बंजारा संस्कृतीचे रक्षण हेच ध्येय

 विवेक मराठी  23-Oct-2018

***पंजाबराव पवार***

अपप्रचारामुळे हा समाज धर्मांतरणाला बळी पडत असल्याने बंजारा विकास परिषदेद्वारे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले. बंजारा विकास परिषदेतर्फे प्रबोधन वर्ग घेतले जातात. तांडयामध्ये तांडयाचे कारभारी आणि नाईक समाजातील धार्मिक परंपरेवर भाष्य करतात. त्याचप्रमाणे भागवत कथेचे आयोजन केले जाते. त्यातून या समाजाला आपल्या मूळ धर्माची, मूळ संस्कृतीची जाणीव करून दिली जाते.

बंजारा समाजाला गौर बंजारा समाज असेही म्हणतात. हा समाज आपल्या उदरनिर्वाहासाठी अनेक ठिकाणी स्थलांतर करत असतो. देशभरातील या समाजाची लोकसंख्या सुमारे 6 कोटी असून देशातल्या 15 राज्यांमध्ये हा समाज विखुरलेला आहे. भटके बंजारा जिथे वस्ती करून राहतात, त्या त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाला तांडा म्हणतात. या तांडयाचे संचालन करणारे म्हणजे ज्यांना मुखिये म्हणता येतील अशा दोन प्रमुख व्यक्ती असतात, त्यांना कारभारी आणि नाईक म्हटले जाते. या समाजाचे मूळ राजस्थानात आहे. देवी जगदंबा या समाजाची कुलदेवता आहे.

पीठागोर महाराज हे बंजारा समाजातील पहिले धर्मगुरू. त्यांचा काळ इ.स.पूर्व समजला जातो. 'जो समाज शिक्षण प्राप्त करून आपल्या समाजाला सज्ञान करतो तोच समाज आपली राज्यव्यवस्था निर्माण करू शकतो' ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. दागुरू हे दुसरे धर्मगुरू होते. ते अकराव्या शतकात होऊन गेले. त्यांनी शिक्षणाची तसेच अध्यात्माची शिकवण दिली. बाराव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत या समाजात फार बदल झाले. हा समाज प्रामुख्याने भटका असल्याने देशभर वेगवेगळया भागांत विखुरला गेला. त्यांच्यापैकी अनेकांच्या व्यापारात बदल झाले, उदरनिर्वाहाची साधने बदलली. पण अशा लोकांनी स्वत:च्या समाजातील उर्वरित लोकांकडे लक्ष न देता, अन्य राजांच्या पदरी काम करत राहणे पसंत केले. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना या समाजाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. या पार्श्वभूमीवर या समाजात संत सेवालाल महाराजांचा जन्म झाला. बंजारा समाजासाठी ते एक अवतारी पुरुष होते. त्यांनी बंजारा समाजाचे रक्षण केले. ते गोरक्षक होते. देशभर त्यांनी प्रवास केला. संत सेवालाल महाराजांनी लोकहित डोळयासमोर ठेवून त्यांचे संघटन केले. समाजाचे नेतृत्वही केले. ते संतगुरू, धर्मगुरू, समाजसुधारक, क्रांतिकारक, अर्थतज्ज्ञ, आयुर्वेदाचार्य होते.

 संत सेवालाल महाराजांचा जन्म 15 फेबु्रवारी 1739 रोजी कर्नाटकातील गुलालडोडी तांडा म्हणजे आताचे सेवागड या गावी झाला. धान्य पुरवणे हा बंजारा समाजाचा व्यवसाय होता. त्यावर अनेक राजांनी बेहिशेबी कर आकारला होता. ही करप्रणाली संत सेवालाल महाराजांनी रद्द करून बंजारा समाजाला न्याय मिळवून दिला. 2 जानेवारी 1773 रोजी रुई तलाव ता. दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथे त्यांनी आपला देह ठेवला. पोहरादेवी ता. मनोरा, जि. वाशिम या गावी त्यांचे समाधीस्थळ आहे.

श्री रामराव महाराज हे बंजारा समाजाचे विद्यमान धर्मगुरू आहेत. ते बालब्रह्मचारी आहेत. तसेच बाबूसिंग महाराज हे त्यांचे उत्तराधिकारी आहेत. रामनवमी हा या समाजाचा मुख्य उत्सव आहे. अनादिकालापासून पोहरादेवी येथे रामनवमीनिमित्त यात्रा होते. या यात्रेला वेगवेगळया राज्यांतून मोठया प्रमाणात भाविक येतात.

