पायाची काळजी - 1

 विवेक मराठी  01-Aug-2017


मधुमेहात हृदयाच्या रक्तवाहिन्या चोंदतात, तशाच पायाच्याही रक्तवाहिन्यांची तोंडं बंद होतात. रक्तपुरवठा कमी झाला म्हणजे येणारं संकट जास्त मोठं, जास्त गंभीर स्वरूपाचं असतं. शिवाय मधुमेहात पायाच्या रक्तवाहिन्या फार मोठया प्रमाणात, बऱ्याच लांबवर ब्लॉक होतात. सुदैवाने या सगळयांची नीट काळजी घेतली, मधुमेह व्यवस्थित नियंत्रणात ठेवला म्हणजे सगळं आलबेल राहू शकतं. परंतु एक मळलेले पाय धुणं किंवा क्वचित सुंदर दिसण्यासाठी स्त्रियांकडून पेडिक्युअरसारखे लाड केले जाणं याव्यतिरिक्त पायांकडे कुणी साधं निरखूनदेखील पाहत नाही. आणि तरीसुध्दा हे जेमतेम दहाएक इंच लांबीचे पाय 50-60 किलो वजन कसे उचलतात, याच्याबद्दल धड विचारदेखील आपण करीत नाही.

धुमेहात पाय कापले जाणं ही सर्वात दुर्दैवी गोष्ट. परंतु आताशा असं होण्याचं प्रमाण झपाटयाने वाढतं आहे. मुळात व्यवस्थित काळजी घेतली तर जो अवयव कधीच खराब होणार नाही, तोच कापण्याची नामुश्की ओढवावी हे खरंच खूप विचार करायला लावणारं असायला हवं. पण प्रत्यक्षात लोक या अत्यंत महत्त्वाच्या अवयवाकडे अजिबात लक्ष देताना दिसत नाहीत.

आपलं 50-60 किलो (ही सरासरी झाली. काही पायांना फार अधिक भार पेलावा लागतो.) वजन आयुष्यभर बिनबोभाट आणि विनातक्रार उचलून घेऊन फिरतं राहण्याचं काम आपले पाय करतात. एक मळलेले पाय धुणं किंवा क्वचित सुंदर दिसण्यासाठी स्त्रियांकडून पेडिक्युअरसारखे लाड केले जाणं याव्यतिरिक्त पायांकडे कुणी साधं निरखूनदेखील पाहत नाही. आणि तरीसुध्दा हे जेमतेम दहाएक इंच लांबीचे पाय 50-60 किलो वजन कसे उचलतात, याच्याबद्दल धड विचार करणं दूर असतं.

आपलं वजन पायावर पडतं, तेव्हा पायाची गुंतागुंतीची रचना एखाद्या स्प्रिंगसारखी वागते. त्यावर पडलेलं वजन चारी दिशांना वितरित करते. चालताना पायाला स्थिरपणा नसेल, तर गडबड होईल. चालत असताना आपला तोल जाईल, आपण पडू, म्हणून निसर्गाने एक योजना केली आहे. पायाला तीन ठिकाणी वजन पेलायची सोय केली आहे. पायाला स्थिरता यायला पायाचं मागचं हाड, आणि पहिल्या आणि शेवटच्या बोटांची दोन मुख्य हाडांची डोकी मिळून तयार झालेला तिपाईसारखा आधार दिला आहे. या तीन मुख्य हाडांच्या बळावर आपण तोल न जाता नीट चालू शकतो. देव ना करो, पण कुणाच्या पायाचा भाग काढायची पाळी आली, तर डॉक्टर या तीन महत्त्वाच्या हाडांना सहसा धक्का लागणार नाही याची काळजी केवळ याच कारणासाठी घेतात. कारण या तीन हाडांपैकी एक हाड जरी काढावं लागलं, तरी पायावर चालणं ही एक मोठी कसरत होऊन बसेल. अर्थात इतर हाडं अजिबात कुचकामी असं मला म्हणायचं नाही. पण चालण्याच्या कामात ही तीन हाडं खूप महत्त्वाची, इतकं मात्र खरं.

