नाणेशास्त्रावर अमिट ठसा उमटवणारे संशोधक - शशिकांत धोपाटे

 विवेक मराठी  02-Oct-2018

 

सध्याच्या समकालीन नाणेशास्त्र-संग्राहक-संशोधकांमध्ये शशिकांत धोपाटे यांचे मोठे स्थान आहे. त्यांच्या नावावर 55 रिसर्च पेपर्स, अनेक वैशिष्टयपूर्ण पुरातन नाण्यांचा संग्रह आणि अभ्यास, 'क्वेस्ट इन इंडियन न्युमिसमेटिक्स' या पुस्तकाचे लेखन, साउथ इंडियन न्युमिसमेटिक्स सोसायटीचे सभासदत्व आणि अध्यक्षपद, ज्ञानप्रबोधिनी, पी.एल. गुप्ता असे काही पुरस्कार आहेत आणि सातवाहनकालीन नाण्यांच्या त्यांच्या अभ्यासाची परदेशातील अभ्यासकांनी दखल घेतली आहे. या अवलियाचा परिचय करून देणारा लेख.

-अंजोर पंचवाडकर

 नाणेशास्त्र ही इतिहासाची एक शाखा. यामध्ये मुख्यत: दोन वर्ग दिसतात - नाणे संग्राहक आणि नाणे अभ्यासक. शिलालेख-अभ्यास, मूर्तिशास्त्र यामुळे जसा इतिहासावर प्रकाश पडतो, त्याप्रमाणेच नाणेशास्त्राच्या अभ्यासाने इतिहासाचे काही वेगळे पैलू उलगडण्यास, काही शक्यता समोर येण्यास मदत होते. भारतात नाणे संग्राहक पुष्कळ आहेत, अभ्यासक त्या मानाने कमी. भारताचा ऐतिहासिक ठेवाच इतका व्यापक आहे की पुरातन नाणी जमविण्याचे वेड असणाऱ्यांची वानवा नाही. 

सध्याच्या समकालीन नाणेशास्त्र-संग्राहक-संशोधकांमध्ये शशिकांत धोपाटे यांचे मोठे स्थान आहे. त्यांच्या नावावर 55 रिसर्च पेपर्स, अनेक वैशिष्टपूर्ण पुरातन नाण्यांचा संग्रह आणि अभ्यास, 'क्वेस्ट इन इंडियन न्युमिसमेटिक्स' या पुस्तकाचे लेखन, साउथ इंडियन न्युमिसमेटिक्स सोसायटीचे सभासदत्व आणि अध्यक्षपद, ज्ञानप्रबोधिनी, पी. एल. गुप्ता असे काही  पुरस्कार, आणि सातवाहनकालीन नाण्यांच्या त्यांच्या अभ्यासाची परदेशातील अभ्यासकांनी दखल घेतली आहे. अशा या ज्ञानऋषीचे शिक्षण-व्यवसाय मात्र पूर्ण वेगळा, रसायनशास्त्राशी संबंधित!  

धोपाटे मूळचे कराडचे, नंतर व्यवसायानिमित्त ठाणेकर आणि आता निवृत्तीनंतर गेली 18 वर्षे पुण्यात वास्तव्य. धोपाटे यांचा जन्म 1930 सालचा. पाठीवर एक बहीण. त्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या आईने त्या काळी शाळेत नोकरी करून या दोन्ही मुलांना मोठे केले. शालेय शिक्षण कराडला झाले आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते कोल्हापूरला आले. राजाराम कॉलेजमधून रसायनशास्त्रात एम.एससी. केल्यावर काही काळ महाविद्यालयात प्राध्यापकी, पुण्याला हिंदुस्तान ऍंटीबायोटिक्स, मुंबईला जनरल पिग्मेंटमध्ये रिसर्च केमिस्ट अशा नोकऱ्या केल्या. दरम्यान मुंबईच्या मंदाकिनी सहस्रबुध्दे यांच्याशी विवाह झाला. 1967  साली नातू यांच्याबरोबर त्यांनी बदलापूर MIDCमध्ये स्वत:ची केमिकल फॅक्टरी सुरू केली. जे करायचे, त्यात स्वत:चे काही वेगळे स्थान निर्माण केले पाहिजे हेच ब्रीद. त्यामुळे फॅक्टरी काय किंवा नाणेअभ्यास काय, धोपाटे यांचा स्वत:चा ठसा त्यावर उमटलेला दिसतो.

