ज्येष्ठांचा मधुमेह

 विवेक मराठी  10-Jan-2018


 

ज्येष्ठांनी प्रथम लक्षात घ्यावं की मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचे बरेच फायदे आहेत. डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना आपलं ग्लुकोज किती असायला हवं हे ठरवून घेता येईल. नवीन विचारांप्रमाणे 140 ते 180 इतकं ग्लुकोज ठेवावं, असा संकेत आहे. 'आता काय, माझं सगळं झालंय' ही भाषा योग्य नव्हे. त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना नियमित भेटायला हवं. कमीत कमी गोळया घेण्याचा आग्रह धरायला हवा.

 मधुमेह हा मुळात वयानुसार होणारा आजार आहे. वय वाढलं की जशी आपली गात्रं थकत जातात, तसाच प्रकार आपल्या रक्तातलं ग्लुकोज हाताळण्याच्या यंत्रणेत होतो. साहजिकच हळूहळू आपलं ग्लुकोज अनियंत्रित होण्याकडे कल वाढतो. वयाच्या तिशीनंतर प्रत्येक दहा वर्षांमागे आपलं रक्तातलं ग्लुकोज साधारण 15 मिलिग्रॅम दर डेसीलिटरने वाढतं, त्यातही जेवणानंतरचं ग्लुकोज वाढण्याचं प्रमाण अधिक असतं, असं दिसून आलं आहे. गमतीची गोष्ट म्हणजे वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत जर मधुमेह झालेला नसेल, तर पुढे तो होण्याची शक्यता जवळपास नसतेच. जगातली ज्येष्ठांची वाढती संख्या पाहता या वयातल्या माणसांना मधुमेह झाल्यावर त्यांना काही विशिष्ट प्रश्नांना सामोरं जावं लागतं का, याचा विचार होणं नक्कीच महत्त्वाचं आहे.

वय जसजसं वाढत जाईल, तसं सगळं शरीर सगळया इंद्रियांसकट थकत जाणार, हे सांगायला कोणी तज्ज्ञ नको. परंतु यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयानुसार थकणाऱ्या इंद्रियांमध्ये मधुमेहाच्या दृष्टीने पचनसंस्था अग्रक्रमी असते. कारण खाणं आणि मधुमेह यांचा दृढ संबंध असतो. दात नसतात किंवा ते कमकुवत झालेले असतात. त्यामुळे अन्नपचनाच्या नमनालाच बिनसायला सुरुवात होते. मधुमेहाच्या दृष्टीने ज्या खायला हव्यात अशा सॅलड, भाकरी यासारख्या गोष्टी दात नसल्याने कमी खाल्ल्या जातात. भूक कमीच असते. स्मरणशक्तीही कमकुवत होत जाते. गोळया घेतल्या की नाही हे लक्षात राहत नाही. प्रसंगी दोन वेळा औषध घेतलं जातं तर कधी अजिबातच घेतलं जात नाहीत. आवडीनिवडी पक्क्या झालेल्या असतात. थोडा हट्टीपणा आलेला असतो. मग दिलेलं खाणं खाल्लं जातंच असं नाही. त्यामुळे ग्लुकोज आत्यंतिक कमी व्हायची भीती वाढते. त्यात आतडयांची आकुंचन-प्रसरणशक्ती क्षीण होते. अन्न तरुण वयातल्या व्यक्तींपेक्षा हळूहळू पुढे सरकतं. पोटफुगीचा प्रश्न उभा राहतो. बध्दकोष्ठ होतं. पाचक रस कमी होतात. म्हणजे पचनाला अडचण आली.

तशात ज्येष्ठांच्या शरीरातले स्नायू कमी होऊन त्यांची जागा चरबीने घेतलेली असते. चरबी जास्त झाल्यामुळे इन्श्युलीन रेझिस्टन्स वाढतो. असलेलं इन्श्युलीनदेखील कमी प्रभाव दाखवतं. तुम्हा-आम्हा लोकांमध्ये जेवायला सुरुवात केली की यकृत शरीरात साठवलेल्या गोष्टींपासून ग्लुकोज बनवायचं आपलं काम त्वरित थांबवतं. वयाप्रमाणे ते उशिरा उशिरा होत जातं. तोपर्यंत रक्तात वाढीव ग्लुकोज येतच राहतं. परिणामी जेवणापूर्वीचं ग्लुकोज वाढतं. तोंडी घेतलेलं ग्लुकोज ज्या वेगाने शोषलं जातं, तो वेग वयानुसार मंदावलेला असतो. म्हणजे जर तरुण वयात जेवणानंतरचं ग्लुकोज त्वरित वाढून तितक्याच लवकर सामान्य पातळीवर येत असेल, तर वाढत्या वयातल्या व्यक्तींच्या बाबतीत ग्लुकोज झटपट वाढलं नाही, तरी ते दीर्घकाळ रक्तात येतच राहण्याची शक्यता वाढते. बऱ्याच वयस्करांना वेगवेगळया कारणांनी अनेक औषधं एकाच वेळी घ्यावी लागतात. त्या औषधांमुळेसुध्दा ग्लुकोज वाढू शकतं. कुठले ना कुठले आजार त्यांच्या शरीरात घर करून असतात. त्यानेही ग्लुकोज वाढू शकतं.

