समस्त महाजन - सेवा कार्य

 विवेक मराठी  03-Jan-2018

***विजय मराठे***

वर्ष 2013, जून महिना. उन्हाने त्रस्त होऊन पावसाची वाट पाहण्याचा काळ. याच काळात पहाडी भागात पर्यटकांची प्रचंड प्रमाणात वर्दळ असते. उत्तराखंडमधील पर्यटन स्थळांना तर विशेष महत्त्व प्राप्त होते. या भागात गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ धाम ही पवित्र चार धाम तर आहेतच, शिवाय शीख समाजाचे पवित्र स्थळ हेमकुंड साहिब, खालच्या भागात देहरादून, हरिद्वार तसेच हृषीकेश ही मनाला भावणारी ठिकाणे आहेत. उत्तराखंडात दर वर्षी पर्यटकांची आणि यात्रेकरूंची गर्दी असते. पर्यटक आणि यात्रेकरूंमुळेच उत्तराखंडाचा आर्थिक कणा मजबूत आहे. या काळात होणाऱ्या कमाईवर येथील लोकांचे वर्षभर भागते. यात्रेकरू आणि पर्यटक यांची सेवा करण्यातच धन्यता मानणारे येथील स्थानिक लोक आहेत. मात्र येथे येणाऱ्या यात्रेकरूंना आणि पर्यटकांना कुठे माहीत होते की येथे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपले आजचे आनंदी जीवन भविष्यात राहणार नाही.

जेव्हा नैसर्गिक संकट येऊन उभे राहते, तेव्हा मनुष्य त्या परिस्थितीसमोर हतबल आणि परावलंबी होऊन जातो. एक कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तराखंडात 16 जूनला पावसाचे तांडव सुरू होते. या दुर्दैवी प्रलयाने उत्तराखंडात सर्वनाश आणि हाहाकार माजविला.  या नैसर्गिक संकटाने उत्तराखंडातील जन-धन-पशुधन यांचे तर नुकसान झाले. अशा वेळी स्वाभाविकच संपूर्ण भारतभरातून मदतीचे हात सरसावले. पैसे, रेशन, पाणी, कपडे, औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तू तर आल्याच, त्याशिवाय अनेक जण व्यक्तिगत किंवा कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या माध्यमातून उत्तराखंडात प्रत्यक्ष पोहोचले. परिस्थिती इतकी बिकट होती की, कितीही मनुष्यबळ आणि वस्तुरूपात मिळालेली मदत कमीच पडत होती. सरकारकडूनसुध्दा प्रयत्न होत होते, परंतु तेही अपुरे पडत होते. देशभरातून सेवाभावी संस्था आपली सर्व दैनंदिन कामे बाजूला ठेवून उत्तराखंडात अडकलेल्या माणसांची सेवा करण्यास तत्पर होत्या. अशा नैसर्गिक संकटसमयी जराही विलंब न लावता उत्तराखंडात मनुष्यसेवेसाठी पुढे सरसावलेल्या संस्थांपैकी 'समस्त महाजन' एक होती.

संस्थेचे व्यवस्थापक, विश्वस्त गिरीश शाह यांनी पूरग्रस्तांच्या मदतकार्यात संस्थेला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी काळजी घेण्याची सूचना आपल्या कार्यकर्त्यांना केली. मनुष्यसेवा, निसर्गसेवा, प्राणिमात्र सेवांचे असे सेवा कार्यांचे अनेक आयाम असेलेली संस्था 'समस्त महाजन'ने एकापाठोपाठ एक, याप्रमाणे अनेक गावांमध्ये सेवा कार्याचे जाळे तयार केले. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू, आजारी लोकांसाठी आरोग्यसेवा अशा अनेक प्रकारची मदत संस्थेने केली. संपर्क तुटलेल्या गावांमध्येही संस्थेचे कार्यकर्ते सेवा कार्य करण्यास पोहोचले. स्थानिक स्तरावरील तात्कालिक मदतकार्याबरोबरच 'समस्त महाजन'ने पूरग्रस्तांच्या दीर्घकालीन पुनर्वसनासाठीदेखील अनेक योजना तयार केल्या. या सर्व गोष्टींच्यामागे संस्थेचा एकच उद्देश आहे - कुठेही, कधीही मनुष्याची किंवा कोणत्याही मुक्या प्राण्याची निःस्वार्थी भावनेने सेवा करणे.

उत्तराखंडात समस्त महाजन संस्थेने केलेली सेवा कार्ये

* पूरग्रस्तांना खाद्यपदार्थांची 6100 पाकिटे पाठवली. थेपले, सुखडी, खाखरे, चिवडा, मेथी मसाला आणि पाण्याची बाटली यांचा त्यात समावेश होता. * 'समस्त महाजन' संस्थेच्या कार्याने प्रभावित झालेल्या उत्तराखंड सरकारने खाद्यपदार्थांची पाकिटे पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. * गंगा नदीच्या किनारी वसलेल्या बैरागी कॅम्पमधील 400 घरे चिखलात पूर्णत: फसली होती. 2000 लोकसंख्या असलेल्या या 400 घरांना संस्थेने दत्तक घेतले. त्यांच्या घरातील पाणी-चिखल साफ करून त्यांना जीवनावश्यक वस्तू, 100 रुपये रोख, तसेच 1000 रुपयांचे किट दिले. * चंद्रशेखर नगरमधील 1400 कुटुंबांना एक महिना अन्नव्यवस्था पुरवली. तसेच त्रियुगीनारायण गावातील 50 कुटुंबांना, तसेच तोबी गावातील 35 कुटुंबांना मदत केली. * बद्रीनाथ येथेही पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 23 किट देण्यात आले. यामध्ये गावातील सर्व वर्गातील लोकांचा समावेश होता. 'समस्त महाजन' संस्थेने ब्रदीनाथ येथे दोन शाळांना दत्तक घेतले आहे. तेथील कुटुंबांना खेचर खरेदीसाठी 11000 रुपये देण्यात आले आहेत.  * बद्रीनाथच्या पवित्र बद्री मंदिरातील भंडाऱ्यासाठी महिनाभराच्या अन्नधान्याची व्यवस्था संस्थेने केली. * रुद्रप्रयाग येथे मेडिकल कॅम्प लावला. * राय येथे निराश्रितांसाठी तंबूची व्यवस्था करण्यात आली.

समस्त महाजन संस्थेच्या कार्याने प्रभावित होऊन जोशीमठ येथील उपजिल्हाधिकारी यांनी संस्थेला प्रशस्तिपत्र प्रदान केले, ज्यामध्ये संस्थेद्वारे केलेल्या सेवा कार्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. तसेच प्रशासनातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.     

9893436951

अनुवाद - पूनम पवार