आनंदाची गुरुकिल्ली

 विवेक मराठी  08-Aug-2017


 "_ला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य केलं की ते, घरबसल्या मिळतं' ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, तर समस्त मानवजात नक्कीच आभारी राहील. गंमत अशी आहे की  सुख, समाधान, आनंद ह्या काही बाजारात विकत मिळणाऱ्या गोष्टी नाहीत. सहजासहजी मिळणाऱ्या तर बिलकुलच नाहीत. सुखाची गंमतही अशी की एखाद्या चंद्रमौळी झोपडीतला माणूससुध्दा सुखी असू शकतो, पण त्याच वेळेस महालात झोपणारा धनिक सुखी असेलच असं नाही.

सुखाचा शोध हा अविरत चालणारा आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने शोधत राहतो आनंदाचा, सुखाचा सदरा. रामदास स्वामी म्हणतात, 'जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूंचि शोधूनि पाहे.'

सिग्मंड फ्रॉइड म्हणतो, 'कल्पनातीत अपेक्षेच्या पूर्ततेतून येणारा भाव म्हणजे सुख.' गंमत बघा, सुखाचा शोध हा असा संतांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत आपापल्या दृष्टीकोनातून घेत राहतो.

सामान्य माणसांची फार गंमत होऊन जाते बघा! सर्वसंगपरित्याग केलेला एखादा तत्त्ववेत्ता म्हणतो, 'गरजा कमी कराल तर आपोआप सुखी व्हाल.' त्याच वेळेस एखादा नावाजलेला उद्योगपती म्हणतो, 'रिक्षात बसून रडण्यापेक्षा मर्सिडीझमध्ये बसून रडलेलं बरं.' आजच्या व्यवहारवादी जगात जिथे गरजा कमी करणं हे अशक्यप्राय होऊन बसलंय आणि जिथे पैसे फेकून सुख मिळवता येतं हा विचार रूढ आहे, अशा जगात म्हणूनच शाश्वत सुखाचा,आनंदाचा मार्ग शोधणं गरजेचं आहे.

अमेरिकेतल्या कॉर्नेल विद्यापीठात डॉ.थॉमस गिलोवीच हे मानसशास्त्रज्ञ गेली 20 वर्षं संशोधन करताहेत की सुख, आनंद नक्की कशात असतं? पैसे खर्च करून एखादी नवीन वस्तू घेतली की होणारा आनंद, त्या वस्तूच्या वापरातून मिळणारं सुख असं किती दिवस टिकून राहतं? शाश्वत आनंदासाठी काय करावं?

त्यांच्या या संशोधनातून आलेले निष्कर्ष फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात, 'अनुभूतीतून आलेला आनंद हा भौतिक वस्तूंच्या मालकीतून आलेल्या आनंदापेक्षा शाश्वत असतो, म्हणून तुमचे पैसे अशा गोष्टीवर खर्च करा, ज्यातून तुम्हाला आयुष्यभर पुरतील अशा आठवणी गोळा करता येतील.'

ते पुढे म्हणतात की भौतिक वस्तूंतून मिळणाऱ्या आनंदाचे काही तोटे आहेत, उदा.,

  1. नव्याचे नऊ दिवस - नवीन वस्तू दुसऱ्या दिवशी जुनी होते आणि तिच्याबरोबरच जुना होतो ती वस्तू घेताना मिळालेला आनंद, झालेलं समाधान. गंमत बघा, नव्याकोऱ्या आय-फोनने ढीगभर सेल्फी काढले तरी होणारा आनंद जुन्या कपाटात सापडलेल्या रंगीत फोटोच्या तुलनेत कमीच असतो, कारण तो असतो आठवणीतून आलेल्या अनुभूतीचा आनंद.
  2. वाढीव गरजा - 30 इंचाचा टीव्ही 54 इंचापुढे छोटा वाटायला लागतो. काल घेतलेला मोबाइल नवीन मॉडेलपुढे निरुपयोगी वाटायला लागतो. भौतिक गरजांची ही ओढ मारुतीच्या शेपटासारखी वाढतच जाते आणि त्या गरजांच्या पूर्ततेतून होणारा आनंदही क्षणिकच ठरतो.
  3. 'भला उसकी सारी मेरे सारी से अच्छी कैसी?' - तुलना आणि त्यातून येणारी असूया हे मनुष्याचं व्यवच्छेदक लक्षण. आपण नव्या घेतलेल्या वस्तूचा आनंद होण्यापेक्षा शेजाऱ्याकडे असलेल्या वस्तूचा जास्त हेवा वाटत असेल, तर मग अशा आनंदाला, अशा सुखाला अर्थच काय?

म्हणून डॉ. गिलोवीच म्हणतात, भौतिकतेतून आलेल्या आनंदापेक्षा अनुभूतीतून आलेला आनंद दीर्घकाळ टिकतो आणि सदाबहार असतो.

अनुभूतींच्या आठवणी होतात आणि आठवणी आयुष्यभर आपल्यासोबत दरवळत राहतात. अनुभवांची गंमत पाहा, कळत-नकळत ते तुमचाच एक भाग होऊन जातात.

चार गाडया, दोन घरं याच्या पलीकडे तुमची ओळख असतात तुम्ही घेतलेले आनंदानुभव. ते फक्त तुमचे असतात. ह्या आनंदानुभवांना असूयेची किनार नसते. ते निखळ असतात, त्यांच्या आठवणी होतात, म्हणून शाश्वत असतात.

याच विषयावर संशोधन करणाऱ्या ब्रिटिश कोलंबिया  विद्यापीठाच्या प्राध्यापिका एलिझाबेथ डून म्हणतात, ''वस्तू  कदाचित अनुभवांपेक्षा जास्त काळ टिकत असतील, मात्र अनुभवांच्या आठवणी होतात आणि मनाच्या कोपऱ्यात रेंगाळणाऱ्या आठवणी आयुष्यभर आनंद देतात.'' आनंदाच्या अशा आठवणी गोळा करणं महत्त्वाचं. सुखाचा, समाधानाचा मार्ग त्यातूनच जातो. कदाचित म्हणूनच वेगवेगळया महागडया वस्तूंनी सजलेल्या दिवाणखान्यापेक्षा अमूल्य अशा आनंदानुभवांनी आणि आठवणींनी भरलेलं मन जास्त सुख देतं.

(ट्रेव्हिस ब्रॅडबरीने फोर्ब्स मासिकासाठी लिहिलेल्या 'व्हाय यू शुड स्पेंड मनी ऑॅन एक्स्पीरिअन्स, नॉट थिंग्ज' या लेखाचा स्वैर अनुवाद.)

9773249697

[email protected]