बेकरी उद्योगातील मराठमोळी भरारी

 विवेक मराठी  11-Oct-2018

1977 साली विद्या पाटील यांनी उद्योग करण्याच्या उद्देशाने मयूर बेकरीचा पाया रचला. आज 41 वर्षांनी मयूर बेकरीचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ व उद्योगाची पार्श्वभूमी नसताना अत्यंत तटपुंज्या भांडवलात उभ्या केलेल्या मयूर बेकरीचा विस्तार आज अलिबाग व परिसरात पसरला आहे. चवदार व दर्जेदार स्वादिष्ट बेकरी उत्पादनांसाठी मयूरचे नाव घेतले जात आहे. या बेकरीच्या मुख्य प्रर्वतक विद्या पाटील यांची यशोगाथा सांगणारा लेख...

अलिबाग शहराचे नाव घेताच डोळयासमोर येतो तो निळाशार समुद्रकिनारा, नारळी-पोफळीच्या बागा आणि विकेंड पर्यटनाचे हक्काचे ठिकाण. इथल्या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जगाच्या कोनाकोपऱ्यातून लाखो पर्यटक येतात. इथल्या निसर्गाबरोबर इथले खाद्यपदार्थही चवदार आहेत. या चवदार पदार्थांचा आस्वाद पर्यटक घेत असतात. आंबे, चिंच, नारळ, सरबत, मासे अशा अनेक पदार्थांबरोबरच बेकरीचे विविध पदार्थ पर्यटक येथून हमखास घेऊन जात असतात. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. कारण अनेक नामांकित कंपन्याचे विविध बेकारी पदार्थ तर जगभरात मिळतात, पण कोकणची खास ओळख बनलेली मयूर बेकरी देश-विदेशातील खवय्यांसाठी विशेष आकर्षण बनली आहे. मयूर बेकरीची ओळख सातासमुद्रापार पोहोचली आहे. ही ओळख निर्माण झाली ती विद्या पाटील यांच्या अपार कष्टामुळे, जिद्दीमुळे आणि उत्तम व्यवस्थापन सूत्रामुळे.

प्रवास उद्यमशीलतेचा

विद्याताई पाटील या मूळच्या बारामतीच्या. लग् होऊन त्या अलिबाग येथे आल्या. सासरची परिस्थिती तशी सधन होती, पण घरात स्वस्थ बसणे त्यांना आवडले नाही. बी.एड.चे शिक्षण पूर्ण करून त्या अलिबागमधील कन्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यात त्यांचे मन रमत नव्हते. त्यांच्यातील उद्यमशीलता त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. पारंपरिकतेकडे न वळता त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास घेतला. उद्योग-व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण अपेक्षित असा मार्ग सापडत नव्हता. या काळात वर्तमानपत्रामध्ये कोकण विकास महामंडळाची सुशिक्षित बेकारांना काही विशिष्ट उद्योगांसाठी कर्ज देण्यासाठी एक जाहिरात आली होती. विद्याताईंच्या आप्तजनांनी त्यांना ही जाहिरात पाठवली. त्यामध्ये बेकरी व्यवसायाला कर्ज देण्याची योजना होती. तेथूनच बेकरी व्यवसायाचे बीज रोवले गेले. बेकरी व्यवसायासंदर्भात माहिती घेणे, सासरच्या मंडळींची परवानगी मिळवणे अशा अनेक गोष्टीत त्यांची दोन वर्षे गेली. अखेर 1976 साली विद्याताईंनी मनाशी पक्के केले की, मला आता व्यवसायात उतरायचे आहे. नोकरी सोडली आणि पुण्यात Food Craft Instituteमध्ये Bakery and confectioneryचा एका वर्षाचा कोर्स केला. बेकरीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ताईंनी पुण्यातील हिंदुस्थान बेकरीत काम केले, त्याचबरोबर व्यवसायाबाबत निरीक्षणही केले. एक वर्षाचा कोर्स संपला आणि बेकरी व्यवसाय करू शकतो असा आत्मविश्वास ताईंच्या मनात निर्माण झाला. पण मेहनत करण्याची तयारी व व्यवसायात यशस्वी होण्याच्या आत्मविश्वासाबरोबरच एका गोष्टीची गरज भासते, ती म्हणजे आर्थिक भांडवलाची. त्यासाठी विद्याताईंना मात्र खूप मोठी मेहनत घ्यावी लागली, कारण पूर्वीच्या काळी शासनाकडून उद्योगांना मिळणारे अर्थसाहाय्य तुटपुंजे होते. त्यातच बँकेचे कर्ज मिळवण्यासाठी माराव्या लागणाऱ्या खेटयांमुळे अनेकांची उद्योग करण्याची इच्छाशक्ती तेथेच मरून जाते. पण ताईंनी सर्वांवर मात करीत अखेर 26 हजार रुपयांचे कर्ज मिळवले. सासरची मंडळी अनुकूल नव्हती. मात्र विद्याताईंच्या वडिलांनी आर्थिक पाठबळ देऊन प्रोत्साहन दिले आणि अखेर 1977 साली 22 पत्र्यांची लाकडावर चालणारी बेकरी सुरू केली.