आता शिक्षण, अर्थार्जन सगळे रसायनशास्त्राशी संबंधित, मग हे नाणी संशोधनाचे वेड आले कुठून आणि त्यात इतका मोठा पल्ला गाठला कसा? धोपाटे म्हणतात, ''माझ्या दृष्टीने जुनी दुर्मीळ नाणी अभ्यासताना माझं केमिस्ट्रीचं ज्ञान फार उपयोगी पडतं. अनेकदा जुनी नाणी हातात पडतात, तेव्हा ती राप, मळ, गंज चढून इतकी खराब झालेली असतात की कधीकधी त्यावर काही छापलं तरी आहे की नाही असं वाटावं. मग त्याचा आकार, वजन यावरून कुठल्या धातूचं नाणं असावं याचा अंदाज बांधून वेगवेगळी रसायनं वापरून ती स्वच्छ करावी लागतात.'' पुरातन नाणी स्वच्छ करणे यात धोपाटे यांनी प्रभुत्व मिळविले आहे.

''मी लहान असताना, बक्षीस किंवा भेट म्हणून कुणी पाहुणे किंवा नातेवाईक हातावर नाणं ठेवत असत. आमची आर्थिक परिस्थिती ओढगस्तीची असूनही आईने न खर्चता ती सगळी एका डब्यात जमवून ठेवली होती. मी 1948 साली मॅट्रिक झाल्यावर तिने तो डबा मला दिला. त्यात काही चांदीची नाणी होती. ब्रिटिशांची नाणी होती आणि 1860 सालचा एक रुपया होता!! म्हणजे जवळजवळ 90 वर्षे जुना!! त्याच डब्यात सातव्या एडवर्डची तसेच पाचव्या आणि सातव्या किंग जॉर्ज यांची नाणी होती, जी त्या काळी चलनातून बाद झाली होती आणि त्यामुळे ती दुर्मीळ नाणी म्हणून गणली जात होती. जुनी नाणी जमवायच्या माझ्या छंदाची ती सुरुवात होती म्हणायला हरकत नाही'' असे धोपाटे सांगतात.

ही नाणी तुम्हाला कशी मिळतात, हा प्रश्न नवीन संग्राहकांकडून नेहमी विचारला जातो. उत्खननात सापडलेल्या गोष्टींवर कुणाला हक्क सांगता येत नाही, त्या सरकारकडे जमा झाल्या पाहिजेत असा नियम असताना, नवोदितांना असा प्रश्न पडणे साहजिक आहे. ''ब्रिटिश सरकारच्या काळात विशेष सन्मान म्हणून जुनी नाणी काही विशेष व्यक्तींना दिली जात. तसेच गावोगावच्या सोनारांकडे गहाण पडलेली, वितळवण्यासाठी आलेल्या स्क्रॅपमधून आलेली अशी सोन्या-चांदीची, तांब्याची नाणी मिळू शकतात. सुरुवातीला व्यवसायानिमित्त आणि नंतर नाणी मिळवण्यासाठी म्हणून मी बराच फिरलो. एखाद्या लहानशा गावातल्या सराफाकडे दुपारच्या वेळेस गेलं की मालक जरा निवांत असतात. आणि जर त्याचा मूड चांगला असेल तर एखादा दुर्मीळ ठेवा हाती लागू शकतो. मला होस्पेटमधल्या अशाच एका लहानशा दुकानात विजयनगर साम्राज्याची छोटी 8 चांदीची नाणी मिळाली. त्या वेळी अक्षरश: घबाड हाती आल्याचा आनंद झाला. तसंच एकदा वाईला एका सराफाकडे विचारणा केली की काही जुनी नाणी आहेत का? तर त्यांनी थोडयाच वेळात वितळवण्यासाठी म्हणून क्रूसिबलमध्ये ठेवलेला ऐवज दाखवला, त्यात गोव्याचे शासक कदंब छितराज याचं सोन्याचं नाणं हाती लागलं.'' शशिकांत धोपाटे यांच्याकडे असे अनेक किस्से आहेत, की अगदी अचानक त्यांच्या हाती काही दुर्मीळ चिजा सापडल्या आहेत.

