व्यवसाय कधीही करता येतो!

 विवेक मराठी  10-Jan-2018

व्यवसायाचे क्षेत्र जात-धर्म-लिंगभेद-आरक्षण-वशिला या सगळयापासून मुक्त आहे. येथे टिकायचे झाल्यास जिद्द-कष्ट-संयम-अभिनवता इतकेच गुण आवश्यक असतात. पण यापेक्षाही फायदेशीर पैलू म्हणजे आपल्याला जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर व्यवसाय करता येतो. व्यवसायाला वयाची मर्यादा नसते. माझ्या बाबांनीच हे सिध्द करून दाखवले होते.

 अलीकडेच माझा एक मित्र मला भेटला. तो एका चांगल्या कंपनीत उच्चाधिकारी म्हणून काम करत होता. त्याची घरची स्थिती उत्तम आहे. मुलीचे लग्न झाले आहे आणि मुलगाही एका सुस्थापित माहिती तंत्रज्ञान कंपनीत नोकरीला लागला आहे. माझ्या मित्राच्या मनात नोकरी पूर्णकाळ करण्याचा विचार कधीच नव्हता. त्याने दहा वर्षे आधीच - म्हणजे वयाच्या पन्नाशीत सेवानिवृत्ती घेतली. त्याचे कारण म्हणजे साठीनंतर माणसावर खूपशा मर्यादा येत असल्याने शरीर सक्रिय असताना आणि मनात उत्साह असतानाच जीवनशैलीत बदल करावा, असे त्याच्या मनाने घेतले. त्याप्रमाणे त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतलीही, पण आता भरपूर वेळ हाताशी असल्याने त्याचे व्यवस्थापन कसे करावे, हा प्रश्न त्याच्यापुढे पडला होता.

मित्राने प्रामाणिकपणे त्याची समस्या माझ्यापुढे मांडली. तो म्हणाला, ''जय! मला नक्की काय करावे, हेच सुचत नाही. मुलांचे मार्गी लागले आहे. पैसे मिळवण्याची आणि आमच्या भवितव्याची काळजी नाही. पर्यटन करावे म्हटले तर नोकरीच्या निमित्ताने मी पत्नीसमवेत देश-परदेशातील बहुतेक ठिकाणे पालथी घातली आहेत. सामाजिक कार्याला वाहून घ्यावे म्हटले तर तो माझा पिंड नाही. एखादा छंद जोपासता येईल, पण नवी कला शिकावी म्हटले तर तेही वय आता राहिले नाही. मग मी करू तरी काय?''

मी शांतपणे त्याला म्हणालो, ''हे बघ. हा विचार तू खरे तर नोकरी सोडण्यापूर्वी करायला पाहिजे होतास. नोकरीत असताना तू तुझ्या वेळेचे व्यवस्थापन जसे काटेकोर करत होतास, तसेच आताही करायला हवेस. बाकी तू इतर सांगतोस त्या मला सबबी वाटतात. करायचे आणि शिकायचे ठरवले, तर माणूस कोणत्याही टप्प्यापासून सुरुवात करू शकतो. मी तर म्हणेन की तू एखादा छोटा व्यवसाय का नाही सुरू करत? तुझ्या शिक्षणाच्या आणि नोकरीतील कामाच्या अनुभवाच्या आधारे ते तुला जमू शकेल.'' यावर माझा मित्र गडबडला आणि म्हणाला, ''छे छे! ते व्यवसायाचे वगैरे मला काही जमणार नाही. तरुण वय असते तर गोष्ट वेगळी. आयुष्याची 25 वर्षे नोकरीत घालवल्यावर अनोळखी क्षेत्रात मी तरी नाही उतरणार.''

