सामाजिक कार्याच्या ऊर्जेने तळपणारा शांत सूर्य 

 विवेक मराठी  10-Oct-2018

औरंगाबाद येथील 'गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र'. डॉ. दिवाकर व सविता कुलकर्णी हे दांपत्य इथे चोवीस तास सेवा देत आहेत. स्वत: मात्र औरंगाबाद शहराच्या एका कोपऱ्यात दरिद्री झोपडपट्टी वसाहतीत राहून आजूबाजूच्या 35 हजारांच्या लोकवस्तीसाठी निष्ठेने काम करत आहेत. प्रसिध्दिपराङ्मुख राहून निःस्वार्थीपणे केलेल्या कामाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख...

औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या पूर्वेस औद्योगिक वसाहत आहे. तिला लागूनच एक झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीतून जाणाऱ्या चिंचोळया रस्त्याने रेल्वे रूळ ओलांडले की उजव्या हाताला एक वेगळी दिसणारी इमारत आपले लक्ष वेधून घेते. खरे तर लक्ष वेधून घेण्यासारखे तिच्यात काही नाही. ती भव्य नाही की चकचकीत नाही. उलट प्लास्टर न केलेल्या उघडया विटांमुळे तिचा खडबडीतपणा अधोरेखित होतो. आणि त्यानेच कदाचित ती लक्ष वेधून घेत असावी. ही इमारत म्हणजे 'गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र'. डॉ.दिवाकर व सविता कुलकर्णी हे दांपत्य इथे चोवीस तास राहून गेली 25 वर्षे हे केंद्र चालवीत आहेत.

डॉ. दिवाकरांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा जरा खर्जातला आवाज याचा समोरच्यावर काही प्रभाव पडतो. पण सविताताई तर अगदी आपली आई, बहीण, वहिनी वाटावी अशा व्यक्तिमत्त्वाच्या आहेत. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कार्याची व्यापकता, त्यातील भव्य सामाजिक आशय याचा जराही अंदाज येत नाही. पण त्यांना आपण बोलते केले, तर हळूहळू ही संवादाची नदी खळाळत अशी काही वाहत राहते की बघता बघता हा प्रवाह भव्यता धारण करतो.

अंबाजोगाईच्या मामा क्षीरसागरांच्या घरात सविताचा जन्म झाला. सामाजिक क्षेत्रातले मामांचे स्थान, त्यांची तत्त्वनिष्ठा यांचा छोटया सवितावर नकळत दाट असा ठसा उमटला. घरात येणारी पूर्णवेळ प्रचारकांची व्यक्तिमत्त्वे तिला जवळून न्याहाळता आली. दामूअण्णा दाते, सुरेशराव केतकर, गिरीशजी कुबेर, सोमनाथजी खेडकर आदी पूर्णवेळ कार्यकर्तें यांची समर्पित वृत्ती तिच्यावर संस्कार करून गेली.

त्यांचा ओढा सामाजिक कामाकडे आपसूकच वळला. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुण्याला जाऊन एम.एस.डब्ल्यू. करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात सामाजिक कार्याचे विधिवत शिक्षण देणाऱ्या संस्था कमी होत्या आणि असे शिकणारेही कमीच होते. पण सविताताईंनी याच क्षेत्रात काम करण्याची जिद्द बाळगली होती.  

एम.एस.डब्ल्यू. पूर्ण करून आल्यावर अंबाजोगाईलाच दीनदयाळ शोध संस्थेच्या कामात सक्रिय भाग घ्यायला सुरुवात केली. हळूहळू आदिवासी, महिला, दलित यांच्या समस्या त्यांना उमगायला लागल्या. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात कुही गावातील वनवासी कल्याण आश्रमाचे काम पाहून आल्यावर त्यांचे या विषयाचे आकलन आणखीनच विस्तारले.

अंबाजोगाईलाच डॉ. लोहिया दांपत्यांची मानवलोक संस्था आहे. या संस्थेत काम करण्यास सविताताईंनी सुरुवात केली. इथे काम करत असताना 'आध्यात्मिक वृत्तीने समाजसेवा करणाऱ्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन' असा एक विषय घेऊन त्यांनी काही संशोधनही केले.

