बँक एकत्रीकरणाचा कालसुसंगत प्रयोग

 विवेक मराठी  02-Oct-2018

भारतीय बँका जगाच्या तुलनेत आकाराने खुज्या आहेत. त्यामुळे वेगाने बदलणाऱ्या काळाला एकेकटयाने सामोरे जाणे त्यांना कठीण होणार आहे. त्यात त्या बुडित कर्जात होरपळल्या आहेत आणि त्यांना तारण्यासाठी सरकारला भरपूर पैसे आतापर्यंत ओतावे लागले, जे करत राहणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर नुकतीच बँक ऑॅफ बरोडा, विजया बँक आणि देना बँक यांच्या एकत्रीकरणाची घोषणा झाली, त्याकडे बघावे लागेल.

बँकिंग क्षेत्रच खूप वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग वेगाने वाढतो आहे. आपण एखाद्या बँकेच्या हेल्पलाइनला फोन करावा आणि आपल्याला सगळी उत्तरे पटापट मिळावी आणि नंतर कालांतराने कळावे की आपण एका चॅटबॉटशी बोलत होतो, मशीनशी संवाद करीत होतो. काय वाटेल आपल्याला? धक्काच बसेल. परंपरेने आपण बँकेच्या शाखांत जात होतो. आता शाखा मोबाइलमध्ये सामावल्या जात आहेत. शाखा आता आपल्या दाराशी येऊ लागली आहे. एटीमची गरज कालांतराने कमी होत आहे. पेमेंट बँक निर्माण होत आहेत. बँकेतर फायनान्स कंपन्या बँकांशी स्पर्धा करीत आहेत. अशा रकाळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना मागे राहून चालणार नाही. बुडित कर्जे जशी हळूहळू का होईना, पण मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तसतसे पुढच्या टप्प्यांचा विचार करणे अतिशय आवश्यक आहे.

प्रत्येक सार्वजनिक बँकेने त्याच त्याच तंत्रज्ञानात गुंतवणूक करणे अतिशय खर्चाचे ठरेल. बाजूबाजूला शाखा असणे खर्चाचे आणि अनावश्यक होत आहे. तीच तीच सर्वोच्च पदे प्रत्येक बँकेत असणे अनावश्यक आहे. त्यातच भारतीय बँका जगाच्या तुलनेत आकाराने खुज्या आहेत. त्यामुळे वेगाने बदलणाऱ्या काळाला एकेकटयाने सामोरे जाणे त्यांना कठीण होणार आहे. त्यात त्या बुडित कर्जात होरपळल्या आहेत आणि त्यांना तारण्यासाठी सरकारला भरपूर पैसे आतापर्यंत ओतावे लागले, जे करत राहणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर नुकतीच बँक ऑॅफ बरोडा, विजया बँक आणि देना बँक यांच्या एकत्रीकरणाची घोषणा झाली, त्याकडे बघावे लागेल.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकत्रीकरण घडवून संख्येने कमी पण आकाराने मोठया बँक सरकार अस्तित्वात आणणार, ही घोषणा सरकारने अर्थसंकल्प सादर करतानाच केली होती. पहिल्या टप्प्यामध्ये स्टेट बँक आणि तिच्या संलग्न बँका - उदा., स्टेट बँक ऑॅफ हैदराबाद इत्यादी - यांचे विलीनीकरण केले गेले. ते पूर्णत्वाला गेल्यावर सरकार पुढची वाटचाल करणार हे अपेक्षित होते. खरे तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संचालक मंडळांनी याबाबत पुढाकार घ्यावा आणि कुठल्या बँका आपल्या दृष्टीने एकत्र यायला अधिक सोयीच्या ठरतील याचा विचारपूर्वक निर्णय करावा. मात्र अधिक वेळ जाऊ  नये, म्हणून सरकारलाच पुढाकार घेणे आवश्यक ठरले. असाही एक विचारप्रवाह होता की ह्या बँका एकत्र येताना शक्यतो क्षेत्रीय दृष्टीने विचार करता त्या देशातील वेगवेगळया भागांत प्राबल्य असणाऱ्या असाव्या, ज्यायोगे नव्याने निर्माण झालेल्या बँकेचा विस्तार हा खऱ्या अर्थाने देशाच्या सर्व भागात असेल. प्रस्तुत तीन बँकांच्या बाबतीत मात्र दोन बँका - पश्चिम भारतात उगम असणाऱ्या बँक ऑॅफ बरोडा आणि देना, तर एक दक्षिण भागातून, मंगलोर येथे उगम असलेली विजया अशा या बँका आहेत. महाराजा सयाजीराव गायकवाडांनी स्थापन केलेली बँक ऑॅफ बरोडा ही देशातील सार्वजनिक बँकिंग संदर्भात दबदबा असलेली, प्रगतिशील आणि आर्थिक स्थिती सक्षम असलेली बँक म्हणून ओळखली जाते. या तिन्ही बँकांतील ती सर्वात जुनी आणि सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे अर्थातच या एकत्रीकरणामध्ये तिचेच प्राबल्य असणे साहजिक आहे. मात्र हे एकत्रीकरण (अमालगमेशन) आहे, एकाने दुसऱ्यांना ताब्यात घेणे (टेकओव्हर) नाही. त्याशिवाय या तिन्ही सार्वजनिक बँका आणि त्यातही पूर्णपणे स्वायत्तता आणि असंलग्नता अशा असल्याने स्टेट बँकेपेक्षा अधिक आव्हाने एकत्रीकरणात आहेत. मात्र तिन्ही बँका एकाच संगणक प्रणालीवर असल्याने त्यांचे एकत्र येणे हे त्या मानाने सोपे जाणार आहे.

