आधुनिक काळातील सांदिपनी श्रीराम मंत्री

 विवेक मराठी  08-Aug-2017

 

***डॉ. कीर्तिदा रमेश महेता***

जुहू येथील उपनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक आणि विद्यानिधी शिक्षण संकुलातील विविध ज्ञानशाखांचे प्रणेत श्रीराम मंत्री यांचे 30 जुलै रोजी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा लेख.

'विद्यानिधी या इवल्याशा कल्पनारूपी बीजाचं रूपांतर आज एका संकुलरूपी बोधिवृक्षात झालेलं पाहताना मी मनोमनी आनंदित झालो आहे. त्यासाठी तुम्हां सर्वांचे मला मन:पूर्वक आभार मानायचे आहेत.' हे कृतार्थ उद्गार होते आदरणीय रामभाऊ उपाख्य श्रीराम मंत्री यांचे. निमित्त होते उपनगर शिक्षण मंडळाच्या षष्टयब्दीपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळयाचे.

 विद्यानिधी शिक्षण संकुल परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संकुलाच्या उभारणीत ज्यांनी ज्यांनी योगदान दिले, अशा सर्व सदस्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. या सोहळयाचे जनक होते अर्थातच रामभाऊ. संकुलाच्या विकासात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे, अशांचा सत्कार व्हावा ही कल्पना त्यांच्या मनात कित्येक महिन्यांपासून होती. ती या सोहळयाच्या निमित्ताने पूर्ण झाली.

एके दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे विद्यानिधीत गेले असता निरोप मिळाला की, अंतर्वेधमध्ये - रामभाऊंच्या चिंतनिकेत त्यांनी मला बोलावले आहे. रामभाऊ  महिन्यातून एक/दोनदा सकाळी विद्यानिधीत येत असत. आल्यावर शाळेतल्या काही शिक्षकांना चर्चेसाठी चिंतनिकेत बोलावून घेत. या चर्चासत्रानंतर आमच्यासमोर विविध विषयांतली माहितीपुस्तके तयार होऊन येत असत.

 त्या दिवशी मला चिंतनिकेत बोलावून रामभाऊंनी त्यांच्या मनातली गोष्ट सांगितली. संस्थेच्या विकासात ज्यांनी हातभार लावला आहे, अशा सर्वांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्याचा मानस व्यक्त केला. हा सोहळा संस्मरणीय व्हावा यासाठी विद्यानिधीचे व्यवस्थापक मंडळ उत्साहाने कामाला लागले. विद्यानिधीत दर वर्षी शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी 'सोच और भोज - plan and lunch' हा कार्यक्रम होत असतो. यंदा या कार्यक्रमाच्या जोडीने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. या निमित्ताने अनेक वर्षांनी जुने सदस्य, कार्यकर्ते आणि त्यांच्या परिवाराचे स्नेहमिलनच झाले.

अनेक सदस्यांचे पत्ते शोधून त्यांना या कार्यक्रमात सहभागी करण्यात आले. विचारांचे आदानप्रदान होत होते. या कार्यक्रमामुळे सर्वांनाच खूप आनंद झाला होता. सगळयात जास्त खूश होते ते रामभाऊ. मात्र हा कार्यक्रम रामभाऊंसाठी विद्यानिधीतला अखेरचा कार्यक्रम ठरणार आहे, याची तेव्हा आम्हाला पुसटशीदेखील कल्पना नव्हती. एखादा कार्यक्रम यशस्वी पार पडल्यानंतर रामभाऊ केवळ धन्यवाद द्यायचे नाहीत, तर अगदी तोंडभरून आमच्यावर स्तुतिसुमने उधळायचे. आता यापुढे अाम्ही सगळेच जण त्यांच्या कौतुकाला मुकणार आहोत.

