विषारी साप घोणस व फुरस

 विवेक मराठी  07-Aug-2017

 


***रूपाली पारखे-देशिंगकर****

भारतातल्या चार प्रमुख सापांपैकी तिसरा जहाल विषारी साप असलेल्या घोणसाला इंग्लिशमध्ये 'रसेल्स व्हायपर' म्हणतात. संपूर्ण देशभर आढळणारा हा साप कमालीचा तापट आणि चिडका असतो. सहा फुटांपर्यंत वाढणारा घोणस त्याच्या अंगावरच्या नक्षीमुळे कायम लक्षात राहतो. घोणसाच्या अंगावर जणू रुद्राक्षांची माळच रंगवलीय असं वाटतं. त्याच्या पाठीवरचा भाग मोठया लांबट काळया ठिपक्यांनी सजलेला असतो. या ठिपक्यांच्या तीन ओळी असतात, ज्या स्वतंत्र असतात. मधली ओळ त्याच्या पाठीच्या कण्यावर दिसते. ही मधली ओळ सर्वात गडद असते, कारण हिच्यावरचे ठिपके ठळक असतात. बाकीच्या दोन्ही ओळी त्याच्या दोन्ही बाजूंच्या अंगावर असतात. बाकी पोटाकडचा भाग पांढरट पिवळट रंगाचा असतो. या ठळक ठिपक्यांमुळे हा साप नजरेत भरतो. याचं डोकं अगदी टिपिकल विषारी सर्पाच्या डोक्याचा नमुना म्हणता येईल. त्रिकोणाकृती चप्पट असलेल्या या डोक्यावर इंग्लिश 'व्ही'ची खूण असते. तोंडाच्या पुढच्या भागाचा उंचवटा आणि मध्यम आकाराचे डोळे अगदी ठळकपणे दिसतात, ज्यात गोल बुब्बुळं नि उभ्या बाहुल्या असतात. गंमत म्हणजे याची नाकपुडी मात्र लहान असते. असा हा घोणस अंगापिंडाने जाडजूड सदरात मोडतो. त्याचं नुसत अंगच जाड नसतं, तर घेरही जास्त असतो. अजगराशी असलेल्या किंचित साम्यामुळे अनेकदा याला अजगराचं पिल्लू समजण्याची चूक केली जाते. घोणस अतिशय बेफिकीर राहणारा साप आहे, कारण जहाल विषाने याच्या नादी लागणारे फारच थोडे असतात. ह्याचं अस्तित्व अगदी दहा फुटांवरून हा जाणवून देतो. अंगाने मोठा असल्याने याचा श्वसनभाताही मोठा असतो. स्वत:च्या भात्यात हा भरपूर हवा भरून घेऊन दीर्घ काळ फुस्कारत राहतो. ह्याचे फूत्कार नागाप्रमाणे लहान नसून दीर्घ असतात. हे फूत्काराचे इशारेच शत्रूला लांब पळवून लावतात. मुख्यत: उंदीर खाणारा हा साप प्रसंगी पाली, सरडे नि लहान पक्षीसुध्दा खातो.

नागाचे व मण्यारीचे दात पक्के असतात, मात्र घोणसाचे दात विमानाच्या चाकांप्रमाणे तोंडातून बाहेर येतात, त्वचेत घुसतात नि विष सोडतात. अगदी इंजेक्शनच्या सुईसारखे  हे दात आतून पोकळ असतात अणि विषग्रंथीला जोडलेले असतात. चावा घेतल्यावर त्या केसाएवढया पोकळ नळीतून विष बाहेर येतं. हे विषदंत पडले, तरी साधारण महिना-पंधरा दिवसांत नवीन येतात. जर विषग्रंथी रिकामी झाली, तर 24 तासांत भरली जाते. घोणस चावलेल्या जागी तीव्र वेदना होऊन तो भाग सुजायला लागतो. विषाचा प्रभाव सुरू झाल्यावर नाडीचे ठोके अनियमित होतात आणि डोळयाच्या बाहुल्या विस्फारलेल्या राहतात. विष भिनल्यावर तोंडातून, नाकातून व लघवीतून रक्तस्राव सुरू होतो. घोणस मादी 'जारज' म्हणजे पिल्लांना जन्म देणारी असून एका वेळी तीस-पस्तीस पिल्लांना जन्म देते.

'बिग फोर' अर्थात चार प्रमुख विषारी सापांपैकी चौथा साप म्हणजे फुरसं. इंग्लिशमधे याला सॉ स्केल्ड व्हायपर म्हणतात. राज्यात आणि देशात सर्वत्र आढळणारा हा साप कमालीचा चिडका असतो. महाराष्ट्रात, विशेषतः कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या या सर्वात लहान विषारी सापाबद्दल लिहायचं, तर साधारण दीड फुटापर्यंत वाढणारा हा साप बहुतांश मातकट बदामी रंगात आढळतो. क्वचित त्याचा रंग तपकिरी आणि हिरवट बदामी असतो. फुरशाच्या पाठीपासून खाली जाणाऱ्या अंगावर नागमोडी वाटावी अशी रेष असते. ह्या रेषेचा रंग फिक्कट पांढरा असल्याने ती अगदी उठून दिसते. याच्या पाठीच्या कण्यावर लहान फिकट रंगाचे चौकोनाकृती ठिपके असतात. पोटावर मात्र हा मातकट पांढऱ्या रंगाच्या छटांमध्ये पाहायला मिळतो. फुरशाचं त्रिकोणी चप्पट डोकं म्हणजे अगदी टिपिकल विषारी सापाच्या डोक्याचं उदाहरण म्हणू शकतो. याच्या डोक्यावर साधारण बाणाच्या आकाराची पांढरी खूण ठळकपणे दिसते.

