चिनी उत्पादनांच्या आयातीवर नियंत्रण हवे

 विवेक मराठी  12-Aug-2017

 

 

****उज्वला बाबर-गायकवाड*****

साधारण वीस वर्षांपूर्वी भारतीय व्यापारी येथील उत्पादकांकडूनच खेळणी, प्लॅस्टिक बादल्या, देवी-देवतांच्या मूर्ती आणि बऱ्याच लहान-सहान गोष्टी मागवत असत. परंतु आता ते उद्योग बंद झालेले दिसत आहेत आणि हेच भारतीय उत्पादक आणि व्यापारी ह्या गोष्टी चीनमधून आयात करत आहेत. कर आणि वाहतूक खर्च विचारात घेऊनदेखील या वस्तू स्वस्त आणि शिवाय सुबक, सुंदर, अनेक प्रकारांमध्ये मिळत आहेत. दिवसागणिक चिनी वस्तूंचे आकर्षण भारतात वाढत आहे. प्रथमत: अतिशय स्वस्त आणि आकर्षक, तसेच लगेच उपलब्ध होत असल्यामुळे चीनमधून वस्तू आयात करणे आणि आपले स्वत:चे लेबल लावून ती विकणे असे कित्येक उत्पादक आणि व्यापारी करताना दिसत आहेत.

    चीन अशाच रितीने भारतीय बाजारपेठ गिळंकृत करतोय. अशा आर्थिक आक्रमणाला भारतीय व्यवस्थाही तितकीच जबाबदार आहे, जितके आपणापैकी कोणी ना कोणीतरी चिनी वस्तू स्वस्त म्हणून खरेदी करणारे आणि विकणारे!

चीन हा भारताचा सर्वात मोठा ट्रेड पार्टनर आहे. भारताची चीनकडून आयात 2016-17मध्ये अंदाजे 61.2 अब्ज डॉलर्स आहे. ही 'व्यापार तूट' (ट्रेड डेफिसिट Trade Deficit) 2011पासून सतत वाढतेच आहे. ह्या आयातीमध्ये इलेक्टि्रकल वस्तूंचा प्रामुख्याने समावेश असतो. त्यानंतर मशीनरी आणि त्याचे सुटे भाग, ऑरगॅनिक केमिकल्सपासून ते प्लॅस्टिक पॅकेजिंग किंवा खेळण्यांपर्यंत सर्व आहे. 'ऍसोचेम'च्या अहवालानुसार, खेळणी उत्पादन व्यवसाय चालू ठेवणे कठीण झाले आहे. चीनच्या स्वस्त आणि मस्त खेळण्यांनी भारतीय लहान मुलांवरच भुरळ घातली नाही, तर मोठयांनाही याचे आकर्षण आहे. अंदाजे 2000 लहान व मध्यम उद्योग गेल्या 4 ते 5 वर्षांत बंद झाले आहेत.  ठाणे आणि भिवंडीमधील 60 टक्के उद्योग बंद पडले आहेत आणि बऱ्याच उद्योगांना याची झळ बसणार आहे. यमुना नगर हे प्लायवूड उत्पादकांचे माहेरघर, परंतु तिथेही चीनच्या प्लायवूडच्या स्वस्त, आकर्षक डिझाइन्स, प्रकारांनी जवळपास 50% व्यवसाय घसरला आहे. आपल्या भारतीय सणांवरही त्याचे आक्रमण दिसून येते. चीनमधून आपल्या देवतांच्या मूर्ती आयात होऊ लागल्या आहेत आणि मूर्ती बनवणाऱ्या स्थानिकांना त्याचा फटका बसत आहे. एकूणच भारतीयांची नस ओळखून त्या प्रकारे उत्पादने बनवून ते मोठया प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात चीनचा असलेला हातखंडा भारतीय अर्थव्यवस्थेला खिंडार पाडणारा आहे. निर्यातीबाबत जर्मनीनंतरचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून चीन ओळखला जातो आणि WTOनुसार (World Trade Organisationनुसार) चीन निर्यातीमध्ये लवकरच जर्मनीला मागे टाकू शकेल. चीन जगभरातून कच्चा माल मागवून तयार झालेला माल Consummable Product जगाला विकतो. चीनने निर्यात वाढवण्यावर अतिशय भर दिला आहे आणि त्याच्याशी जोडलेल्या प्रत्येक घटकाला प्रोत्साहित केले आहे. चिनी वस्तू स्वस्त होण्याची काही विशेष कारणे म्हणजे कमी भांडवल गुंतवणूक, आणि सरकारची निर्यातस्नेही (Export friendly) धोरणे. यात त्यांनी ठिकठिकाणी Export झोन निर्माण करून सर्व अत्याधुनिक व्यवस्था अतिशय कमी दरात उत्पादकाला उपलब्ध केल्या आहेत, ज्यात विद्युत व्यवस्था, पाणी, कामगार, तसेच कच्चा माल उपलब्ध करून देणे, करांमध्ये सवलत आणि निर्यातीसाठी योग्य अशा व्यवस्था निर्माण केल्या आहेत. तसेच परदेशी गुंतवणूकदारांना विशेष सवलत असल्यामुळे जगातील असंख्य वस्तू ह्या एकटया चीनमध्ये बनवल्या जातात. या अनेक कारणांमुळे वस्तूंच्या किमतीमध्ये 10%पासून 70%पर्यंत फरक पडतो. त्यामुळे सर्वांना चिनी वस्तू स्वस्त पडतात. परंतु चिनी वस्तू कमी दर्जाच्या असतात याबद्दल बहुतेकांचे एकमत! दिवाळीमधील फटाके काय किंवा एखादी इलेक्टि्रकल वस्तू काय, सर्वच कमी टिकाऊ तसेच खेळणी आरोग्याला घातक आहेत, हे अनेकदा सांगितले आहे. भारतीय बाजारपेठेवरील चिनी वस्तूंचे हे आक्रमण टाळण्यासाठी भारत सरकारने काही पावले उचलली आहेत. परंतु एकदा आपल्या देशाचीच संपूर्ण अर्थव्यवस्था नव्याने तपासली पाहिजे, जेणेकरून चीनच्या आयातीबाबत कठोर उपाययोजना करता येतील. आपली कृषिप्रधान अर्थव्यवस्था लक्षात घेऊन काही पावले उचलली पाहिजेत.

सरकारने वस्तू सेवा कर (GST) लागू केला आहे. परंतु काही ठिकाणी गोंधळ आहे. GSTमुळे वस्तूंच्या किमतीमध्ये निश्चितच फरक पडेल, परंतु ही कमी होणारी किंमत, चीनच्या वस्तूच्या किमतीपेक्षा कमी असेल का? याबाबत शंका आहे. प्रचंड जनसंख्या आणि त्यांच्या गरजा पूर्ण करू शकणाऱ्या स्थानिक उद्योगधंद्यांना प्रोत्साहित करून SEZसारखी एखादी प्रणाली कार्यान्वित केली, तर भारतात निर्माण होणाऱ्या गरजा इथेच पूर्ण होतील आणि आयात कमी होऊ शकेल. त्यासाठी सरकारने पायाभूत सुविधा, ऊर्जेचा प्रभावी वापर, नैसर्गिक संसाधनाचा योग्य तो वापर, वस्तूंच्या किमती कमी करण्यात उपयोगी पडेल.सर्वसामान्य जनतेनेही याविषयी जागृत झाले पाहिजे, जेणेकरून चिनी वस्तूंच्या मागणीला आणि आयातीला आळा घालता येईल!

 प्रोप्रायटर, माऊली असोसिएट्स

 9987533574