मला मित्राची दया आली. मी त्याला म्हणालो, ''अरे! व्यवसाय हे असे खुले क्षेत्र आहे, जेथे कर्तबगारी सिध्द करण्यासाठी जात-धर्म-वय-लिंग-आरक्षण अशी कोणताही पूर्वअट नसते. माणूस वयाच्या कोणत्याही टप्प्यावर काहीही करू शकतो आणि त्यात यशस्वीही होऊ  शकतो. मी हे आमच्याच घरातील उदाहरणावरून सांगतोय. आमच्या दातार घराण्यात याआधी सगळेच नोकरदार होते. माझे आजोबा रेल्वेत नोकरीला होते, माझे बाबा हवाई दलात नोकरीला होते. ती नोकरी संपुष्टात आल्यावर बाबांनी तीन कंपन्यांत स्टोअर कीपरची नोकरी केली. अखेरच्या नोकरीत दुबईतील कंपनीतून निवृत्त होण्याच्या टप्प्यावर असताना त्यांना अनपेक्षितपणे उद्योगाची संधी समोर दिसली. जो माणूस भारतात परत येऊन निवृत्तीचे आयुष्य घालवणार होता, त्याने त्या वयात तरुणाच्या उत्साहाने एक दुकान सुरू केले आणि पूर्वीचा काही अनुभव नसताना ते चांगले चालवूनही दाखवले. त्याच छोटयाशा रोपटयातून आज 'अल अदील' या बहुराष्ट्रीय उद्योग समूहाचा वृक्ष बनला आहे.''

यावर पुन्हा माझ्या मित्राने शंका काढली. तो म्हणाला, ''समज, मी व्यवसाय सुरू केला, तरी तो कुणासाठी चालवायचा? तुझ्या बाबांना निदान तुझी साथ मिळाली, पण माझा मुलगा काही त्याची चांगली नोकरी सोडून मला मदत करायला येणार नाही. एकटयाच्या जिवावर मी व्यवसायाचा गाडा कसा हाकू?''

यावर मी त्याला दुसरे उदाहरण दिले. मी एका उद्योगपतीची प्रेरणादायी गोष्ट वाचली होती. हा माणूस एका कंपनीत लेखा (अकाउंट्स) विभागात कारकून होता आणि अखेरपर्यंत त्याने ती नोकरी इमाने-इतबारे केली. त्याच्या मनात खरे तर व्यवसाय करायची खूप इच्छा होती, पण नोकरी तर सोडता येत नव्हती आणि कुटुंबाची जबाबदारीही खांद्यावर होती. त्यामुळे व्यवसायाची सुप्त इच्छा मारून तो काम करत राहिला आणि एक दिवस सेवानिवृत्त झाला. पण निवृत्त झाल्यावरही त्याला चैन पडेना. त्याने विपणनाचे एक अभिनव प्रारूप मनात तयार करून ठेवले होते, पण त्यावर कुणी विश्वास ठेवेना. तो निवृत्त कारकून आहे, हे ऐकल्यावर लोक ती योजना समजून घेण्याआधीच त्याला वाटेला लावू लागले. तरीही तो संधीच्या शोधात राहिला. दरम्यान, एका रेस्टॉरंटच्या साखळीचा आपल्या ब्रँडचा परदेशात विस्तार करण्याचा विचार होता. हा गृहस्थ कंपनीच्या मालकांना जाऊन भेटला. आधी दोन-तीन वेळा नकार दिल्यावर अखेर एक संधी देऊन बघावी म्हणून त्यांनी या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्याने खरोखर चमत्कार घडवला. त्या ब्रँडची रेस्टॉरंट्स परदेशांतही झपाटयाने वाढून लोकप्रिय ठरू लागली. या कहाणीतील विशेष भाग असा की, ज्या माणसामुळे हे घडले, तो निवृत्तीनंतर केवळ 12 वर्षे जगला, पण त्याने उद्योजक बनण्याचे आपले स्वप्न साकार केले आणि त्यात यशस्वीही झाला.''

