भीमा कोरेगावची आग कोणाला जाळेल?

 विवेक मराठी  05-Jan-2018

 

लोक सोईपुरते संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करतात, तर दुसरीकडे संविधानाला आणि बाबासाहेबांच्या विचाराला हरताळ फासायचा अशी दुटप्पी खेळी ही मंडळी खेळतात. जेव्हा जेव्हा हिंदुत्ववादी विचाराचे सरकार सत्तेत येते, तेव्हा तेव्हा अशा खेळींना ऊत येत असतो. युती शासनाच्या काळातील रमाबाई आंबेडकर नगरातील दंगल आणि काल-परवा भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटना या एकाच मालिकेतील आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या समाजबांधवांवर हल्ला झाला, दगडफेक झाली. गाडयांची तोडफोड आणि जाळपोळ झाली. या घटनेमुळे सामाजिक तणाव निर्माण झाला. खरे तर असा तणाव निर्माण व्हावा आणि जनतेला अराजकाच्या तोंडावर उभे करून आपला स्वार्थ साधता यावा, अशीच काही मंडळींची मनीषा होती. हल्ल्याची घटना घडताच प्रसारमाध्यमातून हीच मंडळी गरळ ओकू लागली आणि दलित विरुध्द मराठा, दलित विरुध्द हिंदू अशी विभागणी करण्यात ते काही क्षणांत यशस्वीही झाले. तीन तारखेला प्रकाश आंबेडकरांनी बंद पुकारून समाजाची अधिकच अडवणूक करत सामाजिक तणावाला अधिक गडद केले. या साऱ्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव कोणी पेटवले आणि त्यामागे कोणत्या अदृश्य शक्ती कार्यरत होत्या, याचा शोध घेताना नक्षलवादी चळवळीचा हस्तक्षेप समोर येत आहे. भीमा कोरेगावच्या निमित्ताने महाराष्ट्रात अराजक निर्माण करण्याचा डाव तूर्तास तरी उधळला गेला असला, तरी आपण आता ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहोत, हे लक्षात ठेवायला हवे.   

एक जानेवारीला भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या समूहावर शिक्रापूर, सणसवाडी, वडू तुळापूर परिसरात दगडफेक झाली, गाडया फोडल्या, एका तरुणाचा मृत्यू झाला आणि त्यातून महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना अचानक घडलेली नाही, तर सामाजिक तणाव निर्माण व्हावा यासाठी काही मंडळी आधीपासूनच कार्यरत होती, हे आता समोर येऊ लागले आहे. दलित समाजाच्या भावनांना हात घालत दलितांविरुध्द मराठा-ब्राह्मण समाजाला शत्रू म्हणून उभे करण्याचा हा सुनियोजित डाव होता. काहीही करून समाजात अराजक निर्माण करायचे हेच ज्याचे ध्येय आहे, ते लोक सोईपुरते संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करतात, तर दुसरीकडे संविधानाला आणि बाबासाहेबांच्या विचाराला हरताळ फासायचा अशी दुटप्पी खेळी ही मंडळी खेळतात. जेव्हा जेव्हा हिंदुत्ववादी विचाराचे सरकार सत्तेत येते, तेव्हा तेव्हा अशा खेळींना ऊत येत असतो. युती शासनाच्या काळातील रमाबाई आंबेडकर नगरातील दंगल आणि काल-परवा भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटना या एकाच मालिकेतील आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. काहीही करून दलित समाजाला चिथावणी द्यायची आणि समाजस्वास्थ्य बिघडवायचे, असे हे सुनियोजित षडयंत्र आहे.

