विश्वातील अद्वितीय संघटन

 विवेक मराठी  18-Jul-2017 

पुस्तकाचे नाव : विश्वातील अद्वितीय संघटन

                राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

लेखक : रमेशभाई मेहता

प्रकाशक : लोटस पब्लिकेशन्स

मूल्य : 350 रुपये पृष्ठसंख्या : 328

डॉ. केशवराव हेडगेवार हा नागपूरचा तरुण कलकत्त्याच्या राष्ट्रीय विश्वविद्यालयातून डॉक्टरकीची पदवी प्राप्त करून नागपूरला परतला. आता खरे पाहता त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू करून लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी होती. पण डॉ. हेडगेवार हे फार उच्च मनोधारणेचे वैद्यकीय व्यावसायिक होते. पाचपन्नास रुग्णांच्या आरोग्यरक्षणाने त्यांचे समाधान होणारे नव्हते. त्यांना संपूर्ण हिंदू समाजच ठणठणीत निरोगी, बलवान, समर्थ आणि समरस व्हायला हवा होता. म्हणून त्यांनी संपूर्ण देशाच्याच आरोग्याची जणू तपासणी केली. सर्व प्रकारची गुणवत्ता अफाट नि अपार आहे, तरीही हा समाज पुन: पुन्हा परकीय आक्रमणांकडून पराभूत का होतो? ग्रीक, कुशाण, शक, हूण, अरब, तुर्क, अफगाण, पोर्तुगीज, इंग्रज हे वारंवार या देशावर आक्रमणे करतात. इथल्या समाजाला गुलाम बनवतात. त्यांचा उच्छेद करायला याच समाजातून चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, यशोधर्मा, कृष्णदेवराय आणि शिवछत्रपती निर्माण होतात. पण त्यांनी जागवलेली चेतना क्षीण झाली की पुन्हा कोणीतरी नवा आक्रमक येतो नि पुन्हा हा समाज पराभूत होतो. असे का घडते? जयशाली स्वातंत्र्याची, विजयशाली वृत्तीची ही धगधगती चेतना, प्रेरणा क्षीण का होते?

आणि त्या डॉक्टराला, त्या खऱ्याखुऱ्या धन्वंतरीला हिंदू समाजाच्या रोगाचे निदान झाले. असंघटितता, विभाजितपणा, फूट, दुही, विषमता हे या रोगाचे कारण आहे. आता या रोगावर औषध कोणते? केवळ राजकीय स्वातंत्र्य, केवळ सत्ताप्राप्ती पुरेशी नाही. जीवनाच्या हर एक क्षेत्रात सुसंघटितता, एकत्रितपणा, समरसता, एकरसता निर्माण करणे हाच तो उपाय! हेच औषध!

असंघटिततेच्या रोगाने जर्जर होऊन पडलेल्या हिंदू समाजाला हे औषध पाजण्यासाठी या धन्वंतरीने एक अत्यंत अभिनव तंत्र निर्माण केले - दैनंदिन एक तास शाखा! मंत्र छोटा, तंत्र सोपे!

या छोटया मंत्रातून नि सोप्या तंत्रातून अद्भुत शक्ती निर्माण होऊ लागली. ही शक्ती अशीच निर्माण होत राहणे आपल्याला धोक्याचे आहे, हे इंग्रजांना कळले, देशघातकी मुसलमानांना कळले, देशबुडव्या ख्रिश्चन पाद्रयांना कळले, नमकहराम साम्यवाद्यांना कळले, ऍलन ऑक्टोव्हियन ह्यूम नावाच्या इंग्रजाने जन्माला घातलेल्या काँग्रेसलासुध्दा कळले.

कळले नाही आणि आजही कळत नाहीये ते सर्वसामान्य हिंदू माणसालाच. कारण आपण हिंदू आहोत की निधर्मी सेक्युलर आहोत याबद्दल तो स्वत:च 'कन्फ्यूज्ड' मन:स्थितीत आहे. स्वत:च्या राष्ट्रीयतेबद्दल संभ्रांत मनोवस्थेत असणारा असा समाज, जगाच्या पाठीवर दुसरा कोणताही नाही - अद्वितीय! आणि म्हणूनच 'आपण हिंदू आहोत नि हे आपले हिंदू राष्ट्र आहे' ही आपल्या राष्ट्रीयतेची जाणीव त्याला करून देणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे विश्वातले एक अद्वितीय संघटन आहे.

मुंबईचे डॉ. अनिरुध्द जोशी हे मुळात एक वैद्यकीय व्यावसायिक आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून ते आध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून खूप मोठी समाजसेवा करीत आहेत. आज लोक त्यांना पूज्य अनिरुध्दबापू म्हणून ओळखतात. त्यांचा आध्यात्मिक परिवार फार विशाल आहे. त्यांच्या स्वत:च्याच संपादकत्वाखाली 'प्रत्यक्ष' या नावाने पूर्णपणे बिगर राजकीय दैनिक निघते. एक दिवस योगायोगाने अनिरुध्दबापूंच्या हाती रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य श्रीगुरुजी यांचे 'विचारधन' हे पुस्तक आले. ते वाचून पू. बापू अतिशय प्रभावित झाले. 2006 या परमपूज्य श्रीगुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षात संघाने देशभरात 1 लाख सेवाप्रकल्प उभे केले, हे कळल्यावर सर्वच जाणत्या माणसांप्रमाणे पू. बापूही चकित झाले.

त्यातूनच त्यांच्या मनात कल्पना आली की, एका लेखमालेद्वारे 'दैनिक प्रत्यक्ष'च्या वाचकांना रा.स्व. संघाचा परिचय करून द्यावा. रमेशभाई मेहता हे मुंबईचे हे जुने आणि ज्येष्ठ संघकार्यकर्ते. त्यांनी दैनिक प्रत्यक्षमध्ये 'चालता बोलता इतिहास' या स्तंभातून संघ, संघनिर्माते, संघकार्यकर्ते, संघकार्य यांचा इतिहास आणि वर्तमान मांडायला सुरुवात केली. ही लेखमाला अर्थातच लोकप्रिय झाली.

प्रस्तुत 'विश्वातील अद्वितीय संघटन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' हे पुस्तक म्हणजे त्या स्तंभलेखनाचे ग्रंथरूप होय. अनिरुध्द बापूंच्या इच्छेनुसार हे पुस्तक एकाच वेळी मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्लिश अशा चार भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे.

इंग्लिश ग्रंथाच्या तोडीचा उत्कृष्ट कागद, उत्तम मुद्रण, समर्पक मुखपृष्ठ आदी दर्जेदार बहिरंगामुळे पुस्तक अंतर्बाह्य सुबक, वाचनीय, संग्राह्य आणि आवर्जून इतरांना भेट द्यावे, असे झाले आहे.

7208555458