ही दोन उदाहरणे दिल्यानंतर मी मित्राला सांगितले, ''हे बघ. प्रत्येकालाच आपले ध्येय तरुण वयात सापडते असे नाही. शिवाजी महाराजांना वयाच्या सोळाव्या वर्षी पक्के ठाऊक होते की त्यांना पुढे काय करायचे आहे. तेच महात्मा गांधींना आपले ध्येय वयाच्या चाळीशीनंतर गवसले. आपल्यात बहुतेक लोक असे असतात, ज्यांच्या आयुष्यात अखेरपर्यंत कोणतेच ध्येय येत नाही. ते केवळ जगत जातात. त्यामुळे आपण शंका काढत बसू नये. ध्येय समोर ठेवून वाटचाल सुरू करावी. तू तुझ्या अनुभवाच्या जोरावर व्यवसाय सुरू केलास आणि तो यशस्वी होऊन त्याचा आवाका वाढला, तर तुझा मुलगा-मुलगी आपल्या जोडीदारांसमवेत त्यात तत्काळ सहभागी होतील. धंदा कुणासाठी करायचा, हा प्रश्नच उरणार नाही.''

माझ्या मित्राने माझा सल्ला मानला आणि छोटासा व्यवसाय सुरू केला. आता तो आणि त्याची पत्नी दोघेही त्याचे व्यवस्थापन छान करतात. त्यांचा वेळ मजेत चालला आहे आणि धंद्याची वाटचालही.

वय झाले म्हणून कुणी वृध्द होत नाही...

दुसऱ्या महायुध्दानंतर अमेरिकेपुढे सर्वांत मोठे आव्हान होते ते जपानी जनतेला पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्याचे. युध्दाच्या भीषणतेमुळे जपानी मुलांची व तरुणांची मने भग्न झाली होती. या नव्या पिढीपुढे काही आदर्श ठेवून तिला वैफल्यग्रस्ततेतून बाहेर काढणे अत्यंत जरुरीचे होते. जपानच्या पुनर्रचनेची जबाबदारी सांभाळणाऱ्या जनरल डग्लस मॅक्आर्थर यांच्या मनात सतत हा विचार घोळत असे. अशा वेळी त्यांच्या मदतीला आली ती सॅम्युअल उलमन या अमेरिकन कवीची 'यूथ' ही कविता. सॅम्युअल उलमन हे एक उद्योजक होतेच, त्याचबरोबर कवी आणि मानवतावादीही होते. जनरल मॅक्आर्थर यांनी त्यांना प्रेरणा देणारी ही कविता स्वत:च्या कार्यालयात सर्वांना दिसेल अशी लावली होती. तेथून तिचा प्रसार झाला आणि बघता बघता लोकांना इतकी आवडली, की जपानने सॅम्युअल उलमनना आपलेसे मानले. जपानी तरुणाईने या कवितेतून प्रेरणा घेतली. पुढच्या दोन-तीन दशकांत जपानने कात टाकली. त्यांना प्रगतीची नवी दिशा गवसली आणि तो देश अफाट कष्टाच्या व श्रमसंस्कृतीच्या जोरावर एक समर्थ राष्ट्र म्हणून पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला. 'यूथ' या कवितेचा अर्थ खरोखर प्रत्येकासाठी प्रेरक आहे. तारुण्याचा खरा अर्थ त्यात छान वर्णन केला आहे. या कवितेतील दोन ओळींचा अनुवाद मुद्दाम नमूद करावासा वाटतो -

'तारुण्य म्हणजे भीतीवर धैर्याचे मानसिक वर्चस्व. सुखासीनतेवर साहसी भावनेचे वर्चस्व.

आणि हे बहुधा विशीच्या तरुणापेक्षा साठीच्या व्यक्तीतच दिसून येते.

वय वाढले म्हणून कुणी वृध्द होत नसतो.

आपण तेव्हाच वृध्द होतो, जेव्हा आपण आपल्या ध्येयापासून दूर जातो.

काळानुसार त्वचेला सुरकुत्या पडतात; पण आपल्यातील उत्साह टाकून दिला, तर आत्म्याला सुरकुत्या पडतात.'

[email protected]