यशस्वी झुंज

 विवेक मराठी  09-Jan-2018

***निलेश साठे***

मला कॅन्सर ऑपरेशननंतर केंद्रीय कार्यालयात एखाद्या नगण्य विभागाचा प्रमुख करा असं मी म्हटलं असतं, तर ते सहज शक्य होतं. पण मी त्या वेळी LIC Nomura Mutual Fundचा केवळ CEO झालो नाही, तर त्या कंपनीचा कायापालट करून ती नुकसानीतून काढून लाभप्रद केली. नंतर IRDAच्या सदस्यपदाची जाहीरात आली, तेव्हा माझं कॅन्सरचं तिसरं ऑपरेशन होऊन दोनच महिने झाले होते, पण मी अर्ज केला आणि मुलाखतीनंतर निवडला गेलो. मुंबई सोडून हैदराबादला आलो. गाव नवं, कामाचं स्वरूप नवं, पण इथेही झोकून काम केलं आणि माझ्या कामाचा ठसा उमटवला. पुढे काय? 2019 मेनंतर नागपूरला जाऊन समाजसेवा करायची आहे. ब्लू प्रिंट तयार आहे.

कॅन्सर हा शब्द पूर्वी इतका आता भयावह राहिला नसला, तरी 'कॅन्सरमुक्त' व्यक्ती दिसणं आजही दुर्मीळ. गुगलवर सर्च केलं की कळतं की कॅन्सरचे बहुतांश रोगी पाच वर्षांच्या आत दगावतात. त्याला दोन प्रमुख कारणं असतात. एक म्हणजे कॅन्सरचं निदानच उशिरा होतं आणि दुसरं आर्थिक वा अन्य कारणाने सर्जरी केली जात नाही वा केल्यास बराच उशीर झालेला असतो. शिवाय कॅन्सर कुठे झाला आहे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ऑपरेशनने कॅन्सरची गाठ पूर्णपणे काढून टाकता येत असल्याने पेशंटला दीर्घायुष्य लाभणं शक्य असतं. पण बोन मॅरो किंवा रक्तातल्या कॅन्सर पेशी पूर्ण काढून टाकणं जवळपास अशक्य असल्याने तसंच ऑपरेशनची शक्यता नसल्याने असे कॅन्सरग्रस्त पेशंट्स पूर्ण बरे झालेले दिसत नाहीत. दुसरं कारण म्हणजे कॅन्सर शरीराला कुरतडतोच, पण त्याहूनही अधिक मनाला म्हणजे विचारांना कुरतडतो. शरीराने खंगून जाण्याआधी पेशंट मनानेच खंगतो आणि जिवंतपणीच त्याचा मृत्यू होतो. मला 2012 साली कॅन्सर झाला. त्यानंतर माझ्या संपर्कातल्या किमान 10 जणांना कॅन्सर झाला. त्या 10पैकी फक्त एकच व्यक्ती जिवंत आहे. आर्थिक स्थिती नीट नसल्याने उपचारावरील खर्च परवडत नाही, म्हणून उपचार घेता आले नाहीत अशी यापैकी एकही केस नाही. मी मात्र कॅन्सरची तीन ऑपरेशन्स होऊनही 5 वर्षांहून अधिक जगतो आहे. माझ्यात असं काही वेगळं विशेष आहे का की, ज्यायोगे मी कॅन्सरफ्री आयुष्य जगतो आहे? स्नेही म्हणतात, ''तुझी जबरदस्त विल पॉवर.'' कुणी म्हणतात, ''पत्नीची पूर्ण साथ.'' कुणी म्हणतात, ''जीवनाकडे बघण्याचा तुझा सकारात्मक दृष्टीकोन.'' कुणी म्हणतात, ''आर्थिक स्टेबिलिटी.'' कुणी म्हणतात, ''जीवनाच्या अशा टप्प्यावर तू असताना तुला कॅन्सरने ग्रासलं, जेव्हा तुझी मुलं नोकरीत सेटल झाली होती. तुला आर्थिक विवंचना नव्हती.'' अर्थात कुठल्याही घटनेकडे प्रत्येक जण वेगळया दृष्टीने बघत असतो. मला मात्र वाटतं या सर्व गोष्टी तर खऱ्याच, पण परमेश्वरी पाठबळ आणि स्वस्थचित्त स्वभाव या बळावर मी कॅन्सरची तीन ऑपरेशन्स आणि प्रत्येकी 42 तासांच्या 6 केमो घेऊनही आजवर उत्तम शारीरिक आणि मानसिक स्थितीत आहे.

