कुणाचाही स्वाभिमान दुखवू नका

 विवेक मराठी  04-Oct-2018

हातात पैसा खुळखुळू लागल्यावर अनेक लोकांच्या वागण्या-बोलण्यात फरक पडतो. ते आपल्याहून परिस्थितीने दुर्बळ असणाऱ्यांशी तुच्छतेने बोलू लागतात. वास्तविक ही व्यक्तिमत्त्वाची उन्नती नसून अधोगती असते. आपल्याकडून चुकूनही गरिबाचा अपमान होणार नाही, याची काळजी घेण्यात खरे मोठेपण असते. म्हणूनच संतांनाही 'सुखाचा शब्द बोलावा', अशी शिकवण दिली आहे.

 भारतात असताना मी एकदा काही मित्रांसह हॉटेलमध्ये गेलो होतो. ही 25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही सँडविचची ऑॅर्डर दिली. आम्हाला वाटले की दहा-पंधरा मिनिटांत सँडविच येईल, पण ते यायला तब्बल एक तास लागला. एकतर भूक लागली होती आणि त्यातून खाणे येण्यास वेळ लागत असल्याने आम्ही अस्वस्थ झालो होतो, पण ऑॅर्डर कॅन्सल करणे, दुसऱ्या हॉटेलात जाणे आणि तिथे पुन्हा प्रतीक्षा करणे यातही जास्त वेळ गेला असता, म्हणून नाइलाजाने आम्ही बसून राहिलो. सँडविचचे बिल आमच्यातील एका मित्राने दिले, मात्र सेवेतील विलंबाबद्दल तो इतका नाराज झाला होता की त्याने बाउलमध्ये मुद्दाम केवळ दोन रुपये टिप ठेवली.

ऑॅर्डर घ्यायला, सर्व्ह करायला आणि बिल कलेक्ट करायला एक तरुण मुलगी तेथे होती. बाउलमध्ये 2 रुपये टिप ठेवल्याचे पाहून ती एकदम उसकली आणि माझ्या मित्राकडे वळून म्हणाली, ''ते दोन रुपये उचला आणि तुमच्याकडेच ठेवून घ्या. मला त्याची गरज नाही.'' त्यावर माझा मित्र उपरोधाने म्हणाला, ''दहा मिनिटांत द्यायच्या सँडविचसाठी ग्राहकाला तासभर खोळंबून ठेवल्याबद्दल मग तुला किती रुपये टिपची अपेक्षा आहे?'' त्यावर ती मुलगी म्हणाली, ''हा विचार तुमच्या मनात असेल तर तुम्ही मुळीच टिप ठेवू नये, हे उत्तम. तुमची ऑॅर्डर सर्व्ह करण्यास उशीर झाला, याबद्दल मला मनापासून वाईट वाटते आणि मी दिलगिरीही व्यक्त करते. परंतु या उशिराचे कारण तुम्हाला सांगणे गरजेचे आहे. सँडविच तयार करताना आमच्या कुकच्या असे लक्षात आले, की ब्रेड खराब झाला असून त्याला कुबट वास येतो आहे. अशा वेळी केवळ तेवढीच स्लाइस बदलून चालत नाही, तर साठयातील सगळा ब्रेड फेकून द्यावा लागतो. आम्ही जवळच्या बेकरीमधून ताजा ब्रेड मागवला आणि त्याची सँडविचेस बनवून तुम्हाला दिली. यात उशीर झाला खरा, परंतु ग्राहकाला काहीही खायला घालणे हे आमच्या तत्त्वाविरुध्द आहे. आम्हाला तुमच्या पोटाची काळजी असते.''

