चीनचा युध्दज्वर

 विवेक मराठी  14-Aug-2017


भूतानच्या सीमेच्या मुद्दयावरून चीनने भारत व चीन यांच्या संबंधातील युध्दज्वर वाढता राहील असा प्रयत्न चालविला आहे. ही परिस्थिती 1962 सालापेक्षा नेमकी उलटी आहे. 1962 साली भारताची युध्द करण्याची कोणतीही तयारी नसताना चिनी सैन्याला भारताबाहेर फेकून देण्याच्या गर्जना केल्या जात होत्या. तेव्हा चीन शांतपणे भारताच्या विरोधात आक्रमण करण्याची तयारी करत होता. आपला निर्धार शब्दातून व्यक्त करण्यापेक्षा कृतीतून व्यक्त करण्याची तयारी चीनने ठेवली होती. या वेळी मात्र चीनचा भारताला भडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण भारताने शांत राहून आपल्या शब्दांनी परिस्थिती चिघळू दिलेली नाही. दुसऱ्या बाजूने चीन मात्र रोज नवे आरोप करीत, चिथावण्या देत आहे. भारताने 1962 विसरू नये, दोवल यांच्यामुळेच परिस्थिती चिघळली आहे, भारताने आपले सैन्य मागे घेतल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही, चीन उत्तराखंड, काश्मीरमध्ये आपले सैन्य पाठवेल अशी विधाने चीनची प्रसारमाध्यमे, सरकारचे विविध प्रतिनिधी करीत आहेत. भारतावर प्रचंड मानसिक दडपण आणण्याचा चीनचा प्रयत्न सुरू आहे. चिनी सैन्याच्या वार्षिकोत्सवात चिनी राष्ट्राध्यक्षांनी धमकावणी देणारे भाषण केले व त्याला प्रचंड प्रसिध्दी दिली. याउलट भारताने दिलेल्या प्रतिक्रिया ठाम असल्या, तरी त्यात चिथावणीची भाषा नाही. भारतीय प्रसारमाध्यमांनीही सरकारला पाठिंबा देत असताना संयम सोडलेला नाही. त्याचबरोबर चीनच्या धमक्यांना घाबरून भूतानच्या सीमेवरून माघारही घेतलेली नाही. चीन आपल्या बाजूने ही शाब्दिक लढाई वाढवत असताना हा प्रश्न शांततेने सुटेल असा विश्वास भारताने प्रकट केला आहे. चीनची ही अस्वस्थता व भारताने दिलेला शांत प्रतिसाद याचे कारण काय आहे? असा प्रश्न स्वाभाविकच उभा राहतो.

अठराव्या व एकोणिसाव्या शतकात जगावर युरोपियन देशांचा प्रभाव होता. दुसऱ्या महायुध्दानंतर अमेरिका आणि रशिया यांचा प्रभाव निर्माण झाला. ट्रंप सत्तेवर आल्यानंतर अमेरिका जागतिक राजकारणातून माघार घेईल अशी चिन्हे दिसत आहेत. या परिस्थितीत ती पोकळी भरून काढण्याची महत्त्वाकांक्षा चीन बाळगून आहे. भारत व चीन यांच्या सर्वच प्रकारच्या सामर्थ्यात आज मोठे अंतर असले, तरी भारत हा आपला नजीकच्या काळातला मुख्य स्पर्धक आहे याची चीनला जाणीव आहे. चीनच्या भोवतालच्या सर्व देशांना त्याची भीती वाटत आहे. त्यामधे जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आदी देशांचा समावेश आहे. या सर्व देशांना भारताचा आधार वाटतो. चीनवर नियंत्रण ठेण्याकरिता अमेरिकेलाही भारताची साथ हवी आहे. त्यामुळे भविष्यात भारताचे आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढत जाणार आहे. त्यामुळे भारत हा आपला स्पर्धक देश आहे या भावनेनेच चीन भारताशी वागत आहे. भूतानच्या रक्षणाची भारताने हमी दिलेली आहे. जर भारताला ती हमी पाळता आली नाही, तर भारत अन्य देशांच्या दृष्टीने अविश्वासार्ह ठरेल. तेच घडवून आणण्याचा चीनचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे. चीन डोकलाम भागातील आपले बळ वाढवीत असल्याच्याही बातम्या आहेत.

आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी चीन कोणत्या टोकाला जाईल? त्याच्यापुढचा एक मार्ग हा मर्यादित युध्दाचा आहे. पण लष्करी तज्ज्ञांच्या दृष्टीने तिथले रणक्षेत्र भारताच्या दृष्टीने अनुकूल आहे. अशा सीमित युध्दाचा चीनचा अनुभवही फारसा चांगला नाही. 1962नंतर भारत-चीन दरम्यान अशाच प्रकारचे जे चार पेचप्रसंग उभे राहिले, त्यात चीनला यश आले नाही व सामोपचारानेच ते त्याला मिटवावे लागले. जनता सरकारच्या काळात अटलजी पंतप्रधान असताना ते चीनच्या दौऱ्यावर असताना चीनने व्हिएतनामवर हल्ला केला, पण तोही अयशस्वी झाला. एखाद्या देशाची कितीही ताकद असली, तरी तिचा विशिष्ट क्षेत्रातील युध्दात उपयोग होत नाही, याचा अमेरिकेनेही व्हिएतनाममध्ये व अफगाणिस्तानात अनुभव घेतला आहे. त्यामुळे हा मार्ग चीनच्या दृष्टीने धोकादायक आहे. या मुद्दयावरून भारताशी सर्वंकष युध्द खेळणे चीनला परवडणारे आहे काय? या संदर्भात त्याच्या नेतृत्वाला निर्णय घ्यावा लागेल. आपल्या आर्थिक शक्तीच्या बळावर जगावर प्रभुत्व मिळविण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे. या त्याच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी सर्वंकष युध्द मारक ठरू शकते. आपल्या आर्थिक बळावर चीन पाकिस्तान, श्रीलंका, बांगला देश, नेपाळ, म्यानमार यांना आपल्या कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. आर्थिक मदतीपाठोपाठ जी चीनची दादागिरी येते, त्याचा हे सर्व देश अनुभव घेत आहेत व त्या त्या देशात त्याची प्रतिक्रियाही उमटत आहे. आपल्या विभागातील अशांततेला कारणीभूत असलेल्या पाकिस्तान व उत्तर कोरिया या देशांना चीन पाठिंबा देत आहे व त्याचीही जगभरात सुप्त प्रतिक्रिया आहे. हे सर्व मुद्दे विचारात घेता, भारताशी सर्वंकष युध्दाचा निर्णय चीनला महागात जाईल.

या पार्श्वभूमीवर चीन या प्रश्नावरून जी प्रचाराची पातळी वाढवीत आहे, त्याची तीन कारणे संभवू शकतात. आपल्या प्रचाराच्या दबावाखाली भारताने माघार घेतली, तर एकही गोळी न झाडता चीनचे सर्व हेतू साध्य होतात व भारत कोणालाही सुरक्षितता देऊ  शकत नाही हे स्पष्ट होते. जरी चीनला तडजोड करावी लागली, तरी भारतावर काही अटी लादून ती करता यावी हा दुसरा. भारत-चीन यांच्या संबंधातला हा संघर्ष 1962 साली अमेरिका व रशिया यांच्यात क्युबा येथे अण्वस्त्र ठेवण्याच्या रशियन निर्णयाच्या निमित्ताने झालेल्या संघर्षाची छोटी आवृत्ती आहे. त्या वेळीही जगावर महायुध्दाचे ढग जमा झाले होते. दर दिवशी तणावात भर पडत होती. परंतु पडद्याआडून अमेरिका व रशिया यांच्यात सामंजस्य झाले व रशियाने क्युबामधील क्षेपणास्त्रे मागे घेण्याच्या बदल्यात अमेरिकेने रशियाच्या जवळची तुर्कस्थानमधली अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे मागे घेतली. अशाच तऱ्हेचा काहीतरी तोडगा इथे निघू शकतो. त्यामुळेच सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन भारत शांत राहून वाट पाहत आहे. म्हणूनच, ज्याप्रमाणे पाकिस्तानचा दहशतवाद भारताने प्रचार करून जगापुढे आणला आहे, तसा चीनच्या विस्तारवादाबाबत आक्रमक प्रचार केलेला नाही.