छंद बियाणांचा...

 विवेक मराठी  10-Jan-2018

***हर्षद तुळपुळे****

उत्तराखंडमधील जरधार गावातील शेतकरी विजय जरधारी यांनी 1980च्या दशकात बीज बचाव आंदोलन सुरू केलं, जे आजही अविरत चालू आहे. त्यांनी 'बारानाजा' (बारा धान्यं) नावाच्या मिश्र पीक पध्दतीचं पुनरुज्जीवन केलं आहे. त्यांनी 'राजमा' या पिकाच्याच सुमारे पावणेदोनशे जाती संग्रहित केल्या आहेत. शिवाय धान्याच्या आणि भाजीपाल्याच्या इतर शेकडो जाती संग्रहित करण्याचं आणि शेतकऱ्यांना वाटण्याचं त्यांचं काम अखंड चालू आहे.

 फेकबुकवर दीड मिनिटाचा एक व्हिडिओ बघितला. त्याला खूप लाइक्स आणि शेअर्स आले होते. सय्यद घनी खान हा कर्नाटकातील 40 वर्षं वयाचा एक शेतकरी. एक दिवस शेतात फवारणी करताना त्याला अचानक अस्वस्थ वाटायला लागलं. डोकं दुखायला लागलं. हे फवारणीच्या रसायनांमुळे होतंय हे त्याच्या लक्षात आलं. मग त्याने रसायनं वापरायचं पूर्ण बंद केलं आणि नैसर्गिक शेती करायचं ठरवलं. एक दिवस त्याच्या काकांकडून त्याला भाताच्या एका गावरान बियाणाबद्दल माहिती मिळाली. त्याने त्या जातीच्या 40 बिया मिळवल्या आणि रुजवून काढल्या. त्यातून त्याला दोन पोती धान्य मिळालं. कर्नाटक सीड कॉर्पोरेशनकडे चौकशी केल्यानंतर त्याला कळलं की ही 'रत्नचुडी' नावाची भाताची जात आहे, जी खूप पूर्वी म्हैसूर प्रांतात वापरली जायची आणि जी आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या घटनेने सय्यदच्या मनात गावरान बियाणांबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं. काळाच्या ओघात दुर्मीळ होत चाललेली अशी गावरान बियाणी गोळा करण्याची मोहीमच त्याने हाती घेतली. Natural Organic Farmers Associationच्या मदतीने तो आख्ख्या भारतभर फिरला. जंगलांत, आदिवासी भागात फिरून त्याने जिथे जिथे मिळतील तिथून गावरान बियाणी गोळा करून त्याचा संग्रह करायला सुरुवात केली. आज त्याच्याकडे सुमारे साडेआठशे विविध प्रकारची नैसर्गिक बियाणी उपलब्ध आहेत. ती तो आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देतो. त्याचं महत्त्व पटवून देतो आणि त्याचा प्रसार करतो. याशिवाय फळझाडांच्याही कितीतरी जुन्या प्रजाती त्याने संग्रहित करून ठेवल्या आहेत. 2008 साली 'कृषी पंडित' पुरस्काराने त्याचा गौरव झाला.

सय्यद घनी खान यांच्याबद्दल इतकी माहिती मिळाल्यानंतर एकंदरच 'बियाणं' या विषयाचा जरा खोलात जाऊन अभ्यास करावासा वाटला. बियाणांच्या बाबतीत शास्त्रज्ञ, शेतकरी आणि अभ्यासक यांचे दोन परस्परविरोधी मतं असलेले गट आहेत. एक गट नवीन तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या संकरित आणि जनुकीय बियाणांचा पुरस्कर्ता आहे, तर दुसरा गट अशा कृत्रिम बियाणांचा विरोधक असून नैसर्गिक बियाणांचा पुरस्कर्ता आहे. 'भारतातल्या सव्वाशेपेक्षा जास्त कोटी लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी संकरित आणि जनुकीय बियाण्याला पर्याय नाही, ही बियाणी पर्यावरणीयदृष्टया पूर्णत: सुरक्षित असून दुप्पट-तिप्पट उत्पादन देणारी आहेत' असं पहिल्या गटाचं म्हणणं आहे. याउलट 'संकरित आणि जनुकीय बियाणी शेतीचा उत्पादनखर्च वाढवतात, त्यांच्यामुळे मोन्सॅन्टोसारख्या कंपन्या गब्बर होतात आणि शेतकरी कर्जबाजारी होतात, त्यांच्यामुळे जीवविविधतेला धोका आहे, नैसर्गिक बियाणीच रोगप्रतिकारक्षम, पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्टयाही फायदेशीर आहेत' असं दुसऱ्या गटातील लोकांचं म्हणणं आहे. या दोन गटांमध्ये सतत वाग्युध्द सुरू असतात. कोणाचं बरोबर आणि कोणाचं चूक याचा न्यायनिवाडा करणं हा या लेखाचा हेतू मुळीच नाही. पण भारतात असे काही लोक आहेत, ज्यांनी देशी वाणांच्या जतनासाठी आयुष्य वाहून घेतलंय. कोणाला वस्तुसंग्रहाचा, नाणी वगैरे जमवण्याचा छंद असतो, तसा काही अत्यल्प लोक गावरान बियाणी संग्रहित करण्याचा छंद जोपासत आहेत.