या काळातच औरंगाबादला डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे काम विस्तारण्यास सुरुवात झाली होती. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून डॉ. दिवाकर कुलकर्णी लहुजी साळवे आरोग्य केंद्राचे काम पाहत होते. हे केंद्र चालवत असताना त्यांना महिला सहकाऱ्याची आवश्यकता जाणवायला लागली. त्यांनी नाना नवलेंना त्यांची ही गरज सांगितली. नानांनी त्यांच्या शैलीत सविताताईंच्या घरी अंबाजोगाईला पत्र पाठवून आणि सतत पाठपुरावा करून त्यांना इकडे बोलावून घेतले.

औरंगाबादला डॉ. दिवाकर व सविता यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली, आणि त्यांच्याही नकळत नियतीने त्यांना एकत्र बांधायचा निर्णय घेतला. नाना नवलेंनीच पुढाकार घेऊन डॉ. दिवाकर यांना ''सविताशी लग्न करशील का?'' असा थेट प्रस्ताव ठेवला. इकडे सविताताईंच्या घरात या प्रस्तावाला संमती होतीच. डॉ. दिवाकर म्हणजे अजब व्यक्तिमत्त्व. त्यांना मुळी लग्नच करायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या परीने सविताला या निर्णयापासून परावृत्त करण्याचाच प्रयत्न केला. पण सगळयांच्याच सदिच्छा आणि मुख्य म्हणजे सामाजिक कामात काहीतरी चांगले घडावे ही प्रबळ इच्छा. त्यामुळे 1993 साली हे लग्न अतिशय साधेपणाने, कसलाही गाजावाजा न करता, किमान खर्चात पार पडले.

सविताताईंचे कुटुंब म्हणजे मुळातच चार भिंतीत मावणारे नव्हतेच. लहानपणापासूनच सामाजिक कार्याचे बाळकडू मिळालेले. आता डॉ. दिवाकर यांच्याबरोबरचा संसार त्यांना त्या पैलूने नवीन नव्हताच. कारण दिवाकर यांचेही विचार चौकोनी कुटुंबाचे नव्हतेच. पार्वतीने शंकराला वरले तसाच हा प्रकार. कारण दोघेही सारखेच. लौकिक अर्थाने निःस्पृह, निष्कांचन.

दलित, गोरगरीब महिलांना आर्थिक स्वातंत्र्य नसते, हे ओळखून सविताताईंनी त्यांना पोस्टात खाते उघडण्याची, बचत करण्याची सवय लावली. कित्येक मुसलमान स्त्रियांनी अशी खाती उघडली. मग एक नवीनच समस्या पुढे आली. इस्लामला व्याज मंजूर नाही असा आक्षेप आल्याने या महिलांची खाती बंद करण्यात आली. सविताताईंना त्याचे अतोनात दु:ख झाले. त्या महिला तर आजही त्यांना भेटून याबद्दल खंत व्यक्त करतात.

पुढे चालून बचत गटाची चळवळ मोठी झाली. मुस्लिमेतर स्त्रियांच्या बचत गटांनी मात्र मोठी भरारी घेतली. त्यांच्या एका एका गटाची उलाढाल चक्क 8-9 लाखापर्यंत पोहोचली. यातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला.

महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी घरोघरी फिरण्याचे एक व्रत सविताताईंनी आधीपासूनच बाळगले आहे. त्यांच्या घरातील आबालवृध्दांशी संवाद साधण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे. यातून ही कुणी आपल्यातलीच बाई आहे, आपली कुणी बहीणच आहे हा विश्वास या महिलांमध्ये वाढीला लागला.