बेकरीच्या कोर्समधून ताईंना माहिती अफाट मिळाली होती. पण प्रत्यक्ष अनुभवाची जोड नसल्यामुळे ताईंना पुढे मोठया अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीला काही पदार्थ करण्यास सुरुवातही केली. पण एका कुशल व अनुभवी कारागीराची आवश्यकता भासू लागली होती. अनेक ठिकाणी अशा कारागीराची चौकशी केली. रायगड सोडून पुण्यातील अनेक बेकरींनाही भेट दिली, पण असा कारागीर मात्र मिळाला नाही. या वेळी ताई हतबल झाल्या. काय करावे सुचत नव्हते. पण एक दिवस तरी असा कारागीर मिळेल अशी अशा मात्र कायम होती. म्हणतात ना, जिद्द व मेहनत करण्याची तयारी असलेल्याला नशीबही साथ देते... ताईंना हाच अनुभव आला. पुण्यात ट्रेजची ऑर्डर देण्यासाठी ताई गेल्या होत्या. ऑर्डर दिली. ट्रेवाल्याला विनंती करून सांगितले की एखादा अनुभवी कारागीर असेल तर सांगा. त्याच्याकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पण त्याच वेळी त्यांच्या आतल्या खोलीत एक कुशल कारागीर हाजी महम्मद बसले होते. त्यांनी ताईंचे बोलणे ऐकले. कामाच्या शोधात असलेल्या हाजी महम्मद यांनी पत्रेवाल्यांकडून विद्याताईंचा पत्ता मिळवला व अलिबागला ताईंच्या घरी आले. पुण्यातील सर्व हकिकत सांगितली. ताईंनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना रुजू केले. हतबल झालेल्या ताईंना हाजी यांच्या रूपाने व्यवसायात एक आशेचा किरण सापडला. पुढे हाजी यांच्या बेकरी कामातील अनुभव, कुशलता याचबरोबर ताईंनी स्वत: मेहनत घेण्याचे पक्के करून 1 सप्टेंबर 1977 रोजी मयूर बेकरीला व्यवसायिक रूप दिले.

पहिल्याच दिवशी 300 रुपयांची विक्री झाली. हळहळू विक्री वाढत गेली. संपूर्ण अलिबागमध्ये बेकरीतील खारी, बटर, पाव अशा वस्तूंना ग्राहक मिळू लागला. व्यवसायात जम बसू लागला. याचबरोबर सासरच्या मंडळींकडूनही प्रोत्साहन मिळू लागले, ही सर्वात मोठी आनंदाची व जमेची बाजू होती. त्यामुळे मग बेकरी व्यवसायात पुढे अधिक प्रगती झाली. काही कालावधीनंतर विद्याताईंनी या व्यवसायात आपण महिलांना अधिक प्रमाणात स्थान द्यायचे, म्हणजे महिला अधिक आर्थिक स्वावलंबी होतील याच हेतूतून त्यांनी विक्रेत्या, पॅकिंग करणाऱ्या, माल तयार करणाऱ्यांमध्ये अधिकाधिक महिलांना स्थान दिले. 