मी कॅन्सरमुक्त झालो हा, रोगाचं योग्य आणि लवकर झालेलं निदान, डॉक्टरांचं नैपुण्य, उपचार देण्यातली तत्परता, ज्येष्ठांचे आशीर्वाद, आर्थिक सुबत्ता, घरच्या सर्वांची मदत, माझी Otherwise चांगली असलेली प्रकृती, जीवनाकडे बघण्याचा माझा सकारात्मक दृष्टीकोन या सर्वांचा एकत्रित परिणाम आहे. डॉक्टरांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते. डॉक्टरांचा आश्वासक सूर, पेशंटला घाबरवून न सोडता पण ऑपरेशन कसं केलं जाईल, तयारी काय, कशी, किती ठेवली जाईल याची पूर्ण माहिती दिली, तर पेशंटचं निम्मं टेन्शन दूर होतं. त्यासाठी डॉक्टरांनी पेशंटला योग्य तो वेळ द्यायला हवा, त्याच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या सर्व प्रश्नांना, शंकांना त्यांनी यथोचित उत्तरे द्यायला हवीत.

माणसाला तोपर्यंत जगायची उभारी असते, जोपर्यंत त्याला पुढे काहीतरी करायचं शिल्लक असतं. म्हणून पेशंटने सतत मला काय करायचं राह्यलंय आणि ते मला करायचंय असा विचार करत राहायला हवं. मला कॅन्सर ऑपरेशननंतर केंद्रीय कार्यालयात एखाद्या नगण्य विभागाचा प्रमुख करा असं मी म्हटलं असतं, तर ते सहज शक्य होतं. पण मी त्या वेळी LIC Nomura Mutual Fundचा केवळ CEO झालो नाही, तर त्या कंपनीचा कायापालट करून ती नुकसानीतून काढून लाभप्रद केली. नंतर IRDAच्या सदस्यपदाची जाहीरात आली, तेव्हा माझं कॅन्सरचं तिसरं ऑपरेशन होऊन दोनच महिने झाले होते, पण मी अर्ज केला आणि मुलाखतीनंतर निवडला गेलो. मुंबई सोडून हैदराबादला आलो. गाव नवं, कामाचं स्वरूप नवं, पण इथेही झोकून काम केलं आणि माझ्या कामाचा ठसा उमटवला. पुढे काय? 2019 मेनंतर नागपूरला जाऊन समाजसेवा करायची आहे. ब्लू प्रिंट तयार आहे.

 

 

माझा कॅन्सरचा प्रवास

एप्रिल 2017मध्ये हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये PET CT Scan करून मुंबईचे लिव्हर स्पेशालिस्ट माझे कॅन्सर कन्सलटंट डॉ. अंकुर शहा यांच्या क्लिनिकला त्यांना रिपोर्टस दाखवायला गेलो. रिपोर्ट्स बघून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ते लपवू शकले नाहीत. हसून मला म्हणाले, ‘‘Mr. Sathe, 5 years are over since you were diagnosed of Cancer. Your survival indicated that you have won over Cancer. You are Cancer free. Congrats! तुम्हाला कुठलीही मेडिसिन्स घ्यायची आता आवश्यकता नाही. दर वर्षी एप्रिल महिन्यात एकदा PET CT करीत जा. I wish you long and healthy Cancer-free life.’’

त्यांच्या या बोलण्याने आम्ही अर्थातच आनंदलो. डॉक्टरांकडून घरी परतताना मागील पाच वर्षांच्या घटना आमच्या अंतःचक्षूंसमोर उलगडू लागल्या.