मी मित्राची समजूत काढली. त्याला सांगितले, ''तू एकवेळ टिप ठेवली नसतीस तरी चालले असते. विलंबाबद्दल गिऱ्हाईक नाराज झाले आहे, हे त्या मुलीने जाणले असते, परंतु तिच्या सेवेची किंमत दोन रुपये केल्याने तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली आणि ती रागावली. लक्षात घे, माणूस कितीही छोटा असला तरी त्याच्या कामाचीही काही एक प्रतिष्ठा असते. ते ग्राहकांना आदर देतात, तर त्यांनाही आदर मिळायला पाहिजे. पुष्कळ लोक छोटया हॉटेलांमध्येही ''वेटर! पाणी आण'' किंवा ''ए पोऱ्या! टेबलवर फडकं मार'' असे मोठया रुबाबात फर्मावतात. खरे तर या टोनमध्ये बोलण्याची गरज नसते. कारण स्वाभिमान दुखावला गेला की कुणीही पटकन् रिऍक्ट होतो. 'दीवार' या चित्रपटातील एका प्रसंगात बूटपॉलिशवाला लहान मुलगा ग्राहकाला ताडकन बजावतो, ''सेठऽ पैसे हातमें देना. फेके हुए पैसे मै नही उठाता.'' माझ्या मित्राला माझे म्हणणे पटले.

आमच्या 'अल अदील' स्टोअरमध्येही अशीच एक घटना घडली होती. आमच्या एका स्टोअरमध्ये एक फिलिपिनो ख्रिश्चन मुलगी कॅशियर म्हणून काम करत होती. ती अतिशय प्रामाणिक आणि कामसू होती. एक दिवस तिच्याबाबत एक विचित्र घटना घडली. दुबईत शुक्रवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने दुकानांमध्ये एरवीपेक्षा ग्राहकांची गर्दी जास्त असते. एका शुक्रवारी अशाच गर्दीत कुणी एक व्यक्ती बिलिंग काउंटरपुढे या मुलीसमोर उभी राहिली आणि त्या व्यक्तीने काउंटरवर थाप मारून लक्ष वेधून घेत काही चौकशी केली. नंतर गर्दीच्या आणि हिशेबाच्या नादात ती मुलगी तो प्रसंग विसरून गेली. दिवसाअखेरीस हिशेब जुळवताना तिच्या असे लक्षात आले की ड्रॉवरमधून जमा रकमेपैकी काही पैसे गायब झाले आहेत. ते कसे आणि कुणी घेतले असावे, हे तिला उमगत नव्हते. बरं ती रक्कमही तशी किरकोळ नव्हती, तर जवळपास एक लाख रुपये किमतीचे दिऱ्हॅम होते. दुकानातील इतर कर्मचारी तिच्याकडेच शंकेने बघायला लागले. ती बिचारी केविलवाणी होऊन घरी गेली.

दुसऱ्या दिवशी ती आपल्या आईला घेऊन आली आणि झाल्या प्रकारात आपली काहीही चूक नसल्याचे परोपरीने सांगू लागली. आमच्या कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापक (एचआर मॅनेजर) मात्र तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. अखेर हताश होऊन तिच्या आईने गहाळ झालेली रक्कम भरून द्यायची तयारी दाखवली. त्यावर आमच्या व्यवस्थापक महाशयांनी टिप्पणी केली, की पैसे लंपास केल्याचे उघडकीला येईल म्हणूनच आता ते परत करण्याचा आव आणतेय. या आरोपामुळे ती मुलगी संतापली. तिच्या स्वाभिमानाला जबरदस्त ठेच बसली. तिने आमच्या कंपनीविरुध्द कोर्टात धाव घेतली. कायद्यानुसार कंपनीचा मालक म्हणून मला न्यायालयात उभे राहावे लागले. आयुष्यात कोर्टाची पायरी चढण्याचा माझा पहिलाच प्रसंग. याचिका ऐकल्यावर कोर्टाने हा वाद दोन्ही पक्षांनी सामंजस्याने मिटवावा, असा निर्णय दिला.