आज शिक्षण क्षेत्रात ज्यांना सांदिपनी ऋषींचे स्थान देता येईल, अशी व्यक्ती म्हणजे आदरणीय रामभाऊ होते. सांदिपनी ऋषींच्या आश्रमात कृष्णासारखा धनवंत शिकत होता आणि गरीब घरातला  सुदामाही शिकत होता, तसे विद्यानिधीतही सर्व आर्थिक स्तरांतले विद्यार्थी एकमेकांसोबत आनंदाने ज्ञान ग्रहण करत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व उपनगर शिक्षण मंडळामुळे आमचा रामभाऊंशी संपर्क झाला. 1975च्या अणीबाणीत आम्ही दादरहून जुहू येथे वास्तव्यास आलो. माझे यजमान रमेश महेता यांना अपरिचित क्षेत्रात काम करताना चार व्यक्तींची भेट घेण्याची आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची सूचना संघश्रेष्ठींनी केली होती. हे चौघे जण म्हणजे श्रीराम मंत्री, वासुदेव वालेचा, राम गेहानी आणि पद्मनाभ आचार्यजी. हे स्वयंसेवक तर होतेच, त्याचबरोबर विद्यानिधीशी जोडलेले होते.

 रामभाऊंच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कल्पनेतून आणि अथक परिश्रमातून विद्यानिधी या लहानशा संकल्पना बीजाचे वटवृक्षात - रामभाऊंच्या शब्दांत सांगायचे, तर 'बोधिवृक्षात' रूपांतर झाले आहे. या प्रगतिपथावरील वाटचालीचे साथीदार आणि साक्षीदार होण्याचे भाग्य मला व माझ्या यजमानांना लाभले. यासाठी ऊनपावसाची पर्वा न करता रामभाऊंनी घेतलेले अखंड परिश्रम आम्ही पाहिलेले आहेत. शाळेसाठी निधी जमा करण्याकरिता ते सायकलीवरून अंधेरी ते जूहू असा प्रवास करत असत.

एक प्रसंग मला आजही आठवत आहे. म्हाडामधला जो भूखंड मिळवण्यासाठी रामभाऊ अनेक वर्ष प्रयत्नशील होते, तो भूखंड मिळवण्यासाठी तत्काळ काही रक्कम उभी करायची होती. तेवढी रक्कम संस्थेकडे नव्हती. आजच्या काळात कदाचित ती रक्कम छोटी वाटेल, पण तेव्हा तो आकडा नवे आव्हान ठेवणारा होता. मात्र कोणत्याही परिस्थितीत संस्थेसाठी हा भूखंड घ्यायचाच असा रामभाऊंचा निर्धार होता. माझे यजमानही निधीची व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात होते. त्याच वेळी रामभाऊंकडून व्यवस्था झाल्याचा निरोप आला. एका चांगल्या कामासाठी दाता मिळाला होता.

एक एक वीट उभारत जशी एखादी वास्तू उभी राहावी, त्याचप्रमाणे आज विद्यानिधी संस्था उभी आहे. समाजातल्या वंचितांसाठी उपनगर शिक्षण मंडळांच्या माध्यमातून दोन रात्रशाळा चालतात. त्याचबरोबर कॉम्प्युटर व आर्किटेक्चर यासारख्या विषयातील अद्ययावत शिक्षण उपलब्ध आहे. इंग्लिश व मराठी माध्यमातून के.जी.पासून पदवीपर्यंतचे शिक्षण इथे उपलब्ध आहे. संस्थेचा विस्तार 14 शाखांच्या माध्यमातून झाला आहे. शैक्षणिक काम हा रामभाऊंचा श्वास होता. या कामाच्या माध्यमातून ते देशातील विविध शिक्षण संस्थांशी जोडले गेले होते. विद्याभारतीचे अध्यक्ष, महामंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी समर्थपणे सांभाळली. 

रामभाऊ कर्तव्यनिष्ठ स्वयंसेवक होते. गांधीहत्येच्या वेळी अटक झाल्यानंतरही भारतमातेला परमवैभवाप्रत नेणे हाच त्यांचा ध्यास होता.

शिक्षण क्षेत्राचा अहोरात्र ध्यास घेतलेल्या रामभाऊंच्या मनात एक बालक दडून होता. याची प्रचिती आम्ही विद्यानिधीमध्ये 15 जून रोजी विश्व मल्लखांब दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात घेतली.

आमच्यासाठी रामभाऊ आजही जिवंत आहेत. विद्यानिधीत, विद्यार्थी-शिक्षकांच्या आणि संघस्वयंसेवकांच्या मनामनात जिवंत आहेत.

(लेखिका उपनगर शिक्षण मंडळाच्या सचिव आहेत.)

9322251842