2011 एप्रिलमध्ये माझी मुंबईहून दिल्लीला बदली झाली. LICमध्ये उत्तर क्षेत्राचा क्षेत्रीय प्रबंधक म्हणून मी रुजू झालो. नीलांबरीची तेव्हा LICमध्ये असिस्टंट म्हणून 28 वर्षं नोकरी झाली होती. तिने स्वत:च निर्णय घेतला आणि नोकरीचा राजीनामा देऊन ती माझ्याबरोबर दिल्लीला आली. जम्मू-काश्मीर ते राजस्थान एवढया भूभागातील 7 राज्यं आणि 1 केंद्रशासित प्रदेश असलेल्या उत्तर क्षेत्रात क्षेत्रीय प्रबंधक म्हणून काम करायची संधी मिळणं ही विशेष बाब तर होतीच, कारण अनेक वरिष्ठ अधिकारी या पदावरील नियुक्तीसाठी फिल्डिंग लावून बसले असूनही एलआयसीचे तत्कालीन चेअरमन विजयन साहेबांनी माझ्याच नावावर शिक्कामोर्तब केलं. अनेकांना याचं अप्रूप वाटलं. मी माझ्या कार्यपध्दतीनुरूप आपल्या कार्याचा ठसा उमटवायला सुरुवात केली. एलआयसीची व्यवसायवाढ तर होत होतीच, त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेशनची घडीही मी नीट बसवू लागलो होतो. त्या दरम्यान अधूनमधून मला शौचातून रक्तस्राव होत असल्याचं मला जाणवलं, म्हणून दिल्लीच्या एका डॉक्टरांकडून मी औषधही घेत होतो. साधारण नोव्हेंबर 2011च्या सुमारास मला जवळपास रोजच रक्तस्राव सुरू झाला. डॉक्टरांना पाईल्सची शंका आल्याने पालेभाज्या वर्ज्य करा, पचायला हलकं असलेलं जेवण घ्या वगैरे उपाय त्यांनी केले. पण त्या उपायांचा किंवा औषधांचा खूपसा उपयोग होत नव्हता. त्या दरम्यान काही कारणाने मी नागपूरला आलो असताना नागपूरचे पाईल्स स्पेशालिस्ट डॉ. प्रवीण गुप्ता यांच्याकडे मी गेलो. त्यांनी काही औषधे देऊन पाहिली, पण परिणाम होईना, तेव्हा त्यांनी मला डॉ. जोगळेकर (सर्जन) यांच्याकडे रेफर केलं. त्यांनी रेक्टमची तपासणी केली आणि रेक्टममध्ये पॉलिप (गळू) असल्याचं सांगितलं. तेव्हाच ते असंही म्हणाले की, त्याची Biopsy करणं गरजेचं आहे आणि ते गळू Non malignant असल्यास ते स्वत: ऑपरेशन करतील, पण जर Biopsy reportमध्ये Malignancy आढळली, तर कॅन्सर स्पेशालिस्टकडूनच ऑपरेशन करून घ्यावं लागेल. त्यानुसार डॉ. अभिराम परांजपे यांनी Biopsy केली. रिपोर्ट मिळायला आठ-दहा दिवस लागणार असल्याने मी दिल्लीस परतलो. मला मुंबईस मीटिंगला जावं लागल्याने मी 24 जानेवारीला मुंबईला आलो आणि इकडे नागपूरला माझ्या बहिणीच्या - नीलिमाच्या - यजमानांनी - सुधीर पाठक यांनी डॉ. मोघे यांच्या लॅबमधून Biopsy रिपोर्ट घेतला, ज्यात Malignancy कन्फर्म झाली होती. लगेच त्याने मला फोनवर ते सांगितलं आणि Biopsy report Scan करून ईमेल केला. त्या वेळी मी योगक्षेम या एलआयसीच्या मुख्यालयातच होतो. मी लगेच चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर साहेबांना भेटलो आणि मी दिल्लीला लगेच परत न जाता मुंबईलाच ऑपरेशन करण्याचा माझा निर्णय त्यांच्या कानावर घातला. माझा मित्र डॉ. अशोक देशपांडे याने रहेजा हॉस्पिटलमध्ये ऑन्कोसर्जन डॉ. रमण देशपांडे यांची दुसऱ्या दिवशीची, म्हणजे 25 जानेवारीची अपॉइंटमेंट घेऊन दिली. त्यांनी नीट समजावून सांगितलं की, ''पॉलिपची जागा जर रेक्टमच्या ओपनिंगपासून किमान 10 सें.मी. दूर असेल, तर मला तुमचं रेक्टम वाचवता येईल. Otherwise I will be ruthless in removing the rectum.'' गुदद्वार काढून टाकल्यावर पोटाला छेद देऊन Artificial rectum केलं जातं. त्यावर पिशवी चिकटवली जाते, जी रोज साफ करावी लागते. वगैरे वगैरे... अर्थात पॉलिपची स्थिती लक्षात येण्यासाठी PET CT Scan व इतर सर्व चाचण्या करून घेतल्या आणि 27 जानेवारीला सर्व रिपोर्ट्स बघून डॉक्टर म्हणाले, ‘‘Polyp is at about 12/13 Cms. Most probably I may be able to save your rectum. कधी ऑपरेशन करायचं? तुम्हाला Second Option किंवा पंचांगानुसार चांगला दिवस वगैरे बघायचा असेल तर ते सारं ठरवून मला पुढील आठवडयात भेटा.'' मी त्यांना म्हणालो, ''डॉक्टर, आपण लवकरात लवकर कधी ऑपरेशन करू शकाल?'' मला Second Option, स्वामी, पंचांग, चांगला दिवस यापैकी कुठल्याही कारणाने ऑपरेशनला उशीर करायचा नव्हता. त्याप्रमाणे लगेचच दुसऱ्या दिवशी माझं Operation झालं. नंतर एकदा डॉ. रमण देशपांडे मला म्हणाले, ‘‘Biopsy report मिळाल्यानंतर केवळ 4 दिवसांत ऑपरेशन केलेली माझी ही पहिलीच केस.'' 10-12 दिवस हॉस्पिटलमध्ये राहून 8 दिवस घरी विश्रांती झाल्यावर 20 दिवसांत मी दिल्लीला कामावर रुजू झालो. रेक्टम तात्पुरतं Disable करून पोटाला कोलोस्टोमी बॅग लावली होती, जी रेक्टमची जखम सुकल्यावर तीन-चार महिन्यांनी काढून पोटावरची चिरा शिवून रेक्टम पुन्हा कार्यरत करायचं होतं. ते 3 महिने गर्दीच्या जागी न जाणं, दर 3-4 तासांनी स्टोमा स्वच्छ करणं, 4-6 दिवसांनी जुनी पिशवी काढून नवी लावणं वगैरे कामं नीलांबरीच्या मदतीने करीत होतो.