तीन हाडांना इतर हाडांचा आधार मिळतो. छोटी-मोठी अशी तब्बल 26 हाडं आणि 33 सांधे मिळून आपला पाय बनतो. या सांध्यांना मजबूत धरून ठेवणारी लिगामेंट्स किंवा संधिबंधनं, सांधे हलते ठेवणारे स्नायू, रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या, स्नायूंना मेंदूपासून मिळणारे संदेश वाहून नेणारे मज्जातंतू असा मोठा जामानिमा इवल्याशा पायांमध्ये एकवटलेला असतो. साहजिकच पाय वाटतो तितकं सोपं इंद्रिय नाही, हे कळतं. पायाच्या रचनेमधली विविधता इथेच संपत नाही. पायाची त्वचा शरीराच्या इतर कुठल्याही भागातल्या त्वचेच्या मानाने बरीच जाड असते, शिवाय त्वचेखाली बरीच चरबीही असते. जाड त्वचा आणि त्याखालची चरबी शरीराचं वजन तोलण्यासाठी आवश्यक असलेलं 'कुशन' म्हणून काम करते. उंच उडी मारणारी माणसं उशीवर पडावीत आणि त्या उशांमुळे त्यांना इजा होऊ  नये किंवा आपल्या गाडीला स्प्रिंग असलेले शॉक ऍब्सॉर्बर असतात, गाडी खड्डयात गेली तरी गाडीच्या आत बसलेल्या आपल्याला शॉक ऍब्सॉर्बरमुळे तो धक्का जाणवत नाही, त्यातला हा प्रकार. आपल्या व्यवस्थित चालू शकण्यामध्ये या एकेक गोष्टींची, पायाच्या रचनेतल्या प्रत्येक बारीक भागाची अत्यंत कळीची भूमिका असते. विशेषत: स्नायूंचा आणि लिगामेंटचा लवचीकपणा फार महत्त्वाचा असतो.

मधुमेह या सगळया गोष्टींवर घाला घालू शकतो आणि आपल्या पायांची वाट लावू शकतो. त्यात सगळयात मोठा प्रश्न उभा राहतो पायाच्या संवेदना नष्ट झाल्यावर. तुम्हा-आम्हाला पायाला खडे टोचले, तर आपण काय करू? साहजिकच आपला पाय दुखऱ्या संवेदनेपासून दूर नेऊ. पण समजा, संवेदनाच नाहीशा झाल्या, तर? तर आपल्या खडे टोचणंच काय, एखादा दाभण आरपार गेला तरी आपण, जणू काहीच झालं नाही, असं चालत राहू. एकीकडे पायाला जखमा होतच राहतील, आपल्याला कळणारसुध्दा नाही. झालेली जखम मोठी मोठी होत राहील, जडावत जाईल आणि सरतेशेवटी आपणावर पाय कापायची पाळी येईल. म्हणजे पायाची संवेदना ही आपल्या पायांना जखम होण्यापासून वाचवण्याची सगळयात महत्त्वाची रक्षण करणारी यंत्रणा असते. उगीच नाही 'वेदना ही देवाने माणसाला दिलेली सगळयात अफलातून देणगी आहे' असं बोललं जात.

मधुमेह वेदनांची जाणीव करून देणाऱ्या याच यंत्रणेचं मोठं नुकसान करतो. ज्याला 'न्यूरोपॅथी' म्हणतात, ती मधुमेहात प्रकर्षाने होते. त्यात जर ती व्यक्ती दारू पीत असेल, उगीचच प्रमाणाबाहेर बी 6 हे व्हिटॅमिन घेत असेल, त्याला कॅन्सरची किंवा क्षयाची औषधं चालू असतील, व्हिटॅमिन डीची कमतरता असेल अथवा सिफिलिस-एचआयव्हीसारखे आजार असतील, तर ही न्यूरोपॅथी आणखी वाढते. सगळयात लांब मज्जातंतूंना न्यूरोपॅथी सगळयात आधी विळखा घालते. पाय मेंदूपासून सर्वात लांब अंतरावर असतात. साहजिकच पायाचे मज्जातंतू सगळयात अगोदर न्यूरोपॅथीचे शिकार होतात.

जाणीवच नष्ट झाल्याने, आपल्याला काही झालं आहे याचाच रुग्णाला पत्ता नसतो. तो खुशाल काटयाकुटयातून, गरम रस्त्यावरून अनवाणी चालत राहतो. आपल्या पायात काटे घुसले आहेत हेच न कळल्याने, ते काटे तसेच राहतात. पुढे पाय जडवेपर्यंत पाळी आली तरी ते कळतच नाही. मधुमेहात पाय कापण्याची सुरुवात बहुधा अशा अत्यंत क्षुल्लक जखमेने होते.