या बाबतीतलं एक मोठं नाव म्हणजे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वंदना शिवा. पर्यावरण अभ्यासक असलेल्या डॉ. वंदना शिवा यांचा 'देशी बीज' हा संशोधनाचा आणि कार्याचा विषय आहे. 1984 साली त्यांनी 'नवधान्य' नावाची चळवळ सुरू केली, ज्याचा एक संस्था म्हणून आज खूप मोठा विस्तार झाला आहे आणि त्याला शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. आश्चर्य वाटेल, पण या संस्थेमध्ये आतापर्यंत भाताच्या 4000पेक्षा जास्त स्थानिक प्रजातींची बियाणी संग्रहित केली गेली असून त्यांचं संवर्धन केलं जात आहे. नवधान्य संस्थेतर्फे आजपर्यंत भारतातल्या 17 राज्यांमध्ये महिलांचे छोटेछोटे गट स्थापन करून एकूण 120 'बीज बँका' (seed banks) स्थापन केल्या आहेत. बीज बँकेची संकल्पना अतिशय अभिनव आणि गमतीशीर आहे. बँक लोकांकडून ठेवींच्या रूपात पैसे गोळा करते आणि उद्योजकांना कर्ज देते. त्या बदल्यात ती उद्योजकांकडून व्याज घेते आणि ठेवीदारांना व्याज देते. पतनिर्मिती हे बँकांचं एक प्रमुख कार्य आहे, ज्याला Multiple Credit Creation म्हणतात. म्हणजे असं की, समजा, एखाद्या माणसाने बँकेत 1,00,000 रुपये ठेव म्हणून ठेवले. त्यातली काही रक्कम (समजा 10%) CRRच्या (Cash Reserve Ratioच्या) रूपात बँकेला राखीव ठेवावी लागते. उरलेले 90,000 रुपये बँक दुसऱ्या माणसाला कर्जाऊ  देते. म्हणजेच ती रक्कम कर्ज घेणाऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते आणि तिचं परत ठेवीत रूपांतर होतं. त्यातले परत 10% CRRच्या रूपात वजा होऊन उरलेल्या 81,000 रुपयांचं कर्ज बँक तिसऱ्या माणसाला देते. त्या माणसाने पुन्हा ती रक्कम बँकेत ठेवली की पुन्हा ठेव वाढते आणि पुन्हा बँकेकडे कर्ज देण्यासाठी पैसा निर्माण होतो. अशा प्रकारे बँका पतनिर्मितीचं काम करतात. आता बँकांमध्ये हे जसं पैशाच्या बाबतीत होतं, तेच बीज बँकांमध्ये बियाणांच्या बाबतीत होतं. बँकांमध्ये जसा पैशातून पैसा-पैशातून पैसा-पैशातून पैसा निर्माण होत जातो, तसंच बीज बँकांमध्ये बियाण्यातून बियाणं-बियाणातून बियाणं-बियाणातून बियाणं निर्माण होत जातं. म्हणजे असं की, या ज्या 120 बीज बँका स्थापन झालेल्या आहेत, त्यांना सुरुवातीला नवधान्य संस्थेकडून बीजपुरवठा केला जातो. या बँका मग त्या बिया पेरून धान्य मिळवतात आणि ते बियाणं म्हणून साठवून ठेवतात. शेतकरी या बँकांकडून बियाणं कर्जरूपात घेतात, शेती करतात, धान्य पिकवतात आणि जेवढं बियाणं घेतलं त्याच्यापेक्षा 25% जास्त (व्याज म्हणून!) बीज बँकेला परत करतात. किती अफलातून कल्पना आहे ही!