त्यादरम्यान चेअरमन साहेबांनी मला सांगितलं की, ''तुमच्या प्रकृतीचा विचार करता केंद्रीय कार्यालयातच एखाद्या विभागाचा प्रमुख म्हणून तुमची मुंबईला बदली करायचा माझा विचार आहे.'' त्यावर मी त्यांना म्हटलं, ''मला एकतर याच पदावर ठेवावं वा याहून अधिक आव्हानात्मक असाइनमेंट द्यावी.''

एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडचे सीईओ आणि Director या पदावर माझी नियुक्ती केली गेली. त्या वेळी या म्युच्युअल फंडाची स्थिती खूपच दयनीय झाली होती. Private Sector MF असूनही तो Public Sector MFसारखा चालवला जात होता. मी त्या कंपनीला दोन वर्षात profitमध्ये आणलं. सर्व कर्मचाऱ्यांना bell curveवर आणून त्यांची वार्षिक appraisals सुरू केली. एलआयसीतून प्रतिनियुक्तीवर असणारे अधिकारी परत पाठवले. त्या जागी MFचा अनुभव असलेले कर्मचारी Market related Salaryवर नियुक्त केले. या बदलांचा परिणाम म्हणजे त्या LICMFने कात टाकली. 5400 कोटी असणारी मालमत्ता पुढील 3 वर्षांत 15000 कोटीवर जाऊन म्युच्युअल फंड नफ्यात आला.

त्या दरम्यान मे 2012ला Choloslomy bag removalचं ऑपरेशन झालं. ठरल्याप्रमाणे ऑक्टोबर 2012च्या सोनाग्राफीमध्ये काहीच विपरीत आढळलं नाही. मात्र मार्च 2013च्या सोनोग्राफीमध्ये लिव्हरवर Metastis दिसल्याने CT Scan आणि biopsy केली, तर लिव्हरवर सेकंडरीज डेव्हलप झाल्याचं दिसलं. दोन सेगमेंट्सवर कॅन्सरची लागण झाली होती. डॉ. रमण देशपांडे यांनी मला लिव्हर स्पेशालिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला.

 

कोकिलाबेन हॉस्पिटलमधील लिव्हर स्पेशालिस्ट डॉ. अंकुर शहा यांनी ऑपरेशन्सचा सल्ला दिला आणि मार्च 2013ला 30% लिव्हर कापून काढलं. त्यानंतर ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. शास्त्री यांच्या सल्ल्याने केमोथेरपीच्या 6 सायकल्स घ्यायचं ठरलं. दर 3 आठवडयांनी 3 दिवस ऍडमिट होऊन सलाईनमार्फत दर 20 सेकंदांना 1 थेंब इतक्या संथपणे 400 मि.ली.चा डोस संपायला 42 तास लागत असत. मी शुक्रवारी सायंकाळी ऍडमिट होऊन सोमवारी घरी येत असे आणि मंगळवारपासून ऑफिसला जात असे. सप्टेंबर 2013पर्यंत ही ट्रीटमेंट संपली. प्रोटोकॉलप्रमाणे दर तीन महिन्यांनी CT Scan करत होतो, पण तरीही ऑगस्ट 2014ला लिव्हरच्या दुसऱ्या दोन सेगमेंट्समध्ये पुन्हा कॅन्सरची लागण झाल्याचं आढळलं. या वेळी ऑपरेशन जास्तच कठीण होतं. मी डॉक्टर अंकुर शहांना म्हणालो, ‘‘In 1961, my father died on operation table during kidney surgery. I do not want to die like him.’’ त्यांनी मला आश्वस्त केलं. म्हणाले, ‘‘Mr. Sathe, if I am not able to complete the surgery in the given time, I assure you, I will make you live with Cancer than allowing you to die without it.’’ माझं ऑपरेशन झालं. मी डोळे उघडले, तेव्हाच मला अंतर्मन सांगत होतं की मी आता कॅन्सरमुक्त झालो. पुढे मी जेव्हा IRDAमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मी डॉ. अंकुर शहांचा सल्ला घेण्यासाठी त्यांना भेटलो. ते मला म्हणाले, ‘‘Mr. Sathe, when I will write my memories, I will keep one page for you. It is unbelievable that a person after 3 major surgeries of Cancer and 6 series of chemo thinks of joining a new city at 58 years of age to do a role which he that never done in the past. I would not have accepted the offer even if it was 10 times lucrative. As far as Cancer is concerned, presently you are cancer free. And if cancer has to errupt, it may errupt either in Mumbai or Hyderabad. तुम्हाला जावंसं वाटतं आहे ना? मग तुम्ही खुशाल जा. प्रोटोकॉलप्रमाणे CT/PET CT करत जा. माझ्या शुभेच्छा!''

हैदराबादला 1 जुलै 2015ला रुजू झालो. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली. आयआरडीएमध्येही अनेक बदल घडवले. ही असाइनमेंट संपताना World bank/ADB अशा आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करायची इच्छा आहे. नाहीतर नागपूरला जाऊन संघाच्या संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. कॅन्सर पेशंट्सना आणि त्यांच्या कुटुंबीयांना समुपदेशन तर करीत असतोच आणि करीत राहीन.

-9892526851