सरकारने ही घोषणा करतानाच स्पष्ट केले आहे की प्रत्येक बँकेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जे सेवेसंदर्भातील पगार, भत्ते आणि इतर सोयी आहेत, त्या पूर्णपणे अबाधित राहतील. स्टेट बँक आज एकत्रीकरणामुळे जगातील पहिल्या 50 बँकांत गणली जाते. तिच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळया बँकांमध्ये ज्या ज्या चांगल्या प्रथा होत्या, त्यांचा लाभ सर्वच कर्मचाऱ्यांना दिला गेला आणि त्यामुळे एकत्रीकरण होताना कुरबुरीला जागा राहिली नाही. या बँकांच्या बाबतीतदेखील सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले जाईल, हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. देना बँकेची अवस्था अतिशय बिकट होती. गेली काही वर्षे प्रत्येक तिमाहीला प्रसिध्द होणारे देना बँकेचे तोटयांचे आणि बुडित कर्जांचे आकडे हे ठेवीदारांचे आणि गुंतवणूकदारांचे नाही, तर कर्मचाऱ्यांचेही अवसान गळेल असे होते. सुदैवाने या एकत्रीकरणातून बँक ऑॅफ बरोडासारख्या बँकेशी संलग्न होऊन तिच्या कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी उभारी मिळणार आहे आणि गुंतवणूकदार आणि ठेवीदार दोघांनाही अधिक आश्वस्त होता येणार आहे.

अर्थात संस्थांचे विलीनीकरण करून एक नवीन संस्कृती निर्माण करणे सोपे नसते. विशेषत: जी बँक अधिक सक्षम असते, तिच्या कर्मचाऱ्यांचा कमकुवत बँकेतील कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन काहीसा उपहासाचा असतो. ती मानवी प्रवृत्ती आहे. पण तसे होऊ  न देता सर्वांना एकत्र घेऊन कशी नवी कार्यसंस्कृती निर्माण केली जाते, यावर अशा एकत्रीकरणाचे यश/अपयश ठरत असते. या तिन्ही बँकांच्या नेतृत्वाचा कस या वेळी लागेल आणि त्यांचे मार्गदर्शन आणि ध्येयधोरणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थात या नव्या एकत्रित संस्थेचे नामकरण कसे होणार, हे आजमितीला ठरलेले नाही. बँक ऑॅफ बरोडा, जी या तिघांपैकी सर्वात मोठी आणि अधिक सक्षम बँक आहे, तिचे नाव पुढे सुरू राहणार की काही नवीन नाव दिले जाणार, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे आणि त्यामुळे नव्या बँकेला बँक ऑॅफ बरोडाचे स्थापना वर्ष 1908 सालापासूनचा वारसा सांगता येईल की 2018 किंवा 2019पासूनचा, हे येणारा काळ ठरवेल. कितीही मोठा वारसा असला, तरी आताचा काळ हा कसोटीचा आहे. केवळ बुडित कर्ज हा विषय नसून वेगाने होणारे तंत्रज्ञानातील बदल, त्यामुळे होणारी डिजिटल वाटचाल, घसरत जाणारी शाखांची आणि एटीएमची गरज ह्या सगळयाच विषयांना न्याय देणे गरजेचे ठरणार आहे. सुदैवाने यातील सर्वात मोठी बँक - बँक ऑॅफ बरोडा, जी विजया बँकेपेक्षा आकाराने जवळजवळ 4 पट मोठी आणि देना बँकेच्या 6 पट मोठी आहे, तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक प्रगतिशील आणि नव्याचा मागोवा घेणारी आहे, त्यामुळे देशातील तिसऱ्या क्रमांकाची बँक यातून निर्माण होईल. स्टेट बँकेपेक्षा अधिक आव्हानात्मक असे हे एकत्रीकरण पूर्ण झाल्यावर इतर मोठया बँकांचा मार्गदेखील प्रशस्त होईल. आज ती काळाची गरज आहे.

 डॉ. अभिजित फडणीस

9820402345