गांधी विरुध्द गोडसे कशासाठी?

 विवेक मराठी  05-Oct-2018

गांधी जयंतीचे औचित्य साधून सेवाग्राम आश्रमात काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. काँग्रेसचे हायकमांड सोनिया आणि राहुल गांधी यांनी स्वतः जेवणाची ताट-वाटी कशी स्वच्छ केली, याचे साग्रसंगीत वर्णनही प्रकाशित झाले. सेवाग्राम आश्रमात स्वातंत्र्यानंतरची कार्यकारिणी कमिटीची बहुधा ही पहिलीच बैठक असावी. सत्तर वर्षांनंतर का होईना, पण काँग्रेसला गांधीजींची आणि सेवाग्रामची आठवण झाली, हेही काही कमी नाही. पण एकदम अचानक अशी सेवाग्रामची आठवण का झाली? हा प्रश्न मात्र सर्वसामान्य माणसासमोर नक्कीच आहे. या कार्यकारिणी कमिटीच्या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले असले, तरी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते रणजीत सुरजेवाला यांनी सांगितले की ''यापुढील सर्व निवडणुका या गांधी विरुध्द गोडसे अशा लढवल्या जातील.'' या वाक्याचा खोलात जाऊन विचार केला तर प्रश्न पडतो की आताच म. गांधींची आठवण का आली? या आधीच्या निवडणुका काँग्रेस म. गांधी तत्त्वज्ञान वगळून लढवत होती का? आणि आता पुन्हा गांधींचा विचार जवळ करत आहे अशी कबुली तर या निमित्ताने काँग्रेस देत नाही ना?

मुळात स्वातंत्र्यपूर्व काँग्रेसवर महात्मा गांधींचा प्रभाव होता. ते काँग्रेसकडे राष्ट्रीय चळवळ म्हणून पाहत असत आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याची त्यांनी सूचना केली होती. पण नेहरूंनी ती सूचना मानली नाही आणि राष्ट्रीय चळवळीचे रूपांतर राजकीय पक्षात केले. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांतच म. गांधींची हत्या झाली आणि गांधी तत्त्वज्ञान अडगळीत टाकून केवळ राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या नावाचा वापर करण्याची होड लागली. स्वातंत्र्यानंतरची काँग्रेस ही म. गांधींची काँग्रेस नाही, पण या पक्षाने म. गांधींना आपल्या राजकीय जाहिरातीपुरते मर्यादित केले आहे. सेवाग्राम येथे झालेली कार्यकारिणीची बैठक ही आगामी तीन राज्यांच्या निवडणुका आणि 2019मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक यांच्या पार्श्वभूमीवर झालेली आहे. ही बैठक सेवाग्राममध्ये झाल्यामुळे म. गांधींचा उच्चार होणे स्वाभाविक होते. म्हणूनच काँग्रेसने जाहीर केले आहे की यापुढील सर्व निवडणुका या गांधी विरुध्द गोडसे अशा लढवल्या जातील.

प्रश्न असा आहे की, म. गांधींची हत्या करणारा गोडसे फाशी झाल्यावरही आज जिवंत का राहिला? गोडसेला जिवंत ठेवण्यात कोणाचे हित होते? गोडसेने म. गांधींचा खून केला, त्याचा नेहमीच निषेध झाला पाहिजे. पण त्याच्या नामजपाची माळ सदैव कोण ओढत असते? गोडसे आजच्या तरुण पिढीला कळतो तो काँग्रेस आणि तथाकथित पुरोगामी मंडळींच्या व्यवहारामुळे. गोडसेचा उच्चार केल्याशिवाय या मंडळींचे पान हलत नाही. कदाचित  त्यांच्या अस्तित्वाचा तो प्राणवायूही असेल. गोडसे संपला तर आपली पोपटपंची संपेल, अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे काही करून कोणत्याही विषयात गोडसेचा उच्चार केला की आपण जिवंत आहोत, याची त्यांना जाणीव होत असावी. गोडसेचे समर्थक गोडसेबाबत जेवढी काळजी घेत नसतील, त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात म. गांधींचे भक्त गोडसेचे स्मरण करताना दिसतात. गोडसेला फाशी देऊन सत्तर वर्षे झाल्यानंतही आज त्याच्या नावाचा उच्चार करत 'समाजात गोडसेवादाचा प्रभाव वाढत आहेत आणि गांधीवाद धोक्यात आहे' अशी सातत्याने हाकाटी कोण देत असते? काँग्रेसच्या संस्कृतीत तयार झालेले व स्वतःला पुरोगामी म्हणवणारेच गोडसेला जिवंत ठेवण्यास जबाबदार नाहीत का?

हे वर्ष महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीचे आहे. काँगे्रस ज्याला गोडसे विचाराचे समजते, त्या भाजपाची सत्ता काही राज्यांचा अपवाद वगळता संपूर्ण देशात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच आपल्या विविध योजनांतून महात्मा गांधींच्या विचाराचे, तत्त्वज्ञानाचे प्रकटीकरण करण्यास सुरुवात केली आहे. एका अर्थाने नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत साकार करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हेच काँग्रेसच्या दृष्टीने सोईचे नाही. काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात केवळ गांधींच्या नावाचे राजकारण केले, पण त्यांचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतीही ठोस योजना केल्याचा इतिहास नाही. मात्र त्यांना राजकारणासाठी गांधी हवे आहेत.

काँग्रेसला फक्त राजकारणासाठी, निवडणुका लढवण्यासाठी गांधी हवेत आणि आपल्या पक्षात गांधी आहेत हे सिध्द करण्यासाठी दुसरा पक्ष गोडसेचा आहे असे म्हणणे हे क्रमप्राप्तच आहे. त्यामुळे सेवाग्राम येथील कार्यकारी कमिटीत काँग्रेसला एकमताने निर्णय घ्यावा लागला की, यापुढच्या सर्व निवडणुका गांधी विरुध्द गोडसे अशा लढवल्या जातील. महात्मा गांधी ही व्यक्ती आणि तिचे तत्त्वज्ञान हा राजकारण आणि त्यातही निवडणुकांचा विषय नाही, हे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना माहीत असण्याची अजिबात शक्यता नाही. कारण याआधी त्यांनी 'गांधी आमचे, सावरकर तुमचे' अशी महापुरुषांची विभागणी केली आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखालीच गांधी विरुध्द गोडसे असा निर्णय झाल्यामुळे त्याच्याकडून वेगळी अपेक्षा ठेवणेही सोईचे नाही. मुळात अशा प्रकाचे राजकारण आणि निवडणुका डोळयासमोर ठेवून केलेले निर्णय हे काँगे्रसला सत्तेकडे घेऊन जातील की विसर्जनाकडे, हे येणारा काळच ठरवेल.