मुळात पिंड अभ्यासकाचा असल्याने, एखादे नाणे संग्रहाकरिता मिळाले नाही, पण फक्त अभ्यास करण्यापुरते जरी हाती आले, तरी त्यांना तेवढाच आनंद होतो. पुरातन नाण्याचे अभ्यासक म्हणून जसे त्यांचे नाव होऊ लागले, तसे ताम्रपट, एपिग्राफी याच्याशी संबंधित कामही त्यांच्याकडे येऊ लागले. नाणी जमविणे आणि त्यावर अभ्यास करणे इतकाच संशोधकाचा परीघ मर्यादित असत नाही. धोपाटे या क्षेत्रातील नवोदितांना मदत, इतिहास शिक्षकांना मार्गदर्शन, काही प्रसिध्द देवस्थानांना संग्रहाच्या वर्गीकरणाबाबत सल्ला अशा गोष्टी विनामूल्य, स्वकर्तव्य समजून करतात.

धोपाटे यांच्या संग्रहातील आणि त्यांनी अभ्यासलेल्या काही वैशिष्टयपूर्ण नाण्यांविषयी आपण जाणून घेऊ.

कुरा कॉइन्स - ठाण्याच्या सिध्देश्वर तलावाजवळ बागेत खोदकाम करताना एका गृहस्थांना सात सातवाहनकालीन नाणी सापडली. त्यातली सहा शिशाची, तर एक पोटीनचे होते. या नाण्यांवरील छापलेल्या चित्रांच्या, ब्राह्मी लिपीच्या आधारे धोपाटे म्हणतात की यातली 2 मराठा कुरा शासकांची, 4 सातवाहनांची आणि एक ॐ चिन्हांकित नाणे आहे. कुरा नाण्यांवर एका बाजूस धनुष्यबाण, झाड़, 3 टेकडया आहेत तर दुसऱ्या बाजूवर 'मराठी कुरासा' असे ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहे. सातवाहन नाण्यांवर त्यांचा हत्ती हा छाप आणि दुसऱ्या बाजूवर 'राणो वासीठीपुत्र पुलुमावी' असे लिहिलेले दिसते. धोपाटे यांच्या अंदाजानुसार ही कुरा नाणी इ.स.पू. 100 ते इ.स. 100 या शतकादरम्यानची असावीत. Numismaticsमधले तज्ज्ञ आणि धोपाटे यांचे गुरू डॉ. परमेश्वरीलाल गुप्ता यांच्या मते कुरा राजे हे सातवाहनांपूर्वी दक्षिण महाराष्ट्रात (कोल्हापूर) राज्य करत असावेत. धोपाटे यांच्या मते कुरा शासक आणि इतर काही राजे हे सुरुवातीच्या सातवाहन राजांना समकालीन असावेत. (साधारण इ.स.पू. 200 ते इ.स. 100.) 

ॐ छापलेल्या नाण्याबद्दल सांगायचे तर, डॉ. मिराशी आणि
डॉ. शेंबवणेकर यांच्यातील 'गणेशाच्या पुराणकालीनत्वाच्या वादा'वर प्रकाश टाकणारे असे ते नाणे आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतर धोपाटे यांचे मत डॉ. मिराशी यांच्या मताशी जुळणारे आहे. ओम्काराचे उच्चारण जरी ॠग्वेदकाळापासून होत असले, तरी त्या संदर्भातली लिखित नोंद (epigraphic record) मात्र नवव्या शतकापेक्षा जुनी नाही.

घारापुरी बेटावर सापडलेला ठेवा - काही वर्षांपूर्वी मुंबईच्या घारापुरी बेटावर सापडलेली 361 नाणी धोपाटे यांच्याकडे आली. त्यातली सुस्थितीतील 161 नाणी स्वच्छ करून त्यातून 16 नाणी त्यांनी अभ्यासासाठी वेगळी काढली. वेगवेगळया आकाराच्या, वजनाच्या आणि धातूच्या त्या नाण्यांवर वेगवेगळया आकृत्या आणि चिन्हे आहेत. दुसऱ्या बाजूवर मात्र 3 त्रिकोणांची त्रैकुटक राजांची चिन्ह-मुद्रा आहे. यातील 8 नाणी शिशाची, तर 8 वेगळयाच धातूची असल्याचे धोपाटे यांच्या लक्षात आले. त्याचे रासायनिक परीक्षण केले असता, तो जस्त (झिंक) आणि ऍंटीमनी यांचा संमिश्र धातू (alloy) असल्याचे निदर्शनास आले.  नाणेशास्त्रातील संशोधनात हा धातू प्रथमच आढळून आला आहे.

विजयनगर सिल्व्हर कॉइन्स - विजयनगरची अनेक नाणी आत्तापर्यंत अभ्यासली गेली आहेत, पण ती प्रमुख्याने सुवर्णाची आणि तांब्याची आहेत. होस्पेटला धोपाटे यांना चांदीची 8 नाणी मिळाली. त्यापूर्वी विजयनगर सिल्व्हर कॉइन्सवर फक्त दोन शोधनिबंध लिहिले गेले होते. त्यापैकी एका नाण्याच्या वजन-आकार याविषयी माहिती उपलब्ध नाही. दुसरा शोधनिबंध रमेसन यांचा, त्यात 1.26 व्यासाच्या, 3.33 ग्राम वजनाच्या चांदीच्या नाण्याचा उल्लेख आहे. विजयनगर साम्राज्याचा ऑंखो देखा तपशील लिहिणाऱ्या अब्दुर रझाक याने त्या वेळी चलनात असलेल्या चांदीच्या 'तारा' या नाण्याचा उल्लेख केला आहे. आता धोपाटे यांच्याकडची नाणी रमेसन यांच्या नाण्यापेक्षा बरीच लहान आहेत (0.55 ते 0.83 सेमी व्यासाची), तर आता यातले 'तारा' नक्की कुठले? आणि अर्थातच असा निष्कर्ष निघतो की विजयनगरची ताराशिवाय दुसरी सिल्व्हर कॉइन्स प्रचलित होती, त्या विषयीची माहिती अज्ञात आहे. धोपाटे यांच्याकडील नाण्यांमुळे त्यावर थोडा प्रकाश पडलाय असे म्हणता येईल.

शिवाजीचा अद्वितीय सुवर्ण अर्ध-होन - धोपाटे म्हणतात, ''माझ्याकडे असलेलं हे विलक्षण नाणं थोडं वादाच्या छायेत आहे. 1989मध्ये उडुपीला गेलो असता एका सराफाकडे हे नाणं मिळालं. 0.94 व्यासाच्या आणि 1.36 ग्रॅम वजनाच्या नाण्याची एक बाजू पूर्ण कोरी आहे. दुसऱ्या बाजूवर 'रा जा श्र शि वा' असं देवनागरीत छापलेलं आहे. काहींच्या मते हे विजयनगरचे अर्ध होन नाणं आहे. परंतु विजयनगरचा अर्ध-होन 1.8 ग्राम वजनाचा असतो. विजयनगरच्या नाण्यांवर सहसा आढळून येणाऱ्या देवतांच्या चित्रांचा/लीजंडस्चा अभाव, मागची कोरी बाजू तसंच त्याचं वजन या बाबी ते नाणं विजयनगरचं नाणं असावं या म्हणण्याला दुजोरा देत नाहीत.'' धोपाटे यांच्या मते हे नाणे म्हणजे शिवराज्याभिषेकापूर्वीचा अर्ध-होन असून सध्यातरी ज्ञात असे हे एकमेव शिवराज्याभिषेक-पूर्व नाणे आहे!