मधुमेहातली न्यूरोपॅथी केवळ संवेदना वाहून नेणाऱ्या मज्जातंतूंपुरतीच मर्यादित नसते. स्नायूंना संदेश देणाऱ्या व ज्यांना 'ऑॅटोनॉमिक नर्व्ह फायबर' म्हणतात, त्यांनाही ग्रासतो. स्नायूंना संदेश देणारे 'मोटर फायबर' मज्जातंतू न्यूरोपॅथीचे शिकार झाल्यावर स्नायू कमकुवत व्हायला लागतात. क्षीण स्नायू बोटांची, पायांच्या इतर भागांची हालचाल नेहमीच्या शिताफीने करू शकत नाहीत. आपली चाल बिघडते. शरीराच्या वजनाचा पायावर पडणारा जास्तीत जास्त दाब (प्रेशर) खरं तर अंगठा, करंगळी आणि टाचेचं हाड अशा तीन ठिकाणी विभागलं जायला हवं, तर पायाच्या त्वचेचं सर्वात कमी घर्षण होईल. पण चाल बिघडली की प्रेशर पॉइंट्स बदलतात, त्वचा जमिनीवर जास्त घासली जाते. घासलेली त्वचा जाड व्हायला लागते. याला डॉक्टर 'कॅलस' म्हणतात. कधीकधी काही जणांना भोवरी होते. ती खुपू लागते. वेदना टाळायची आपली सवय, म्हणून भोवरी झालेल्या लोकांची चाल आपसूकच बदलते. प्रेशर पॉइंट्स बदलणं ही मधुमेहात पाय खराब होण्याची पहिली पायरी असते असं म्हटलं, तर ते वावगं ठरू नये.

ऑॅटोनॉमिक नर्व्ह फायबरबद्दल आपण बोलायला हवं. रोजच्या कामात मेंदूची थेट ढवळाढवळ नसलेले मज्जातंतू या गटात मोडतात. आपल्या हृदयाची धडधड असो की श्वास घेणं असो, ते या ऑॅटोनॉमिक वा स्वायत्त मज्जासंस्थेमुळे सुकर होतं. याच संस्थेमुळे आपल्याला घाम येतो. घाम आणि त्वचेला तेल पुरवणाऱ्या ग्रंथी मिळून त्वचा नरम, लवचीक ठेवण्याचं काम करतात. केसदेखील याच संस्थेत मोडतात. जेव्हा ऑॅटोनॉमिक नर्व्ह फायबर्सना मधुमेहाचा फटका बसतो, तेव्हा घाम येणं, त्वचेचा तेल पुरवठा कमी होणं याला सुरुवात होते. कोरडी, पाण्याचा पुरेसा अंश नसलेली त्वचा शरीराचं पूर्ण संरक्षण करायला अपुरी पडते. त्वचेला भेगा पडतात. जेवढी त्वचा जाडी, तेवढी ती कोरडी पडण्याची शक्यता अधिक. साहजिकच पायाच्या तळव्यांची - विशेषत: टाचांची - त्वचा कोरडी पडून तिथे भेगा पडण्याची भीती जास्त.

बहुधा कोरडया त्वचेला कंड सुटतो. खाजवल्यानंही त्वचेला सूक्ष्म भेगा पडतात. त्यातून रोगजंतू आत जातात. इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते. साधा वाटणारा प्रश्न अचानक गंभीर रूप धारण करतो.

ही झाली फक्त मधुमेहातल्या मज्जातंतूंवर होणाऱ्या आघाताची कहाणी. पण पायांवर येणारं संकट मज्जातंतूंपुरतं मर्यादित नसतं. जशा मधुमेहात हृदयाच्या रक्तवाहिन्या चोंदतात, तशाच पायाच्याही रक्तवाहिन्यांची तोंडं बंद होतात. रक्तपुरवठा कमी झाला म्हणजे येणारं संकट जास्त मोठं, जास्त गंभीर स्वरूपाचं असतं. शिवाय मधुमेहात पायाच्या रक्तवाहिन्या फार मोठया प्रमाणात, बऱ्याच लांबवर ब्लॉक होतात. सुदैवाने या सगळयांची नीट काळजी घेतली, मधुमेह व्यवस्थित नियंत्रणात ठेवला, म्हणजे सगळं आलबेल राहू शकतं. त्यासाठी जसा आपण आपला चेहरा रोज आरशात बघतो, तसं पायाकडे पाहावं लागेल.

& 9892245272