सगळयाच गोष्टी केवळ ग्लुकोजशी संबंधित असतात असं नाही. मधुमेहाच्या नियंत्रणात व्यायामाला महत्त्व असतं. शरीरात असलेल्या व्याधींमुळे त्यांना व्यायाम करणं शक्य असतंच असं नाही. गुडघेदुखी ही वयस्कर स्त्रियांची सर्वात मोठी डोकेदुखी असते. ज्येष्ठांचं मूत्रपिंड थकलेलं असतं. पुरुषांना प्रोस्टेटचा त्रास असू शकतो. स्त्रियांमध्ये लघवी धरून ठेवायची क्षमता कमी झालेली असते. मूत्रपिंड कमी काम करत असेल तर बऱ्याच औषधांचा वापर बंद करावा लागतो. सगळयात सुरक्षित औषध म्हणजे इन्श्युलीन. ते द्यायचं तर ग्लुकोज खूप खाली येण्याची, प्रसंगी नॉर्मलपेक्षाही कमी होऊन रुग्ण बेशुध्द पडण्याची भीती असते. विशेषत: एकटं राहणाऱ्या ज्येष्ठांच्या बाबतीत हा विचार करावाच लागतो. रात्री-अपरात्री काही झालं तर काय करायचं? हा प्रश्न असतो. वय खूपच वाढलं की कित्येकांना आपल्याला भूक लागलीय हेही कळत नाही. मग खाण्यापिण्याची हेळसांड व त्यातून आलेले प्रश्न उभे राहतात. एकटया राहणाऱ्या स्त्रिया आपल्या एकटयासाठी जेवण बनवायचा कंटाळा करतात. साहजिकच ग्लुकोजची पातळी खाली घसरण्याची भीती वाढते.

काही मंडळींना वारंवार लघवीला जावं लागतं. लघवीला गेल्यावर अकस्मात घेरी यायची - ज्याला 'मिक्च्युरेशन सिन्कोप' म्हणतात, तो व्हायची शक्यता अधिक असते. अशात नीट दिसत नसताना रात्रीचं लघवीला उठलं की पडायची आणि आधीच ठिसूळ झालेली हाडं मोडायची शक्यता अधिक असते. काही लोकांमध्ये आर्थिक समस्या असतात. पैशाचं नीट नियोजन झालेलं नसतं किंवा वाढत्या महागाईमुळे त्यांचं कंबरडं मोडलेलं असतं. मग औषधांच्या खर्चाचं गणित जुळवताना गडबड होते. या वयात ग्लुकोज अचानक खूप वाढून हाँक (Hyper Osmolar Nonketotic Coma) नावाची, मधुमेहाशी संबंधित अत्यंत गंभीर समस्या होण्याची भीती असते. किंबहुना ती याच वयात आढळते, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

अशा अनेक गोष्टींचं भान राखून ज्येष्ठांचा मधुमेह सांभाळावा लागतो. एक प्रकारे ही तारेवरची कसरत असते.

ज्येष्ठांनी प्रथम लक्षात घ्यावं की मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचे बरेच फायदे आहेत. डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना आपलं ग्लुकोज किती असायला हवं हे ठरवून घेता येईल. नवीन विचारांप्रमाणे 140 ते 180 इतकं ग्लुकोज ठेवावं, असा संकेत आहे.

'आता काय, माझं सगळं झालंय' ही भाषा योग्य नव्हे. त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना नियमित भेटायला हवं. कमीत कमी गोळया घेण्याचा आग्रह धरायला हवा. कमीत कमी 'गोळया' म्हटलंय, 'औषधं' नव्हे. एकाच गोळीत दोन किंवा तीन औषधं एकत्र असू शकतात. या विचाराची सुरुवात भारतीय कंपन्यांनी केली, याचा अभिमान बाळगायला हवा. आता जग त्याचं अनुकरण करू लागलंय. अशाने प्रत्यक्ष घ्यायच्या गोळयांची संख्या कमी होते. म्हणजे लक्षात ठेवणं सोपं जातं. प्रसंगी पिल बॉक्सचा वापर करायला हवा. औषधं कशी घ्यायची याच्या पुडया बांधून ठेवता येतील. त्यासाठी मोबाइलवर अलार्म लावता येईल. गोळया न विसरण्यासाठी कॅलेंडरची मदत घेता येईल. त्यावर आजचं औषध घेतलं की नाही याच्या खुणा करून ठेवता येतात.

वाढतं वय ही नैसर्गिक गोष्ट आहे. वयाने येणाऱ्या मर्यादा जाणून घ्यायला हव्यात. ऐकू कमी येत असेल, नजर अधू झाली असेल, तर इतरांची किंवा श्रवणयंत्रांसारख्या मशीन्सची मदत घेणं गैर नाही. रात्री लघवीला जाताना घरात पुरेसा उजेड आहे याची खात्री असायला हवी. घरातली फरशी गुळगुळीत नसायला हवी. चालताना अडखळायला होणाऱ्या व्यक्तींनी घराबाहेर जाताना काठी - तीही तीन किंवा चार पाय असलेली - वापरणं योग्य ठरेल. म्हणजे पडायला होणार नाही. वेळेवर आणि पुरेसं खाणं, दिवसातून थोडातरी व्यायाम करणं हा रोजच्या आयुष्याचा भाग असायला हवा. व्यायाम म्हणजे बाहेर पडून चार-पाच किलोमीटर चालायलाच जायला हवं असं नव्हे. शरीर हलतं फिरतं ठेवणं हासुध्दा त्यातला एक भाग आहे.

एकटे राहत असल्यास दिवसभरातून एकदा कोणीतरी आपली विचारपूस करील याची सोय करून ठेवायला हवी. इन्श्युलीन घेणाऱ्या ज्येष्ठांच्या बाबतीत हे खूपच महत्त्वाचं आहे. नातेवाइकांना आजाराची नीट कल्पना असलेली बरी. कारण कित्येकदा ग्लुकोज कमालीचं खाली गेलं, हायपोग्लायसेमिया झाला तर ज्येष्ठांमध्ये दिसणारी लक्षणं वेगळी असतात. त्यांच्या वागण्यात फरक पडतो, आपल्याला विचित्र वाटेल अशा गोष्टी त्यांच्याकडून घडतात. माझा एक रुग्ण अपरात्री घराच्या बाल्कनीतून रस्त्यावर लघवी करायचा. अपरात्री त्याचं ग्लुकोज कमी व्हायचं, म्हणून तो असं वागायचा. औषधं ऍडजेस्ट केली आणि तो तसं करायचा थांबला. स्वभावात अचानक झालेला बदल ज्येष्ठांच्या बाबतीत दुर्लक्षून चालत नाही.

उतारवयात इतरांच्या सहजी लक्षात न येणारी गोष्ट म्हणजे डिप्रेशन. या आजाराचं या वयातलं प्रमाण विलक्षण आहे. पण त्याचं निदान ना लवकर होत, ना त्यावर उपचार केले जात. म्हणूनच जाणीव असणं गरजेचं आहे, हे नक्की. दुसरं म्हणजे मूत्रपिंडाच्या मर्यादा. केवळ रक्तातलं क्रिएटिनीन मूत्रपिंडाच्या कार्याचा अंदाज देताना कमी पडतं. एकसारखं क्रिएटिनीन असलेल्या दोन व्यक्तींच्या मूत्रपिंडाच्या कार्यात बरीच तफावत असू शकते, त्याचं लिंग, वय आणि वजन यावर ही तफावत अवलंबून असते हे समजून घ्यायला हवं. त्यांनी आपला इ.जी.एफ.आर. काढून घेतला पाहिजे. तो आकडा तीसच्या खाली आला, तर काही औषधं देता येत नाहीत आणि काही औषधांचा डोस कमी करावा लागतो, हे मनावर बिंबवून ठेवलं गेलं पाहिजे.

बऱ्याच बाबतीत ज्येष्ठ आणि तरुण मंडळी यांच्यात फरक आहे. थकत चाललेल्या शरीराच्या मर्यादा नजरेआड न करता आपला मधुमेह काबूत ठेवणं अजिबात अवघड नाही. वयानुसार शरीरात झालेले बदल लक्षात घेऊन त्याप्रमाणे सगळं आखलं की त्यांच्याही वयात आणखी काही वर्षांची भर पडली म्हणून समजा.

9892245272