डॉ. के.ब. हेडगेवार विद्यालयाच्या ‘ATL’ची गगनभरारी

 विवेक मराठी  15-Oct-2018

गोव्याच्या डॉ. के.ब. हेडगेवार विद्यालयाला भारत सरकारच्या नीती आयोगाच्या वतीने अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत 'अटल टिंकरिंग लॅब' उपलब्ध करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत येथील विद्यार्थ्यांनी अवघ्या एका वर्षात समाजातील अडचणींचा अंदाज घेत त्यावरील उपाययोजनांचे अनेक उपक्रम राबवले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले वाहतूक सुरक्षा उपक्रमाचे आव्हानही यशस्वीरित्या पूर्ण केले.

कुजिरा बांबोळी, गोवा येथील डॉ. के.ब. हेडगेवार विद्यालयाची, भारत सरकारच्या नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत प्रथम 257 शाळांमधून (अखिल भारतीय स्तरावर) अटल टिंकरिंग लॅबसाठी निवड करण्यात आली. शाळेतील विद्यार्थिवर्गासाठी शैक्षणिक वर्ष 2017पासून ही लॅब उपलब्ध करून देण्यात आली. ‘STEM Education’ म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांचे शिक्षण देणे हा या प्रयोगशाळेचा महत्त्वाचा उद्देश. शालेय मुलांना त्यांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठीचा हा उपक्रम असून हेडगेवार शाळेत 5 जुलै 2017पासून त्या संदर्भातील वर्ग सुरू झाले. नीती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नियमित वर्ग सुरू करण्यात आले.

या प्रयोगशाळा असलेल्या शाळांना अटल इनोव्हेशन मिशनच्या माध्यमातून नियमितपणे विविध स्पर्धा/उपक्रम देण्यात येत होते व देण्यात येत आहेत. डॉ. हेडगेवार शाळेने या प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन वेगवेगळे सर्जनात्मक कार्यक्रम आखले व यशस्वीही केले.

भारत सरकारने एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला असल्यामुळे पणजीतील निवडक लोकांना, तसेच या विषयातील तज्ज्ञ लोकांना घेऊन एक सुकाणू समितीची निर्मिती करण्यात आली. यात माजी IITian, विद्यापीठातील प्राध्यापक, NIOमधील वैज्ञानिक, शेतकी अधिकारी, गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, उद्योग क्षेत्रातील काही माणसे या सर्वांचा या सुकाणू समितीमध्ये समावेश करण्यात आला. शिक्षकांसाठीच्या विविध कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी Basic Electronics, Soldering, PCB Making अशा विविध कार्यशाळा नियमित घेण्यात येतात.

शाळेच्या ATL प्रयोगशाळेत विविध प्रकारचे सेन्सर्स, Ardino Boards, मोटर्स अशी वेगवेगळी यांत्रिकी उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच 3-D Printers संदर्भात मुलांसाठी कार्यशाळा घेण्यात आली व मुले आपल्या उपक्रमांसाठी लागणारे साहित्य व छोटे-मोठे भाग नियमितपणे या 3D Printerवर तयार करतात.

अटल इनोव्हेशन मिशनच्या एका उपक्रमात मुलांनी आपल्या सभोवतालच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर तंत्रज्ञान वापरून या समस्यांना उत्तरे शोधण्याचा उपक्रम देण्यात आला होता. मुलांनी प्रयोगशाळेचा उपयोग करून सामान्य माणसांना भेडसावणारे प्रश्न हाताळावेत व समाजोपयोगी प्रयोग करावे यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्यात आले.

संपूर्ण देशभरातून आलेल्या विविध प्रकल्पांमधून प्रथम 100 प्रकल्पांची निवड करण्यात आली. यात हेडगेवार विद्यालयातील विद्यार्थ्यांचे दोन प्रकल्प अखिल भारतीय स्तरावर निवडण्यात आले. त्यानंतर या प्रकल्पावर विविध पैलूंवर काम करून विद्यार्थ्यांना त्या प्रकल्पासंबंधी सविस्तर माहिती देणारी व Working Modelची छायाचित्रे व व्हिडिओ पाठविण्यास सांगण्यात आले, त्या आधारावर देशभरातून एकूण 30 प्रकल्प निवडण्यात आले.

डॉ. हेडगेवार शाळेतील इ.8वीतील सनथ बालेगिरी याच्या कल्पनेतून साकारलेला प्रकल्प प्रथम 30 प्रकल्पांमध्ये निवडण्यात आला आणि त्याच्याच वर्गातील अन्य दोन विद्यार्थी सुमेध प्रभुदेसाई व लेखराज सुर्लकर या तिन्ही विद्यार्थ्यांनी या प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली.

नेमका प्रकल्प काय?

