विचार भारती संमेलन वैचारिक प्रगतीचे एक आश्वासक पाऊल

 विवेक मराठी  06-Jun-2017


*** मिलिंद कांबळे****

 वैचारिक मानसिकतेचे जागरण करण्यासाठी आणि जीवनवादी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी खऱ्या अर्थाने एक लोकचळवळ उभी राहावी, यासाठी भारतीय विचार साधना आणि विश्व संवाद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात नुकतेच विचार भारती साहित्य संमेलन पार पडले.

बदलत्या सामाजिक परिस्थितीत साहित्य विचाराची नवीन वैचारिक मांडणी करण्याच्या दृष्टीने या संमेलनाला अधिक महत्त्व होते. आपली अभिव्यक्ती अधिक ठाशीव करण्याचा आत्मविश्वास नव्या, उगवत्या लेखक-कवींमध्ये यावा, त्या दृष्टीने पाहिल्यास या आयोजनाचा हेतू यशस्वी झाला, असे म्हणता येईल.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात हे एकदिवसीय संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष होते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक संदीप वासलेकर. वासलेकर यांच्या लेखनाबाबत तरुणांमध्ये मोठया प्रमाणावर उत्सुकता असल्याने संमेलनामध्ये त्यांना ऐकण्याची संधी पुणेकरांना पहिल्यांदाच मिळाली.

भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष किशोर शशीतल, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, स्वागताध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत, गीताधर्म मंडळाचे अध्यक्ष व संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, रा.स्व. संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरुध्द देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रचार प्रमुख दिलीपराव क्षीरसागर असे अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. ज्येष्ठ विनोदी लेखक द.मा. मिरासदार यांना 90 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आचार्य गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

ख्यातनाम तत्त्वज्ञ आचार्य गोंविददेव गिरी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्धाटन झाले. या वेळी त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेची अनेक उदाहरणे दिली. ''जगात विचारप्रधान देश असेल तर भारतच आहे. वैचारिक अस्पृश्यता हा भारतीय परंपरेचा कधीही भाग नव्हता. सर्व दिशांनी विचार माझ्याकडे यावेत, हीच वैदिक ॠषिमुनींची भूमिका होती. त्यामुळे मनुष्याच्या उन्नयनासाठी विचारांचे आदानप्रदान व्हायला हवे'' असे ते म्हणाले.

आपल्या बीजभाषणात आचार्यांनी साहित्याची व्याख्या स्पष्ट केली. ''जे लिहिले जाते, जे खपते ते सगळे साहित्य असते का? याचा विचार कोणीतरी करायला हवा. ज्या साहित्याच्या वाचनाने, परिशीलनाने मनुष्याच्या पापवृत्तींचे उपशमन होते, ते उत्तम साहित्य. जे जीवनाला सद्गुणांनी सजविते ते उत्तम साहित्य. मात्र जे वाचायला हवे ते कसे शोधावे हा प्रश्न निर्माण होतो'' असे त्यांनी सांगितले.

साहित्याचा पुनर्विचार व्हायला हवा, हा विचार बऱ्याच दिवसांपासून मनात घोळत असल्याचे सांगत या संमेलनाच्या निमित्ताने त्याला मूर्तरूप आल्याचेही त्यांनी सांगितले. ''मनुष्याचे आंतरिक उन्नयन हवे असेल तर विचार आवश्यक आहेत. मनुष्याचा विकास बुध्दीमुळे झाला आहे आणि विचार हे बुध्दीचे कार्य आहे. मानवी मनाचे खरे उन्नयन होते व त्याला अंतिम स्थिती प्राप्त होते, ते विचारांमुळे. भारताची परंपराच मुळात विचारांची परंपरा आहे. समाजात सगळेच विकारांवर जगणारे नाहीत. तसेच स्वातंत्र्य विचारांचे हवे, विकारांचे नाही. केवळ तर्काने आपल्याला या विश्वाचे गूढ उकलणार नाही'' असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वांना उत्सुकता होती ती वासलेकर हे काय बोलतात ते ऐकण्याची. त्यांनीही विचारांची चर्चा करताना आपण सैध्दान्तिक चर्चेवर जास्तीत जास्त भर देण्याची गरज अधोरेखित केली. उद्धाटनाच्या भाषणात ते म्हणाले, ''आज, काल आणि उद्या या विचारांचा संगम व्हायला हवा. साहित्याला संशोधनाची जोड देण्याची गरज असून पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत आपण संशोधनात कमी पडतो. संशोधन हा आपल्या साहित्याचा स्तंभ व्हायला पाहिजे. विज्ञान आणि वाङ्मय हे एकमेकांशी जोडलेले असते. तत्त्वज्ञान व तंत्रज्ञान हे एकमेकांत पूर्ण मिसळलेले आहेत.''

