प्रकाशाची नवी वाट

 विवेक मराठी  10-Oct-2018

आज अहिल्या महिला मंडळाच्या शंभर कार्यकर्त्या आपआपले संसार सांभाळून संस्थेच्या वेगवेगळया प्रकल्पांतून आपलं योगदान देत आहेत. स्वयंसिध्दा उपक्रमाच्या माध्यमातून आज अनेक महिलांना रोजगार मिळालाय. 'तुम्ही काय करता...' असं विचारल्यावर ''मी घरीच असते''. असं ओशाळून म्हणणाऱ्या गृहिणींना अहिल्या महिला मंडळाने प्रकाशाची नवी वाट दाखवलीय, असं निश्चितपणे म्हणावंसं वाटतं.

 अगदी अलीकडची, म्हणजे 16 सप्टेंबरची गोष्ट. दूरदर्शनच्या एका वाहिनीवर 'गावाकडच्या गोष्टी' हा कार्यक्रम सुरू होता. त्यात पनवेल तालुक्यातील मोहपाडा या छोटयाशा खेडयात घडलेलं विलक्षण स्थित्यंतर दाखवलं जात होतं. बहुजन समाजातील शंभर स्त्रिया (यातील फक्त 15 सुशिक्षित) अस्खलित उच्चारात पौराहित्य शिकवत होत्या. असंही कळलं की यामधील सहा जणींनी तर पुढे जाऊन संस्कृतची 'कोविद' परीक्षाही उत्तीर्ण केली. या महिलांमधील एकही स्त्री ब्राह्मण नाही, हे विशेष. यांना अशा प्रकारे सक्षम बनवण्याचं श्रेय जातं पेणचे स्वातंत्र्यसैनिक तात्या कर्वे यांच्याकडे. तात्यांनी आठवडयातले 3 दिवस मोहपाडयात राहून महिलांसाठी एक नवं कवाड उघडून दिलं. त्यांच्या चार-पाच वर्षांच्या तपश्चर्येनंतर आता या महिला स्वतंत्रपणे लग्न, मुंजी लावू लागल्या आहेत.

संस्कृतच्या प्रचार व प्रसाराला वाहून घेतलेल्या तात्या कर्वे यांनी अहिल्या महिला मंडळाच्या संस्कृत पाठशाळा या उपक्रमाद्वारे आजवर अनेक स्त्री-पुरुषांना संस्कृतमध्ये पारंगत केलंय. यातील काहींना शाळेत नोकरी मिळालीय, तर काहींनी स्वतंत्र क्लास सुरू केलेत. पौरोहित्य हा तर अनेकांच्या आयुष्याचा एक भाग बनलाय. एकटया अलिबागमध्येच तात्यांच्या शिकवणीतून पौरोहित्य करणाऱ्या स्त्री-पुरुषांची संख्या 300च्या वर आहे. अहिल्या महिला मंडळाचा हा उपक्रम आज या 101 वर्षीय तपस्व्याच्या मार्गदर्शनाखाली अव्याहत सुरू आहे.

तात्यांची मोठी मुलगी वासंती देव यांना समाजसेवेचा हा वारसा रक्तातूनच मिळाला. म्हणूनच समाजाचं देणं कसं फेडता येईल या विचाराने त्या अस्वस्थ होत्या. यातूनच समविचारी महिलांचा एक गट बनला आणि त्यांनी अहिल्या महिला मंडळ या नावाने शिक्षण, आरोग्य, स्त्री सबलीकरण व समाजसुरक्षा या चार विषयांना केंद्रस्थानी ठेवून पेणमध्ये कामाला सुरुवात केली. 18 ऑक्टोबर 1966 हा तो शुभारंभाचा दिवस. त्यानंतर ध्येयाला अनुसरून संस्थेची घटना तयार झाली.

ते दिवाळीचे दिवस होते. या सणाचं औचित्य साधून चकली भाजणी, लाडू-चिवडा, शंकरपाळी. असे खाद्यपदार्थ बनवण्यापासून सुरुवात झाली. या प्रकारे घरगुती उद्योगातून रुजलेला मंडळाचा वेलू गेल्या 22 वर्षांत आदिवासी पाडयांवरील शाळा, पोळीभाजी केंद्र, वृध्दाश्रम, आरोग्य केंद्र, रक्तसाठा केंद्र, वाचनालय, संस्कार वर्ग, कौटुंबिक सल्ला केंद्र, ज्येष्ठ महिलांसाठी एक दिवसाचं माहेर, इंदिरा संस्कृत पाठशाळा, आदिवासी मुलींसाठी वसतिगृह असे टप्पे ओलांडत आज गगनावरी जाऊन पोहोचला आहे.

पावलोपावली परीक्षा पाहणारा हा प्रवास. पण वासंती श्रीकांत देव नावाचा दीपस्तंभ पाठीशी ठामपणे उभा होता... आहे, म्हणून आज पेणच्या पंचक्रोशीत अहिल्या महिला मंडळाचं नाव अभिमानाने घेतलं जात आहे.

हेटवणे येथील आदिवासी वस्तीत संस्थेने 1997मध्ये शाळा सुरू केली, तेव्हा स्थानिक लोकांकडूनच शाळा बंद पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. अगदी फोनवरून अश्लील भाषेत संबोधण्यापासून ते जीवे धमकावण्यापर्यंत. परंतु अशा सर्व संकटांना कार्यकर्त्या पुरून उरल्या. आज हे मुक्ताई विद्यामंदिर पूर्णपणे कात टाकून डिजिटल बनतंय.

संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी गाडगीळ म्हणाल्या, ''वनवासी मुलींसाठी वसतिगृह हा मंडळासमोर आलेल्या प्रश्नांतून अचानक उभा राहिलेला उपक्रम. या मुलींना शिकवून समाजाभिमुख करण्याचं आव्हान स्वीकारून आम्ही बारा मुलींना घेऊन वसतिगृह सुरू केलं. मुलींचा प्रश्न कसा निभवायचा, हे प्रश्नचिन्ह समोर होतं. दत्तक पालक योजनेद्वारे मुलींची व्यवस्था लावताना पहिली चार वर्षं परीक्षा पाहणारी ठरली. मात्र नंतर काम पाहून मदतीचे अनेक हात पुढे अाले.''

मंडळाने हात दिल्याने डोंगराच्या आत लांब राहणाऱ्या 30-35 आदिवासी मुली आज स्वयंपूर्ण झाल्या आहेत. काहींनी तर दहावी उत्तीर्ण होऊन कॉलेज प्रवेश घेतलाय. दहावीपर्यंत गेलेल्या मुली कॉम्प्युटर, शिवण, घरगुती उद्योग यातून स्वावलंबी झाल्या आहेत. जयश्री मरगळा या विद्यार्थिनीने तर गेल्या वर्षी 90% गुण मिळवले. तिला डॉक्टर व्हायचं आहे. त्यासाठी मंडळ पाठीशी आहे. केवळ अभ्यासातच नव्हे, तर सूर्यनमस्कार, पथनाटय, चित्रकला अशा अनेक विषयांत त्यांची प्रगती होत आहे. देखणे शाळेतील मुलांची पहिली बॅचही आता पदवीधर होऊन बाहेर पडली आहे. झालंच तर काही मुलं इंजीनिअरिंग, एम.बी.ए. असं उच्च शिक्षण घेत आहेत. ही मुलं जेव्हा मंडळात भेटायला येतात, तेव्हा कार्यकर्त्यांना आपल्या कष्टांची खरी पावती मिळते.

संस्थेच्या संजीवन वृध्दाश्रमात मिळणाऱ्या प्रेमाची व आपुलकीची जाणीव आता सर्वदूर पोहोचल्याने घरातील वृध्दांना काही कारणाने कुठेतरी बाहेर ठेवायचा प्रश्न आला की, अहिल्यांच्या या आश्रमाला प्रथम पसंती दिली जाते. या प्रतिसादामुळेच 2017पासून 'स्नेहांगण' ही वृध्दाश्रमाची दुसरी शाखा कार्यान्वित झालीय. एकूण 45 वृध्दांना मंडळाने आपल्या सावलीत सामावून घेतलंय.

31 डिसेंबर 2003 हा दिवस पेणमधील ज्येष्ठ महिलांसाठी एक पर्वणी ठरला. या महिला एक दिवसाच्या माहेरपणासाठी एकत्र जमल्या आणि 10 वर्षांनी तरुण होऊन घरी गेल्या. तेव्हापासून गेली 15 वर्षं हा दिवस त्यांचा हक्काचा झालाय. दर वर्षी 150 ते 200 स्त्रिया इथे एक दिवसाचं माहेरपण अनुभवून तृप्त होतात.

पेणमधील रुग्णालयांची वाढती संख्या, रक्ताची गरज आणि अलिबागला किंवा पनवेलला जाऊन रक्त आणण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांची होणारी धावपळ हे पाहून कृष्णाजी साठे ब्लड बँक सुरू करण्यात आली. आता वर्षाला साधारणपणे 350 ते 400 रक्तपिशव्या या ब्लड बँकेतर्फे पुरवल्या जातात.

2009-10 हे साल संस्था व कार्यकर्त्या दोघांचीही कार्यक्षमता पटीत वाढवणारं ठरलं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या संस्था बांधणी सहयोग योजना या उपक्रमात संस्थेला सहभागी करून घेतल्याने मंडळाचं रूप अंतर्बाह्य बदललं.

आज अहिल्या महिला मंडळाच्या शंभर कार्यकर्त्या आपआपले संसार सांभाळून संस्थेच्या वेगवेगळया प्रकल्पांतून आपलं योगदान देत आहेत. स्वयंसिध्दा उपक्रमाच्या माध्यमातून आज अनेक महिलांना रोजगार मिळालाय. आरोग्य केंद्रातर्फे घेतल्या जाणाऱ्या शिबिरांमुळे आदिवासी महिलांनाही आरोग्याचं भान आलंय. कौटुंबिक सल्ला केंद्रातून अनेक संसार मोडता मोडता वाचलेत.

गेल्या 22 वर्षांत अनेक नामवंत मंडळाला भेट देऊन गेले. विविध पुरस्कार मिळाले. समाजाच्या अनेक स्तरांवरून या अहिल्यांचं कौतुक झालं. मंडळाच्या सचिव राधिका आपटे म्हणतात, ''ही 22 वर्षं संस्थेच्या विकासाची तर होतीच, त्याबरोबर आम्हा कार्यकर्त्यांनाही प्रगल्भ करणारी होती. दुर्बलांना आधार देण्यासाठी लावलेल्या छोटयाशा रोपटयाचं एका डेरेदार वृक्षात झालेलं परिवर्तन बघताना मन अभिमानाने भरून येतं...''

'तुम्ही काय करता...' असं विचारल्यावर ''मी घरीच असते''. असं ओशाळून म्हणणाऱ्या स्त्रियांना अहिल्या महिला मंडळाने प्रकाशाची नवी वाट दाखवलीय, असं निश्चितपणे म्हणावंसं वाटतं.

[email protected]


संपदा वागळे

9930687512