उत्तराखंडमधील जरधार गावातील शेतकरी विजय जरधारी यांनी 1980च्या दशकात बीज बचाव आंदोलन सुरू केलं, जे आजही अविरत चालू आहे. त्यांनी 'बारानाजा' (बारा धान्यं) नावाच्या मिश्र पीक पध्दतीचं पुनरुज्जीवन केलं आहे. त्यांनी 'राजमा' या पिकाच्याच सुमारे पावणेदोनशे जाती संग्रहित केल्या आहेत. शिवाय धान्याच्या आणि भाजीपाल्याच्या इतर शेकडो जाती संग्रहित करण्याचं आणि शेतकऱ्यांना वाटण्याचं त्यांचं काम अखंड चालू आहे. पर्यावरणतज्ज्ञ डॉ. देबल देव यांनी बंगालमध्ये 'वृही' नावाची स्वत:ची बीज बँक स्थापन केली, जी पारंपरिक भातबियाणांच्या संवर्धनासाठी वाहून घेतलेली आहे. 1995पासून आजपर्यंत भाताच्या सुमारे 1200पेक्षा जास्त स्थानिक जाती या बीज बँकेत संग्रहित केल्या गेल्या आहेत. या संस्थेतर्फे बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये छोटया छोटया बीज बँका स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.

महाराष्ट्रात संजय पाटील हे Bharatiya Agro Industries Foundation या संस्थेत कार्यरत आहेत. 2007 सालापासून याच संस्थेच्या कार्यक्रमांतर्गत ते गावरान बियाणी संवर्धनाचं काम करतात. ठाणे, नंदुरबार, गडचिरोली, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये त्यांचे बीजसंवर्धनाचे प्रकल्प मोठया प्रमाणावर चालू आहेत. बियाणांचा संग्रह, शुध्दीकरण, चांगल्या जातींची निवड, गावरान बियाणांची प्रदर्शने भरवणं असे उपक्रम ते राबवतात, ज्यांना शेतकऱ्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. याशिवाय पश्चिम घाटातल्या मलनाड प्रांतात 'वनस्त्री' नावाचा महिलांचा गट 2001
सालापासून गावरान बीजसंवर्धनाचं काम करतो आहे. पंधरा गावांतल्या सुमारे 150 महिला या गटात कार्यरत आहेत.

सातारा जिल्ह्यातील उंब्रज तालुक्यातील शिवडे या गावात नागेश स्वामी आणि भरती स्वामी हे एक साडेतीन एकरांची शेती असलेलं छोटं शेतकरी कुटुंब. पण बियाणी संवर्धनाचं त्यांचं काम कौतुकास्पद आहे. भात, गहू, कडधान्यं, भाजीपाला यांच्या 500पेक्षा जास्त प्रकारच्या बियाणांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे आंब्याच्या 38 भारतीय जाती आणि 48 प्रकारची कंदमुळं आहेत. आजूबाजूचे अनेक शेतकरी त्यांच्याकडून बियाणी घेऊन जातात.  महाराष्ट्रातल्या कोंभाळणे या गावातल्या राहीबाई पोपेरे या महिला शेतकरी नैसर्गिक बियाणी जतन करण्याचं काम करतात. भाताच्या, भाजीपाल्याच्या आणि इतर धान्यांच्या सुमारे 70-80 जाती त्यांनी संग्रहित केल्या आहेत. त्यांनी 'कळसूबाई परिसर बियाणी संवर्धन समिती' नावाचा स्वयंसेवी गट स्थापन केला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी त्यांना 'बीजमाता' (seed Mother) असे संबोधून त्यांचा गौरव केला आहे. अमरावती जिल्ह्यातील रमेश साखरकर यांची 3 एकरांची शेती असून त्यांनी सुमारे 200पेक्षा जास्त गावरान बियाणांचा संग्रह केला आहे. कर्नाटकमध्ये गुरुसामी नावाचा एक शेतकरी गेली दहा वर्षं गावरान बियाणी संग्रहाचं आणि त्यांचा प्रसार करण्याचं काम करतो आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात नॉयडाला झालेल्या 19व्या Organic World Congress या परिषदेत संपूर्ण भारतातून गावरान बीज संवर्धन करणारे 55 गट सहभागी झाले होते.

असो. शोधमोहीमच घ्यायची झाली, तर भारतात अशा आणखीही कैक व्यक्ती आणि गट सापडतील. आणखीही कितीतरी अज्ञात बियाणी अस्तित्वात असू शकतील. या सर्व व्यक्तींची आणि संस्थांची उदाहरणं वाचकांसमोर आणण्याचं कारण म्हणजे या व्यक्ती व संस्था संकरित आणि जनुकीय बियाणांना नुसता तात्त्वि विरोध करत नाहीयेत, तर नैसर्गिक बीजसंवर्धनाचं काम गेली वर्षानुवर्षं मेहनतीने करत आहेत आणि शेतकऱ्यांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतोय आणि वाढतोय. अर्थात भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. कोणतं बियाणं वापरायचं हा प्रत्येक शेतकऱ्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. शेतकरी संकरित बियाणी वापरतील की गावरान बियाणी पसंत करतील हे येणारा काळच ठरवेल. पण एक मात्र खरं - 'शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी!'

9405955608