एक तारखेला भीमा कोरेगावमध्ये दुर्दैवी घटना घडली, पण त्याची पटकथा खूप आधीच लिहिली होती. एक जानेवारीच्या आधीच्या काही घटना आणि प्रसंग आपण डोळयासमोर आणले की याची साक्ष पटते. विकासाच्या आणि हिंदुत्वाच्या मुद्दयावर संघटित झालेल्या, सत्तेवर आलेल्या पक्षाला नामोहरण करायचे असेल, तर कडवा जातवादच उपयोगाचा आहे, हे सत्तेबाहेर फेकले गेलेल्यांना आणि सत्तेकडे आशाळभूतपणे डोळे लावून बसलेल्या मंडळींना पक्के ठाऊक आहे. जातवादाचा आधार घेऊन या मंडळींनी आधीही आपले राजकारण केले आहे. एका बाजूला जातिअंताचा लढा चालवणारेच गुजरात निवडणुकीत जातवादाची आणि जातीय मताची लिटमस्ट टेस्ट घेत होते. आजच्या काळात हा जातवादच आपल्याला पुन्हा सत्तासोपानाकडे घेऊन जाऊ शकतो, हे लक्षात आलेल्या मंडळींना अधिकच चेव आला आणि भीमा कोरेगावच्या निमित्ताने जातवादाला नव्याने हवा देण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात हे काही अंशी यशस्वी झाले असले, तरी यामागची पाशवी मानसिकता आता समाजाला समजू लागली आहे.

एक जानेवारीच्या आधी तीन दिवस भीमा कोरेगावजवळील वडू तुळापूरमध्ये सामाजिक तणाव निर्माण होईल असा प्रकार बाहेरच्या लोकांनी येऊन केला. प्रश्न दोन्ही बाजूंकडील अस्मितेचा आणि भावनिकतेचा होता. समाजात वितुष्ट निर्माण व्हावे असे वाटणाऱ्यांना या अस्मितांची आणि भावनांची पक्की जाण असल्याने हा तणाव वाढेल अशीच योजना केली. परिणामी 29 तारखेपासून भीमा कोरेगाव परिसर हा सामाजिक तणावाचा शिकार झाला. त्यानंतर दोनच दिवसांनी पुण्याच्या शनिवारवाडयासमोर नवपेशवाई गाडण्यासाठी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली. महाराष्ट्रातील सुमारे 250 संघटना-संस्थांनी या एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. त्यामध्ये नक्षलवादी म्हणून घोषित असलेला सुधीर ढवळे आणि कबीर कला मंच नावाची संघटना - जी नक्षलसंबंधी आहे, यांचा व्यासपीठावरचा वावर लक्षात येण्यासारखा होता. या एल्गार परिषदेत जिग्नेश मेवाणी, उमर खालिद, प्रकाश आंबेडकर अशा मंडळींनी नवपेशवाईचे - म्हणजेच भाजपाचे केंद्रातील व राज्यातील सरकार उलथवून लावण्याच्या घोषणा केल्या होत्या. इतिहासातील मिथकाचा आधार घेऊन आजचे समाजवास्तव कलुषित करणे आणि त्यातून राजकीय पोळी भाजून घेणे हा एकमात्र उद्देश डोळयासमोर ठेवून एल्गार पुकारणारे 1 जानेवारीला भीमा कोरेगावमध्ये न जाता बाहेरून सूत्र हलवत राहिले. परिणामी त्या दिवशीची दुर्दैवी घटना झाली, असे म्हणण्यास खूप वाव आहे. आपण या तीन घटनांचा सूत्रबध्द रूपाने विचार केला, तर भीमा कोरेगावची घटना किती सुनियोजित होती हे लक्षात येईल. पोलीस तपासात नक्षलवादी चळवळीकडे बोट दाखवले जात असून तसे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. शहरी भागात आता नक्षलवादी चळवळीने आपले बस्तान बसवले आहे, याचा हा पुरावा आहे. आपला अराजकाचा विचार समाजावर लादण्यासाठी या मंडळींनी भीमा कोरेगावचा मुहूर्त साधला आणि दलित समाजाला आपल्या हातचे बाहुले बनवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज या नक्षली विचाराचा कधीही स्वीकार करणार नाही, पण भीमा कोरेगावला दलित समाजाच्या आधाराने आपली खेळी खेळण्यात ही मंडळी यशस्वी झाली. भीमा कोरेगावमध्ये अघटित घडवून समाजात जातीय तेढ निर्माण करण्यात ही मंडळी यशस्वी झाली आहेत. एका बाजूला समाजात तेढ आणि असुरक्षितेचे वातावरण निर्माण करणारे मात्र माध्यमातून हिंदुत्ववादी संघटनाच्या पदरात या अनुचित घटनेचे पाप घालून मोकळे झाले. प्रकाश आंबेडकर ज्या प्रकारे हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप करत आहेत, ते पाहता हा सारा प्रकार पूर्वनियोजित आहे, हे लक्षात येत आहे.