रात्रीच्या वेळी वाहनांना असलेल्या हेडलाइट्समुळे समोरून येणाऱ्या वाहनांनी 'डिपर मोड' न वापरल्यास खूप त्रास होतो आणि विद्युतझोताचा डोळयांवर परिणाम होऊन अपघात होतात. विद्यार्थिवर्गाने याचा विचार करून ‘LDR Senser’ वापरून एक उपकरण तयार केले व ते उपकरण गाडीच्या हेडलाइटला जोडले. त्या उपकरणावर समोरून येणाऱ्या गाडीचा प्रकाश पडल्यावर विद्युतझोत आपोआपच ‘Headlight Mode’वरून डिपर मोडवर जातो. या उपकरणांमुळे रात्रीचा वाहन चालकाचा त्रास नाहीसा होईल.

समाजोपयोग

समाजाला भेडसावणाऱ्या या गंभीर स्वरूपाच्या प्रश्नावर 12-13 वर्षे वयाच्या मुलांनी केलेला हा प्रकल्प प्रथम सायकलला, स्कूटरला वापरून त्याची चाचणी घेण्यात आली. वाहतूक खात्याचे अधिकारी, मोटर व्यावसायिक, मोटर मेकॅनिक यांच्याशी चर्चा करून त्यात आवश्यक बदल करण्यात आला. अटल इनोव्हेशन मिशनच्या 30 प्रकल्पांबाबत Video Conferencingद्वारे नीती आयोगाने नेमलेल्या तज्ज्ञ माणसांकडून मार्गदर्शन लाभले. नंतर या 30पैकी काही निवडक प्रकल्प पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील निवडक Start-upशी व अटल टिंकरिंग लॅब असलेल्या तीन शाळांशी Video Conferencingद्वारे वार्तालाप केला. दूरदर्शनवर व अन्य वाहिन्यांवर देशभरात हा वार्तालाप Live होता. देश-विदेशात लोकांनी हा वार्तालाप पाहिला.

पंतप्रधानांनी दिलेले आव्हान

डॉ. हेडगेवार शाळेच्या या प्रकल्पासंदर्भात मोदीजींनी मुलांशी थेट संवाद साधून मुलांचे कौतुक केले. मुलांनी बनविलेले उपकरण समजून घेऊन मुलांना नवीन जबाबदारी देण्यात आली. पंतप्रधान म्हणाले की, बऱ्याच वेळा हमरस्त्यावर रात्रीच्या वेळी गाडया थांबलेल्या वा नादुरुस्त झालेल्या असतात किंवा मागचे दिवे पेटत नाहीत. रात्रीच्या वेळी मागाहून येणाऱ्या गाडीला वा वाहन चालकाला पुढचा अंदाज येत नाही व यामुळे अपघात होऊन जीवितहानी होत असते. या संकटावर मात करण्याच्या हेतूने वा उपाय वा अशी संकटे दर्शविणाऱ्या एखाद्या उपकरणाबाबत अटल टिंकरिंग लॅबमध्ये विचारविनिमय करून एखादे उपकरणाबाबतचे वा उपाययोजनेबाबतचे काम यशस्वीपणे करण्याचे आव्हान पंतप्रधानांनी डॉ. हेडगेवारच्या मुलांना दिले.

मुलांचा प्रतिसाद

15 दिवसांच्या आत इ. 12वीचे दोन विद्यार्थी - ऋषिकेश भंडारी व संकेत मराठे व इयत्ता 9वीमधील कु. सनथ बालेगिरी या तिन्ही मुलांनी पंतप्रधानांनी केलेल्या सूचनेला प्राधान्य मानून त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपकरण तयार केले आहे.

त्या विषयीचा Prototype करून मा. पंतप्रधान कार्यालयाला त्याचा व्हिडिओ पाठविण्यात आला. गोव्यातील वाहतूक खात्याच्या संचालकांच्या मदतीने दोन्ही उपकरणांविषयीचे प्रकल्प पुढे नेण्याच्या दृष्टीने शाळा प्रयत्नरत आहे.

सध्या या ATC प्रयोगशाळेत अशाच प्रकारचे साधारणत: 7-8 प्रयोग चालू आहेत. उदा.- वॉशिंग मशीनमधून वाया जाणारे पाणी, त्याचा उपयोग करणे, Smart Dustbin, अंध बांधवांसाठी नवीन उपकरण, हॉस्पिटलमधील Dripसाठी संकेत देणारे उपकरण, पाण्याच्या टाकीमधून (Overhead Tankमधून) होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्याविषयी संकेत देणारे उपकरण, Fish Feeding Machine.

अटल टिंकरिंग लॅबचे प्रमुख आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक विलास सतरकर, लॅब शिक्षक स्वप्निल वेंगुर्लेकर व सर्व सल्लागार मंडळ यांच्या मदतीने लॅबची चाललेली प्रगती आशावादायक आहे. शाळेचे व्यवस्थापक व मंडळाचे सचिव सुभाष देसाई या सर्व क ामामागे भक्कमपणे उभे राहून प्रोत्साहन देत आहेत.

मुख्याध्यापक,

डॉ. के.ब. हेडगेवार विद्यालय

[email protected], [email protected]

 

विलास सतरकर

9890928411