गरज संवादाची आणि संयमाची

 विवेक मराठी  03-Jan-2018

एक जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला आदरांजली वाहण्यासाठी लाखाेंचा समुदाय उपस्थित होता. दोनशे वर्षांपूर्वी झालेल्या लढाईत कामी आलेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी जमलेला समूह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा आहे. त्यामुळे त्यांनी एक जानेवारीचा अभिवादन सोहळा शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्याचा प्रयत्न केला. पण या शांततेला आणि शिस्तीला गालबोट लावण्याचे काम भीमा कोरेगावपासून काही अंतरावर असणाऱ्या सणसवाडी, शिक्रापूर, वडू तुळापूर गावांत झाले. सकाळपासून शांततेत चालणारा हा सोहळा दुपारनंतरच्या दगडफेकीच्या आणि गाडया फोडण्याच्या, आग लावण्याच्या प्रकारांमुळे गढूळ झाला. या धामधुमीत एक तरुणाचा मृत्यू झाला. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या समूहासाठी हा मोठा धक्का होता. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि समाजबांधवांना शांततेचे आव्हान केले आहे. भीमा कोरेगाव परिसरात झालेल्या या घटनेचे पडसाद त्याच दिवशी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत त्याचे पडसाद उमटू लागले. प्रकाश आंबेडकर यांनी तीन जानेवारीला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली, त्यालाही समाजाने शांततापूर्ण सहकार्य केले.

एकूणच भीमा कोरेगाव आणि तेथील विजयस्तंभ परिसरात जी निंदनीय घटना घडली आणि समाजस्वास्थ्यासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यामागचे करते हात आणि चलाख मेंदू यांचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे. समाजात विद्वेषाची पेरणी करून सामाजिक एकता भंग करण्यात त्या शक्ती काही अंशी यशस्वी झाल्या असल्या, तरी दोन आणि तीन तारखेला समाजातून ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत होत्या, त्या पाहता अशा कळलाव्या मंडळींची डाळ जास्त दिवस शिजणार नाही व लवकरच सत्य समाजासमोर येईल अशी आशा करू या.

ज्या प्रकारे समाजमाध्यमांतून या घटनेला हवा दिली गेली, ती पाहता त्यामागे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा आणि त्यातून समाजजीवन अस्थिर करण्याचा, सामाजिक अराजक निर्माण करण्याचा काही मंडळींचा उद्देश आहे. या देशाचे नागरिक आणि समाजबांधव म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारचे अराजक, सामाजिक अस्थिरता ही परवडणारी बाब नाही, हे लक्षात घेऊन आपण कळलाव्या मंडळींना किती गंभीरपणे घ्यायचे? हे ठरवावे लागेल. ज्यांच्या काही सुप्त इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला उतरण्याची त्यांची तयारी आहे, अशा मूठभरांच्या हातचे बाहुले बनायचे, की अशा प्रवृत्तींना आपल्या सकारात्मक कृतीतून चोख उत्तर द्यायचे, याचा निर्णय आपण समाज म्हणून घ्यायचा आहे. काहीही करून विखार आणि विद्वेष यांच्या आधाराने समाज प्रदूषित करायचा असे ज्यांनी ठरवले आहे, त्यांना आपण बदलू शकणार नाही. पण त्यांच्या हातचे कळसूत्री बाहुले बनायचे की नाही, हे मात्र निश्चितपणे आपल्या हाती आहे. त्यामुळे सारासार विवेकाची कास धरत गढूळ झालेले समाजजीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी आपली सकारात्मक कृती आज महत्त्वाची ठरणार आहे. आपली जात, धर्म बाजूला ठेवून केवळ भारतीय नागरिक म्हणून आजच्या परिस्थितीचे उत्तर शोधणे आवश्यक आहे. ज्यांना समाजात वितुष्ट वाढावे आणि समाज सदैव धगधगत ठेवून त्यावर आपल्या क्षुद्र स्वार्थाची पोळी भाजून घ्यायची आहे, त्यांना चपराक देण्याची संधी समाजाला भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेने प्राप्त करून दिली आहे. भीमा कोरेगाव येथील घटनेकडे केवळ जातीय दृष्टीकोनातून बघून भागणार नाही, तर अशा प्रकारे जातीय लढाई घडवून आणून समाज खिळखिळा करण्याचे जे षडयंत्र चालू आहे, ते मूळापासून समजून घेतले पाहिजे आणि अशा घटनांच्या मागे कोणती अदृश्य शक्ती कार्यरत आहे, याचाही विचार केला पाहिजे. या अदृश्य षडयंत्रकारी शक्तींना नेस्तानाबूत करण्याची जबाबदारी नियतीने आपल्यापुढे ठेवली आहे. ती आपण कशी पूर्ण करणार? हा आताचा प्रश्न आहे.

या प्रश्नाचे उत्तर संयम आणि संवाद या दोन्हीच्या आधारेच आपल्याला मिळणार आहेत, हे लक्षात घेऊन अशा समाजविघातक घटनांबाबत आपला व्यवहार असायला हवा. आज समाजमाध्यमांचे पेव फुटले आहे. प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य यामुळे मिळाले असले, तरी आपण या आयुधाचा वापर कसा करावा, याचा तरतमभाव हरवल्याचे चित्र भीमा कोरेगावच्या घटनेच्या आधी आणि नंतरही समोर आले आहे. अशा माध्यमांचा उपयोग समाजाला जोडण्यासाठी, सकारात्मक कामासाठी व्हायला हवा. मात्र काही मंडळी आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसून येतात. इतिहास आणि मानवी भावना यांच्या आधारे समाजात असे लोक अस्थिरता निर्माण करू पाहत आहेत. आपण लक्षात घेतले पाहिजे की इतिहासाच्या आधाराने आपले वर्तमान बदलणार नाही आणि भविष्यही साकार करता येणार नाही. त्यामुळे जातीय व ऐतिहासिक अस्मिता जागवून जे आपल्यांना भुरळ घालत आहेत, त्यांच्यापासून चार हात दूर राहिले पाहिजे.

 राज्य व राष्ट्रीय स्तरावरचे सर्वपक्षीय नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी यांचे वर्तन आणि माध्यमांसमोरचे व्यक्त होणे हे समाजाला मारक व दुहीची बीजे पेरणारे असल्याचे वारंवार समोर येत आहे. केवळ मतपेढीवर नजर ठेवून थेट व अप्रत्यक्षपणे भडकाऊ भाषणे करणारे नेते आपल्या कृतीतून या समाजाच्या स्वास्थ्याशी आणि एकतेशी आमचे काहीही घेणे-देणे नाही, असे सिध्द करत असतात. या साऱ्या पार्श्वभूमीवर आपण समाजाचे घटक म्हणून संवाद आणि संयम या आपल्या आयुधांचा पुरेपूर वापर केला पाहिजे. त्यातच आपले आणि पर्यायाने समाजाचेही हित आहे.