या सामान्य महिलांना कौशल्य विकासाचे काही एक छोटे-मोठे प्रशिक्षण दिले, तर त्यांना जास्त रोजगार मिळू शकतो हे ओळखून त्यांनी महिला कौशल्य विकास प्रकल्प 'उद्यमिता' राबवायला सुरुवात केली. याचा फारच मोठा परिणाम त्या भागात दिसून आला. ज्या महिलांना तीन-चार हजार रुपये महिना मिळत होते, त्यांना आता त्यांनी आत्मसात केलेल्या कौशल्याच्या आधाराने सात-आठ हजार रुपये महिना मिळायला लागले. साधी धुणी-भांडी अशी कामे न करता त्यांना चांगली कामे मिळायला लागली. जेव्हा सविताताई या गोरगरीब महिलांच्या घरात जातात, तेव्हा त्या बायाबापडया त्यांना 'सोन्याच्या पावलांनी आमच्या घरी लक्ष्मीच आली' असे म्हणायला लागल्या. हा प्रसंग माझ्यासाठी सर्वात आनंदाचा प्रसंग होता, असे त्या आजही भारावल्या स्वरात सांगतात.

पंचवीस वर्षांत औरंगाबाद शहराच्या एका कोपऱ्यात दरिद्री झोपडपट्टी वसाहतीत स्वत: राहून आजूबाजूच्या 35 हजारांच्या लोकवस्तीसाठी निष्ठेने काम करणे ही सोपी गोष्ट नाही. जातीपातीच्या अस्मिता नको इतक्या टोकदार होणाऱ्या काळात एक सवर्ण स्त्री धैर्याने दलित वस्तीत प्रत्यक्ष राहून काम करते, याची वेगळी नोंद घेतली पाहिजे. दूर राहून काम करणारे आजही खूप आहेत. मौसमी काम करणारेसुध्दा खूप आहेत.

काळाचे बदलते आयाम त्यांना चांगले कळतात. एकेकाळी साक्षरता वर्ग घेणे ही गरज होती. पण आता वस्तीत येणाऱ्या सुना या शिकलेल्याच असतात, हे ओळखून गेली चार वर्षे लहुजी साळवे आरोग्य केंद्रात नवविवाहित जोडप्याच्या स्वागताचा कार्यक्रम आखला जातो. पुरणावरणाचा स्वयंपाक केला जातो. संपूर्ण केंद्रात लग्नासारखे वातावरण असते. या जोडप्यांना एकत्र आणि मग वेगवेगळे बसवून त्यांच्या शारीरिक समस्या, इतर काही समस्या यांच्याबद्दल मार्गदर्शन केले जाते. समुपदेशन केले जाते. यातून या जोडप्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. या नवीन मुलींना ब्युटी पार्लर, ड्रेस डिझायनिंग (बुटीक) यासारखी कौशल्ये शिकवली जातात.

महिलांच्या विकासाचे प्रकल्प आणखी खूप विस्तारू शकतात, पण एक व्यक्ती म्हणून कामाला मर्यादा येते, याची खंत  सविताताईंना जाणवते. हे काम सर्वत्र विस्तारत जायला हवे. यासाठी तळमळीने काम करणारी तरुण पिढी उभी राहायला हवी. त्यांच्याच केंद्रात शिकलेली वंदना नावाची तरुणी पुढे त्यांची सहकारी म्हणून तडफदारपणे काम करायला लागली, त्याचे त्यांना खूप अप्रूप वाटते.

बेगम अख्तर यांच्या आयुष्यातला एक किस्सा आहे. त्या लहानपणी झोक्यावर बसून गाणे म्हणत होत्या. एक सैनिक रस्त्यावरून जात होता. त्याने ते गाणे ऐकले आणि त्याने त्यांना खुशीने चांदीचे एक नाणे दिले. ते नाणे बेगम अख्तर यांना गाण्यासाठी कायमस्वरूपी प्रेरणा देत राहिले. सविताताईंनी त्यांच्या लहानपणी घरी येणारे पूर्णवेळ प्रचारक पाहिले. त्यांनी सविताताईंवर नकळत संस्कार केले. त्यांनी लहानपणी अंबाजोगाईत केलेली छोटी-मोठी कामे पाहून पाठीवर हात ठेवला. ही प्रेरणा आयुष्यभर याच मार्गावर चालण्यासाठी कामी येत असावी.

अशा वेगळया वाटा तुडवीत असताना जोडीदार साथ देणारा भेटणे, तसेच कुटुंबीयही याची बूज ठेवणारे भेटणे हे एक प्रकारे भाग्यच म्हणावे लागेल

सवितातार्इंच्या पुढच्या कामासाठी त्यांना शुभेच्छा!

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद