ध्येयनिष्ठ स्वयंसेवक माधवराव पालांडे

 विवेक मराठी  04-Oct-2018

रत्नाागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचे ज्येष्ठ संघस्वयंसेवक माधवराव पालांडे यांचा 93 वा जन्मदिवस नुकताच साजरा झाला. संघातील अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढवा घेणारा लेख.

क्षणाचे हौतात्म्य निश्चितच महत्त्वाचे आहे. पण नित्य जळत राहणे, चंदनासारखे सतत झिजत राहणे हे त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे व आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी कृतीने स्वयंसेवकांना हा पाठ दिला. त्यातील एक स्वयंसेवक माधवराव रामजीराव पालांडे. हे दादा या नावाने परिचित आहेत. त्यांचा जन्म ता. खेड, जि. रत्नागिरी येथे 1 सप्टेंबर 1925 रोजी झाला. वडिलांचे अकाली निधन आणि कोकणातून गरिबीमधून आई रमाबाईंनी आणि मामांनी त्यांचे पालनपोषण केले. मुंबईतून स्वकष्टाने त्यांनी शिक्षण घेतले. श्रीनिवास कॉटन मिलमध्ये कॅन्टीनपासून इमानदारीने काम करून आपल्या कुशलतेमुळे त्या परिवारात नावलौकिक मिळवला.

दादा 1943मध्ये मुंबई वरळी, डिलाइल रोड, बीडीडी चाळ मैदानात स्व. प्रल्हादजी अभ्यंकर यांच्यासह शाखेत जाऊ लागले. त्या काळात नारायण वायंगणकर (ज्येष्ठ स्वयंसेवक) यांच्याबरोबर अनेक बाल-तरुणांना संघशाखेत आणले. माधवराव दादा म्हणतात, ''कै. प्रल्हादजी अभ्यंकर, कै. बंडोपंत यांनी मला संघशाखेत आणले आणि माझ्या जीवनाचे सोने झाले.'' सन 1948 सालच्या पहिल्या संघबंदीमध्ये ते वरळी येथे कारागृहात होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती लढा, कच्छ करार, भाववाढविरोधी आंदोलन, गोरक्षा अभियान, भारत-चीन युध्दाच्या संरक्षण समितीची स्थापना करणे अशा अनेक चळवळीत भाग घेतला व नेतृत्वही केले. दलित शिक्षण प्रसारक समिती, कोकण जनता परिषद, झोपडपट्टी जनता परिषद, विजय बजरंग व्यायामशाळा, एकता मंडळ, नागरिक सेवा संघ, प्रगती कला मंडळ, मुंबईत संघाचे प्रत्यक्ष काम करत असताना त्यांनी तळवट-खेड ग्रामस्थ मंडळ, पंधरागाव माध्यमिक शिक्षण संस्था, पंधरागाव वि.जनता सेवा संघ, खेड तालुका मराठा सेवा संघ या संस्थांच्या कामात हिरिरीने भाग घेतला.

भारतीय जनसंघाच्या माध्यमातून मुंबई नगरपालिका तसेच खेड विधानसभा मतदारसंघातून मान्यवर नेत्यांशी प्रखर झुंज दिली. भारतीय मजदूर संघाचे ते फाउंडर मेंबर आहेत. स्व. रमणभाई शहा, स्व. दत्तोपंतजी ठेंगडी यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळयाचे संबंध होते. जनसंघाचे संस्थापक स्व. दीनदयाळ उपाध्याय यांच्याबरोबर त्यांनी काम केले.

भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या अनेक लढयात नेतृत्व केले आहे. मुंबईत असताना ते दादर भागाचे संघचालकही होते. नंतर माधवराव दादांनी आपले सामाजिक कार्य जन्मगावी तळवट खेड या पंधरागावी सुरू केले.