पाश्चात्त्य विचार हा विश्लेषणावर आधारित आहे, भारतीय विचार हा संश्लेषणावर आधारित आहे, असा मूलभूत फरक मांडून त्यांनी त्याचे उदाहरणही दिले.

उद्धाटनाच्या सत्रात स्वागताध्यक्ष प्रदीप रावत यांनी संमेलनाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ''इतर कुठल्याही संमेलनाशी या संमेलनाची स्पर्धा नाही. वैचारिक अस्पृश्यता संपविणे हा या संमेलनाचा उद्देश आहे. हे विचारकलहाला निमंत्रण आहे. विचार खऱ्या अर्थाने मुक्तपणे मांडता येतील अशी यामागची संकल्पना आहे. आम्ही कोणत्याही विशिष्ट विचारसरणीचा आग्रह धरत नाही. चांगल्या, सकस साहित्याची निर्मिती ही सांस्कृतिक मूल्यांवर आधारित असते. कुठल्याही कलेच्या विकासासाठी व्यक्तिस्वातंत्र्य आवश्यक असते. पारंपरिक कल्पनांचे जोखड फेकून देऊ, तेव्हाच सकस साहित्याची निर्मिती होते.''

''हे संमेलन विज्ञान व अध्यात्म यांचा संगम करण्यासाठी आहे. हे संमेलन जीवनवादी साहित्याची चळवळ पुन्हा सुरू करण्यासाठी आहे. कोणत्याही विचारधारेचा प्रसार करण्यासाठी किंवा कोणत्याही विचारधारेला विरोध करण्यासाठी नाही. नैतिकतेच्या पायावर जीवनवादी साहित्य उभे राहावे यासाठी हे संमेलन आहे'' असे संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार म्हणाले.

साहित्याला योग्य दिशा देण्याची गरज - मेहेंदळे

संमेलनाच्या पहिल्या सत्रात 'व्यक्ती, समाज आणि साहित्य' या विषयावर परिसंवाद झाला.

ज्येष्ठ निवेदक व लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे हे या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रभाकर पुजारी, डॉ. जयंत कुलकर्णी, डॉ. सुप्रिया अत्रे आणि विनय पत्राळे हे या परिसंवादातील वक्ते होते.

या वेळी बोलताना डॉ. मेहेंदळे म्हणाले, की ''आज दूरचित्रवाणीवरील मालिकांच्या रूपाने अत्यंत चुकीचे चित्र उभे करण्यात येत असून समाजाला योग्य दिशेने नेण्याची जबाबदारी साहित्यिकांची व लेखकांची आहे. त्यामुळे साहित्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे.''

दुसऱ्या सत्रात प्रसिध्द वक्ते डॉ. संजय उपाध्ये यांचा 'मातृभाषेतून मन:शांती' हा कार्यक्रमही झाला. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात व धकाधकीच्या जीवनात मानसिक शांती मिळवायची असेल, तर मातृभाषेची साधना केल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी खुमासदार शैलीत पटवून दिले. या वेळी अनेक मान्यवर व रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.

मराठी विकिपेडियावर सक्रिय व्हा

मराठी विकिपेडिया इतर भाषांच्या तुलनेने मागे असल्याने पर्यावरणतज्ज्ञ प्रा. माधव गाडगीळ यांनी तिसऱ्या सत्रात विकिपेडिया मराठीसाठी योगदानाबद्दल मार्गदर्शन केले. पर्यावरण आणि जीवविविधता यावर कार्य करणारे तज्ज्ञ म्हणून प्रा. गाडगीळ यांची ओळख आहे. मात्र तेच माधव गाडगीळ मराठी भाषेत ज्ञान-विज्ञान वाढावे आणि या माहिती युगात मराठी मागे पडू नये, यासाठी हिरिरीने प्रयत्न करत आहेत. त्यांनी कळकळीने मराठीजनांना घातलेली 'मराठी विकिपेडियावर सक्रिय व्हा' ही साद वेगळा अनुभव ठरली.

