'सेल्फी'ची जीवघेणी चौकट

 विवेक मराठी  22-Jul-2017


सेल्फी ही नवी आणि प्रत्येकाला सुखद, हवीहवीशी वाटणारी गोष्ट. स्वत:ला स्वत:च पाहणं याचा आनंद आगळा. सेल्फी घेताना आणि त्यानंतर ते न्याहाळताना जणू आपलं मूळ स्वरूप दिसावं, आत्मसाक्षात्कार व्हावा या भावनेने ते घेतले वा पाहिले जातात. कारण ते घेताना आजूबाजूचं भान - इतकंच काय, देहभानदेखील गळून जातं. या उमलत्या पिढीला इतकी आत्ममग्नता आली, याच्या कारणांचाही शोध घेतला पाहिजे. सेल्फी काढताना जीव गमावणारे थोडेच असले, तरीही करोडो लोक या जाळयामध्ये अडकले गेलेत.

 मे महिन्याच्या सुट्टीतली गोष्ट. बच्चेकंपनीला घेऊन आम्ही भाटयाच्या समुद्रावर गेलो होतो. थंडगार वारा, फेसाळत्या लाटा आणि पायाला वाळूचा मृदू स्पर्श या साऱ्यामुळे मुलं एकदम खूश होती आणि या आनंदात सहभागी होतानाच त्यांच्या हालचालींवर सावधपणे नियंत्रण ठेवण्याचं कर्तव्यही आम्ही चोख बजावत होतो.

खरं तर इथे येण्यापूर्वीच मुलांचं एक बौध्दिक घेऊन त्यांनी काय करणं, काय टाळणं अपेक्षित आहे हे आम्ही सांगितलं होतं आणि त्यानुसार सारं काही छान सुरू होतं.

लाटांवर उडया मारण्यात मुलं मश्गुल झाली होती. इतक्यात कॉलेजवयीन चार मुलं शेजारी येऊन उभे राहिली. काहीतरी चर्चा झाली आणि दोघे जण पाण्यात पुढे जाऊ लागले. उंच उंच लाटांच्या दिशेने पाठ करून ते मोबाइलमध्ये फोटो घेऊ लागले. कुणीतरी त्यांना हटकल खरं, पण त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मग त्यांनी अन्य दोघांसह पाण्यात झोपून फोटो टिपायला सुरुवात केली. योगायोगाने तिथे एक पोलीस आले व त्यांनी चौघांनाही कडक दम भरला. आजूबाजूच्या माणसांनी योग्य वेळी आलेल्या पोलिसांचे (मनातल्या मनात) आभार मानले आणि मग उत्स्फूर्त अशा कोकणी प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या. ''काय शहाणी समजत होती ती पोरं स्वत:ला. हिम्मत असेल तर एका दमात रायगड चढून दाखवा म्हणावं.'' कोणी म्हणालं, ''कुठून आली होती ती मुलं? त्यांना काय माहीत कोकणातला समुद्र? फोटो काढाल, पण तोच टांगायची वेळ यायची.'' तर कुणी म्हणत होतं, ''तरुण रक्त आहे. ऍडव्हेंचरस काही करायची इच्छा. ती अशी पुरी करतात. काय बोलणार!'', ''अहो, आधी थिबा पॉईंटला दांडीवर बसूनपण असेच फोटोचे उद्योग करत होती ती पोरं.''

खरं तर खूप धम्माल करून आम्ही घरी परतलो. पण ती मुलं, त्यांचं ते वागणं आणि त्यावर इतरांच्या आलेल्या प्रतिक्रिया हे सारंच विचारांच्या शृंखला जोडत जात होतं.

आजूबाजूची सळसळती तरुणाई, मोबाइलशी झालेली त्यांची सलगी आणि विशेषत: त्या मोबाइलच्या साहाय्याने स्वत:च्या विविध छटा टिपण्याची, लाइक्स मिळवण्याची चढाओढ या साऱ्या गोष्टी डोळयांसमोरून सरकू लागल्या. आणि मग एखाद्या गाडीने वेग घ्यावा तसे माझे विचारही धावू लागले.

आपण समुद्रावर पाहिलेला किस्सा हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. आता तर अशा फोटो काढण्याची, सेल्फी काढण्याची आपल्याला इतकी सवय झालीय की मोबाइलच्या चार्जरइतकीच त्याची सेल्फी स्टिकदेखील महत्त्वाची बनलीय. होतं?