 

जेव्हा जेव्हा समाजात अशांतता निर्माण होते, तेव्हा तेव्हा समाजधुरीणांनी समन्वयाची भूमिका घेणे अपेक्षित असते. पण शरद पवार यांनी भीमा कोरेगावच्या आगीत पेट्रोल ओतण्याचे काम केले. ''या घटनेत हिंदुत्ववादी मंडळी असून ते पुण्यातून आले होते'' असे शरद पवार यांनी माध्यमांना सांगितले. पवारांकडे एवढी खात्रीशीर माहिती होती, तर त्यांनी तपास यंत्रणांकडे आधी धाव का घेतली नाही? महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ही जबाबदारी नव्हती का? दुसऱ्याचे घर जळत असताना त्यावर आपली पोळी भाजून घेण्याचे काम या निमित्ताने शरद पवार यांनी केले, असे म्हणायला खूपच वाव आहे. समाजात दुफळी निर्माण करून सामाजिक तणावाबरोबरच दुरावलेली दलित मतपेढी स्वतःकडे वळवण्याच्या क्षुद्र लालसेने शरद पवार असे वागले असतील का? दीर्घकाळ सत्तेच्या बाहेर राहणे हा शरद पवार यांचा स्वभाव नाही. काहीही करून सत्तासुंदरीला आपलेसे करायचे हाच त्यांचा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे भीमा कोरेगावची घटना म्हणजे आपले ईप्सित साध्य करण्याची नामी संधी असल्याचे लक्षात येताच शरद पवार तातडीने माध्यमांपुढे बोलले. पुण्याचे हिंदुत्ववादी असे म्हणताना शरद पवारांना ब्राह्मण म्हणायचे होते का? प्रत्यक्षात मात्र या घटनेला 'दलित विरुध्द मराठा' अशा स्वरूपात माध्यमांतून दाखवले गेले. त्यानंतरही शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली नाही. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा तरुण आता शरद पवारांच्या भानामतीला बळी पडणार नाही, ही आजचे वास्तव आहे. तो भिडे गुरुजींबरोबर 'बि घडत' आहे, हीच शरद पवारांची खरी मळमळ आहे आणि त्यातून ते असे विखारी, आगलावे वक्तव्य करत आहेत. भीमा कोरेगावच्या निमित्ताने सामाजिक तेढ वाढवण्यात शरद पवार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत, हे मतदार कधीही विसरणार नाहीत.

 

 

 