1980पर्यंत पारंपरिक पध्दतीनेच बेकरीमधील पदार्थ करणे सुरू होते. त्यामध्ये दर्जा, गुणवत्ता असली तरी स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल व व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यात काळानुसार बदल केले पाहिजेत या तत्त्वानुसार विद्याताई युरोपला गेल्या. जर्मनीतील हॅनोव्हरमध्ये राहून दोन बेकऱ्यांमध्ये एकेक आठवडा काम केले. त्या तेथेच कणकेचे पाव बनवण्यास शिकल्या. अलिबागला तसे पाव बनवणे सुरू केले, पण अनेक ग्राहकांना ते सुरुवातीला आवडले नव्हते. मात्र हळूहळू त्याची मागणी वाढत गेली. पुढे 1990च्या दशकात अलिबाग बदलत गेले. अलिबागमध्ये लाखो पर्यटक दाखल होऊ लागले. त्यावर आधारित उद्योगांना चालना मिळाली. तसेच आर.सी.एफ. कंपनीनंतर लोकांचे राहणीमान, आचार, विचार बदलले. त्याचा फायदा बेकरी व्यवसायाला झाला. पुढे ताईंनी आपल्या बेकरीमध्ये आमूलाग्र बदल करून ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा व पदार्थ देण्याचा संकल्प सोडला. त्यातूनच लाकडाच्या भट्टीच्या जागी त्यांनी रोटेटिंग डिझेल फायर्ड ओव्हन घेतला. इमारतीमध्ये सुधारणा करून युरोपीय पध्दतीची बेकरी बांधली. याचा फायदा व्यवसायात झाला. आजही कोणताही विदेशी पर्यटक अगदी आवडीने येथील पदार्थ विकत घेतो. त्यांनी बेकरी व्यवसायात अशीच अनेक स्थित्यंतरे आणली.

पुढे ग्राहकांना काही पदार्थ आवडले, तर काही पदार्थ आवडले नाहीत म्हणून ते पदार्थ त्यांनी पूर्णपणे बंद न करता त्यात काही बदल करून ग्राहकांना दिले. त्यानंतर त्यांना प्रतिसादही मिळाला. त्यामुळे एखादा पदार्थ आपण कितीही आवडीने बाजारात आणला आणि ग्राहकांना आवडला नाही तरी खचून न जाता आणि त्यात बदल केल्यास ते ग्राहकांना आवडते, हा अनुभव आजच्या पिढीसाठी नक्कीच अनुकरणीय आहे. विद्याताईंनी आपल्या व्यवसायातील बदल करताना त्यामध्ये स्वत: लक्ष दिले. त्यासाठी अनेक प्रयोग केले. विविध बेकरी पदार्थ म्हणजे मैद्यापासून बनवलेले असतात, असा प्रचार रूढ आहे. पण विद्याताईंनी यात बदल करून मैदाविरहित पदार्थांवर अधिक भर दिला आहे. त्याचबरोबर साखरमुक्त आरोग्यदायक असे पदार्थ बनवले जात आहेत. त्याचबरोबर सुका मेवा, फळे, विविध धान्यांचे मिश्रण करून तयार करून बनवलेले विविध बेकरी पदार्थ या बेकरीची ओळख बनू लागले आहेत. आगामी काळात खास नारळापासून बनवलेले मैदाविरहित बिस्किट बाजारात येणार असून त्याच्या विविध चाचण्या सुरू असल्याचे त्या सांगतात. तो पदार्थ रायगडची सीमारेषा ओलांडून नक्कीच संपूर्ण भारतात प्रसिध्द होईल, अशी विद्याताईंना आशा आहे. 

आजघडीला अलिबाग व आजूबाजूच्या परिसरात मयूरच्या सहा शाखा आहेत. येथे 100पेक्षा अधिक कामगार काम करतात. एवढा सर्व कारभार आजही विद्याताई आपल्या वयाच्या 72व्या वर्षी तरुणाच्या उत्साहाने सांभाळतात. शरीर जरी थकत चालले असले, तरी विद्याताई बेकरीत सकाळी व संध्याकाळी फेरफटका मारतात. पदार्थाविषयी काही समस्या असल्यास विचारतात. तसेच कामगारांशी नेहमीच आपुलकीने वागतात. कामगार आनंदी असेल तर आपले कामही आनंदाने करेल, त्यासाठी त्यांच्या खासगी आयुष्यात कोणत्या अडचणी असल्यास त्याही दूर करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतात.

अलिबागमधील विद्याताई पाटील यांनी बेकरी व्यवसाय यशस्वी करून, एक उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला आहे, त्याचबरोबर त्यांनी असंख्य महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांची यशोगाथा आजच्या समस्त युवा वर्गाला नक्कीच प्रेरणादायक आहे.

अभय पालवणकर

8446208486