साधून संवादे, राहू्र आनंदे!

 विवेक मराठी  06-Jun-2017


** डॉ. अद्वैत पाध्ये***

संवादाचे आपल्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण आहे. पालकांनी मुलांशी, आईवडील, आजीआजोबा यांनी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. अर्जुनाने श्रीकृष्णाशी संवाद साधला, तेव्हाच श्रीकृष्णांनी गीता सांगितली व त्याला मानसिक बळ मिळाले. म्हणजेच संवादातून आपल्याला विवेकविचारांचे अमृत मिळाले. तर असा हा संवाद आपला काळानुरूप बदलत्या शैलीत सुरू केला पाहिजे, ठेवला पाहिजे, वाढवला पाहिजे, तरच आपले जीवन आनंदी होईल.

निलेशचे आईवडील त्याला आज मोठया मुश्किलीने माझ्याकडे घेऊन आले होते. तो यायलाच तयार नव्हता. त्याची प्रचंड चिडचिड चालू होती माझ्यासमोरच. मग मी त्याला शांत केले व आईवडिलांना बाहेर पाठवले आणि त्याला विचारले, ''काय झालं रे निलेश? एवढा का रागावला आहेस?''

''चिडू नको तर काय करू? स्वत: माझ्याशी नीट वागत नाहीत. हिटलरशाही करतात आणि मग मला कमी मार्क मिळाले म्हणून तुमच्याकडे घेऊन येतात. मीच गुन्हेगार आहे. मीच वेडा आहे. हे तेवढे शहाणे.'' निलेशचा आवाज पुन्हा चढत गेला.

''अरे हो.... पण मला तर नीट सांग. मी तुला कोणतंही लेबल लावलेलं नाही. तू फक्त मला तुझी बाजू किंवा तुझी कहाणी सांग. म्हणजे मला कळेल नक्की काय झालंय ते.''

''पण ते चुकीचं वागत आहेत. मग मी का पेशंट?''

''अरे, पण मी कुठे तुला पेशंट वगैरे म्हटलं का? उलट तुला वाटतं ना ते तुझे गुन्हेगार आहेत, म्हणजेच तुझी कैफियत पहिले नको का ऐकायला? आणि पेशंट वगैरे किंवा मेंटल वगैरे असे काही नसतं बाळा. मन सर्वांनाच असत तसंच. मग शरीराचं दुखणं तू स्वीकारतोस, तसं कोणामुळे का होईना, तुझं मन दुखावलंय ना? मग त्याला आराम नको का पडायला? बोल निलेश, सांग नक्की काय झालंय ते. त्याआधी सांग तुला कोणी भाऊ-बहीण आहेत का?''

''नाही. मी एकुलता एक आहे. माझे खूप लाड करायचे माझे आईबाबा. माझा शब्दपण खाली पडू द्यायचे नाहीत. मी मोबाइल गेम्स छान खेळायचो त्यांच्या मोबाइलवर. मला त्यातले सर्व ऍप्स पटापट ऑपरेट करता यायचे. त्यामुळे त्यांनीच मी मागितला तो ऍपलचा फोन मला आणून दिला. मग माझा स्वत:चा व्हॉट्स ऍपवर मी ग्रूप बनवला. मग आम्ही खूप चॅटिंग करायचो. चॅटिंगमुळेच माझी गर्लफ्रेंडपण मला मिळाली. मग चॅटिंग आणखीनच वाढलं. आमचे सेल्फीज आम्ही पाठवायचो. मला तर खूपच ते सर्व आवडायचे. माझा वेळ कसा जायचा ते समजायचंच नाही. यातून माझा अभ्यास राहायला लागला. आईबाबा विचारायचे, तर मी केला सांगायचो. पण माझ्या माक्र्सनी खोटेपणा बाहेर आला डॉक्टर आणि मग झालं... आईबाबा एवढे संतापले, बाबांनी तर मला पट्टयाने झोडून काढलं. मोबाइल हिसकावून लॉकरमध्ये ठेवून दिला. आईलापण ते ओरडले. तिचं लक्ष नाही म्हणून. मग आईने माझ्यावर राग काढला. आता ती नोकरी कायमची सोडून घरी माझ्यावर लक्ष ठेवायला बसली आहे. त्या दोघांनी अक्षरश: हिटलरशाही सुरू केली आहे. मी थोडे दिवस ऐकलं, पण आता नाही ऐकणार मी त्यांचं. मी काय चीज ते दाखवीनच.''

''निलेश, अरे, पण तू म्हणालास ते तुझे गुन्हेगार आहेत, म्हणजे काय? त्यांनी तर तुला हवं ते सर्व दिलं ना?''

''पण कधी मला वेळ दिला का? कधी बोलायचे का बसून माझ्याशी? कधी क्रिकेट खेळले का माझ्याबरोबर? आईसुध्दा आल्यावर सतत मैत्रिणींशी गप्पा नाहीतर मावशीशी नाहीतर टीव्ही सीरियल्स! मग मी माझ्या फ्रेंड्सशी चॅट केलं तर बिघडलं कुठे?''

मग मी निलेशला बाहेर पाठवले व त्याच्या आईवडिलांना आत बोलावले. वडील आता बसताच म्हणाले, ''डॉक्टर, तुम्ही त्याच्या बोलण्यावर जाऊ नका हं. पक्का बदमाश आहे. आम्ही त्याला एवढं सगळं दिलं, जे जे मागेल ते ते दिलं, पण आमचे चांगले पांग फेडले हो दिवटयाने. खरं सांगू? असा राग येतोय ना, समोर दिसला की फटकावावं असंच वाटतं.''

''अहो, शांत व्हा. काहीतरीच काय बोलताय? तरी मी तुम्हाला सांगत होते एवढा ऍपलचा मोबाइल नको. साधा द्या. आधी नको तेवढं प्रेम केलं, लाड केले आणि आता नुसता राग राग करत आहात. बरोबर आहे का डॉक्टर हे वागणं? मला तर अगदी कानकोंडं व्हायला झालंय.''

''हे बघा. निलेशची समस्या व तुमची माहिती ऐकून घेतल्यावर असं दिसतंय की, निलेशच्या बाबतीत तुमची हाताळणी, संवाद हे जसं त्या त्या वयात व्हायला पाहिजे तसं झालेलं नाही व होत नाही आहे. त्यातला समतोल ढासळला आहे आणि त्यामुळे निलेशचं वागण्यातलं संतुलन बिघडलंय. तर आता ही बिघडलेली संवादाची लय पुन्हा नीट बसवायची आहे. त्यासाठी आपल्याला सगळयांनाच एकत्र प्रयत्न करावे लागणार आहे. तसे केले, आपल्या चुका प्रांजळपणे स्वीकारून त्या सुधारण्याचा मनापासून प्रयत्न केला, तर आपल्याला सूर सापडेल.''

थोडक्यात, निलेशच्या समस्येचा विचार केला, तर एकूणच संवाद योग्य पध्दतीने, त्या वयात जो आवश्यक व योग्य असतो तसा न होता चुकीच्या पध्दतीने झाल्यामुळे सर्वच समतोल ढासळला होता. आधी अतिलाड, पूर्ण निलेशकेंद्रित वागणे म्हणजे फक्त त्याचे सर्व हट्ट पुरवण्याकडे त्यांचे लक्ष होते आणि मग नंतर एकदम निंदाजनक आणि हुकूमशाही वागणे, आईचे पूर्णपणे गोंधळलेले वागणे किंवा तिला काहीच मतस्वातंत्र्य नसणे/गृहीत धरणे - म्हणजेच छुपे मतभेद, ज्याचा उपयोग निलेशने स्वत:च्या फायद्यासाठी केला. एकूणच संवादाचा अभाव, विसंवाद, विरूप संवाद अशा नकारात्मक बाबींमुळे निलेशची समस्या निर्माण झाली होती.

संवाद हा आपल्या जीवनात महत्त्वाचा आहे. माणसाला विचारांचे वरदान मिळाले आहे. विचारांसाठी भाषा महत्त्वाची. भाषेतून साधला जातो तो संपर्क. त्याच भाषेला/विचारांना भावनेत गुंफून साधला जातो तो संवाद. संवाद काही वेळा शब्दाशिवायही साधला जातो, देहबोलीतून. देहबोली भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतात. 'शब्देविण संवादु' म्हणतात तो हाच!

पण त्याचबरोबर जशा काळाबरोबर अनेक गोष्टी बदलतात, नव्या गोष्टी येतात आणि आपण त्याचा त्यांच्या फायद्यातोटयासकट स्वीकार करतो, तसेच संवादशैलीतही बदल करण्याची गरज आपण स्वीकारली पाहिजे. गेल्या दशकभरात तर काळ झपाटयाने पुढे गेला आहे. आंतरजालाने प्रत्येक माणसाच्या हातावर राज्य करायला सुरुवात केली. नुसत्या स्पर्शाने आपण आंतरजालात शिरून कोणाशीही संपर्क साधू शकतो, माहिती प्रसारित करू शकतो, इतके या आंतरजालाने व समाजमाध्यमांनी आपल्या मोठया माणसांचेही दैनंदिन आयुष्य व्यापून टाकले आहे, तर जी मुले याच जगात जन्मापासून सामोरे जात आली आहेत, त्यांच्या मेंदूवर याचा प्रभाव नक्कीच पडत असणार, हे सत्य स्वीकारून त्या पिढीच्या योग्य अशी संवादशैली आत्मसात केली पाहिजे.

आपल्या वेळी लहानपणी रेडिओनंतर दूरदर्शनसुध्दा ठरावीक वेळ असायचे. टेलिफोनसुध्दा दुर्र्मीळ गोष्ट होती. असली तरी वापर काही जास्त नसायचा. बाजारात वस्तूंची रेलचेल नव्हती. करिअर क्षेत्रेदेखील मर्यादितच होती. आपल्या लहानपणी विभक्त असली तरी एक मूळ असलेले कुटुंब असायचे. घरात एकाच व्यक्तीचा (पुरुषाचा) वरचश्मा असायचा. मोठयांनी सांगितलेले पूर्ण ऐकलेच पाहिजे, ऐकायचेच ही परंपरा पाळण्याची (एकत्र कुटुंबातून विभक्तमध्येही आलेली) वृत्ती/तयारी असायची. मनात प्रश्न यायचेच नाहीत किंवा आले तरी मोठयांनी सांगितलेला शब्द प्रमाण मानून गप्प बसणे आपण श्रेयस्कर मानायचो. (कुमारवयीन काळाबद्दलचे निरीक्षण आहे.) आपल्या वेळी एका वेळी एकाच विषयावर लक्ष केंद्रित करायचे - म्हणजे एकाग्र करायचे याला महत्त्व असायचे. वस्तू, करिअर सर्व मर्यादित असल्याने सर्वांकडे साचेबध्द पर्यायच असायचे.

परंतु जागतिकीकरणानंतर आणि विशेषतः गेल्या दशकभरात आपण साध्या मोबाइलवरून स्मार्टफोनवर गेलो आहोत. जन्मत:च आपले फोटो काढले जातात. ते क्षणात अमेरिकेतील आपल्या नातलगांपर्यंत पोहोचतात. खोलीत (हॉस्पिटलच्या व नंतर घरच्याही) टीव्ही असतोच, ज्यावर असंख्य चॅनेल्स 24#7 चालू असतात. त्यामुळे स्मार्टफोन, त्यावरचे ऍप्स, टीव्ही चॅनल्स यामुळे सातत्याने मुलांच्या मेंदूला उत्तेजना मिळत असते. वस्तूंची तर प्रचंड रेलचेल असते. अगदी एका गोष्टीचे चांगले चांगले आंतरराष्ट्रीय ब्रँडचे पर्याय समोर असतात, ज्यातून निवड करणे सोपे नसते. तसेच करिअरसाठीसुध्दा अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत, ज्यामुळे एखाद्याला गोंधळलेपण येऊ शकते. त्याचबरोबर आंतरजालाच्या प्रभावामुळे जसे आंतरजालात एका वेळी अनेक विंडोजमध्ये काम करू शकतो, तसे आजची मुले एका वेळी अनेक गोष्टी करू शकतात - म्हणजेच 'अनेकाग्रता' हा आजचा परवलीचा मंत्र आहे. लक्ष नियंत्रित करण्याच्या विनोबांनी तीन पायऱ्या सांगितल्या होत्या. एकाग्रता, अनेकाग्रता, समरसता! त्याचबरोबर माहितीच्या प्रभावामुळे प्रत्येक गोष्टीला 'का' विचारण्याची/कसे विचारण्याची नवीन पिढीला सवय झाली आहे. त्यामुळेच मोठयांनी नुसते सांगितले म्हणून करायचे, अशी पध्दती त्यांना मान्य नसते.

असे जे हे बदल झाले आहेत, ते का झाले, चुकीचेच आहेत, सगळे वाईट आहे अशी नावं ठेवून ते बदलणार नाहीत. त्या बदलांना मनापासून स्वीकारून आपण आपल्या संवादशैलीत बदल घडवणे जरूरीचे आहे. हुकूमशाही किंवा परंपरागत पालकी वृत्तीची संवादपध्दती बदलली पाहिजे. 'मी सांगतोय ना? मग ते केलंच पाहिजे. करायचंच' अशा संवादाकडून चर्चात्मक संवादशैली आत्मसात करायला हवी. म्हणजेच 'तुझं काय मत आहे, मला असं वाटतं' अशा प्रकारे सुरुवात करून त्याचे मत काय आहे, त्याला असे का वाटते, आपल्याला का असे वाटते ही त्याच्या व आपल्या भूमिकेची देवाणघेवाण व्हायला हवी व त्यातून मग त्याला पटले आपले म्हणणे किंवा आपल्याला त्याचे, तर तसे करायचे. दोन्हीतले फायदे-तोटे समजावून सांगायचे, निर्णयाची जबाबदारी, त्याच्या तोटयांना सामोरे जायची जबाबदारी तुझी, पण आमची मदत असेलच, हा विश्वास देणे असा संवाद व्हायला हवा. त्यात काही वेळा चर्चेच्या नावाखाली कोणी पुन्हा आपले हुकूमशाही घोडे दामटवू शकतो, पण हळूहळू हा बदल झाला पाहिजे. एका दिवसात हा बदल शक्य नाही, पण सुरुवात व प्रयत्न करायला हवेत.

हे करताना आपण हेही लक्षात ठेवायला हवे की, मुले आपले अनुकरण करत असतात. त्यामुळे चर्चात्मक संवादशैली ही फक्त मुलाशी, बायकांशी हुकूमशाही अशी दुहेरी भूमिका त्यांना गोंधळवू शकते, त्यांच्या मनावर परिणाम करू शकते. त्यामुळे बदल मनापासून व पूर्ण कुटुंबाबाबत हवा.

तसेच मूल आपले अंग नाही, स्वतंत्र व्यक्ती आहे; तसेच पालकत्व हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, जीवन नाही; तसेच आपण त्याच्या जीवनाचे शिल्पकार नसून तोच त्याच्या जीवनाचा शिल्पकार आहे, आपण मदतनीस आहोत असे महत्त्वपूर्ण बदल दृष्टीकोनात आवश्यक आहेत.

अनुकरणीय असल्याने आपणदेखील त्यांनी नको करायला असलेल्या गोष्टी (टीव्हीचा, मोबाइलचा अतिवापर) टाळायला हव्यात. त्यांनी करायच्या गोष्टी आपण आत्मसात करायला हव्यात. (व्यायाम/खेळ/वाचन) यासाठी मुलांसाठी रचनात्मक वेळ देणे/काढणे फार महत्त्वाचे आहे. मूल ही स्वतंत्र व्यक्ती आहे हे एकदा मान्य केले की आपण आपल्या इच्छा, आकांक्षा त्यांच्यावर लादणार नाही (मनाविरुध्द), ज्यामुळे त्यांचे नुकसान होणार नाही, पण त्यांच्या आकांक्षा कळायला त्यांच्याशी रोज बोलले पाहिजे. एकत्र वेळ घालवला पाहिजे. मुलांबरोबर आहोत, पण लक्ष व्हॉट्स ऍपवर, हे बंद व्हायला हवे. लक्ष पूर्ण त्यांच्याशी बोलण्यात हवे.

आता नुकतीच सिध्दान्तची जी घटना घडली, ती कुटुंबातील संवादाचा अभाव (आईवडिलांमधील, पालक-मुलांमधला) व (आईची (?) संशयी वृत्ती/विकार) याबाबत योग्य वेळी मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत न घेणे (मनोविकारतज्ज्ञ, समुपदेशक) या बाबी कारणीभूत आहेत. संवादाचा अभाव गुन्हेगारी वर्तनापर्यंत (कदाचित नैराश्यामुळे) घेऊन गेला. यावरून संवादाचे महत्त्व अधोरेखित होते. तज्ज्ञांशी योग्य वेळी संवाद महत्त्वाचा असतो.

संवादाचे आपल्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण आहे. पालकांनी मुलांशी, आईवडील, आजीआजोबा यांनी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. अर्जुनाने श्रीकृष्णाशी संवाद साधला, तेव्हाच श्रीकृष्णांनी गीता सांगितली व त्याला मानसिक बळ मिळाले. म्हणजेच संवादातून आपल्याला विवेकविचारांचे अमृत मिळाले. तर असा हा संवाद आपला काळानुरूप बदलत्या शैलीत सुरू केला पाहिजे, ठेवला पाहिजे, वाढवला पाहिजे, तरच आपले जीवन आनंदी होईल.

साधून संवादे, राहू आनंदे!

लेखक मनोविकासतज्ज्ञ आहेत.

[email protected]