ती मुलं, ज्यांना क्षणाचा आनंद टिपण्याचा मोह अनावर होत होता.... की ते लोक, ज्यांनी मुलांना अविचारी ठरवत हात झटकले.... की आणखी काही..? पुढे पुढे जाताना मन उदास झालं. वाचलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या (टी.व्ही.वर) साऱ्या घटना स्मरू लागल्या.

31 मे 2014 या दिवशी अम्रितपाल सिंग (भारतीय) हा अमेरिकन पायलट एका प्रवाशासह Cessna 150 k हे विमान कोसळून मरण पावला.

ऑगस्ट 2014मध्ये केरळमधील शरणपूर रेल्वे स्टेशनवर 14 वर्षांच्या एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला.

मार्च 2015मध्ये दहा तरुण मंडळी नागपूरजवळील तलावामध्ये बोटिंगला गेली होती. आनंदाने जल्लोश सुरू होता आणि अचानक बोट पाण्यात उलटली. पाण्यात बुडून 7 जणांचा मृत्यू झाला.

शरणपूर स्टेशनवर झालेल्या दुर्घटनांची पुनरावृत्ती जोगेश्वरी, मिरा रोड स्टेशनांवर झाली आणि त्यातही दोन मुलांवर काळाचा घाला आला.

अशी अनेक उदाहरणं आठवली आणि या साऱ्या दुर्घटनांमध्ये असलेलं एक साम्य लक्षात येऊ लागलं, ते म्हणजे 'यांना मृत्यू म्हणावं, हत्या म्हणाव्या की आत्महत्या? हा अनुत्तरित प्रश्न.'

थोडा खोलवर विचार करू या आपण या साऱ्या घटनांचा. या प्रत्येक घटनेमध्ये उपस्थित असलेला एक साक्षीदार, पण कधी तर मृत्यूच्या मागचा सूत्रधार तोच होता का, असंदेखील वाटू लागतं. ओळखलंत ना आपणही! अगदी बरोबर. तो आहे प्रत्येक मृतकांच्या (गळयाभोवती फास आवळणारा) जवळ असणारा त्यांचा मोबाइल!

बघा ना, किती प्रेम करतो आपण या मोबाइलवर. ऑक्सिजनच जणू. तो नसला, दूर असला, डिस्चार्ज झाला किंवा नेटवर्कमध्ये नसला की एक अस्वस्थता येते. पण हाच मोबाइल कधी आपला घात करेल, मृत्यूच्या अकराळविकराळ जबडयात ओढून नेईल, अशी कल्पना आपल्याच मोबाइलबाबत कधी तरी मनात येते का?

पण अम्रितपालला विमान चालवतानादेखील सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही आणि म्हणूनच कोणताही तांत्रिक दोष नसतानादेखील विमान कोसळून दोघे ठार झाले.

बोटीचा स्वभाव पाण्यावर तरंगण्याचा. पण या दहा मुलांनी सेल्फीच्या नादात बोटीचा समतोल बिघडवला आणि सात जण पाण्यात बुडून त्यांचा अंत झाला.

धावत्या रेल्वेसमोर, रेल्वेच्या टपावर चढून सेल्फी घेण्याचा प्रयत्न शरणपूर, मिरा रोड, जोगेश्वरी या ठिकाणी कोवळया मुलांच्या आयुष्याचा अंत करण्यास कारणीभूत झाला.

मग प्रश्न पडतो की मरण बुरखा पांघरून येतं, निमित्त घेऊन येतं या तत्त्वज्ञानानुसार त्याची नोंद मृत्यू म्हणून व्हावी..., की निर्जीव असला तरीही ज्याचा जादूटोणा लहानपणापासून मोठयांपर्यंत साऱ्यांवर भूल घालतो, त्या मोबाइलने केलेल्या हत्या म्हणाव्या..., की एखाद्या पतंगासारखं स्वत:ला ज्योतीवर झोकून द्यावं तसं मोबाइलचा हात धरून (वा हातात मोबाइल धरून) क्षणाचा आनंद मिळवणाऱ्या अतिरेकी ऊर्मीतून घडलेल्या त्या आत्महत्या ठरवाव्या?

अशा दुर्घटनांबाबत अंकशास्त्र काय सांगतं ते पाहू. जागतिक पातळीवर मार्च 2014 ते सप्टेंबर 2016पर्यंत सेल्फी घेताना झालेल्या मृत्यूच्या घटना किंवा मृतांचा आकडा 127 होता. परंतु यातील भारतात घडलेल्या घटना 76 आहेत.