 या लहानसर सापाच्या शरीराची ठेवण अगदी घोणसासारखी असते. म्हणजे, डोकं त्रिकोणी, शरीराचा मधला घेर मोठा आणि शेपटीकडे निमुळता होत गेलेला. थोडक्यात सांगायचं म्हणजे शरीराची दोन्ही टोकं निमुळती होत गेलेली असतात. व्हायपर गटात मोडणाऱ्या सर्व सापांची शरीररचना साधारण अशीच असते.

फुरशाच्या बाणाकृती आकारामुळे त्याच्या तोंडाचा पुढचा भाग साधारण गोलसर दिसतो, ज्याच्या मानाने त्याचे डोळे मोठे वाटतात. या मोठया वाटणाऱ्या डोळयांचं वैशिष्टय म्हणजे त्याच्या उभ्या बाहुल्या अगदी ठळक दिसतात. कमालीचा चिडका असलेला साप स्वत:च्या लहानसर शरीराची वेटोळी एकमेकांवर खवले घासून खसखस आवाज काढतो आणि त्याच वेळेस फूत्कार सोडून कडकडून चावतो. व्हायपर कुटुंबातल्या सदस्यांचं विष अतिशय जहाल समजलं जातं. फुरशाच्या विषाचं वैशिष्टय म्हणजे, याचं विष घोणसाच्या विषापेक्षा जहाल असतं. भक्ष्याच्या रक्तात गुठळया तयार करण्याची शक्ती यांच्या विषात असते. शरीरातल्या रक्तावर परिणाम करणारं विष हिमोटॉक्सिक म्हणून ओळखलं जातं. फुरसं चावल्यानंतर दंशाच्या जागी प्रचंड जळजळ सुरू होऊन ती शरीरभर पसरते. जिथे दंश होतो, तो भाग काळानिळा होऊन सुजायला लागतो. या सुजलेल्या भागासकट दंशित व्यक्तीच्या लघवीतून, तोंडातून रक्तस्राव सुरू होतो. हळूहळू हा रक्तस्राव वाढतो व अतिशय अशक्तपणा जाणवतो. निसर्गात काही साप अंडी घालतात, तर काही साप पिल्लांना जन्म देतात. आपण मागच्या लेखात पाहिलं होतंच की अंडयातून जन्माला येणाऱ्या सापांना 'अंडज' म्हणतात, तर पिल्लं जन्माला घालणाऱ्या सापांना 'जारज' म्हणतात. फुरसं जारज असून याची मादी एका वेळेस साधारण सहा ते आठ पिल्लांना जन्म देते. नुकतीच जन्माला आलेली पिल्लंसुध्दा जहाल असतात आणि मोठयांप्रमाणेच बेडूक, सरडे, विंचू नि पाली खायला सुरुवात करतात.

नाग, मण्यार, घोणस व फुरसं या चार महत्त्वाच्या विषारी सापांबरोबर सह्याद्रीच्या गर्द जंगलात सापडणारा चापडा उर्फ हिरवा घोणस हा निमविषारी साप अनेकांनी पाहिलेला असतो. हिरवट अंगाचा आणि पिवळट पोटाचा हा चापडा बांबूंच्या बेटात आढळत असल्याने 'बांबू पिट व्हायपर' म्हणूनही ओळखला जातो. निशाचर असलेल्या या सापाची नाकपुडी व डोळे यांमध्ये एक लहानसा खड्डा असतो, ज्यामुळे तो गर्द काळोखात आसपास असणारे उष्णरक्तीय पक्षी, उंदीर अचूक पकडू शकतो. तीनेक फुटांपर्यंत वाढणारा हा साप झाडांवरच राहतो. याचाही चावा कडकडून असतो, मात्र विषाचा परिणाम इतर चौघांच्या मानाने सौम्य असतो. चापडयाची मादी साधारण डझनभर पिल्लांना जन्म देते.

जाताजाता राजाचा उल्लेख करायला हवाच. जगातील सर्वात लांब विषारी सर्प म्हणजे नागराज अर्थात किंग कोब्रा. दक्षिण भारत, आसाम, पश्चिम बंगाल व ओदिशा या भागांत आढळणारा किंग कोब्रा साधारण अठरा फुटांपर्यंत वाढतो. हिरवट काळपट रंगाच्या या अजस्र धुडाच्या संपूर्ण शरीरावर उलटया व्ही आकाराचे पांढरे पट्टे असतात. साध्या नागाप्रमाणे हा नाग फणा काढू शकत नाही, पण साधारण पाच फुटापर्यंत उंच उभा राहून दंश करू शकतो. दंश करतेवेळी हा साधारण पाव लीटर विष भक्ष्याच्या शरीरात टोचतो. इतर सापांनाच भक्ष्य म्हणून खाणारा हा साप, जगातला एकमेव साप आहे ज्याची मादी वेटोळयांच्या साहाय्याने काडया, पालापाचोळा गोळा करून घरटं बनवते आणि त्यात सुमारे पन्नास अंडी घालून ती उबवून त्यांची राखणही करते. पिल्लं जन्मायच्या वेळेस ती या घरटयापासून दूर जाते, कारण नवजात पिल्लांना ती स्वत: खाऊ शकते.

वरील सर्व विषारी सापांना भारतीय वन्यजीव कायद्याने संरक्षित केलं असून त्यांना पकडणं, मारणं अथवा मारायला मदत करणं, मनोरंजनासाठी किंवा इतर कामासाठी वापरणं अपराध आहे.

[email protected]