अनेक साहित्य संमेलनांत मराठी भाषा जिवंत ठेवण्याविषयीचे ठराव केले जातात. परंतु मराठी भाषा जिवंत ठेवायची म्हणजे नेमके काय करायचे? याबद्दल कोणी ठोस कार्यक्रम देत नाही. मराठी विकिपेडिया सत्राच्या माध्यमातून या संमेलनात हा विचार देण्यात आला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मराठी भाषा ही केवळ साहित्याचीच नव्हे, तर जोपर्यंत ती ज्ञानभाषा होत नाही, तोपर्यंत ती खऱ्या अर्थाने समृध्द होणार नाही आणि ती टिकवण्यासाठी मराठी साहित्यातील ज्ञानभांडार विकिपेडियाच्या माध्यमातून समाजासमोर आले पाहिजे, हा विचार या सत्रात देण्यात आला.

चौथ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन रंगले. या कविसंमेलनात बंडा जोशी, आश्लेषा महाजन, मनोहर सोनवणे, मकरंद कुलकर्णी यांच्यासह नामवंत कवींनी सहभाग नोंदविला. माजी आमदार विश्वास गांगुर्डे हे या कविसंमेलनाचे अध्यक्ष होते, तर अमृता खाकुर्डीकर आणि दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह रवींद्र घाटपांडे यांच्या हस्ते बंडा जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

जीवन आनंदी करण्यासाठी सकारात्मक व्हा

समारोपाच्या सत्रात वासलेकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रसिध्द पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. गो.ब. देगलूरकर हे या वेळी प्रमुख पाहुणे होते. ''माणूस सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही विचार करू शकतो. मात्र आपण सकारात्मक विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे. समाजातील उणिवांचा सामना करताना सकारात्मक वृत्ती बाळगा आणि मानवी जीवन आनंदी करा'' असे त्यांनी आवाहन केले.

या सत्रात संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल, पुणे यांच्या वतीने सोलापूरचे प्रभाकर पुजारी यांना 'ज्ञानेश्वर पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला. रोख 31 हजार रुपये, शाल, श्रीफळ, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

वासलेकर म्हणाले, ''आपल्याला दहशतवादाविरुध्द तसेच भ्रष्टाचाराविरुध्द कारवाई करायला हवी. मात्र त्यासाठी आपण नकारात्मक बनून चालणार नाही.'' हे विचार जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मानवजातीच्या आजवरच्या वाटचालीची गोळाबेरीज केल्यास ती जमेचीच ठरते, असे निरीक्षण नोंदवत ते म्हणाले, ''समाजातील कमतरतांवर कृती करा, परंतु मानवी जीवन अधिकाधिक सकारात्मक, अधिकाधिक आनंदी कसे होईल, याचा प्रयत्न करा.''

या वेळी बोलताना डॉ. देगलूरकर म्हणाले, ''की ॠग्वेदकाळापासून आमचे पूर्वज विचार करत आले आहेत. मात्र विचार नुसता करून चालणार नाही, तर चांगला विचार करणे आवश्यक आहे. साहित्य हे जीवनाला उपयोगी पडणारे असावे.'' माझ्या दृष्टीने मंदिरे ही सामाजिक संस्था होती, सर्व कलांचा उगम मंदिरांतूनच झाला असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.

संमेलनाचे कार्यवाह प्रदीप नाईक यांनी आभार मानले. या एक दिवसाच्या संमेलनाला तिन्ही सत्रांत लेखक व कवींची चांगलीच उपस्थिती होती. हे संमेलन यशस्वी होण्यासाठी नयना कासखेडीकर, अजिंक्य कुलकर्णी, आशय खाकुर्डीकर, सौ. डांगे, उमेश खंडेलवाल यांनी व्यासपीठ व्यवस्था सांभाळली. नरेंद्र उंब्रजकर, स्वामिनी मोरे, मकरंद कुलकर्णी यांनी स्वागत व्यवस्था पाहिली, तर श्रीपाद देशपांडे, गौतम यांनी वाहतूक व्यवस्था सांभाळली. नगरसेवक सर्वश्री श्रीनाथ भिमाले, रघुनाथ गौडा, राजेंद्र शिळीमकर, राहुल माने, राजेंद्र शेडगे व त्यांचे कार्यकर्ते या संमेलनाच्या यशासाठी झटत होते.

विचार भारती साहित्य संमेलन हा पहिलाच उपक्रम. आता यापुढे महाराष्ट्रात गावोगावी आणि शहरात विविध ठिकाणी एक स्वायत्त व्यासपीठ निर्माण करता येईल, असे या संमेलनाच्या संयोजनातून दिसत आहे. त्यामुळे साहित्य जगतात वैचारिक मानसिकतेचे जागरण करण्यासाठी एक आश्वासक पाऊल पुढे पडल्याचे दिसून येते.

9923167684