भारतीयांच्या दृष्टीने 76 ही संख्या नगण्य असली, तर जागतिक टक्केवारीत ती जवळपास 60% आहे. सेल्फी हे खरं तर मोबाइल कंपन्यांनी विक्रीसाठी वापरलेलं एक अस्त्र म्हणू. त्यामुळे आता मोबाइलची निवड करताना आपल्याकडे आधी फ्रंट-बॅक कॅमेरा किती मेगा पिक्सेलचे, ते पाहिलं जातं.

पूर्वी गोगलगाईच्या गतीने फिरणारी पत्रं होती. जीवन तुलनात्मकदृष्टया संथ होतं. पुढे संप्रेषणात क्रांती घडवणारे टेलीफोन, मग मोबाइल फोन आणि आता स्मार्ट फोन प्रत्येक हातात दिमाखाने वावरू लागले. जगातल्या कोणत्याही दोन टोकांवरील माणसांना जोडण्याच्या सद््गुणामागे माणसाला संकुचित बनवत जाणारा, 'बेभान आत्ममग्नता' नावाची नवी मानसिक व्याधी निर्माण करणारा, लाइक्सच्या स्पर्धेत उतरताना निराशेला घेऊन येणारा छुपा अजेंडादेखील आता हळूहळू समोर येत आहे.

म्हणून तर विविध मोबाइल कंपन्यांनी ज्या जाहिराती तयार केल्या, त्यात फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्यांना अग्रणी स्थान दिलंय.

भारतामध्ये 2017 जानेवारी ते जून या सहा महिन्यांत 14 तरुण-तरुणींनी प्राण गमावले आहेत. हे 18 ते 24 वयोगटाचे आहेत.  तसेच मुलींच्या तुलनेत मुलांचे मृत्यू अधिक झाले आहेत.

कुणी म्हणेल की 14 हा आकडा भारताच्या लोकसंख्येत एका बिंदूहूनही लहान आहे. अगदी बरोबर. पण आपण दररोज फेसबुक, टि्वटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स ऍप या माध्यमांतून 1.8 अब्ज सेल्फी अपलोड करतो. काही काम करताना, प्रवास करताना, खाताना, काहीतरी धाडसी कृत्य करताना या सेल्फी काढलेल्या असतात.

सेल्फी ही नवी आणि प्रत्येकाला सुखद, हवीहवीशी वाटणारी गोष्ट. दहा वर्षांपूर्वी फोटो काही विशिष्ट प्रसंगी शहरातून काढले जायचे. आता प्रत्येकाच्या हाती असलेल्या स्मार्ट फोनमध्ये प्रत्येक पावलावर फोटो टिपता येतात. स्वत:ला स्वत:च पाहणं याचा आनंद आगळा. आरशातून ती संधी मिळते आपल्याला. पण आता तेही मागे पडलंय.

सेल्फी घेताना आणि त्यानंतर ते न्याहाळताना जणू आपलं मूळ स्वरूप दिसावं, आत्मसाक्षात्कार व्हावा या भावनेने ते घेतले वा पाहिले जातात. कारण ते घेताना आजूबाजूचं भान - इतकंच काय, देहभानदेखील गळून जातं. या उमलत्या पिढीला इतकी आत्ममग्नता आली, याच्या कारणांचाही शोध घेतला पाहिजे.

जीव गमावणारे थोडेच असले, तरीही करोडो लोक या जाळयामध्ये अडकले गेलेत. यातून मी केवळ एक शरीर आहे हा भौतिकवादी दृष्टीकोन बळावतो. सौंदर्याच्या कल्पना बाह्यरूपाशी येऊन थांबतात.

'मी'चा कोष स्वत:भोवती विणला जातो. नात्यांची, विचारांची व्याप्ती लहान होत जाते.

नकारात्मक स्पर्धा वाढीला लागते. मला जास्त लाइक्स मिळाले तर माझं मूल्य योग्य आहे, अन्यथा कमीपणाची भावना सतावू लागते.

Long Term Memoryची क्षमता कमी होत जाते. कारण प्रत्येक गोष्ट आपण तात्कालिक स्मृतीमध्ये ठेवत जातो.


टी.व्ही.चे दुष्परिणाम आपल्याला आता कुठे पटू लागलेत. त्याच्याही पुढे आहे हा स्मार्ट फोन. लोभसवाण्या रूपातली अफूची गोळी. मग याचा परिणाम केवळ दैनंदिन जीवनावरच नाही होत, तर त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर, परस्परसंबंधांवर, सामाजिक भूमिकेवर व शेवटी सर्व समाजावर होतो. समाजापासून तुटणारं अलिप्त व्यक्तिमत्त्व यातून निर्माण होणार नाही, याचाही विचार करणं गरजेचं आहे.