भीमा कोरेगावच्या घटनेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. स्वबळावर अकोला शहरही बंद करण्याइतपत प्रकाश आंबेडकर यांची ताकद नाही. तरीही बंद झाला याची अनेक कारणे आहेत. नेतृत्वहीन दलित समाजाला भीमा कोरेगाव येथे झालेला हल्ला हा आपल्या अस्मितेवरचा हल्ला वाटणे स्वाभाविक होते. त्यातून जो असंतोष तयार झाला, त्यामुळे समाज रस्त्यावर उतरणे स्वाभाविक होते. एक व दोन तारखेला कोणीही बंदची किंवा आंदोलनाची हाक न देताही समाज रस्तावर उतरला होता. या दोन दिवसांत दलित समाजाने नेतृत्वहीन राहून आपला राग व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी बंदची हाक दिली. बंदला चंागला प्रतिसाद लाभला तो प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे नव्हे, तर समाजाच्या मनात साचलेल्या असंतोषामुळे. बहुसंख्य लोक भीतीमुळे, किंवा समाजस्वास्थ्य अधिक बिघडू नये याच कारणासाठी शांत राहिले. प्रकाश आंबेडकर म्हणतात, की ''पंधरा टक्के जनतेने बंदला प्रतिसाद दिला.'' हे जरी खरे असले, तरी ती पंधरा टक्के जनता प्रकाश आंबेडकरांची समर्थक नव्हती. बदलती सामाजिक परिस्थिती आणि तणाव लक्षात घेऊन तीन जानेवारीला घरात बसलेला समाज मनातून प्रचंड अस्वस्थ आहे. तो प्रकाश आंबेडकरांचा समर्थक नाही. भीमा कोरेगाव प्रकरणातून प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच्या नेतृत्वाला दलिताचा महाराष्ट्रातील एकमेव नेता अशी मोहोर लावून घेतली आहे. काही अतिउत्साही मंडळींनी प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणूनही घोषित केले आहे. प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला काहीच हरकत नाही. पण मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे पूर्ण करण्यासाठी या अराजकाच्या आणि रक्तलांच्छनाच्या पायघडया कशासाठी? प्रकाश आंबेडकरांनी संविधानाच्या आधाराने निवडून यावे, बहुमत सिध्द करावे आणि खुशाल मुख्यमंत्री व्हावे, पण त्यासाठी नक्षली लोकांना हाताशी धरून दलितांच्या जिवाशी खेळू नये. प्रकाश आंबेडकरांनी याआधी अनेक वेळा नक्षलवादाशी असलेले संबंध उघड केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाबाबत शंका व्यक्त केली असून आपला साम्यवादी चेहरा दाखवला आहे. सचिन साठे, शीतल साठे या नक्षलवादाशी संबंधित जोडीला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून हेच प्रकाश आंबेडकर धावपळ करत होते. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे नक्षली साथीदार भीमा कोरेगाव येथे सामाजिक दुफळी निर्माण करण्यात यशस्वी झाले असले, तरी या यशाचा आनंद त्यांना फार काळ घेता येणार नाही. द्वेष, हत्या आणि सामाजिक दुफळी यातून प्रकाश आंबेडकरांना सत्तेचा सोपान पार करता येणार नाही. त्यासाठी त्यांना समतेचा, ममतेचा आणि संविधानाचाच आधार घ्यावा लागणार आहे, हे त्यांनी विसरू नये.

भीमा कोरेगावच्या घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्रात अराजक निर्माण करून सत्ता संपादनाचे स्वप्न पाहणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेलही, पण तेवढयापुरता हा प्रश्न मर्यादित राहत नाही. मूठभरांनी स्वार्थासाठी लावलेली आग विझली असली, तरी धग अजूनही कायम आहे. या घटनेमुळे समाजात लागलेली आग आज वरवर विझलेली दिसत असली, तरी आतमध्ये विखाराचे निखारे धुमसत आहेत. आजही कोल्हापूर, सांगली, कल्याण अजूनही तणावाखाली आहेत. ज्या वडू तुळापूरमधून भीमा कोरेगावमधील आग भडकली, तेथे दोन्हीही समाजगटांत समेट घडून आली आहे. आणि गाव पुन्हा गुण्यागोविंदाने पहिल्यासारखा व्यवहार करत असले, तरी समाजमनात निर्माण झालेली परस्पराविषयीची तेढ, द्वेषाची आग कुणाला जाळेल? आज आपल्या समाजाला काही स्वार्थी आणि समाजद्रोही मंडळींनी ज्वालामुखीच्या तोंडावर नेऊन ठेवले आहे. भविष्यात कोणत्याही क्षुल्लक कारणाने या सुप्त ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो आणि त्याची झळ शेवटी समाजलाच बसेल. भीमा कोरेगावच्या घटनेने महाराष्ट्रात सामाजिक दुफळीची आणि विद्वेषाची जी आग लावली आहे, ती विझण्यासाठी संवाद, संयम आणि समन्वय याच सूत्राचा वापर करावा लागणार आहे. भीमा कोरेगावच्या आगीत महाराष्ट्राने पुरोगामित्वाच्या बेगडी चेहऱ्याआडचा नक्षलवाद, जातीयवाद आणि राजकीय स्वार्थ स्पष्टपणे पाहिला आहे. आता उभ्या महाराष्ट्राची जबाबदारी आहे की भीमा कोरेगाव येथे लागलेल्या आगीत जातीयवाद, नक्षलवाद आणि स्वार्थी राजकारण जाळून समता, बंधुता आणि एकतेचे सोने उजळवून घेणे, मनामनात साचलेला विखार आणि द्वेष याच आगीत जाळून पुन्हा एकदा खरा पुरोगामी महाराष्ट्र उभा करणे. भीमा कोरेगावच्या आगीने हाच संदेश दिला आहे.   
  9594961860