पंधरागाव विभाग जनता सेवा संघ, मुंबई ग्रामीण विभागाची स्थापना 1947मध्ये केली. ते मंडळाचे सल्लागार होते. पंधरागाव परिसरात त्यांनी तरुणांमध्ये राष्ट्रीय वृत्ती निर्माण करणारी अनेक कामे सुरू केली. त्यांचे परममित्र लोकसेवक दयानंद (भाऊ) रामजी म्हापदी यांच्या सहकार्याने या परिसरात रा.स्व. संघाच्या कार्याचा ठसा उमटविला. स्वत: गिरणी कामगार असल्याने भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून कामगारांच्या अनेक लढयात ते अग्रभागी राहिले. राम जन्मभूमी आंदोलनातही सहभागी झाले. विश्व हिंदू परिषदेचे संघटक म्हणूनही ते कार्य करीत होते. संघाच्या प्रेरणेने श्रीमहालिंग धरती प्रतिष्ठानची स्थापना करून, शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून त्यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने पंधरागावात 13 बालवाडया, 23 अंगणवाडया सुरू केल्या. तरुण मुलींसाठी शिवणकला वर्ग सुरू केले. पंधरागावातील पाच विद्यालयांनी एकत्र विचारमंथन करावे, म्हणून उपाले बंधू तळवट-पाल, खेड गुरुशिष्य गुणगौरव सोहळयाची स्थापना, स्वामी विवेकानंद जयंती उत्सव युवकांना प्रेरणेसाठी चालू केला. महिलांसाठी महिला मेळावा, महिलांसाठी निवेदिता पतपेढी रजिस्टर केली. या परिसरातील जलसंवर्धनासाठी त्यांनी प्रयत्न केले व त्यासाठी धरणग्रस्त समितीची स्थापना केली आहे. त्या समितीचेही अध्यक्षपदही भूषवले.

माधवराव दादांनी आपल्या गावात जय महालिंग माध्यमिक शिक्षण संस्थेची स्थापना केली. राष्ट्रीय कामगार युनियन मुंबई स्व. बाळासाहेब साठे पुरस्कार, कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कृष्णामामा महाजन यांच्या प्रथम स्मृतीदिनी समाजप्रबोधन स्मृती पुरस्कार देण्यात आला. खेड तालुक्याच्या वतीने जाहीर सत्कार 1994मध्ये तळवट खेड गावी अध्यक्ष कै. शिवाजीराव गोताड व प्रमुख पाहुणे मा. भि.र. उर्फ दादा इदाते यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी पंधरागाव विभाग जनता सेवा संघ, मुंबई ग्रामीण विभाग मंडळाचे सल्लागार म्हणून काम केले. पंधरागावातील बाबे प्राथमिक आरोग्याच्या केंद्राच्या इमारतीच्या कामात सक्रिय भाग घेतला. रस्ते, वीज यासाठी शासकीय योजनेतून प्रयत्न केले. परिसरातील लोक त्यांना सांगतात, ''माधवराव दादा, आता विश्रांती घ्या!'' त्यावर ते म्हणतात, ''हवी वाटली जरी विश्रांती, मरणोत्तर ती मिळे चिरंतन, म्हणून सारखे कार्य करावे, जगी जोवरी लाभे जीवन.'' माधवरावांच्या जीवनावर डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी यांचा फार मोठा प्रभाव आहे.

त्यांची साधी राहणी, स्वच्छ विचार अभ्यासवृत्ती आणि या उतारवयातही कामाची तत्परता वाखण्याजोगी आहे. त्यांचे मिठास बोलणे खेडयापाडयात अत्यंत लोकप्रिय झाले आहे. या सर्व कार्याची धुरा सांभाळताना खरी मदत होती त्यांच्या स्व. पत्नी म्हणजे सर्वांच्या पार्वतीकाकू यांची. त्यांना तीन मुलगे व दोन मुली आहेत. अशा सत्त्वशील माधवरावांना दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..

 

9404330210