एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व डॉ. ग. प्र. परांजपे

 विवेक मराठी  03-Jan-2018

 

 नाना म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. सतत धडपड, कधीही शांत निवांत बसणे नाही. शाळा, कीर्तन, प्रवचने, व्याख्याने सतत लेख लिहिणे मग तो शिक्षक संघटनेसाठी असो, नाहीतर आध्यात्मिक क्षेत्रातील असो, पुणे आकाशवाणीचा कार्यक्रम असो - सतत कार्यमग्न. कंटाळा, आळस याचा त्यांना कधीही स्पर्शही झाला नाही.

रामाचे निरपेक्ष दास्य करि तू मागू नको त्याजला!

त्यापायी झिजवी तनू निशिदिनी सोडू नको भक्तिला !

त्याचे सर्व असे तनूधन तुझे त्याला समर्पी आधी!

शेषाचा उपभोग घेई विधिने याते चुकेना कधी !!

 या श्लोकाची रचना 77 वर्षांपूर्वीची, विष्णुपंत रहाळकरांची. माझ्या लहानपणापासून रामाच्या गाभाऱ्याच्या दारावर लिहिलेल्या या ओळी आम्ही सतत वाचत आलो. ज्यांनी या श्लोकाचा भावार्थ आयुष्यभर आचरणात आणला, निरपेक्षपणे रामाचे दास्यत्व पत्करले, त्यानेच दिलेले हे मानवी शरीर शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्याच सेवेत कृतज्ञता म्हणून व्यतीत केले आणि हे सारे करत असताना जे शिल्लक राहिले, त्या शेष भागाचा विधिनियम पाळून मग उपभोग घेतला, ते माझे पूज्य पिताश्री कै.डॉ. ग.प्र. परांजपे.

आठवणीचा आनंद, स्मृतींचा सुगंध हा काही आगळावेगळाच असतो. आज नानांच्या निधनाने मी भूतकाळात तर गेलेच, खूप खूप आठवणी मनात दाटून आल्या. पण मग लक्षात आले की एका वटवृक्षाच्या छायेत आपण किती निवांतपणे वावरत होतो. शिक्षकी पेशाची सारी कर्तव्ये अतिशय प्रेमाने, मनापासून आणि प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या माझ्या वडिलांना त्याखेरीज आणखी एक आयुष्य होते आणि तेही आयुष्य ते मनःपूर्वक जगले.

नानांच्या जीवनात खऱ्या अर्थाने दोन अलौकिक सत्पुरुष होते. एक म्हणजे श्री दासगणू महाराज आणि दुसरे स्वामी वरदानंद भारती. या असामान्य व्यक्तींच्या सहवासात आलेल्या सामान्य व्यक्तीला सदैव अपूर्व आनंद देत असतात. जीवनाला नवा मार्ग दाखवत असतात. त्याचेच एक उदाहरण म्हणजे दासगणूंच्या समग्र वाङ्मयावर केलेली पीएच.डी. त्या पीएच.डी.चा स्वामी वरदानंदांना इतका आनंद झाला की स्वामीजी म्हणायचे - ''जणू काही मला पदवी मिळाली.''

नाना म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. सतत धडपड, कधीही शांत निवांत बसणे नाही. शाळा, कीर्तन, प्रवचने, व्याख्याने, सतत लेख लिहिणे - मग तो शिक्षक संघटनेसाठी असो, नाहीतर आध्यात्मिक क्षेत्रातील असो, पुणे आकाशवाणीचा कार्यक्रम असो - सतत कार्यमग्न. कंटाळा, आळस याचा त्यांना कधीही स्पर्शही झाला नाही.

आपल्या कर्माने आपण जीवन व्यवहारासाठी धन कमावतो, त्याच आपल्या कर्माने सामाजिक कामनांची पूर्ती होते. पण आणखी एक सूक्ष्म गोष्ट घडत असते, ती आपल्या लक्षात येत नाही. पण अध्यात्मिकदृष्टया तीच सर्वात महत्त्वाची असते. गीता म्हणते, 'योगिनाः कर्म कुर्वन्ति, संग त्वक्त्या आत्मशुध्दे।' आपल्या कर्माचा आपल्या चित्तावर अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होत असतो, इकडे आपले लक्ष असते का? आज जेव्हा मी नानांच्या जीवनाचा परामर्श घेते आहे, तेव्हा लक्षात येते - खरेच, नाना म्हणजे एक आध्यात्मिक सत्पुरुष होते. सगळे असूनसुध्दा ते कशातही नव्हते. निरिच्छ होते. आपल्या अंतःकरणात निर्माण होणाऱ्या वासना शुभ मार्गाकडे प्रवृत्त होण्यासाठी सतत विष्णुसहस्रनामाचे पाठ करत असत. उठल्यापासून सद्गगुरूंच्या स्मरणातच असत. आता तर अलीकडे महिन्यापूर्वीच स्वामींजीचे आध्यात्मिक चरित्र लिहायला घेतले होते. तसेच 2020मध्ये स्वामींजीची 100वी जयंती येईल, त्या वेळी मी असेन-नसेन, त्यासाठी काय-काय करावे हे त्यांनी लिहून ठेवलेय. नागपूरच्या 'प्रज्ञालोक' मासिकाच्या संपादकांसाठी पत्र लिहिलेय.

