पदाची शोभा वाढवणारी निवड

 विवेक मराठी  24-Jun-2017


रालोआचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर झाल्यानंतर, सर्वसंमतीने ते राष्ट्रपतिपदावर विराजमान होतील अशी अटकळ होती. पण तसे होणे नव्हते. भाजपाचे हे दलितप्रेम बेगडी आहे, यापासून बरीच काही टीका विरोधकांनी केली. ही टीका करत असताना अलीकडच्या इतिहासाचा सोयीस्कर विसर त्यांना पडला, त्याचे स्मरण करून देणे अगत्याचे आहे. संपुआने ज्या मीरा कुमार यांना कोविंद यांच्यासमोर निवडणुकीसाठी उभे केले आहे, त्यांचे वडील बाबू जगजीवनराम हे जनता पक्षाच्या कार्यकाळात 2 वर्षे उपपंतप्रधानपदी होते. जनसंघ हा या जनता पक्षाचा एक मोठा घटक पक्ष होता, ज्यातून पुढे भाजपाची निर्मिती झाली. एवढेच नव्हे, तर जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर 1980 साली जेव्हा पुन्हा निवडणुका झाल्या, त्या वेळी बाबू जगजीवनराम हे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपाने घोषित केलेहोते. तात्पर्य, कोविंद यांना राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी देण्यामागे पक्षाची वैचारिक परंपरा आहे. दलितवर्गाला आपल्या बाजूला वळवण्यासाठी साधलेला डाव नाही.

याच जगजीवनराम यांच्या कन्येला मीरा कुमार यांना संपुआतर्फे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. काँग्रेसच्या बुडत्या नौकेत मीरा कुमार यांच्यासारखे निष्ठावंत आहेत, त्यामुळेच हे दिशाहीन, शीड फाटलेले जहाज अद्याप तरंगते आहे असे म्हटले पाहिजे. एरव्ही ज्या लढाईत हार होणार हे ती सुरू होण्यापूर्वीच निश्चित आहे, अशा लढाईत कोण आपणहून लढायला सिध्द होईल? तेव्हा मीरा कुमार यांच्या निष्ठेचे कौतुक करावे तेवढे कमीच ठरेल.

मोदी-शहा जोडगोळीला टोकाचा विरोध हे एककलमी व्रत अंगीकारलेल्या विरोधकांना कोविंद यांच्या निवडीचा जो झटका बसला आहे, त्यातून प्राप्त झालेल्या बधिरावस्थेतून मीरा कुमार यांना मैदानात उतरवले गेले आहे. संघाचा शिक्का असलेल्या कोविंद यांना केवळ 'सैध्दान्तिक' विरोध करण्यासाठी, पराभव समोर दिसत असतानाही संपुआने उमेदवार उभा केला आहे. राजकारण करताना सिध्दान्तांचे गाठोडे सोयीने वळचणीला टांगून ठेवणाऱ्यांच्या तोंडी ही भाषा शोभून दिसत नाही.

विरोधकांचे हे गाठोडेही नीट बांधलेले नाही. एकेक गाठ सुटून ते पूर्ण सुटण्याच्याच बेतात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी कोविंद यांच्याशी असलेल्या सौहार्दापोटी आणि लालूंना धोबीपछाड देण्यासाठीही, कोविंद यांना पाठिंबा जाहीर करून हे गाठोडे सैल करण्यास सुरुवात केलेलीच आहे. आणि हे संपादकीय लिहीपर्यंत तरी मायावतीही अजून कुंपणावर बसल्याचेच दिसत आहे. विरोधकांची ही भ्रमिष्टावस्था म्हणजे त्यांच्या प्रतिक्रियात्मक राजकारणाचे फलित आहे. मोदी-शहा या दुकलीला नामोहरम करण्यासाठी ना त्यांच्याकडे एकीचे बळ आहे, ना राजकीय कल्पनाशक्ती. त्यामुळे त्या दोघांशी असलेले शत्रुत्व जोपासण्यासाठी, टिकवण्यासाठीही ते दोघे काय खेळी करतात याकडे विरोधी पक्षातल्या दिग्गजांना डोळे लावून बसावे लागते, इतकी त्यांची दुरवस्था आहे.

राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून भाजपाने केलेली निवड कोविंद यांची त्यांच्या राजकीय विरोधकांबरोबरच, या विरोधकांच्या दावणीला बांधलेल्या स्वयंघोषित माध्यमपंडितांना व राजकीय विश्लेषकांना-देखील चकवा देऊन गेलेली आहे. पत्रकार परिषदेत कोविंद यांच्या नावाची घोषणा करताना, त्यांची या पदासाठीची योग्यता सांगतानाच 'ते दलित समाजातील आहेत' ही वस्तुस्थिती शहा यांनी नमूद केली. दिवसरात्र जातीपातीच्या समीकरणात बुडालेल्या विरोधकांसाठी हे विधान धक्कादायक ठरले. त्या घोषणेत वावगे काय होते? उलट, कोविंद यांच्या अन्य पात्रतेचा उल्लेख करतानाच मागास जातीत जन्मलेल्या एका व्यक्तीला, तिच्या कर्तृत्वाच्या आधारावर राष्ट्रपतिपदासाठी निवडत आहोत हा संदेश त्यातून दिला गेला. ही निवड म्हणजे, संघपरिवार जी समरसता ही संकल्पना गेली काही वर्षे सातत्याने मांडत आहे, त्या संकल्पनेचे हे मूर्त रूप आहे. मात्र आधी माध्यमांनी आणि त्यांच्याबरोबर सर्व राजकीय विरोधकांनी 'कोविंद हे दलित असल्याचा' शहांनी उल्लेख केल्यावरूनच छाती पिटायला सुरुवात केली. 

रालोआतील सहकारी पक्ष असलेल्या, पण प्रत्यक्षात कोणतेही सहकार्य न करण्याचीच शपथ घेतलेल्या शिवसेनेच्या कार्याध्यक्षांनी एकाच भाषणात लागोपाठ दोन परस्परविरोधी विधाने करून स्वत:चे आणि पक्षाचे हसे करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी गोलगोल बोलत उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या या वर्तनाने झालेली शोभा त्यांना भविष्यकाळात महागात पडली, तर नवल वाटू नये.

कोविंद यांची निवड हा कुटिल डाव आहे आणि तो या देशाची घटना बदलण्यासाठी आहे, असा सनसनाटी आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. ज्यांना कायद्याचे ज्ञान आहे असा सार्वत्रिक समज आहे, त्या प्रकाश आंबेडकरांनी असे बिनबुडाचे आरोप करावेत हे आकलनापलीकडील आहे. शिवाय ते स्वत:ही राष्ट्रपतिपदाचे एक संभाव्य दावेदार होतेच. त्यांना उमेदवारी देण्याची डाव्यांची मागणी संपुआतील अन्य घटक पक्षीयांनी मान्य केली नाही, ही गोष्ट अलाहिदा.

राष्ट्रपती हे हस्तिदंती मनोऱ्यात राहणारे शोभेचे पद. रूढार्थाने कोणतेही राजकीय अधिकार नसलेले, परंतु विशेष मानाचे पद. मात्र दैनंदिन राजकारणापासून अलिप्त राहूनही देशासाठी खूप भरीव कार्य करता येते, हे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या कार्यकाळात दाखवून दिले. त्यांनी स्वकर्तृत्वाने या पदाची प्रतिष्ठा एका वेगळयाच उंचीवर नेऊन ठेवली. त्यानंतर आलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी मात्र सत्ताधाऱ्यांचा 'रबर स्टँप' राहण्यात आनंद मानला. ते त्यांच्या सोयीचेही होते. विद्यमान राष्ट्रपतींच्या कार्यकाळात या पदाला पुन्हा एकदा स्वत:ची गरिमा प्राप्त झाली.

एक अतिशय संवेदनशील, प्रखर सामाजिक जाणीव असलेले ऋजू स्वभावाचे आणि प्रसिध्दिपराङमुख असे कोविंद यांचे व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या कार्यकाळात ते या पदाची गरिमा वेगळया उंचीवर नेऊन ठेवतील अशी आशा आहे.