खरंच, एकदा प्रत्येकाने स्वत:च स्कॅनिंग करून पाहू. आपण या साऱ्यात कुठे आहोत? भारताच्या तरुण पिढीवर थेट दुष्परिणाम करणारी, चौकटबंद विचारांना खतपाणी घालणारी कोणती शक्ती या सेल्फीच्या माध्यमातून आपल्या तरुणाईवर आघात करत नाहीय ना..? कुणाच्या छुप्या रणनीतीचा तर हा भाग नाही ना? या सेल्फीच्या अतिरेकाने सदसद्विवेकाचा विकास खुंटत तर नाही ना?

विचार करून तर पाहू. कंपन्यांना त्यांचा खप वाढवायचा आहे आणि आपल्याला आपली उमलणारी पिढी...

 

मोबाइल कंपन्यांचे मार्केटिंग

एकीकडे आत्मकेंद्रित होत जाणारी ही उमलती पिढी, 'आमच्यावेळी नव्हतं असलं काही, पण त्यांना कोण समजावणार?' असं म्हणणारे आपण सारे मागच्या पिढीचे प्रतिनिधी आणि याचा यथामति यथाशक्ति फायदा घेतात त्या विविध मोबाइल कंपन्या.

फोनच्या स्मार्टपणामध्ये भर टाकण्यासाठी विविध डिझाइन्स तयार होतात. 'यूजर फ्रेंडली' म्हणत आकारने मोठे, माणसाला गुंत्याने वेढून टाकणारे, अधिक आत्मकोशात नेणारे फीचर्स घेऊन यांची प्रमोशन्स होतात.

'सेल्फी' या फीचरवर मार्केटिंग करणाऱ्या दोन नामांकित कंपन्याचा मार्केट शेअर एक वर्षाच्या काळात 2 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर जातो! आणि मग हळूहळू इनकमिंग-आउटगोइंग हे मुख्य कार्य विसरून सारेच फ्रंट कॅमेऱ्याच्या शर्यतीत उतरतात. आज सेल्फी स्पेशलची स्पर्धा 16 मेगा पिक्सेलपर्यंत पोहोचली आहे.

सेल्फी फेम म्हणून अब्जावधींचा व्यापार करणाऱ्या या कंपन्या अशा अपमृत्यूंवर मात्र भाष्य करत नाहीत. तंत्रज्ञान विकसित केल्याचं श्रेय घेतात, पण त्याचे 'Do's' आणि 'Dont's' मात्र सांगत नाहीत. कारण त्यांना करायचा असतो केवळ व्यापार. पण हातात आलेलं यंत्र कसं वापरायचं यासाठी असलेल्या यूजर गाईडमध्ये मात्र सामाजिक जबाबदारीचं भान ठेवत त्याच्या अविवेकी वापराने होणारे दुष्परिणाम छापण्याचं धाडस मात्र दाखवत नाहीत.

शासनाने या अपघातांवरून धडा घेत 'नो सेल्फी झोन' जाहीर केले, पण त्यातून मानसिकता बदलत नाही.

या घडलेल्या, घडणाऱ्या, घडता घडता वाचलेल्या अपघातांमध्ये आणि बेभानपणे स्वत:ला काळच्या हवाली करणाऱ्या  या सेल्फीकारांच्या मागे आपलीदेखील काही भूमिका आहे, याचा विचार या मोबाइल कंपन्या करणार आहेत का?

असे अपघात वारंवार घडतानादेखील त्याच सेल्फी फीचर्सवर मार्केटिंग करत विक्रीचे उच्चांक या कंपन्या गाठत आहेत. 'तंबाखूमुळे कर्करोग होतो' हे तंबाखूच्या पाकिटावर छापणं अनिवार्य करण्यासाठी जसे कर्करोगाचे रुग्ण प्रत्येक कुटुंबात दिसेपर्यंत वाट पाहण्याची सहनशीलता आपण दाखवली, तशीच सेल्फीमुळे अपघात होतात असे प्रबोधन मोबाइल कंपन्यांनी करावे यसाठीदेखील सहनशीलता दाखवणार आहोत का आपण सेल्फी अपघातांचा आकडा लक्षवेधी होईपर्यंत...

लेखिका समुपदेशक आहेत.

9823879716, 9273609555, 02351-204047, [email protected]