मग मी स्वत:च त्या प्रकरणात लक्ष घातले. ती मुलगी आणि व्यवस्थापक यांना समोरासमोर बोलवून बाजू मांडायला लावली. त्या मुलीने घडले होते तसे सांगितले, पण आमचे व्यवस्थापक मात्र बाजू मांडताना अडखळू लागले. मुलीवर आळ घेण्याचे पुरावे त्यांना देता येईनात. ती मुलगी खरे बोलत असल्याचे मला पटले होते, कारण त्याच काळात नजरबंदी (हिप्नोटाइज) करून कॅशियरकडून पैसे लंपास करण्याचे आणखी काही प्रकार अन्यत्र घडले होते. मी तत्क्षणी कंपनीच्या वतीने त्या मुलीची माफी मागितली आणि व्यवस्थापकांना खोटे बोलण्याची शिक्षा म्हणून त्यांचे अधिकार कमी केले. न्याय मिळाल्याने त्या मुलीने माझे आभार मानलेच, आणि नंतर दर वर्षी ती ख्रिसमसला माझ्यासाठी आठवणीने फुलांच्या गुच्छासमवेत चॉकलेट्स आणू लागली. तिच्या स्वाभिमानी वृत्तीचे मला नेहमी कौतुक वाटत राहिले.

व्यवसायात असलेल्या प्रत्येकाला माझे सांगणे असते, की तुमच्याकडे नोकर म्हणून काम करणाऱ्यांशी तुच्छतेने बोलून त्यांचा स्वाभिमान दुखवू नका. त्याचा फटका कधीतरी व्यवसायाला बसतो. अमेरिकेत एकदा आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. तेथील जेवणात पापड अर्धाकच्चा भाजलेला होता. फ्लॉवरची भाजीसुध्दा कच्चीच शिजवली होती. आम्ही वेटरला तसे सांगितल्यावर त्याने भाजी बदलून दिली, तर तीही कच्चीच शिजलेली होती. मला याचे आश्चर्य वाटले. मी वेटरला विचारले असता तो म्हणाला, ''मालकाचे आणि कुकचे बिनसले आहे आणि त्यामुळे कुक निषेध म्हणून स्वयंपाक नीट करत नाहीय.'' आता यांच्या भांडणामुळे ग्राहकांवर अन्याय होणार आणि धंद्याचेही नुकसान होणार, हे उघड आहे. अनुभवी आणि कुशल माणसे जपताना त्यांच्याशी योग्य पध्दतीने बोलणे गरजेचे असते. त्यांना खूप लाडावून डोक्यावर चढवू नका, पण तुच्छतेने वागून पायाखालीही तुडवू नका.

मित्रांनोऽ, आपण नेहमी स्वत:चा आणि दुसऱ्याचाही स्वाभिमान जपावा. लहानपणी मला एका गृहस्थांनी जेवणाच्या पंगतीतून ताटावरून उठवले होते आणि ''बाळ, ही पंगत बडया लोकांसाठी आहे, तू मागाहून बस'' या शब्दांत माझ्या गरिबीचा अपमान केला होता. मी तिरीमिरीने न जेवता निघून आलो. तेव्हा माझ्या आईने माझी कृती योग्य असल्याचा निर्वाळा दिला. तिने मला पेशव्यांचे न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांच्या बालपणातील गोष्ट सांगितली होती. लहान राम हा एका सावकाराच्या घरी शागिर्द असताना एक दिवस सावकाराच्या पायावर पाणी घालताना त्याचे लक्ष धन्याच्या कानातील तेजस्वी मोत्याच्या भिकबाळीकडे गेले. पायावरील पाण्याची धार इतरत्र पडल्याने संतापून सावकाराने रामचा अपमान केला. स्वाभिमानी रामने तत्क्षणी खूप शिकण्याचा निश्चय करून काशी गाठली आणि तेथून वेदशास्त्रसंपन्न दशग्रंथी विद्वान होऊनच तो घरी परतला. आपण दुसऱ्याचा मान ठेवावा आणि स्वत:चाही राखून घ्यावा. एक छान सुभाषित लक्षात ठेवण्यासारखे आहे.

अधमा धनमिच्छन्ति धनं मानं च मध्यमा:।

उत्तमा मानमिच्छन्ति मानो हि महतां धनम् ॥

(कनिष्ठ मनोवृत्तीचे लोक धनाची इच्छा करतात, मध्यम मनोवृत्तीचे लोक धनासमवेत मान मिळण्याची इच्छा करतात, परंतु उत्तम वृत्तीचे लोक केवळ मान राखला जाण्याची इच्छा करतात, कारण मान हेच त्यांच्यासाठी मोठे धन असते.)

 (या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा [email protected] या पत्त्यावर पाठवू शकतात.)