प्रकृती इतकी नाजूक असतानासुध्दा एकही दिवस ते ध्येयाविना जगले नाहीत. त्याचे उदाहरण म्हणजे विनायकराव नांदेडकरांना हिंदीतून एक कीर्तनोपयोगी आख्यान करून हवे होते. त्यासाठी पुण्याहून हिंदी कोष मागवून ते काम सुरू होते. मागच्या वर्षी गोदापरिक्रमा नांदेडहून सुरू झाली. त्या वेळी स्वामीजींच्या संस्कृत गोदामाहात्म्याचा विविध वृत्तांतील केलेला मराठी अनुवाद. आम्ही त्यांच्याकडे बघून थक्क होत असू. खरेच, कुठून मिळत असेल ही ऊर्जा, हा अमाप उत्साह! गोदापरिक्रमा करणाऱ्या पदयात्रींना भेटण्यासाठी आम्ही त्यांना घेऊन गेलो तर म्हणाले, ''सगळं गोरटं मला भेटायला इथं आलंय. तुम्ही गोदापरिक्रमा करताय, मी तुम्हा सर्वांना नमस्कार करायला आलोय.'' खरेच हे सगळे अलौकिकच आहे. आणि त्यांच्या पाठीशी उभे असलेले त्यांचे सद्गुरू! त्यामुळेच हे सगळे घडत होते, यात शंकाच नाही.

स्वामीजींच्या मध्ये सर्वांना ज्ञान देणारी, प्रेरणा देणारी, चेतना देणारी नितांत अलौकिक दिव्य शक्ती होती. त्यामुळे स्वामीजींना भेटायला समाजातील सर्व थरांतील लोक येत. यात मग राजकारणी, तंत्रज्ञ, वैज्ञानिक, डॉक्टर, व्यासंगी पंडित, प्राध्यापक-शिक्षक येत असत. त्यामुळे अनेक विषयांवर चर्चा होत असे. बऱ्याच वेळी नाना तिथेच असत. त्याची टिपणेही ते काढत असत. कशासाठी? तर या चर्चांचा उपयोग समाजाला कसा होईल याचे चिंतन नानांच्या मनात चालू असायचे. मग कोणी कोणी त्यांचे अनुभव-अडचणी असे सांगे. त्यावर उपायही स्वामीजी सांगत. या सगळया चिंतनाचा परिणाम म्हणजे 'आमचे आप्पा, आमचे स्वामी' हे पुस्तक आणि तेही स्वामीजींच्या समोर त्यांच्या परवानगीने तयार झाले.

त्याचबरोबर स्वामीजींच्या वेगवेगळया पुस्तकांवर मान्यवर लेखकांनी परीक्षण करावे आणि या पुस्तकाचे महत्त्व विशद करावे आणि समाजाला स्वामीजींचे मोठेपण दाखवून द्यावे अशी नानांची कल्पना. अनेक मान्यवरांशी बोलून नानांनी ती योजना कार्यवाहीत आणली आणि 'ही अनंत संपदा' प्रकाशित झाली.

एकदा उत्तरकाशीला उत्सवासाठी जायचे होते. पण माझ्या आईला (म्हणजे वसुधा परांजपे) नोकरीमुळे जाता येत नव्हते. नाना त्या वेळी निवृत्त झाले होते. ते जाऊ शकले नाहीत, पण म्हणून ते  पुण्यात स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी भावार्चनेबद्दल आपले प्रकाशकीय सविस्तर लिहून काढले आणि स्वामीजींना दाखवले. यापेक्षा वेगळी गुरूंची सेवा कोणती असू शकते? नानांची गुरुनिष्ठा अलौकिक होती यात शंकाच नाही. गुरू हाच त्यांच्या जीवनाचा आधार आणि सर्वस्व. आज नानांच्या वयाला 86 वर्षे पूर्ण झाली आणि स्वामीजींच्या निर्णयाला 15 वर्षे उलटली. पण तरीही कोणताही लेख, कविता लिहिली की आधी स्वामींसमोर ठेवणार, त्यांना मनोगत सांगणार आणि मगच अप्पांसमोरून हलणार. आजच्या जमान्यात ही अपूर्व गुरुभक्ती जवळजवळ लोप पावली आहे. पण नानांचे जीवन म्हणजे गुरुनिष्ठेचा, गुरुभक्तीचा वस्तुपाठच आहे.    9423971653