याशिवाय घारापुरीला सापडलेली कुमारगुप्ताची नाणी, कदंब शासकांची सुवर्ण नाणी, हरारची सुवर्णमुद्रा, शेवटच्या पेशव्यांचं सुवर्णनाणं, राजारामाची शाहू महाराजांनी काढलेली स्मृतिमुद्रा, दुर्मीळ असं विष्णुकुंडीन-माधव नाणं, पंधराशे वर्षं पुरातन गुप्तकालीन अश्वमेध नाणं अशी अनेक वैशिष्टयपूर्ण नाणी धोपाटे यांच्या संग्रही आहेत.

परदेशी दुर्मीळ नाण्यांचा अभ्यास करावासा वाटला नाही का? असे बरेच जण विचारतात, त्यावर धोपाटे म्हणतात, ''अभ्यासासाठी काही दुर्मीळ रोमन नाणी संग्रहात आहेत. पण सध्यातरी आपल्या भारतीय नाण्यांच्या संशोधनातून मान वर करायला फुरसत मिळत नाहीये.''

नाणकशास्त्राच्या या छंदापायी धोपाटे यांचा नाणी-संग्रह तर विलक्षण झाला आहेच, तसेच या निमित्ताने जो लोकसंग्रह जमला, त्याचे मोल जास्त आहे. या क्षेत्रातले तसेच पुरातत्त्वशास्त्रातील काही दिग्गज, डॉ. परमेश्वरीलाल गुप्ता, डॉ. अजय मित्र शास्त्री, डॉ. शोभना गोखले यांचे मार्गदर्शन लाभले. अण्णा शिरगावकर यांच्यामुळे ताम्रपट या विषयाची गोडी आणि अभ्यासाची संधी मिळाली. प्रा. डॉ. रूपाली मोकाशी हिच्यासारख्या तरुण अभ्यासकांबरोबर काम करताना मिळणारी ऊर्जा, पद्मश्री डॉ. ढवळीकर यांचा परिचय, तसेच डॉ. पाठक, डॉ. राजा रेड्डी, डॉ. रघुनाथ भट यांचा स्नेह हा मोलाचा ठेवा आहे.

धोपाटे यांच्या मते हातात एखादे सुरेख पुरातन नाणे पडावे, पण त्यावर काय लिहिले आहे ते वाचता येऊ नये यासारखे दु:ख नाही. त्यांना सुरुवातीला मुघल नाणी मिळाली, मग त्यावरचे इन्स्क्रिप्शन वाचता यावे यासाठी त्यांनी उर्दूचा क्लास लावला, त्याच्या दोन परीक्षा दिल्या. ब्राह्मी लिपीचे स्व-शिक्षण घेऊन त्यात प्रावीण्य मिळवलेय. त्यांच्या ब्राह्मी लिपीच्या ज्ञानामुळे त्यांना अनेक ताम्रपट अभ्यासायला मिळाले. सहसा 'वेळ जाता जात नाही' ही निवृत्त वृध्दांची तक्रार असते. धोपाटे आज वयाच्या 87व्या वर्षीसुध्दा त्यांच्या कामात इतके गढलेले आहेत की त्यांना वेळ पुरत नाही. पुढचे किमान सहा महिने पुरतील एवढे प्रोजेक्ट समोर आहेत

त्यांच्या पुस्तकासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेत पद्मश्री डॉ. ढवळीकर म्हणतात, ''Shri Dhopate has studied history, learnt deciphering ancient scripts and languages, from Buddha's times 2500 years ago to the Maratha period, and even colonial coinage of 19th century. He has been making sterling contributions to Indian numismatic studies.''(श्री. धोपाटे यांनी इतिहास, पुरातन भाषा, लिपी यांचा अभ्यास केला आहे. बुध्दकालीन, 2500 वर्षांपूर्वीचा ते मराठा काळ तसेच 19व्या शतकातील (ब्रिटिश) नाण्यांपर्यंतचा काळ त्यांनी अभ्यासला आहे. भारतीय नाणेशास्त्राच्या क्षेत्रात त्यांचे फार मोठे योगदान आहे.)

या क्षेत्रात येण्याची इच्छा असणाऱ्यांना धोपाटे यांचे एकच सांगणे आहे - 'जे कराल ते उत्तमच असू द्या, आणि आपला ठसा त्यावर उमटू द्या.'