ब्राह्मी 

 विवेक मराठी  10-Oct-2018

प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत, भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. आजचे तीर्थस्थळ आहे सिंध प्रांतातील मिरपूर खास.

वेदांनी गौरवलेला सरस्वती-सिंधू नदीच्या परिसराचा दक्षिणेकडचा प्रांत म्हणजे सिंध. वैदिक देवता - इंद्र, अग्नी, मित्र, वरुण यांना पूजणारा हा प्रांत. इंद्रादी देव ज्याला महान मानतात, तो देव म्हणजे ब्रह्म. ब्रह्माची कथा केनोपनिषदात येते ती अशी -

एकदा इंद्र, अग्नी आणि वायू या देवांनी असुरांच्या विरुध्द एक युध्द जिंकले. ते स्वत:ला त्या विजयाचे कर्ते समजू लागले. एकदा, हे तिघे जण एकत्र असताना, त्यांच्यासमोर एक दिव्य व्यक्ती प्रकट झाली. ती व्यक्ती कोण आहे, हे जाणण्यासाठी अग्नी गेला, त्याने विचारपूस केली. तेव्हा त्या व्यक्तीने त्याला विचारले, ''तू कोण आहेस?'' अग्नी म्हणाला, ''मी अग्नी असून, मी काहीही जाळू शकतो.'' त्यावर त्या व्यक्तीने एक गवताची काडी देऊन, ती जाळून दाखवायला सांगितले. अग्नीला काही केल्या एक लहानशी काडी जाळता आली नाही. तो हताश होऊन परत आला. इंद्राला आणि वायूला सांगितले, ''मला काही ती व्यक्ती कोण आहे ते कळत नाहीये.'' मग वायू गेला. त्या व्यक्तीने वायूला गवताची काडी उडवायला सांगितले. वायूला काही ते जमले नाही. मग इंद्र गेला. अग्नी आणि वायू दोघांचा अनुभव ऐकल्याने, इंद्राने नम्रतेने ती व्यक्ती कोण आहे याची चौकशी केली. तेव्हा उमा हैमावती नावाची देवी प्रकट झाली आणि तिने त्या दिव्य पुरुषाची ओळख करून देत म्हणाली, ''हा ब्रह्मदेव असून, तो सर्व गोष्टींचा कर्ता आहे. तुम्हाला असे वाटते की तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने युध्द जिंकलात, पण खरे असे की ते कार्य ब्रह्माने तुमच्यामार्फत करवून घेतले. खरा कर्ता ब्रह्मदेव आहे. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचे पानदेखील हालू शकत नाही.'' ब्रह्माला जाणल्यावर, इंद्र, अग्नी आणि वायू यांनी ब्रह्माला वंदन केले व त्यांचा कर्तेपणाचा अभिमान निघून गेला.

ही कथा एक रूपक आहे, मनातील सुष्ट आणि दुष्ट शक्तींच्या युध्दाचे. 'रात्रंदिस आम्हा युध्दाचा प्रसंग' असे संत तुकाराम म्हणतात, ते हे युध्द. त्या युध्दात जेव्हा सुष्ट विचारांचा जय होतो, तेव्हा गर्वाने फुलून न जाता जाणावे की तो विजय ब्रह्माने दिलेला असतो.

सृष्टिनिर्माता ब्रह्म 'कर्ता', सृष्टीची काळजी वाहणारा विष्णू 'धर्ता' आणि सृष्टीचा संहार करणारा महेश 'हर्ता'. ब्रह्मा-विष्णू-महेश या तीन देवांच्या शक्ती आहेत ब्राह्मी, वैष्णवी आणि माहेश्वरी - अर्थात सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती. ब्राह्मी/सरस्वती ही ब्रह्माची शक्ती असल्याने हंस हे तिचे आणि ब्रह्माचे वाहन आहे. तिच्या हातातही ब्रह्माप्रमाणे जपाची माला आहे. आणि ब्रह्माप्रमाणे तीसुध्दा शुभ्र वस्त्र धारण करणारी देवी आहे.  

ब्रह्म-ब्राह्मीची जोडी सरस्वती नदीच्या काठाने ब्रह्मदेवाच्या मंदिरांच्या रूपात प्रकट झाली असावी असे वाटते. आज राजस्थानमध्ये पुष्कर येथील ब्रह्माच्या मंदिराची कथा सरस्वती नदीशी जोडली आहे. किंवा कोकणात हरिहरेश्वरला सावित्री-गायत्री या ब्रह्मपत्नी cum नद्यांची कथा ब्रह्मदेवाशी जोडली आहे. त्यावरून पूर्वी सरस्वती नदीच्या काठाने ब्रह्म मंदिरे अस्तित्वात असावीत. या मताला दुजोरा देणारे एक कारण आहे मीरपूर खास येथे सापडलेली ब्रह्माची मूर्ती.

आज सरस्वती नदीचे कोरडे पात्र भारतात घग्गर आणि सिंधमध्ये हाकरा या नावाने ओळखले जाते. हाकरापासून जवळ मिरपूर खास नावाचे एक गाव आहे. मिरपूर खास येथे गुप्त काळातील - साधारण 5व्या/6व्या शतकातील - ब्रह्माची मूर्ती सापडली होती. चार मुखे, हातात कमंडलू, गळयात यज्ञोपवित, कमरेला धोतर आणि खांद्यावर उत्तरीय घेतलेली ब्रह्माची अतिशय देखणी मूर्ती आहे. ब्राँझमध्ये केलेले हे एक उत्कृष्ट शिल्प आहे.

 

ब्रह्म व ब्राह्मी यांची जोडी एकमेकांना पूरक अशी आहे. सरस्वती ही वाचेची, शब्दाची, भाषेची देवी आहे. तर ब्रह्म हा कृतीचा देव आहे. ब्रह्माच्या कृतीला ब्राह्मीची वाचा साथ देते. किंवा ब्राह्मीच्या शब्दाला अनुसरून ब्रह्म कृती करतो! ब्रह्म या कर्ताची अर्धांगिनी ब्राह्मीची वाणी आहे!

मानवाची कोणतीही निर्मिती आधी विचारात येते, शब्दात येते, वाचेमध्ये येते. मग त्याची आखणी/design होते आणि मग कृतीने निर्मिती होते. Declaration of Independance असो नाहीतर वेरूळची लेणी असोत. आधी विचार शब्दात मांडला जातो आणि त्यानंतर कृतीने तो प्रत्यक्षात उतरतो. या कारणास्तव ब्राह्मी-ब्रह्म ही जोडी मानवाच्या सर्व प्रकारच्या निर्मितीची अधिष्ठात्री देवता आहे.

जो ब्रह्म आणि ब्राह्मी या शक्तींना शरण जातो, त्यांना जाणतो, तो मोजके बोलतो आणि जे बोलेल तशीच कृती करतो. असा मनुष्य साक्षात ब्रह्मच होय! त्याचे गुणगान करताना संत तुकाराम म्हणतात, 'बोले तैसा चाले त्याची वंदिन पाऊले, अंगे झाडीन अंगण, त्याचे दास्यत्व करेन.' 

एकूण कार्य करण्याची शक्ती शब्दात आहे. तो शब्द बोली असो किंवा लेखी असो. 'शब्द दिलाय'/'लिहून दिलंय' म्हणजे ती गोष्ट केल्यासारखीच असते, हे आपण व्यवहारातदेखील पाहतो! अर्थात ब्रह्म आणि ब्राह्मी एकमेकांपासून वेगळे नाहीत. त्यामुळे ब्रह्माची वाचा 'ब्राह्मी' आणि ब्रह्माची लिपीसुध्दा 'ब्राह्मी'! ती लिपी ब्रह्माने तयार केली, म्हणून ब्राह्मी! सरस्वती नदीच्या काठाने तयार झाली म्हणून ब्राह्मी. आणि लेखी शब्द हा सरस्वती वाणीचे दृश्य रूप म्हणून ती ब्राह्मी!

 मौर्य काळापासून किंवा त्या आधीपासून, साधारण इ.स.पूर्व तिसऱ्या/चौथ्या शतकापासून ब्राह्मी लिपी भारतभर वापरलेली दिसते. पुढे काळानुरूप व देशानुरूप बदल होऊन त्या लिपीमधून शारदा, मैथिली, गुरुमुखी, नागरी, देवनागरी, पूर्वनागरी, कानडी, तामिळ इत्यादी लिप्यांचा जन्म झाला.