बंजारा समाजातील समस्या काळानुसार बदलत गेल्या. हा समाज आपल्या कामासाठी स्थलांतर करत असल्याने शिक्षणाची वानवा असते. आजच्या काळात पुस्तकी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आल्याने तर बंजारा समाजातील अल्पशिक्षितपणा अधिकच उठून दिसतो. त्यातूनच धर्मांतरणाला अर्थात ख्रिश्चनीकरणाला वेग आला. ही समस्या लक्षात आल्यावर 2005 साली बंजारा विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. संत सेवालाल महाराज हे येशूचे पुत्र आहेत असा खोटा प्रचार करून बंजारा समाजातील लोकांचे धर्मांतरण केले जात होते. यावर विचार करून बंजारा विकास परिषदेने बंजारा समाजासमोर संत सेवालाल महाराजांचे योग्य चरित्र मांडले. 

अपप्रचारामुळे हा समाज धर्मांतरणाला बळी पडत असल्याने बंजारा विकास परिषदेद्वारे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले. बंजारा विकास परिषदेतर्फे प्रबोधन वर्ग घेतले जातात. तांडयामध्ये तांडयाचे कारभारी आणि नाईक समाजातील धार्मिक परंपरेवर भाष्य करतात. त्याचप्रमाणे भागवत कथेचे आयोजन केले जाते. त्यातून या समाजाला आपल्या मूळ धर्माची, मूळ संस्कृतीची जाणीव करून दिली जाते. त्यासाठी संत सेवालाल महाराजांच्या साहित्याचे वितरण केले जाते. ज्या लोकांचे धर्मांतरण झाले आहे त्यांना मूळ धर्मात परत आणले जाते.

बंजारा समाजातील धर्मांतरण होण्यामागे शिक्षणाचा अभाव ही मूळ समस्या होती. ही समस्या ओळखून या समाजाचे शिक्षणासाठी प्रबोधन केले. परंतु त्यातले जे शिकले ते शहरात स्थायिक झाले. त्यांच्यामधील श्रध्दा कमी झाली. ह्या लोकांनी पोहरादेवी येथे जाणे बंद केले. ही नवी समस्या निर्माण झाली. म्हणून बंजारा विकास परिषदेतर्फे या समस्येवर उपाययोजना करण्यात आली. त्यानुसार धर्मरक्षक दिन, रक्षाबंधन, 15 फेबु्रवारी - संत सेवालाल महाराज जयंती उत्सव, रामनवमी शोभा यात्रा असे उत्सव साजरे करून, तसेच प्रत्येक तांडयात भगव्या ध्वजाचे वितरण करून तांडयावरील लोकांचे प्रबोधन करण्यात येते. त्यातून लोकांचे विचारपरिवर्तन केले जाते.

बाबूसिंग महाराजांच्या नेतृत्वाखाली हिंदू संमेलन घेण्यात आले. यामध्ये डॉ. श्यामसुंदर यादव महाराजांचा समावेश होता. या संमेलनात प्रवचन, पारायणे, भागवत कथा घेण्यात आले. तसेच 10,000 धार्मिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून आजवर 150 तांडयांवरचे धर्मांतरण थांबविण्यात बंजारा विकास परिषदेला यश आले आहे.

बंजारा विकास परिषदेतर्फे 2006 साली विशाल हिंदू संमेलन घेण्यात आले होते. या संमेलनात तत्कालीन संघ सरकार्यवाह आणि विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत उपस्थित होते. या संमेलनाला बंजारा आणि मातंग समाजातून 10,000 लोक उपस्थित होते.

बंजारा विकास परिषदेमुळे धर्मांतरण ह्या समस्येचे निराकरण झाले. तसेच या समाजाचा विकास करण्याचे कार्य बंजारा विकास परिषदेने केले. अनेक गावात धर्मरक्षक समितीची स्थापना करून अनेक मार्गांनी प्रत्यक्ष होणारे धर्मातरण थांबविण्यात बंजारा विकास परिषदेला यश आले. त्यामुळे गौर बंजारा समाजातील मूळ संस्कृती पुन्हा रुजायला सुरुवात झाली.  

- बंजारा विकास परिषद, विदभ©