॉर्मलपेक्षा कमी होत असल्यास तुम्हाला औषधं बदलून घेता येतील. हायपोग्लायसेमियाचा धोका कमी असलेली बरीच औषधं आता बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा फायदा घेतला पाहिजे.

आतापर्यंत सगळं सुरळीत सुरू असताना अचानक त्याच औषधांनी तुमचं ग्लुकोज कमी व्हायला लागलं, तर तुमच्या मूत्रपिंडाच्या तपासण्या करून घ्या. दोष तिथेही असू शकतो. वयस्कर मंडळींमध्ये वयानुसार मूत्रपिंड कमी काम करत असतं. तेव्हा त्यांच्याबाबतीत अधिक सजग राहिलं पाहिजे. केवळ रक्तातलं क्रिएटिन नॉर्मल आहे म्हणून धन्यता न मानता त्यांचा इ.जी.एफ.आर. करून घ्या. तो करण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत नाहीत. नियमित दारू पिणाऱ्यांनीदेखील सांभाळायला हवं. त्यांच्यात दीर्घकाळ हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. अशांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं चांगलं.

 ज्या औषधांमुळे हायपोग्लायसेमिया होतो, ती घेत असाल तर वेळच्या वेळी जेवणं, खाण्याच्या वेळा काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे. खाण्याच्या वेळा नियमित पाळल्यावर सहसा हायपोग्लायसेमिया होणार नाही. शिवाय घरी ग्लुकोमीटर असलेलं बरं. रात्री-अपरात्री हायपोग्लायसेमिया झाला, तर कुठे धावायला नको. नाहीतरी अवेळी लॅबोरेटोरीज उघडया नसतातच. प्रवासात किंवा ट्रॅफिकमध्ये अडकण्याची शक्यता गृहीत धरून सोबत काहीतरी खाण्याची वस्तू असू द्या. अगदी ग्लुकोजचं पाकीट असलं तरी चालेल. पण बिस्किटं किंवा खाखरा यासारखे लवकर खराब न होणारे पदार्थ जवळ ठेवणं केव्हाही इष्ट. हेही लक्षात घ्या की जेव्हा पोट रिकामं असतं, तेव्हा ही लक्षणं दिसतात. उगीच सारखं काही तोंडात टाकत बसाल तर ग्लुकोज कधीच नियंत्रणात येणार नाही.

हायपोग्लायसेमियामध्ये डॉक्टर '15चा नियम' लक्षात ठेवतात. हायपोग्लायसेमिया झाला की 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट देतात. 15 मिनिटं थांबतात. त्यानंतर ग्लुकोज तपासतात. ते कमीच आलं, तर पुन्हा 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट देतात. दोन-तीन वेळा असं करून ग्लुकोज नॉर्मल झालं नाही, तर रुग्णाला भरती करतात आणि शिरेतून ग्लुकोज देतात. इतर देशांमध्ये हायपोग्लायसेमियात वापरलं जाणारं ग्लुकॅगॉनचं इंजेक्शन मात्र आपल्याकडे सहजी मिळत नाही.

9892245272